Sufi
Blessed with love!

क्षण आठवून आनंद होतो पण क्षणांच्या पाकळ्यांचा दिवसच आपला असेल तर ..? 
एखादाच पण संपूर्ण दिवस आपल्याला मिळावा, एवढंच स्वप्न प्रियकर वर्गाचं असतं. 
माझा देव त्यात फार रोमँटिक... त्याने दोघांच्या नावे म्हणून की काय, अक्षरशः पावसाळी अन् बर्फाळी वातावरण भिजू घातलं होतं. माझ्या मूडला उधाण आलं होतं. फार काही नाही पण तो जवळ असायलाच हवा होता हा अट्टाहास मनाला टाळता येत नव्हता. पण नोकरीवरून सारखं सारखं कितीदा सुट्टी घ्यायची. त्यात नात्याचे आणि प्रेमाचे चोचले अती जास्त असतात.
पण गोड असतात नाही? म्हणजे त्याशिवाय का आम्ही एकमेकांत बांधले गेले असतो?. त्यातल्या त्यात हे चोचले म्हणजे आवड होती एकमेकांची.
प्रेम शाबूत आहे, जोपर्यंत प्रेम तुमच्यात आहे. तेही दोन्ही व्यक्तीकडून तितकंच खरं नि महत्त्वाचं म्हणजे निरागस हवं.!त्याला या बाहेरच्या राजकारणी, दिखाऊ प्रेमाचा स्पर्शही नसावा! जे वेंधळटही चालेल, पण किमान त्यावर लिहिलं जावं इतकं स्वच्छ असावं! 
"तुझं पण ना.."
(मागून कुणाची बारीकशी पुटपुट ऐकू आली)
"कधीही लिहायला सुचतं बाई तुला. एवढा एकटा वेळ मिळालाय आणि आम्ही हे असे नशिबी ज्यांच्या नशिबी लेखिकाबाई आल्यायत. ज्यांना दोघांच्या एकट्या वेळेतही 'किस' सोडून कविता होताय." त्याने मुद्दाम मला डिवचत म्हटलं.
"दोन चहा चालतील.
चहा मसाला टाक फक्त." मी म्हटलं.
"बरं चालतंय, पण त्यानंतर मला दोन ओळी माझ्या हव्या! "
"हावऱ्या, तुझ्यावर मी केसच करणारे ! असं दरवेळी माझ्या लेखणीकडून रिश्र्वत घेतोस... " 
"चहा हवाय ना? " त्याने खोडकरपणे विचारलं. 
"अरे मुसाफिर, तुम सिर्फ बनाकर लाओ | हम हमारे लहेजे
के साथ आपके सामने आपका पेगाम हाजिर रखेंगे...|"
"उफ ! आलोच ... "


अंहा, हे दिसतंय तितकं साधं नाही हां...

एक खोली दोघांना मिळणं... सगळं सुरळीत होणं अजिबात नाही. तेही जात-पात, स्त्री चारित्र्य, अविवाहित मुलगा मुलगी एकत्र आणि महत्त्वाचं म्हणजे शेजाऱ्यांच्या उपस्थितीत एका खोलीत लग्नाआधी पलंगापर्यंत जाणं म्हणजे भलतंच दरारक!
पण तरीही... बॉयफ्रेंडच्या मित्राचं घर तो नसताना रिकाम ठेवणं, आपल्या नव्या शास्त्रात न बसणारच. बॉयफ्रेंडने मित्राकडे प्रस्ताव ठेवण्याचा उशीर मित्र राजी न व्हायचा प्रश्न दुरदुरवर नव्हता. त्यामुळे तो जाणार हेच आमच्यासाठी प्रेमाचं स्वप्न रुजू करायची वेळ होती. अन्ह... शारीरिक नाही, रोमँटिक नि अलगद भावनिक स्वप्नकथेचं स्वप्न!
खूप बोलायचं, ऐकायचं, लिहायचं, अनुभवायचं नि हे सगळं करून कसलीच घाई न करता त्याच्या मिठीत गुडूप व्हायचं, एवढंच या आजच्या दिवसाचं सुख येणाऱ्या कित्येक निराशांना परतवणार होतं. 
आम्ही दोघे आनंदून गेलो होतो. हुरहुर मनात होतीच पण एक वेगळचं जग एका दिवसात फील करायला मिळणार होतं. म्हणजे लिव्ह-इनचं एक पाऊल आम्ही जगणार होतो. भीती नव्हती, उत्सुकता होती...
नव्या नात्याचा जिव्हाळा अजीर्ण करेल असं काहीतरी करावं, एवढाच ध्यास मनी होता. नात्यातील काही गोष्टी किरकोळ भासत असल्या तरी त्या किरकोळ थेंबात पावसासारखं मजबूत नि मनमोहक आयुष्य साकारण्याची धमक असते.
"मोहतर्मा, आईयेगा जमीन पर. ये गालिब इंतजार कर रहा हैं|" त्याचा चहा झाला होता..
मी या एवढ्या विचारांच्या गर्तेत त्याच्या अजीर्ण अस्तित्वाला लिहित गेले होते...
तर्र... तुझ्यासाठी...

दोन शब्द लिहिले, एक मोठ्ठा शब्द लिहिला. 
पण...
पण कर्ज तुझं जास्त आहे, वर काळजीचं व्याज वाढलंय. कोणत्या दोन ओळी लिहू? 
.
तुझं प्रेम लिहू की तुझा स्पर्श लिहू की तुझ्या असण्याच वर्णन करू? की लिहू तू किती हवायस मला? 
कोणत्या दोन ओळी लिहू? 
.
त्या ओळींना चंदनाची दृष्ट लावू की तुझ्या प्रेमाची साठवण टाकू? कोणत्या दोन ओळींत मावतं हे प्रेम? कपाट थोडी आहे की कप्प्यात टाकलं नि मावलं हे प्रेम !
...
त्यापेक्षा हे बघ... या डायरीवर, इतकं मुक्त सोडलंय मी त्याला. 
त्यामुळे दोन ओळी खोडून, लिहून प्रेमाच्या एका भावनेचं किती संशोधन केलंय, ते कोण्या शास्त्रज्ञाच्या बस की बात नहीं समझे खुश नसिब| 
पण... 
तरीही ज्याला शेवट नसतो असा चहा आहे तुझं प्रेम, 
ज्याची तक्रार असते असा प्रश्न आहे तुझं प्रेम! 

...

अशा दोन ओळी आहेस तू, ज्याला नेहमीच लिहून पुन्हा लिहित रहाव वाटतं! 
किंवा मग ... 
"ए किंवा मग काय? हा काय महाप्रसाद आहे?" तो मग्न ऐकत होता, पण त्याचा कुठल्याच प्रतिसाद नाही म्हणून मी चिडत म्हटलं,
एकवार चहाचा चस्का घ्यायचा उशीर त्याने माझ्या मानेवर त्याची हनुवटी ठेवत विचारलं, 
"पसारा नको, मुसाफिरला मंजिल ऐकायची आहे." तो म्हणाला
"थोडा मुश्किल हैं। ". मी उत्तरलो
"इश्क कहा आसान था? 
हम तरस रहे हैं...." त्याने प्रत्युत्तर केलं.
" सुनियेगा..." मी प्रयत्न करत म्हटलं. 
"क्यों? क्या सच में इतना खूबसूरत होता हैं दूसरा कोई?...
(याने हम...)
जो इंसान खुद के हिस्से का प्यार बिनशर्त बाट देता हैं बेझिझक |" 
....
इतकं हेट करतेस ? 
खूपच ! 
ये की अशी मग... त्याने लागलीच शब्दांसह मला मिठीत ओढलं.  हा पाऊस खट्याळ आपल्याला मिठीत पाहायला त्रस्त झाला नि तुला त्याच्यावर लिहून त्याला खुश करायचं सुचतंय, अन् तरीही त्या खट्याळला आपलं हे प्रेम मिठीत पहायचंय !
"खोटारडा शहाणाच आहेस की!" 
"चहा आणला ना, ये की मग अशी जवळी!"
गुदगुली नको ना, उघड्या अंगाला ओढ तुझ्या स्पर्शाची आहे, गुदगुल्या कसल्या करतोयस. तुम्हा आजकालच्या मुलांना प्रेमही जमत नाही. हे प्रेम कसं अलवार हवं. बागेतल्या झाडांवर फुलपाखराने भिरभिराव पण फुलाला टोचुही नाही, स्पर्श बागडावा या मोकळ्या कळीवर !
नि तोच त्याच्यातल्या प्रियकराला छेडल्यामुळे इम्रान हाश्मी जागा होत त्याने अलगद माझ्या पाठीच्या कडांना त्याच्या बोटांच्या स्पर्शाने लयीत ओघळत नेलं, पावसाचा थेंब पाडवा तसं नि शहारून मी मिठीत जावी त्याच्या इतकं अलवार नि रोमांच उभे करणार होतं.
यापुढे काही होणार नाही, असं काहीसं मनात होतं, कारण शारीरिक प्रेमाने भावनिक प्रेम दुरावलं जातं.
त्याने अलगद मला कोणत्याच नजरेने न पाहता उचलून हलकेच बाथ टबात नेलं. तोच स्पर्श नीलायम ठेवत त्याने आमच्या ठेवणीतले निकोलसचे " ए वॉक टू रिमेंबर" हे पुस्तक वाचायला सूरुवात केली. पण वाचता वाचता एका वाक्याशी अचानक तो थांबला नि म्हणाला, बघ ना...
या पुस्तकासारखा एक वॉक तर आपण घेतलाय. या पुस्तकाला वाचताना आपण एकमेकांसोबत हा वाचनाचा प्रवास तर केलाय. पण हा लेखक निकोलस स्पार्क्स पुस्तकाचा शेवट असा करतो की, "आपल्या प्रेमातला हा पायी प्रवास खडतर पण लक्षात राहणारा होता. यामुळेच मला चमत्कारांवर विश्वास बसू लागला. हा प्रेमाचा चमत्कार एवढा सुंदर असतो आणि शेवटी ती मरते."
याला काय अर्थ आहे... या वॉक मध्ये सगळचं तुटक आहे, कशालाच पूर्णत्व नाही. वॉक हा असा अर्धवट राहतो...?
तो इमोशनल होऊन त्या टबा वर डोकं टेकवून बोलतच राहिला. .
"होना, अर्धवटच राहतो."
म्हणत मी त्या टबाच्या कड्यावरून पळून जात घासरणारच तोच त्याच्या पिळदार हातांनी माझ्या कमरेच्या विळख्यात हातांचा स्पर्श गुंफवून त्याने मला सावरत जवळ घेतलं नि म्हणाला,

"पुस्तक किती प्रश्न किती उत्तरे आणि किती समजूतदार बनवतात ना माणसाला? आणि या पुस्तकांची लेखिकाच मला मिळाली...
आपला वॉक अर्धवट नाही ठेवणार मी! कधीच नाही, मी तुला उचलुन घेऊन चालेल, तू साथ देशील ना? ..."
-----




पाऊस नेहमीसारखा बरसत होता.
वातावरण काहीसं असं होतं... नोकरीच्या निर्जीव भिंती, मनाला लागलेलं बंधन, समोर कॉम्प्युटरची निगरगट्ट भिंत, शेजारी पाण्याची बॉटल अन् माझ्या डोळ्यात खिडकीच्या काचेला चिकटलेले ते थेंब... हळूच आत शिरलेली रोमँटिक हवा, झाडांच्या पानांवर धोधोधोधोधो बरसणारा तो...
याला काय अर्थये.?
त्याने मनसोक्त स्वतःच्या असण्याचा आनंद घ्यायचा आणि आम्ही ते बाटलीच्या आत बंद झालेलं पाणी तोंडात टाकून मुक्त उडण्याची सगळीच तहान भागवायची.?
नैराश्यात ते ऑफिसाच रटाळ काम करत मी ना उम्मीद बसले होते.  तोच ऑफिसात उमीद येते. ऑफिसात उमेद आहे,  आशा आहे एक विरणारी आशा.!
एक अनावधाने समोर आलेला क्षण! ज्याच्याकडे मी फक्त बघतच राहिलेले क्षणभर !
या ऑफिसच्या आझादी कोंडलेल्या माहोलात अलगद दरवाजा उघडला. एक थंड वाऱ्याचा झोका आला नि एक चमचमीत पिळदार शरीरयष्टी असलेला पुरुष केसांच्या हालचालीला दोन्ही हाताने मागे करून त्या अंगाला चिकटलेल्या टाईट सफेद शर्टाच्या बाह्या वरती सरसावत ऑफिसमध्ये शिरला... रोमँटिकपणा मी मनात दडवत त्याच्याकडे फक्त एकवार बघत मनात सगळा खेळ सुरु केला...
पांढऱ्या सदऱ्यात लपेटलेला तो ओल्या कपड्यात ओल्या मातीतलं शिल्प भासत राहिला. त्याची प्रत्येक हालचाल माझ्या मनात प्रणयक्रिडेची आशा जागवत होता. या वातावरणाला जागत हृदयाच्या आत गंटागळ्या खाणारं मन बॅकग्राऊंडला 'हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले' म्हणत म्हणत अचानक त्याच्या सोबतीला गेले. चित्रपटात जसं सलमान खान ऐश्वर्याच्या मागे पळत विदेशात जाऊन गाणं म्हणू लागतो ना अगदी तसं!
Captured: Pooja Dheringe
या मूडमध्ये एकदम हातात हात घालून मॅरेथॉनमध्ये धावावे तसे आम्ही कात्रजच्या टोकाच्या टेकडीवर पळत पळत गेलो. एकमेकांकडे बघण्याची फुरसत काढून बघणार होते मी त्याच्या शरीरावरून ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबांना पण पाऊस इतका घनदाट बरसु लागतो की मनाला बेफान होऊन त्याची बेगम होऊन भिजायचच असतं.
दोघेही अल्लड होऊन त्या टेकडीच्या रस्त्याने पाखरासांरखे बेछूट रस्ता कापू लागतो. जाताना एका पॉईंटला दोघे थकून जातो. थांबावं वाटतं, पण दूरवर एक दिवा चमकलेला दिसतो, तिथे जाईपर्यंत हाय खायची नाही म्हणून त्या टपरीवर  जायची स्पर्धाच लागते.
एका पॉईंटला तर इतकी सुंदर अत्तर शिंपडणारी बाभूळ लागते, तिचं सौंदर्य पाहून  दोघांच्या पावलांची हालचाल एकाच ठिकाणी स्तब्ध होते. तो हळूहळू पाऊल टाकत माझ्या जवळ येऊ लागतो. मी स्वतः ला त्याच्या जवळ नेत दूर जाऊ लागते.  त्या काळ्याकुट्ट बाभळीच्या काट्यांच्या खाली छपराला गळती लागावी तसे थेंब दोघांवर बरसू लागतात. दोघांची हालचाल थांबते. तो माझ्या जवळ आलेला असतो. मी आधीपासूनच त्याची झालेली असते. तो बघत राहतो. काजवेही आमच्यात सामावून गेलेले असावे, एवढी शांतता पसरते. पावसाच्या तडाख्यात मध्येच एखाद्या विजेचं येणं होतं. हिंदी चित्रपटात ती त्याच्या कवेत जाते, तसं खऱ्या आयुष्यात कुठलाच सीन होत नाही.
वीज येऊन जाते. वास्तवातील मुलगी मात्र स्वतःच्या चारित्र्यावर सफेद चादर पांघरून स्वतःलाच कोंडून घेत राहते. ती विजेला घाबरून त्याच्या मिठीत जात नाही आणि तोही शाहरुख खान होत नाही. पण हेच वास्तव धावत जातं जेव्हा वरती तो बरसत असतो,
मनात एक ना अनेक हरहुन्नरी भावना उफाळत असतात पण बाईने आधी पुरुषाच्या जवळ तरी जावं का? मनात किंतू येतो आणि पुरुषात हे क्षण सोडण्याचा संयम मात्र नसतो. तोच मी निशब्द आणि स्तब्द होते.
शेवटी त्याने मला आहे तसं जवळ घेण्याच्या अपेक्षेविरहित मीच जाते... त्या कुठला अबला नारीची पांढरी चादर दूर भिरकावून देत, त्याच्या त्या सरसावलेल्या पांढऱ्या सदऱ्याला गच्च धरत मिठीत घेऊन त्याच्या त्या वरच्या बटणाला खाडकन तोडत त्याच्या 'असण्याला' मिठीच्या आकाशात संपूर्ण घेऊन इतकं घट्ट करते की, ही रात्र या मिठीच्या आकाशात अशीच घट्ट राहावी अन् त्याचे चुंबन माझ्या कपाळाच्या क्षितिजावर दीर्घकाळ असावं ! ज्याचं कुण्या अडगळीतल्या चित्रकाराने पंचवीस वर्षानंतर जसच्या तसं काळं-निळं चित्र काढावं. लोकांनी त्या चित्रात जाऊन अनुभवावा माझ्या ऑफिसातल्या स्वप्नातल्या पांढऱ्या राजकुमाराला नि त्या शरीरयष्टीला अन् त्या रोमान्सला जसच्या तसे हुबेहूब.!  
.
पण, "रोमान्स त्याला काढता येईल?"
माझ्या या अडखळत्या स्वप्नांत मी कुठे हरवून गेले होते माझं मलाही कळलं नाही. पण त्याच्या पापण्यांचा थेंब माझ्या कपाळावर पडला तेव्हा माझी तंद्री तोडून मी त्याच्याकडे आकाशाकडे एकटक पहावे तसे पहातच राहिले. त्या नजरेत या मादक निसर्गातील अवकाशाचा स्पर्श होणं शक्य वाटलं!
त्याचा स्पर्श होऊ लागला होता. एक मादक रसायन जेव्हा स्पर्श करतो, रोमांच उभे राहतात अंगभर.
काहीच सोडावं वाटतं नाही. पण ती झोपडी आमची वाट पाहत असते.
तरीही त्याचा मादक स्पर्श माझ्या सर्वांगावर हावी होऊन गेलेला असतो. या क्षणाला समाजाचे गालबोट लावण्याआधी आम्ही दोघे एकमेकांना स्वतःच्या हबकत्या स्थितीत ठेऊन चालू लागलो.
अशावेळी स्वतःच्या श्वासांचा वावर उघड्या अंगावर होऊ लागतो. सगळ्या धमण्यांत तेवढंच काय ते जीवंत वाटत असतं.
शेवटी श्र्वासांच्या गतीत पाऊलांचा खेळ करत आम्ही झोपडी पर्यंत येतो खरे! आता मात्र समाज आजूबाजूला होता. 'मर्यादांचा बांध या मोकळ्या शेताला घातला गेला होता' या ठिकाणी मात्र आम्ही एकमेकांकडे बघून सगळ्या शारिरीक अनुभूतीच्या कल्पनांचा स्वर्ग गाठत होतो.
कल्पनेच्या दुनियेची मला खरंच मजा वाटते, हे जग जे आपलं नाही, जे जगू शकत नाही, याची किंचितही खंत मनाला भासू देत नाही.
या दुरून दिसलेल्या झोपडीत एक काजळीत सत्तरी गेलेला कंदील होता, एक सत्तरीची आजी, एक स्टोव आणि तीन पाच लोकांची गर्दी.
आम्ही दोघे पावसाने ओलेचिंब नि कुडकुडत अवघडलेल्या स्थितीत आत आलो. त्यातल्या तिन्ही मुलांनी माझ्याकडे वळून पाहिलं नि दोन मुलींनी त्याच्याकडे वळून पाहिलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.

शरीराचं आकर्षण खरंच इतकं ऍट्रॅक्टिव्ह असतं का?
इतकं सुंदर असतं की एक महोल तयार होतो, कुठल्याही अत्तराविना एकमेकांकडे बेहकले जाण्याचा माहोल. पण आम्हाला त्या माहोलचा भाग व्हायचं नव्हतं. आम्ही एकमेकांतच पुरेसे आणि तरीही खूप जास्त प्रेम करायला उरलेले असे होतो. 
आम्ही दोन चहा मागवले. आजीने तिच्या जुन्या काळातला मटका चहा दिला. चहाची चव ही खरी, त्यात त्याचं माझ्या खांद्यावर हात टाकणं, हळूहळू झोपडी बाहेरचा चंद्र दाखवत माझ्या गालाला ओढ लावणं.
मी तर क्षणात विरघळून गेले होते. इतकं सगळं गोड्ड अन् स्वप्न सुख होतं... ते इथे संपत नाहीच, आम्ही आमच्या मनात असताना टिक म्हणत टेप ऑन होतो, अंहा ss अहहाह अन्हा अहहाहा " टीप्प टीप बरसा पानी"
उफ !
तन, मन आणि संपूर्ण जगच प्रेमाच्या धुंदीत बुडालेलं होतं आणि त्याचं जवळ असणं? हे कुठल्याच उपमेच्या बंधनात अडकतच नव्हतं. त्याचा सहवास बस! याहून सुख नव्हतं .
ते गाणं लागलं त्याने माझ्याकडे, मी त्याच्याकडे अन त्या पाच जणांनी आम्हा दोघांकडे पाहिलं. कारण नकळत आम्ही एकमेकांच्या इतक्या जवळ आलो होतो की, एकमेकांचे ओठ एकत्र होण्याचा उशीर होता. ते अधीर होऊन आमच्याकडे पाहू लागले होते.
तितक्यात,
"असाइन्मेंट झालेली दिसतेय ?" जवळून आवाज आला.
आं? मी गोंधळून जागी झाले...
ओह ओह ओह गॉड. कसे हे भारतीय लोक्स यार. ! मोक्याच्या क्षणी सुख गेलं... हे ऑफिसवाले प्रेमही करू देत नाही यार....
मग काय,
त्याबाहेरच्या 'टीप टीप बरसा 'ला  खिडकीच्या कांचांत रंगवून, तीच काच पुन्हा पुसून टाकून मी त्या निगरगट्ट स्क्रीनकडे लक्ष देत त्या कल्पनेच्या विश्वाला उद्गारवाचक चिन्ह लावून झोपडीच्या काळया बाकावर ठेऊन आले.
अशी कल्पनेतली प्रेमं खरे किती खुशनसीब होऊन हवं तसं जगून घेता, नाही.?
ऑफिसवाल्यांचाही एक अलगच रोमान्स असतो, मनातल्या मनात शिजणारा आल्हाददायी गुपचूप क्षण असतो !...


भारतातील मासिक पाळीचे एकंदरीत स्वरूप समजल्यानंतर हीच परिस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी असेल, या विषयाचा टॅबू, व्याप्ती आणि दृष्टिकोन कसा असेल हे समजून घेणे औत्सुक्याचे होते. पुढारलेले देश म्हणजे पुढारलेली मुक्त मानसिकता का? हे प्रश्नचिन्ह डोक्यात होतं. तोच याचा अभ्यास सुरू केला...
जगात आणि आश्चर्य वाटेल पण भारतातही काही चांगल्या प्रथा आहेत, ज्यात मुलींची पहिली मासिक पाळी साजरी केली जाते. या शोधानंतर काही देशांतील मासिक पाळी संबंधित प्रथांबाबत समजले ते खालीलप्रमाणे;

१. दक्षिण भारत : 
आपल्या भारत देशात भलेही पाळी विषयी अनेक गैरसमज आणि मान्यता असल्या तरी देखील, दक्षिण भारतात ह्यासंबंधी एक चांगली परंपरा बघायला मिळते. ज्यानुसार जेव्हा मुलीला पहिली पाळी येते तेव्हा तिची पूजा केली जाते.

२. फिलिपिन्स : 
फिलिपिन्समध्ये जेव्हा कुठल्या मुलीला पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिची आई तिची पाळीची पॅण्टी स्वतः धुते आणि त्यानंतर त्या पॅण्टीला मुलीच्या चेहऱ्यावर लावल्या जाते. ह्यामागे त्यांची अशी मान्यता आहे की, ह्यामुळे मुलीच्या चेहऱ्यावर मुरूम येत नाही. तसेच मुलीला तीन पायऱ्यांवरून उडी देखील मारावी लागते. ह्याचा अर्थ असा की तिला तीन दिवसांची पाळी राहील.
३. आईसलंड :
आईसलंड येथे मुलीला तिच्या पहिल्या पाळीवेळी रेड केक खायला मिळतो. हा केक लाल आणि पांढरा असतो, जो तिची आई बनवते.

४. जपान : 
जपान येथे मुलीच्या पहिल्या पाळीवेळी तिची आई ‘Sekihan’ नावाचा एक पारंपारिक पदार्थ बनवते. ह्या पदार्थात तांदूळ आणि बिन्स असतात. ह्यावेळी संपूर्ण कुटुंब ह्या पदार्थाचा आस्वाद घेतात आणि मुलीची पहिली पाळी साजरी करतात.

५. ब्राझील :
ब्राजीलमध्ये तर ही एक ब्रेकिंग न्यूज असते. नातेवाईकांमध्ये ह्याची घोषणा केली जाते आणि ही बातमी साजरी केली जाते.

६. इटली :
इटली येथे पहिल्या पाळी नंतर मुलीला ‘Signorina’ (miss/young lady) असे म्हणून संबोधले जाते. येथे देखील सर्वांना ही बातमी सांगितली जाते. एवढच नाही तर लोकं मुलीचे अभिनंदन करण्यासाठी देखील येतात.

७. दक्षिण अफ्रीका :
दक्षिण आफ्रिका येथे मुलीला तिच्या पहिल्या पाळी वेळी एक ग्रँड पार्टी दिली जाते. त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या जातात. पण पाळी दरम्यान त्यांना तीन दिवस घरातून बाहेर जाण्यास मनाई असते तसेच त्यांना पुरुष आणि लहान मुलांपासून देखील दूर राहण्यास सांगितले जाते.


८. इस्त्राइल : 
इस्त्राइल येथे मुलीला पहिल्या पाळीच्या वेळी मध खाऊ घातला जातो. ह्यामागे अशी मान्यता आहे की ह्यामुळे तिला तिच्या पुढील मासिक पाळीत त्रास होणार नाही.


९. कॅनडा : 
कॅनडा येथे मुलींच्या पहिल्या पाळी संबंधी एक विचित्र प्रथा आहे. येथे पहिली पाळी आल्यावर ती मुलगी एक वर्षांपर्यंत बेरी खाऊ शकत नाही. एक वर्षानंतर तिला जेवढ्या वाटेल तेवढ्या बेरी ती खाऊ शकते.

१०. तुर्की : 
तुर्की येथे देखील पहिल्या पाळी संबंधी एक विचित्र प्रथा पाळली जाते. येथे मुलीला पहिली पाळी आल्यावर तिच्या कानशिलात लगावली जाते.

११ आसाम: 
आसामच्या कामाख्या देवीचं मंदिर एक शक्तिपीठ म्हणून पाहिलं जातं. हे मंदिर गुवाहाटी इथे आहे. कामाख्या देवीला "Menstruation Goddess" असा दर्जा दिला आहे - म्हणजे 'मासिक पाळीची देवी'. एकीकडे शक्तिपीठ म्हणून कामाख्या देवीची पूजा केली जाते तर दुसरीकडे मासिक पाळीबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धांना वाव दिला जातो.

१२. नेपाळ :
नेपाळच्या खासकरून पश्चिम भागामध्ये आजही मासिक पाळीच्या चार दिवसांत स्त्रियांना घराबाहेर, गावाबाहेर एका छोटय़ा खोलीत, ज्याला ‘छोपाडी’ म्हणतात, तिथे जाऊन राहावे लागते. काही जणींना गोठय़ात त्यांचे ‘ते चार’ दिवस काढावे लागतात, तर काही जणी त्यांच्या घराच्या खालच्या अंधाऱ्या जागेत चार दिवस राहतात, असं सांगितलं जातं.

मासिक पाळी या गोष्टीकडे आपण कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलंच नाही. भारतातच नव्हे तर जगातील अशा बऱ्याच देशांमध्ये मासिक पाळीबद्दल आजही निष्ठुर, निर्दयी अंधश्रद्धा पाळल्या जातात.


जगभर 'अशीच' मासिक पाळी !

by on जुलै २२, २०१९
भारतातील मासिक पाळीचे एकंदरीत स्वरूप समजल्यानंतर हीच परिस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी असेल, या विषयाचा टॅबू, व्याप्ती आणि दृष्टिकोन ...

-मिसेस मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर नापसंती


मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सांडगे वाळत घालणारी बाई पहिली का हो. !
विनोदच आहे हा.
महाराष्ट्रभर गाजलेली आज्या आणि शितलीची बॉर्डर वरची लव्ह स्टोरी संपून त्याजागी एक अशी मालिका आली ज्यावर सोशल मीडियावर बऱ्याच स्त्रियांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया देऊन पोस्ट लिहिल्या. मिसेस मुख्यमंत्री नावाने.
त्या पोस्टींवर कमेंट्सच्या माध्यमातून पुुुुरुषांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न ही केला.
मग मला प्रश्न पडला, आक्षेपार्ह असण्यासांरखं त्यात आहे काय ?
तेव्हा ट्रेलरवरून अंदाज आला.  ही मालिका काल्पनिक पात्र आणि घटनेवर आधारित आहे.  म्हणूनच त्यात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याची बावळट बायको हे समीकरण दाखवले आहे.
जर समजा तुम्हाला कोणी सांगितले. की मुख्यमंत्र्याची बायको ही गाडीवर वडे / सांडगे वाळत घालते तर? किंवा मग मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक चालू असताना बिनडोक सारखी दारातून डोकावून त्यांना आवाज देते, मुख्यमंत्री ऐकत नाही तेव्हा ती खट्याळ पणे म्हणते की, "अहो आज कुणी गडी माणूस नाही तेवढे दळण आणून देता का ?"
मग तिसऱ्या प्रोमोत हे दिसते की मुख्यमंत्री, इतर नेते आणि बायको कुठेतरी जात असते पण मध्येच म्हशी आड येतात तेव्हा बायको गाडीतून उतरते आणि म्हशींना त्यांच्या स्टाईलमध्ये हकलते.
हे हास्यास्पदच नाहीं का?
तरी सोशल मीडियावर स्त्री वादी स्त्रिया यावर बोलता, चिडता आणि भांडताय.
याचं कारण काय असेल ? म्हणजे स्त्रियांना हा विनोद आवडत नाही आणि पुरुषांना तो पटतोय. ?
मग मला वाटलं की विनोदासाठी यांच्याकडे असा बावळट नवरा का दाखवला गेला नाही?
मग प्रश्न येईल की या आधी अस झालं तेव्हा अशा स्त्रियांनी त्या लेखकाची पाठ थोपटली नाही. पण मग आज का या विनोदाच्या पद्धतीला गांभीर्याने घेतलं जात आहे?
तेव्हा मला आठवतात, ते नवरा बायकोचे मेसेजेस. जे प्रत्येक सोशल मीडियावर फिरत असतात. असे वाटते त्याचा आस्वाद घेण्याची सवय लग्न झाल्यानंतर प्रत्येक पुरुष स्वतःला लावतोच. याचाच पुढचा परिणाम म्हणजे आता तर स्त्रियाही हे स्वीकारून त्यावर हसतात. चला हवा येऊ द्या सारख्या प्रचंड लोकप्रिय शोज मधून याचे भागच्या भाग प्रसारित केले जातात.
यावर मन नाही भरत तर मी बघते माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका. तर तुम्ही म्हणाल बायकोला बिझनेस वुमेन दाखवायची तर त्याचा ग्राफ खालून वर असावाच. त्यासाठी बायकोने आधी बावळट असायलाच हवं. याचेच उदाहरण 'पुढचे पाऊल ' सीरियल. त्यामधील बायको धूळ पडलेला लॅपटॉप पाण्यात भिजवून वाळत घालते.
विनोद बुद्धीची वाहवा नाही करावी वाटत. वाटते,
आजही मराठी चित्रपटांना जसे चांगले दिवस येत आहे तसे मालिकांना केव्हा येणार?
मालिकांचे भाग लिहिताना कोणती मानसिकता डोक्यात असेल लेखकाच्या? या बायकोच्या अशिक्षित अडाणीपणाचा बोभाटा, त्यातून प्रेक्षकांकडून वाहवा, तिची भावनिक बाजू, नवऱ्याचा पुरुषीपणा याशिवाय   सिरियल बनणार कशा? आणि बनल्या तरी प्रेक्षक त्या स्वीकारतील? तर अशावेळी आठवण होते ,"एका लग्नाची दुसरी गोष्ट, दिल दोस्ती दुनियादारी सारख्या खुमासदार शैलीत उचलून धरलेल्या मालिकांची.
आज झी मराठी सारख्या ताकदीच्या वाहिनीवर यासारखी कृती दाखवली जाते. पुरुषांचे म्हणणे आहे की, इतक्यात या सीरियलचा प्रोमो बघून मत प्रदर्शन नको, कारण यात पुढे ट्विस्ट असतील. काय ट्विस्ट? कोणती वळणे? जास्तीत जास्त काय होईल ? एक बावळट गृहिणी बायको मुख्यमंत्री होऊन घरासह राज्य सांभाळेल. अशा स्क्रिप्ट लिहून काय होतं माहिती?
पहिले तर या अशा मालिका बघणारा वर्ग गृहिणी आणि जास्तीत जास्त कंटाळलेल्या पुरुषांचा असतो. त्यामुळे लेखक विचार करतो, या प्रेक्षक वर्गाच्या आवडीनुसार आणि अपेक्षेनुसार मालिका बनवू. म्हणजे माझी लेखणीही गाजेल आणि प्रेक्षकही खुश. पण असे प्रयोग खूप कमी होतात जिथे लेखक आपल्या लेखणीतून अनपेक्षित कलाकृती बनवतो. ज्यातून जास्त काही नाही पण आपण जे लिहिलं त्यातून मानसिकतेत बदल होतो.

मला माहिती आहे आपला समाज ना कीर्तनाने सुधारला ना तमाशाने बिघडला. पण मला हे चूक वाटतं, कारण गृहिणीच्या वागण्यात मालिकांमुळे नकळत एक बदल घडत असतो कारण मालिकांचे आयुष्य हे जास्त असते.  त्यामुळे बघणाऱ्यांच्या कानावर, डोळ्यावर, मनावर हे नकळत परिणाम करत असते. आणि एखादी गोष्ट सतत कानावर पडत राहिली की आपणही ती तशीच आहे असे मानून चालतो. त्यामुळे आपला समाज हा बदलत्या मानसिकतेचे नाटक करतो. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने विडंबन करून स्त्रियांचं सामर्थ्य पचनी पाडण्याचा लेखकाचा प्रयत्न प्रामाणिक का असेल पण या सगळ्याची गरज नाही वाटत.
कारण देश इतकी शतके पुढे गेला तरीही आजही बाष्कळ आणि बावचाळलेली विनोद बुद्धी बदललेली दिसत नाही. आपली पायामुळे आणि संस्कृती लोक सोडत नाही, सोडणार नाहीत. त्यामुळे हे असे केविलवाणे प्रयत्न एखाद्याच्या दुर्बुद्धी ला आवडणारे असतील पण त्याचे नकारात्मक परिणाम होत असतात.
विनोद बुध्दीचे प्रकार नसतात. तीही लिंग भेदात विभागलेली असते. हे माझं विधान काहीसं स्त्रीवादी असेलही पण मला चुकीचं वाटत नाही. कारण माझ्यासमोर दोन उदाहरणे उभी राहतात, एक काल संसदेत रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वापरलेली विनोद पद्धती आणि तीच विनोद बुद्धी  स्त्रियांवर विनोद करायचे म्हटले की तिचा कमीपणा लक्ष्यकेंद्री करून किंवा जास्तीत जास्त तिच्या शरिरपर्यंत मर्यादीत असते.

त्यामुळे स्त्रीवादी न होता हा केविलवाणा प्रयत्न नाकारण्याचे धाडस करेल. पण या मालिकेच्या पूर्व जाहिरतीवरून लेखक काहीतरी शिकेल, अशी अपेक्षा .

विनोदबुद्धी की मागासलेपणाचे प्रतिबिंब

by on जून २३, २०१९
-मिसेस मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर नापसंती मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सांडगे वाळत घालणारी बाई पहिली का हो. ! विनोदच आहे हा. मह...


"दूर ५० मीटरवर एक बाबा उन्हाळ्यात पाणी, आईसक्रीम विकत बसलेले दिसतात."

त्यांच्याशी संवाद वाढवायचा, त्यांना म्हणायचं,
"काय हो बाबा, हि दगडं कशी पडली?" यावर ते त्यांच्या रोजच्या पर्यटनाची कॅसेट सुरू करतात.
त्यात एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली जाते, "ते तुम्हाला आवडतेय ना दूरवर ते झोपडीचं ठिकाण. तिथे अजिबात जाऊ नका ( दबक्या आवाजात).
हे काहीतरी थ्रिलिंग वाटत होतं म्हणून मी त्यांना विचारलं, "का हो बाबा? छान आहे कि ती झोपडी. या मंदिरासारखी पडलेलीही नाही."

त्यावर ते काहीच आश्चर्य न दाखवत म्हणू लागतात, "काही दशकापूर्वी त्याच दूरवरच्या झोपडीत एक वर्हाड गेलं होतं. तेव्हा झोपडीच्या तिथून लागलीच मंदिरात यायला भुयार होतं. लोकं पाण्यामुळे तिथून ये-जा करायचे. पण एके दिवशी त्या भुयारातून गेलेलं जोडपं अन त्यांच्याबरोबरच वऱ्हाड पुन्हा कुठे कधीच दिसलही नाही आणि मंदिरापर्यंत पोहोचलही नाही. त्यामुळे इथून जाताना थोडं जपून!
तेथील कोरडी जमीन, अनोळखी माणसे आणि हे वेगवेगळे किस्से यामुळे मनाचे आधीच भीतीने खिळखिळे झालेले फुफ्फुस हळूहळू स्वतःला समजावू लागताच ते पुढे म्हणतात,
"तुम्ही आता ज्या उंच कळसाला पाहत आहे ना, त्याची दगडं आतून पोखरली गेली आहे आणि ते बाजूचं वेगळं पडलेलं मंदिर आहे ना, त्याच्या आत गेले की एका वृत्तपत्राच्या पानावर कुंकवाचे सडे दिसतील. त्या आतल्या भागाला ओलांडण्याचे चुकूनही धाडस करू नका."
तरी बरे त्यांनी सांगायच्या पूर्वीच ते धाडस मनाने करून झालेलं होतं. त्यामुळे मनात कसलाच किंतु न ठेवता ते अनुभवले तरी.
त्यात वेगळं काही नव्हतं. कारण 'कुंकवाचा पडलेला लाल सडा हा मनाला अडवेंचर जगायला शिकवतो.'
मी ते डोळ्यासमोर आणून बाबांचं ऐकू लागते.
बाबा बोलू लागतात, "अन् त्याच एकट्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूच्या शिळांना दुसऱ्या एका बारीक दगडाने वाजवून पाहा. तिथे असलेल्या प्रत्येक पाच दगडातून वेगवेगळा आवाज येतो. हा प्रयोग मी करून पाहिलाच. तेव्हा मला कळलं प्रत्येक दगडाची ठेवण ही वेगळी आणि काही दगडे ढीली झाली आहेत. बरीच कारणं असू शकतात. त्यामुळे या गोष्टीला मी घाबरले नाहीच.
मग "हा मंदिराच्या बाजूलाच एवढ्या मोठ्या दगडांचा ढीग कसा? "

मी खूप वेळ त्या ढीगाकडे पाहत होते, तेव्हापासून डोक्यात सतत चालू होतंच. तोच ते म्हणाले, "हा मंदिराच्या बाजूलाच एवढा मोठा दगडांचा वेडावाकडा ढीग तो त्या काळात होता मोठा तटबंदी दरवाजा."
असे वाटले जसे काही वर्षांपूर्वी घडलेलं सगळंच कल्पनेच्या स्वरूपात माझ्यासमोर पात्रांसकट उभे राहिले. हा सगळा एका नव्वद वर्षाच्या मूर्त माणसांकडून मिळालेला 'पळसदेव'चा वसा.
यावरून त्यांना हे सांगायचं होतं की, आजही हे मंदिर म्हणजे पुरातन घटनांचं वास्तव्य असलेलं ठिकाण आहे.

मी होकारार्थी मान डोलावत पुढे आले खरी. पण डोक्यात या जुन्या समजुतीचे पारायण चालू होते.
उर्वरित प्रश्र्नांपैकी "नेमकं त्या जोडप्याचं काय झालं असेल ?" एवढा प्रश्न अनुत्तरित राहत होता.
तेव्हा मंदिराच्या इतिहासाची उत्सुकता चाळवली -
पळसदेव गावात असलेलं हे पळसनाथ मंदिर. चालुक्य राजाने, ८ ते ११ या तीन शतकांमध्ये हेमाडपंथी पद्धतीने बांधले. पुण्याहून हे मंदिर १३० किलोमीटरवर आहे. जायला साधारण ३ तास लागतात.
पुण्याहून सोलापूर रस्त्याने जाताना, भिगवाणच्या पुढे गेल्यानंतर उजनी धरणाची मागची बाजू दिसू लागते. त्या मागच्या बाजूचा रस्ता कापत कापत जेव्हा हळूहळू पुढे जाऊ लागतो.
तिथे दूरवर अर्ध्या पाण्यात एक जुन्या घडणीतलं मंदिर दिसू लागतं. हे काहीतरी चित्रपटाच्या शूटिंगची आठवण करून देणारं असतं. 
या मंदिराचा एक स्वतःचाच नियम असतो.
पाणी खूप असेल तर पाण्याचा फक्त वरचा भाग किंवा कळसच दिसतो. परंतु सध्या महाराष्ट्रातल्या दुष्काळाने होरपळलेल्या जमिनींमुळे पानी पातळी प्रचंड प्रमाणात खाली गेली आहे. त्यामुळे हे विदारक चित्रण असले तरीही, पळसदेव बघणाऱ्यांसाठी हा एक विचारात पाडणारा पण पर्वणी अनुभव असतो. 
कारण काही वळणे पार केल्यानंतर एका पॉईंटला पोहोचल्यानंतर स्वतःची वाहने आपण नेऊ शकत नसतो. केरळात असते तसं ह्या बाजूने त्या बाजूला जायचे तर प्रत्येकी ५० रुपये नाववाल्याला देऊन मंदिरापर्यंत पोहोचणे शक्य होते.

त्यानंतर हळूहळू वातावरणाचा अंदाज घेत मन प्रसन्न आणि नवं खाद्य मिळाल्यासारखे कावरबावर होऊन सगळचं न्याहाळू लागते. प्रवास पाण्यातून जाणारा असल्यामुळे मन मंदिरापर्यंत पोहोचण्याआधीच प्रसन्न होऊन जाते. नावाडी हे दिवसातून अशा अनेक पर्यटकप्रेमींना हे सुख देत असतात. त्यांची कमाई दिवसाला अंदाजे सातआठशे होते, असे हा प्रवास करताना त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर लक्षात येते.
इथे प्रामुख्याने दोन मंदिरं आणि एक धर्मशाळेची परस आहे.

या मंदिरांच्या आवारात जरी मन प्रसन्न होत असले तरी एका दृश्याने मनाची घालमेल होते कारण येथील मुख्य मंदिराच्या कळसाला ज्या आखीवरेखीव दगड, शिळांचा आधार आहे. त्यावर संपूर्ण टोकापर्यंत, कळसाच्या भागापर्यंत चपला घालून, धडधड आदळत वर जाता येणं शक्य आहे. 
हि एक व्यक्ती म्हणून लज्जास्पद मानसिकता आहे कारण येथे जाणारे लोक हे त्या मंदिराची डागडुजी किंवा बांधकाम बघायला न जाता ते तिथे सेल्फीज, टिकटॉक व्हिडीओज किंवा फोटोज काढून सोशल मीडियावर कुल दिसण्यासाठी जातात. त्यामुळे इथे एखादीतरी 'दिशादर्शक' पाटी असावी. जेणेकरून त्या मंदिराचे पावित्र्य आणि त्यावरील भाग विस्कळीत होणार नाही. 
१९७८ला जेव्हा उजनी धरण बांधले गेले त्यांनतर हे मंदिर फक्त इ.स. २००१, २०१३, २०१६, २०१९ ला पाण्याबाहेर आले होते. 
मंदिराच्या दिशेने गेल्यानंतर पात्रे, चौकोनी खांब, लवा, बेल, स्तंभ या पंचशाखांच्या पायाभरणीवर सुस्थितीत दिसते. नंदी, मरगळ, सुंदर शरीरयष्टी असलेले आणि अजंठा लेण्यांवर कोरलेले दगडातील शिल्प इथेही आहे, जुन्या दगडांना हे कोरलेले दगड शोभून दिसतात. 
मंदिराची भटकंती झाल्यानंतर पाऊलं आपोआप उजनी धरणाच्या पाण्याकडे जाऊ लागतात, कारण उन्हाच्या झळांनी लाही लाही झालेला प्रवास दूर लोटण्याचा प्रयत्न त्यात असतो. महाराष्ट्रातला दुष्काळ त्या उजनीच्या पाण्याच्या बाहेर असलेल्या जमिनीत भेगा खोदून खोदून झिरपलेला दिसतो. तेव्हा पायाला मेलेले मासे, खेकडे आणि बगळे लागतात. तरीही येथे येणाऱ्या पक्षांची उजनीसोबतची नाळ तुटत नाही. ते याचा मनसोक्त आनंद एखाद्या कट्ट्यावर बसून लुटत राहतात.



मन आतापर्यंत हा दुष्काळ स्वीकारण्याची तयारी करतो कारण प्रवासात आणलेली पाण्याची बाटली हि पळसदेव लागायच्या आधीच संपलेली असते आणि बाबांकडून विकत घेतलेल्या पाण्याने कोरड संपत नसते. जेव्हा दुष्काळ आपल्यापर्यंत पोहोचतो तेव्हा त्याची झळ, दाहकता आणि त्यातलं वास्तव याची धग जाणवू लागते. ते कोरडे दृश्य मनाला वाचा फोडू लागतं.


उजनीला आलात पण उजनीचे 'मासे' नाही खाल्ले असे मांसाहारी नाहीत. त्यामुळे भिगवणची खासियत म्हणून तिथल्या चवदार, बोटे चाखत बसावे अशा माशांचा धंदा करणारा व्यापारीही मंदिराच्या ५० मीटरनंतर तुमची वाट पाहत असतो.
परतताना जास्त काही नाही पण मंदिराचं सौंदर्य, गुपितांची कुपी अन् बाटलीच्या तळाला लागलेल्या पाण्याच्या घोटाचं महत्त्व अधोरेखित करून मन नाविन्याने पण खिन्न होऊन जाते.



सुचत नाही कधी कधी... सुन्न व्हायला होतं. सगळं आयुष्य रुक्ष वाटू लागतं. जेव्हा डोकं 'डिप्रेशन ' नावाच्या राक्षसाच्या तोंडात जाऊ लागते. मन हात वर करून त्या खोलात जाणाऱ्या ' स्वतःला ' बाहेर ओढत असते, पण डोक्यातल्या डिप्रेशनने स्वतःवर ताबा मिळवलेला असतो.
नकारात्मक सहवास, एकटेपणा, स्वतःशीच बोलणे, तर्क वितर्क लाऊन स्वतःवर प्रेम न करणे, स्वतः बद्दल शंका उपस्थित करणे, खूप खूप मेहनत करून सतत अपयशच येणे, करीयरच्या टप्प्यात आपल्याला हे जमत नाहीये अस वाटणे यामुळे हे डिप्रेशन अधिकाधिक वाढू लागतं.
माझं तसचं होऊ लागलंय.
माझं वय कमी आहे असं आजूबाजूचे म्हणतात.
हेही म्हणतात की, तू राहते, दिसते, हसते सगळं नॉर्मल आहे. मग डिप्रेशन आलंय कसलं. ?
मी माझ्या मनात येणारे असंख्य नकारात्मक विचार टाळू लागते. पण तरीही हे डिप्रेशन जात नाही... मला वाटतं की हा कुठेतरी माझा नाही, माझ्या पिढीचा आणि येणाऱ्या पिढीचा दोष आहे.
त्यानंतरच्या पिढ्या या जन्मतः तयारीनिशी येतील. पण आम्ही जे जन्मलो ते सगळे अर्ध्य्या हळकुंडाने पिवळे होऊन आलो, आणि आजही तसेच आहोत.
वाटते, टिकाव लागावा या स्पर्धेच्या युगात.
वाटते, हातातून काहीच सुटू नये.
वाटते, आपण करू शकतो काहीतरी अचंबित मग का करू नये?
नव्वदीत जन्मल्यांचा हा एकंदरीत  प्रॉब्लेमच झाला आहे. एकतर ते ना तळ्यात ना मळ्यात. ते इतके भरकटले आहे की रस्ताच स्पष्ट नाही आणि रस्ता स्पष्ट नसला की आयुष्याची फरफट होते. आणि ही फरफट म्हणजे "डिप्रेशन."

हे लिहिण्याचे कारण माहिते? काल सोशल मीडियावर एकाने त्याची आत्महत्येची नोट शेअर केली. " मी तुमच्यापासून खूप खूप लांब जात आहे. आई बाबा मला क्षमा करा"
"आत्महत्या? ". मी शंकेने स्वतःलाच विचारले.
"नाही तो असं करणं शक्य नाही. " मीच त्याचं उत्तरही दिले. पण तरीही ही नोट म्हणजे काय होतं ? हे मला सुरुवातीला कळलं नाही. कारण ज्या व्यक्तीने हे लिहिलं होतं, तिच्याबरोबर माझे अनेकदा बोलणं झालेलं. चांगला चोविशितला तरुण तो.
लगेच तातडीने फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्याचं नाव शोधलं आणि कॉल लावला. फोन स्विच ऑफ होता. मला त्या पोस्टचा तर्क लावायचा नव्हता. कारण तो आत्महत्या करेल, असं कधी मनातही आलेलं नव्हतं. कारण, तो आताच्या पिढीतला तरुण होता. पण तो 'आताच्या पिढीतला' हे मी अनवधानाने विसरत होते.
तेव्हा मी स्वतःपासून विचार करू लागले. ही आताची तरुण पिढी म्हणजे नव्वदीत जन्मलेली उनाड बालकं. ज्यांना लहानपणी वाटायचे, आयुष्य हे  लहानपणी नकळत, निरागसपणे जगण्यासाठी आणि मोठं झालं की, जाणते होऊन पोटा पाण्यापुरत कमावण्यासाठी असते. हे आयुष्याचं प्लॅनिंग जणू लहान असतानाच त्यांचं ठरलेलं होतं.
पण मधल्या काही काळात तंत्रज्ञानाचा वापर जो भरमसाठ वाढला आणि झपाट्याने स्पर्धा वाढू लागल्या, तेव्हा वर्गातल्या एका विद्यार्थ्याला पहिलं येऊन चालत नाही, या स्पर्धेत चिरडले जाऊ नये म्हणून प्रत्येकाला स्वतःची ओळख घेऊन फरफट करत का होईना रस्ता कापावा लागतो. तसं या नव्वदितल्या मुलांचं झालं.
ही स्पर्धा म्हणजे कोणतंही ध्येय असो, चालत रहा, जिथे चालणं थांबेल तिथे तुमचे विचार थांबतील. आणि विचार थांबतील तेव्हा तुम्ही या स्पर्धेच्या खूप मागे गेलेलं असाल.
मला भीती हीच वाटते, जर आपण मागे पडलो या स्पर्धेतून तर?

आताच्या तरुणाईसाठी दोन गोष्टी एका तराजूत असतात,
"जगणं आणि स्पर्धा."
जगायचं म्हणजे आठवड्यातील पाच दिवस नोकरी, रात्री निवांत झोप, घरातल्यांबरोबर जेवण, आठवड्याचे शनिवार रविवार सुट्टी आणि सोमवार पासून पुन्हा कातरवेळी फिरायला गेलेलं मन जागेवर आणून कामाला लागणे. पण जेव्हा हाच तराजू स्पर्धेच्या पारड्याकडे झुकवावाच लागतो तेव्हा मात्र हाच तरुण दिवस-रात्र फोनचा डब्बा डोळ्यासमोर धरून स्वतःच्या प्रत्येक इंद्रियांची कसब लावत, स्वतःच्या आतल्या कसोटीला पिळून काढून पणाला लावतो. मग त्यातून कुठेतरी वाहवा मिळाली की तेवढ्यापुरता मनाला, डोक्याला शांतता. कारण स्पर्धेच्या जगात आज जे आहे ते उद्या अदृश्य झालेलं असतं . उद्या नवीन काहीतरी हवंच. रोजचा दिवस आपला नसतो. त्यामुळे रोजचा दिवस आपलाच असावा, या हट्टापोटी आता आता तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकलेली तरुण पिढी रात्र रात्र फोनच्या डब्ब्यात तळागाळात काहीतरी शोधत, बनवत राहते. असं करत करत नोकरीवरून आलेला दिवस संपून पहाटे ४- ५ वाजेपर्यंत स्वतःच्या छंदाचे लाड पुरवत पुन्हा सकाळी १० च्या नोकरीसाठी कंबर कसून , मनाची तयारी करून त्याच उत्साहात ते तयार होतात.
पण हा उत्साह जुन्या पिढीसारखा म्हातारपणापर्यंत टिकत नाही. याचे कारणच ही, तरुणाई ही कमी-अधिक वेगाच्या रेषेत पुढे जाते. समतोल नाही यात. यामुळे डोक्यावर ताण येऊ लागतो.
शिवाय या स्पर्धेच्या युगात डोक्याच्या प्रत्येक तंतूला कामाला लावलेलं असताना घरात गेलं की घरातल्यांची वेगळीच अपेक्षा असते. पिढीतले हे अंतर त्यावेळी समजून सांगण्याच्या परिस्थितीमध्ये तरूणाई नसते. त्यामुळे घरातल्यांनी फायद्याचे सांगितले तरी ते टाळले जाते. यामुळे हळूहळू घरातून खटके उडू लागतात. आणि परिणामी, बाहेरचे टेंशन असतेच त्यात घरातून बाहेर पडताना बाहेरचे टेंशन यामुळे डोकं सतत जड वाटू लागतं. आपण हसायचा प्रयत्न केला तरी हसू येत नाही, कुणाला मदत करावी वाटते पण शरीरात उर्जाच शिल्लक राहत नाही किंवा मग कधीतरी हे सगळं आपण करतोय ते चूक करतोय हे कळत असूनही आपण स्वतःच्या मनातल्या मनातच चिडचिड करू लागतो. सगळं जग दुष्ट वाटू लागतं.
यात हळूहळू एकेका घटनेची भर पडत जाते आणि ही डोक्यातल्या गच्च भरलेल्या किड्यांची संख्या वाढू लागते. मनाला कोचे पडून जातात, पोखरून जाते आपलीच विचार शक्ती. तरीही हे थांबत नाही आणि अस करत करत सगळे आतले प्रयत्न करून झाले की मन थकते. मग ताबा मेंदू घेऊ लागतो आणि मेंदूकडे ताबा जाऊन गोष्टी अधिकच अनपेक्षित घडू लागतात. आणि शेवटी मनासमोर हार मानलेला मेंदू आत्महत्येच्या खोल दरीत मारून टाकायला जातो स्वतःला.
यानंतर मला बोलावंसं वाटतं...

आमची पिढी चुकतेय.

स्पर्धा आहेत.
खूप आहेत.
आता तर जागतिकीकरणानंतर त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाल्या आहे. पण आपण थोडे थांबूया. थोडासा कणाकणाने विचार करूया. थोडासा या मौल्यवान आयुष्याचा विचार करूया! 
पूर्णच थांबून जाण्यापेक्षा आपली स्पर्धेत राहण्याची गती मंद ठेवूया, जितकी तुम्हाला झेपेल तेवढीच आणि एक मात्र करूया, फोनच्या डब्ब्यात सुख शोधणं बंद करू.
एकटेपणा आला की फोन घेतो आपण. हे घाणेरडं व्यसन आहे. कारण जेव्हा मनाला संवाद करायचा असतो तेव्हा जीवंत माणसेच लागतात समोर. पण सोशल मीडियावर होणारा संवाद हा डोक्याने केला जातो. कारण चॅटिंग करताना, पोस्ट करताना, कमेंट करताना आपण नेहमीच प्रत्येक शब्दाचा विचार करतो. डोक्याला विचार करण्यासाठी वेळ देतो. पण तसं प्रत्यक्षात माणूस समोर असेल अशावेळी बोलताना आपले हावभाव, आपले मन जो स्वभाव असेल तसं व्यक्त होत जातो. 
सतत डोक्याने होणारा मशिनसारखा संवाद तुमच्या मनाच्या उत्साहाला, ऊर्जेला अधिक निकामी करत आहे.
"दिवसातून किमान ५ लोकांबरोबर बोला, यामुळे तुम्ही विचार न करता मनापासून बोलाल" आणि जेव्हा कमी विचार असतील तेव्हा कामही अधिक होईल आणि हळूहळू स्वतःचं अस्तित्व तयार होईल. जेव्हा मन सुदृढ असेल तेव्हा आयुष्य सुंदर वाटेल.
डीप्रेशनचा प्रवास सुरू होतो. हे तडकाफडकी नसतं. कारण डिप्रेशन हा डोक्याने घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे अशा आत्महत्येच्या वाटेवर जाणाऱ्या तरुणाईने लोकांशी बोलावं. कोणीही अनोळखी असो बोलायचं. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या आयुष्याचा विचार करायचा. रस्त्यावर जाणाऱ्या किती लोकांच्या चेहऱ्यावर आज हसू आहे हे बघायचं. जगात एवढी लोकसंख्या आहे त्यात स्वतःला कशात तरी सतत गुंतवून ठेवायचं. त्याशिवाय हे एकटेपण दूर होणार नाही.
एकटेपणाचा मोह असतो, ते व्यसन करू नका...
नाहीतर स्वतःच स्वतःचा इतका तिरस्कार करू लागाल की स्वतःचाच जीव घ्याल !
त्यामुळे समाज कितीही खराब, सडक्या मनोवृत्तीचा म्हणत असलो आपण तरी त्यातले आपले आवडते लोकं निवडायचे आणि त्यांच्याशी मूर्त स्वरूपात तोंडाने बोलायचं. व्यक्त व्हायचं. ही खरी  प्रक्रिया सुरू करायची...
एवढाच एक उत्तम उपाय डिप्रेशन विरोधात लढण्यासाठी मला वाटतो. कारण हे तंत्रज्ञानाच्या युगात कंप्युटरच्या निर्जीव दगडासमोर बसणे, सोशल मीडियावर पोस्ट करणं, त्यावरच जगणं, खुश होणं, हे मशिनच्या प्रजातीचे लक्षण.
मशीन होणं माणसाला जमणार नाही, त्यामुळेच तो डिप्रेशनमध्ये जातो. त्यावर लोकांचा लोकांबरोबर असलेला मुक्त संवाद वाढायला हवा, एवढेच कळकळीने वाटते.



आधुनिक पिढीच्या या कुलनेस ट्रेंडचा फायदा बर्याचदा सामाजिक उपक्रमांत होतो. याचीच अनेक उदाहरणे आणि तरुण पिढी या निषिद्ध विषयाला कसे हाताळते याची माहिती...


मासिक पाळीचे इमोजी 
सोशल मीडियावर पहिल्यांदाच दाखल झालेल्या मासिक पाळीबद्दलच्या इमोजीला स्त्रियांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ४७% स्त्रिया असे म्हणत आहेत की, या इमोजीमुळे त्यांना मासिक पाळीबद्दल अधिक उघडपणे बोलता येईल. स्त्रियांच्या मनातल्या गुजगोष्टींना, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षांना संवादाचे खुले आकाश मिळावे यासाठीच्या उपक्रमांमध्ये या इमोजीला गणले जात आहे.
मासिक पाळी किंवा पिरियड इमोजी हे त्याविषयीच्या संवादाचे प्रतीक आहे. जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येचे प्रत्यक्ष जीवनानुभव या इमोजीमधून व्यक्त होतील. स्त्रियांच्या शारीरिक, आरोग्यविषयक समस्यांवर अधिक गंभीरपणे चर्चा होईल. खरेतर ही इमोजी सोशल मीडियावर यायला बराच उशीर झाला आहे.

भारतीय निर्माती गुनीत मोंगा यांच्या पिरियड: एन्ड ऑफ सेन्टेन्स' या लघुपटाने जिंकला ऑस्कर! 

भारतात मासिक पाळीच्या मान्यतांवर आधारित लघुपट पिरियड: एन्ड ऑफ सेन्टेन्स'ने  ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट श्रेणीत या लघुपटाने पुरस्कार पटकावला. चित्रपटात प्रामुख्याने भारतातील महिलांची मासिक पाळी आणि या काळात त्यांना येणा-या अडचणी यावर भाष्य केले आहे. २५ मिनिटांच्या या लघुपटात दिल्लीनजिकच्या हापुड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सत्य घटना सांगितली आहे, ज्यात सॅनिटरी नॅपकीन बनवणा-या काही महिलांची कथा रेखाटण्यात आली आहे.

मासिक पाळीसाठी सुट्टी 

महिलांच्या मासिक पाळीविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यात मासिक पाळीचे दिवस महिलांसाठी अतिशय वेदनादायी असतात. याची दखल घेत कल्चर मशीन या डिजिटल मिडीया कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर करण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे.

28 मे रोजी 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस' सुरु करण्यात आला.
    
मासिक पाळी स्वच्छता दिवस (एमएचएम) हा मासिक पाळीत स्वच्छता कशी पाळावी याचे महत्त्व दर्शविण्यासाठी २८ मे हा वार्षिक जागरूकता दिवस म्हणून घोषित केला गेला आहे. २०१४ मध्ये जर्मन-आधारित एनजीओ डब्ल्यूएएसएच(वॉश) युनायटेड यांनी ही सुरुवात केली. जगभरातील महिला आणि मुलींना याचा फायदा व्हावा हा त्याचा उद्देश होता.

पॅडकेअरहे सयंत्र 

इन्फोसिसमध्ये कार्यरत असणाऱ्या पुण्याच्या अजिंक्य धारिया या मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या तरूणाने मासिक पाळीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडची संपूर्ण विल्हेवाट लावण्यासाठी पॅडकेअरहे सयंत्र विकसित केले आहे. रासायनिक आणि यांत्रिक प्रक्रियेचा वापर करून यात पॅडची विल्हेवाट लावली जाते, त्यानंतर शिल्लक राहणारा कचरा प्रक्रिया करून पुन्हा वापरणे शक्य असल्याने त्या कचऱ्याला मोल मिळणे शक्य आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये हे सयंत्र बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असून महिलांची वसतिगृहे, कॉर्पोरेट कार्यालये, विद्यापीठे आणि रूग्णालये येथे त्याचा योग्य वापर शक्य आहे. त्याचा आकार आटोपशीर असल्याने एका स्वच्छतागृहातही ते बसवणे शक्य आहे. विजेवर चालणारे हे उपकरण कितीही वेळा वापरणे शक्य आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या तशा प्रकारच्या यंत्रांच्या तुलनेत हे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे.

मासिक पाळीतील दुखण्यावर औषध
मासिक पाळीतील दुखण्यावर आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी  सांफे रोल ऑनहे वेदनाशामक औषध विकसित केले आहे.  वैद्यकीयदृष्टय़ा गुणकारक असलेल्या तेलांचा वापर करून हे औषध बनवण्यात आले आहे. मासिक पाळीच्या काळात ओटीपोट, पाठ आणि पायांमध्ये होणाऱ्या असह्य़ वेदनांवर या औषधाचा वापर केला असता वेदना कमी होणे शक्य असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. दहा मिलीच्या दहा रुपये किमतीच्या पॅकिंगमध्ये हे औषध उपलब्ध होणार आहे.पाळीच्या त्रासामुळे कुठलेही महत्वाचे काम सुटू नये म्हणून या समस्येवर औषध तयार करण्याची गरज प्रकर्षांने जाणवली. सात महिन्यांहून अधिक काळ यावर संशोधन केले. हे औषध संपूर्ण नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या औषधाच्या वापरातून कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने देखील यावर शिक्कामोर्तब केले आहे.

युट्युबवरील नवनवे प्रयोग
जिथे एका बाजूला पॅड्सच्या जाहिराती पाहून पालक लाजिरवाणे हावभाव देतात, तर दुसरीकडे याचा विरोधाभास दिसून येतो.
कारण सॅनिटरी पॅड्सचा किंवा कुठल्याही नैसर्गिक प्रक्रियेचा प्रसार हा केवळ पारंपरिक माध्यमातून व्हावा असे नाही. हेच सिद्ध कारण्यासाठी आताच्या घडीला युट्युबवर जेव्हा सॅनिटरी पॅड्स हे नाव टाकलं जात. तेव्हा अनेक उत्तम जाहिराती असलेला संच समोर येतो किंवा सॅनिटरी पॅड्सचा प्रसार करणारा उत्तम आशय असलेला लघुपट पहिल्याच क्रमांकाला असतो.
त्यातील उत्तम चॅनेल्समध्ये खालील नावांचा समावेश होत आहे;
१.      बीइंग इंडियन
२.      व्हिटॅमिन स्त्री
३.      गर्लियाप्पा


आधुनिक काळातील मासिक पाळी!

by on जून ०३, २०१९
आधुनिक पिढीच्या या कुलनेस ट्रेंडचा फायदा बर्याचदा सामाजिक उपक्रमांत होतो. याचीच अनेक उदाहरणे आणि तरुण पिढी या निषिद्ध विषयाला कसे हात...