नोव्हेंबर 2018 - Sufi
एक गोष्ट सांगते,
एक 'ख़ुशी' आणि एक 'खामोश आयुष्य' असतं. एक दिवस या खामोश आयुष्यात ख़ुशी येते.
आयुष्य हैराण होतं. कारण या खामोशीमुळे कधीच त्याच्याजवळ कुणीही आलेलं नसतं, ना येणार असल्याच्या पूर्वखुणा असतात पण, ख़ुशी येते...
प्रचंड ख़ुशी येते. आयुष्य खुश राहायला लागतं. आयुष्याला माहीत असतं, खूप कमी वेळ 'ख़ुशी' माझी आहे, तरीहि आयुष्य खुशीच्या अधीन होत जात. ॲडिक्शन वाढत जातं.... 
ख़ुशी एका मिनीटाला खूपशा आत्म्यांना जिवंत करते ताकद देते, त्यांच्या कित्येक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या ओठांना खरं हसायला शिकवते... 
पण तो क्षण येतोच, ख़ुशीची वेळ संपते... तिला जायचं नसतं , मृत्यूने कवटाळलेलं असतं आणि तिच्या थांबण्यासाठी प्रार्थना करणारे हातही तिला सोडत नसतात.
'काहीतरी जादू होईल' या आशेवर आयुष्य खुशीच्या लंबी उम्रची दुवा मागतो पण आयुष्याने उशीर केलेला असतो, ख़ुशी मरते.
आणि मग मागून आवाज येतो
"बाबूमुशाय ज़िंदगी और मौत उपर वाले के हाथ है ... उसे ना तो आप बदल सकते है ना मैं ... "

अशा धाटणीतला हा 'आनंद' चित्रपट ...

आताच्या माध्यमांतून डायलॉग्जमध्ये सर्रास 'बाबूमोशाय' हे विशेषण वापरलं जातं. पण त्या बेंगॉली शब्दाचा खरा प्रवास आणि ट्रेंड 'आनंद'ने सुरु केला. विविध संस्कृतीचा गोडवा पोहोचवून, एकमेकांच्या संस्कृतीबद्दल आवड निर्माण करण्याची ताकद चित्रपटांमध्ये असते खरी.!
जुने चित्रपट बघताना संयम खूप असावा लागतो कारण त्यांची कथा आताच्या कथानकांसारखी (म्हणजेच आधी घटना, मग फ्लॅशबॅक आणि शेवटी ट्विस्ट) या  तीन टप्प्यात न सांगता, ती तशी हळूहळू उलगडत आणि रंगत जाणारी असते. त्यामुळे त्यासाठी 'दिग्दर्शकाच्या' कामावर विश्वास असणं फार महत्वाचं ठरतं, आपला संयम सत्कारणी लागतो.
'आनंद' हा तसा एका ओळीतील चित्रपट. थोडक्यात, चित्रपटातल्या नायकाला  'आपण मरणार असं कळतं' तेव्हा तो हे गांभीर्याने हाताळणारं आयुष्य कशा प्रकारे जगू लागतो त्याची हि कथा.
अगदी सरळ, साधा आणि अस्खलित खुश चित्रपट. ना कुठला भडक इफेक्ट, ना एक्सटेर्नल व्हीएफएक्सचा अति वापर, नाही कुठल्या पात्रांचा बळजबरीचा अभिनय. चित्रपटाचे संगीत, याबद्दल वेगळे काय सांगू चित्रपट हा १९७०चा तरीही, आजच्या तरुणाईत 'कहीं दूर जब दिन ढल जाए साँझ की दुल्हन बदन चुराए' हे गीत माहिती नसणारे अपवादच. आणि एवढ्यावर हे गाणं थांबत नाही त्याचे अनेकानेक रूपं बनत आधुनिकतेत मॅशअप बनत जातात त्यामुळे त्या गाण्याचे बोल, संगीत आणि ती धून आजही कातरवेळेत आयुष्य सुकर करण्यासाठी गुणगुणणारे असंख्य आहेत. हे त्या चित्रपटाचे यश ! 
आकर्षक गोष्ट म्हणजे अत्यंत साधं चित्रण आणि इफेक्ट्सपेक्षा चित्रपटाच्या कथेवर केलेला फोकस. त्यात पर्वणी म्हणजे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या एकत्र अभिनयाची जुगलबंदी आणि गुलजार यांच्या लेखणीची भर.
खरेतर वेगळी अशी नाही पण, खूप विचारपूर्वक आणि लोकांना सामावून घेईल अशा ठेवणीतली संहिता (स्क्रिप्ट). 'गुलजार' हे अनेकांना त्यांच्या शायरीच्या किस्स्यांकरिता प्रसिद्ध वाटणारे व्यक्तिमत्व आहे, पण या चित्रपटातील त्यांचे लेखन हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक भावनेला न्याय देणारे ठरते.
चित्रपट संहितेत थोडासा बदल आणि वेगळेपण म्हणजे चित्रपटाशी जोडलं जावं म्हणून वापरलेल्या मराठी, बेंगाली आणि हिंदी या भाषेचा टच. आणि हे सगळं लेखन तेव्हा यशस्वी ठरतं जेव्हा चित्रपटासाठी अचूक पात्र पारखली जातात. आणि त्यामुळे चित्रपटातील प्रमुख आकर्षण म्हणजे डायलॉग डिलिव्हरी, ती इतकी सुरेख कि इतके दिवस शुंभ असणारा मनुष्यही शेवटात 'आनंद'च्या मृत्यूवेळी विरघळेल.
आणि हे सगळं निरीक्षण करीत करीत आपण येतो, चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात ... हा टप्पा इतका काळजातला वाटतो कि तो असा समीक्षणातून सांगण्यापेक्षा अनुभवावा इतका जिवंत आहे, इतका वैयक्तिक दुःख हलकं करणारा आहे.
आणि याच शेवटच्या टप्प्यात दिग्दर्शकाची खरी परीक्षा असते, कारण चित्रपटाच्या शेवटात एवढी ताकद आणावी लागते कि, चित्रपटगृहाच्या बाहेर पडल्यावरही तुम्हाला प्रेक्षकांच्या मनात, चर्चेत जिवंत ठेवायचं असतं.  त्यासाठी त्या कथेचा क्रम आणि ठेवण तशी जुळवून आणायला हवी. ते या चित्रपटास काठोकाठ लागू होते.  दिवा लावायला जावा नि लाईट यावी, इतका परफेक्ट टाईमिंग/ इतका तंतोतंत शेवट दिग्दर्शक मुखर्जींनी या चित्रफितीतून गुंफला आहे.
चित्रपट डोळ्यासमोरून असा निघून जाताना दिसतो, फक्त तीन तासांची चित्रफीत असते ती. पण आपल्या आनंदाचा आणि विचारांचा 'किस्सा' बनून जाते आणि पडदा पडायच्या आतच आपण 'आनंद' व्हायला लागतो. आणि आपण स्वतःला जाणीव करून द्यायला लागतो कि, "बाबूमुशाय, ज़िंदगी बड़ी होनी चाहिए ... लंबी नहीं" 

बाकी काही नाही, चित्रपट पाहिल्यावर स्वतःच्या आयुष्याचं डोक्यावर असलेलं ओझं किंचितसं हलकं होऊ लागतं.

#Must_watch
#Best_composition_of_Indian_cinema



बाबूमुशाय...!

by on नोव्हेंबर २८, २०१८
एक गोष्ट सांगते, एक 'ख़ुशी' आणि एक 'खामोश आयुष्य' असतं. एक दिवस या खामोश आयुष्यात ख़ुशी येते. आयुष्य हैराण होतं. कारण य...


सगळा निसर्गाचा प्रचंड पसारा नि त्यात तो एकच कणखर हट्टी दगड नि आजूबाजूला देहाचं मंदिर होईल इतका प्रचंड स्तब्द डोह... 
दूर दूरवर नजर जाता नजर कमी पडेल इतकी स्वतःतच मग्न अशी शांतता...
हळूहळू राज्य तिथे वर चांदण्यांचं येतं.
तीत हरवून जात मी स्वतःचा हात हातात घेते...
शांततेत त्या भोवतालच्या मी स्वतःशी आपसूक बोलू लागते, उगाच एखाद्या विचाराशी चाळा करू लागते.
तेव्हा, अलगद हातात घेतलेला माझा दूसरा हात मला स्पर्श करून म्हणतो , नको, शांत रहा जरावेळ . काहीच गरज नाही विचार आणण्याची. एकदम स्तब्द हो मनाच्या शांततेत, या पाण्यासारखी.
पण,
मन ते असं शांततेत शांत राहणार कसं!
हळूहळू राज्य मनाचं येऊ लागतं.
मी अडखळत स्वतःशी हसत स्वतःबरोबरचा संवाद टाळू लागते.
हळूहळू राज्य पाण्यावर येतं.
ते तिथे बसूनही माझ्यावर मोहिनी घालत शांत करते मज आतून बाहेरून...
त्याची ती मोहिनी लपेटत मी शब्द हे शोधत जाते,  प्रवास हा शब्दातून नवखणण्याचा हा असा घडत जातो...

जल ते वृंदावन मानुनी, ढीम्म होतो तो पाषाण,         
पसरत जाते काळोखाची किमया, 
उजेडास या कवेत घेते।।
.
वाऱ्याचेही रिते शहाणपण, न उरे या काळोखातही,
जादू त्याची तिथेही चाले, घेतो कुशीत वाऱ्यासही।।
.
.
न लवे पापणी माझी, उडे आकाशी माझीच स्वप्ने,
सौम्य रवीही आड जातो,
अंधाराला त्या साम्राज्य सोपवुनी।।
.
.
उरे शेवटी राज्य काळोखी, स्वप्न माझी हि स्तब्द होतात,
त्याच त्या पाषाणावर, मी ठिम्मपणे एक स्वप्न जन्मवते।।
 .
.
गडद होतो काळोखही तो, स्वप्न माझे सुरक्षित होते,
निराधार ते आजपर्यंतचे स्वप्न, ठामपणे खरे होत जाते।।
 ........................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!.......................


#कुठल्याच_शब्दाला_कुठल्याच_शैलीत_न_बांधता_सुचलं तसंच


निसर्गाचा पसारा...

by on नोव्हेंबर २७, २०१८
सगळा निसर्गाचा प्रचंड पसारा नि त्यात तो एकच कणखर हट्टी दगड नि आजूबाजूला देहाचं मंदिर होईल इतका प्रचंड स्तब्द डोह...  दूर दूरवर नजर ज...

मी - काय बोलु? काय बोलु? ............
हाई बोलु? हेलो ? की मग फक्त एक स्माइली टाकु? की मग हाई बोलून स्माइली टाकु?
हाश्ह्ह्ह....... मला काहीच समजत नव्हत. पुरती चलबिचल, धांदल,गडबड,थरथर सगळ एकदाच....
हां.....पाण्याचा घोट घेतला नि ठरवल कि हेल्लोच बोलते...तितक्यात फोन वाजला ... त्याचा फोन होता तो. ओ माय गॉड……. माझा श्वास त्या फोनवरच्या आवाजात थांबला होता.
तो – हेलो
मी - हेलो कोण ?
तो – कशी आहेस.... ?
मी मनातल्या मनात हसून म्हटलं, नशीब त्याने त्या 'कोण'चं उत्तर दिलं नाही.
मी - यावर तर बरं आहे, ठीक आहे, मस्त आहे की मग मजेत ? काय उत्तर देउ? की सरळ सरळ विचारून टाकु , का फोन केला म्हणून ........ नाही, नको ....
तो - ते जाऊदे सगळं. "मला सांग कुठे आहेस आत्ता? ?"
"हेलो?"
मी - हं..... मित्राबरोबर.....
तो - काही प्लान आहे का आजचा?
मी - नाही......
तो - मी येतोय. नेहमीच्या ठिकाणी भेट. नो एक्सक्यूझेस....बाय.
“काय पटापट बोलून गेला हा.. बस्स ? मी गारठली होते, अंगात सनसनीत झणक गेली होती. त्याच्या त्या अनपेक्षित शांत शब्दांनी. जाऊ की नको ? नाहीतर मेसेज टाकते, काम आहे आज नक्कोच भेटायला... पण भेटावसही वाटतय. आज तब्बल ४ महिन्यांनी त्याने फोन केलाय, नक्कीच काहीतरी काम असणार. सोबत नीशाही असेल ? सुंदर दिसते तशी ... दोघे सोबत छान दिसतात, नाही? ओह काम ऑन आयशा , स्टॉप थिंकिंग टू मच…….” मी स्वतःलाच समजावल.

“एनी प्रॉब्लेम?” मित्राने विचारलं.
मी - नो, नॉट ऐट ऑल...
फोन कट झाला होता. काहीच बोलली नव्हते मी, कारण आजचा हा फोन नि त्यानंतर झालेल संभाषण, आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं, की आज त्याला माझी गरज आहे.
आम्ही भेटलो. तो आला. मी पाहिलं.
माहीत नाही का ? पण आज पहिल्यांदा सोबत असलेल्या मित्राला मी 'मीठी मारुन बाय' केल. तो बघतच होता. माझं मन आज चक्क शांत होत, निगरगट्ट गार. जे हृदयाचे ठोके त्याला बघून धडधडायचे ते आज जणू नव्हतेच.
शर्ट तर तोच घातलाय, पहिल्या भेटीचा. पर्फ्युर्मही तोच, स्पाइक्स, स्टॅंड कॉलर, ब्लॅक शर्ट बस्सच... याआधी तर कद्धी असं झालं नाही ..? काही हवंय का याला? ती सोबत नाही दिसतेय ... काही गडबड तर नसेल?
तो हसला. मला खोट हसावं लागलं. चार बाय सहाच्या खोलीत जितकं गुदमरत नाही, तितकी घुसमट त्या एसी गाडीत होत होती. कारण, काहीही झाल तरी 'माझ प्रेम संपलय' हे त्याला दाखवायचं होतं, आणि यावेळी ते गरजेचही होत. अवघड होत? नाही… बिलकुल नाही ... मी असे एक ना असंख्य विचार करत होते.
गाडी सुरू झाली, पण संवाद मात्र नव्हताच. नजरानजरही झाली नाही किंवा मुद्दाम टाळली त्यानेही... २० मिनिटांचा वेळ गेला.
आम्ही दोघेही शांत होतो, इतके शांत की आवाज होता, फक्त एसी नि रेडियोच्या 'आपकी मुलाक़ात'चा.
तो - गाणं बदलू..? नाहीतर तूच लावते का एखादं? असही तुला माझी प्लेलिस्ट आवडत नाही ना ....
मी - हां :) ..... ( पुन्हा एकदा मनाला समजावलं, प्रेम संपल आहे आणि ते पुन्हा होणार नाहीच , बस्स ..यापुढे काहीही विचार करायचाच नाही) या तन्द्रित अजाणतेपणी मी 'ब्रेकअप सॉँग' लावलं.
हश्ह्ह्ह्ह.... दोघांची नजरानजर झाली आणि एकदाची ती शांतता भंग झाली, आता मात्र दोघेही खळखळुन हसलो.
तो -तू केव्हापासून अशी गाणी ऐकायला लागलीस ? ' त्याने सहजच विचारल'
मी - नवाब साब, मोहब्बत क़ी थी इसलिए, मोहब्बत जी रहे थे|
अब दिल टूटा है, तो उसे भी अपने दर्द की खुशी बाटने का मौका दो||
तो - तू बिलकुल नही बदललीस |
“मी आताही शांतच होते. खरं सांगायचं, तर केव्हा एकदा बडबड करते अस झालं होतं. या शांततेची बिलकुल सवय नव्हती, ना मला ना त्याला. माझा तो थंडावा त्याला आतून खात असावा, तो तेवढा ओळखतोच ना मला ?.... नक्कीच आयशा, हा काय प्रश्न झाला?
पण मग “निशा नि माझ्यामध्ये त्याने निशाला निवडल,” माझ्यावर प्रेम होत ना? ..” तो असतानाही मी स्वतःबरोबर बोलणं अधिक पसंत करत होते ......... पण तरीही कदाचित काहीतरी वाटल असावं किंवा नाहीसुद्धा किंवा मग मी बोलावं म्हणून…म्हणूनच त्याने "लग जा गले" लावलं. माझं भयानक आवडतं गाणं.!
आता मात्र माझ्या मनातल्या आठवणी, प्रेम, एकत्र घेतलेला चहा, ज्ञानप्रबोधिनीची एसपीडीपी, डाकेची दाबेली , वडापावचा चटका, डॉमीनोझचा पिझा, ऐन पावसात छत्री नसताना उडालेली धांदल, राग, रुसवा, त्याचं मनवनं ,चीडचीड, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक आल्हाददायी क्षण यांना ओहोटीसारख उधाण आलं होतं. ४ महिन्यात सहन केलेला तो दुरावा, तो एकटेपणा त्या एका गाण्यामुळे मी पुरती विसरून गेले, स्वतःलाच मन म्हणत होतं,
"लग जा गले के फिर ये, हसीं रात हो ना हो|
शायद फिर इस जनम में, मुलाक़ात हो ना हो || " गाण्याचे बोल मला बोलतं करू पाहत होते. ओठांवर शब्द इतके ऊसळुन आले होते की, कोणत्याही क्षणी तोल जाऊन बाहेर पडतील,
पण मग मनाने प्रश्न केला,
"आठवते ती रात्र.? जेव्हा तू सोबत होती. तू अडचणीत होतीस. तो ही सोबत होता. हेच गाणं बाजूला चालू होतं. तो तुझा हात धरून विचारू शकत होता की " पिल्लू काय झालयं? मला सांग बरं..... मी आहे ना सोबत ... ही अशी रुखीरखी परी छान नाही वाटत बघ...." पण तेव्हाही त्याला फोन आला. काळजी घे, म्हणून तो निघून गेला, तो गेलाच.
त्यामुळे आज तू काहीही बोलणार नाहीस हे कन्फर्म. कारण तुझं प्रेम तू मारलं आहेस, तुझ्या भावनांना तू मारलं आहेस नि ते कायमचंच.! आता कोणतीही तडजोड नाही, कारण नातं वाचवण्यासाठी जी तडजोड करत होतीस तू, ते नातंच आता राहील नाही, मग तडजोड ती कशासाठी?”
त्याने माझी तंद्री तोंडात विचारलं,
तो - आज उपवास आहे?
मी - अं...?
तो - नाही, इतकी शांत तू कधी नसतेस ना, म्हणून विचारलं.
मी - हमारे चेहरें पे तो हरदम मुस्कुराहट हुआ करती थी| शायद, हमारा वही अंदाज आपको रास नही आया ||
तो - असं तुटक का गं बोलतेयस ? बोल ना काहीतरी एकदम धाडधाड फाडफाड आधीसारखं.... तुझी ही शांतता पोखरतेय मला.
"एकदा माफ कर ना!"
मी - माफी ? कशासाठी?
तो - सगळ्याच गोष्टींसाठी.
मी - कोणत्या गोष्टी ? मला काहीच कळत नाहीए...
तो - पिल्लू, तुला सगळं कळतय. नको ना अस करुस. मला नाही ना राहता येतंय तुझ्याशिवाय....
मी - मला खरंच नाही रे कळतेय, तू कशाबद्दल माफी मागतोयस ते.
तो - बर मी काय करू म्हणजे तू आधीसारख वागशील ?... सांग ना .........
मी - अरे थांबव..... थांबव..... थांबव.... घर आलं ना माझं. चल बाय, छान वाटलं भेटून ... :)
तो - तू बदललीस.... इतकी की, तू शांत झालीयेस प्रचंड आणि मला त्रास होतोय त्याचा. कान तरसलेत गं तुझ ते "आज जाने की ज़िद ना करो " ऐकायला. आज हवं तितका वेळ थांबेल, तू जा म्हटली तरी नाही जाणार, पण तू बोल गं… मी खूप एकटा पडलोय गं..... काहीतरी तर बोल....प्रेम करतो गं मी तुझ्यावर..........
मी - "बस्सससस्स्स्स्स्स्स हां.......... यापुढे एक शब्दही नकोय मला....... नॉट ए सिंगल वर्ड ... प्रेम ? वाह बॉस.... सवयीला प्रेमाच नाव देऊन मोकळा झालास ?,ज्याला तू प्रेम म्हणतो, ती निव्वळ एक तडजोड आहे , आपल्या या सो कॉल्ड तडजोडीला कंटाळून प्रेम कधीच लुप्त झालय.. हे जे आपण भेटलोय ते काही प्रेम म्हणून नाही , मुळीच नाही. आपण भेटलोय, कारण आपल्याला एकमेकांची सवय झालीय. तुला भीती मला गमवण्याची मुळीच नाहीए, तू घाबरतोय त्यानंतर येणार्या एकटेपणाला नि तुझा तो एकटेपणाच आज माझ्यासमोर माफी मागतोय.... त्यामुळे ना....".
पुढे बोलणारच तितक्यात फोन वाजला......” हे! कैसे हो ? बहोत दिनों बाद ....? ” फोनवर बोलता बोलताच त्याला अलविदा केल नि मी निघाले.
मी शरिराने तर घरी आले होते, पण मनात विचारांनी घरच्या घर बांधली होती, आसवांची अतिवृष्टी होतानाही, का कुणास ठाऊक, पण मनाचा एक कोपरा इतका सुखावला होता की, डोक बंद होतं नि मन तूटल होतं तरीही तो आनंदित होता ...पण का ?.... .........
आता सगळच संपल होतं... हो ना?. सगळंच....
मग का ? रात्री रेडियोवर लागलेल्या ''आज जाने की ज़िद न करो '' ऐकताना मी रडले? का पुन्हा 'त्याच्या नसण्याच्या'नुसत्या कल्पनेने कोलमडले आणि याहीवेळी नेहमीसारखंच माझ्या अश्रुंचा समुद्र बघण्यासाठी ती रात्र नि तिचा काळोख होता….. तो नाहीच….!



प्रेम? सवय? तो ?

by on नोव्हेंबर २३, २०१८
मी - काय बोलु? काय बोलु? ............ हाई बोलु? हेलो ? की मग फक्त एक स्माइली टाकु? की मग हाई बोलून स्माइली टाकु? हाश्ह्ह्ह....... मला...







जुन्या पेटीत 'ती' चिठ्ठी सापडली.
आज घराची सफाई करताना
सापडलेला तो कागद एक 'भूतकाळ' होता.
यांना जाऊन आज जवळजवळ ५ वर्षे झाली.
आता तर काळ्या टिकलीचीही सवय झाली होती.
मग या अचानक सापडलेल्या तोफ्याचं प्रयोजन काय होतं ?
ती चिठ्ठी नवी होती की, ?
पण ती चिठ्ठी ....
हो ती यांच्याच अक्षरातली होती.
मला ते गुलदस्त्यातले दिवस आठवले ...
पन्नास वर्षांपूर्वी यांनी मला लिहिलेली ती खमकी 'माझी' चिठ्ठी आठवली ....
त्या चिठ्ठीला 'प्रेमपत्र' म्हणणं मुद्दामच टाळलं. कारण आजही ते आठ्ठवून हसायला येतं कारण ते प्रेमपत्र नाही,
 ती 'किराणामालाची' यादी होती.
संताप माझाही तासभर झालाच होता.
कारण, दुसऱ्यासाठी लिहिलेलं माझं प्रेमपत्र तिसऱ्यालाच गेलं होतं... आणि त्या भल्या माणसाला याचा कणभरही संताप नव्हता??
हो ... माझं प्रेमपत्र यांच्याकडे गेलं आणि यांची किराणामालाची यादी माझ्याकडे आली.... आणि मी लिहिलेल्या प्रेमापत्रातला तिसरा तो बाजूलाच राहिला.
नशीब ! पत्रावर ठळक लिहिलेल्या फोन नंबरमुळे तासाभरात यांचा फोन तरी आला...
त्यांचा आवाज तोच होता, जो माझ्या आयुष्याला हवा होता. ज्यात ताकद होती, आयुष्यभर माझ्यामागे खंबीरपणानं उभं राहण्याची.
ज्याला पत्र लिहिलं तो बाजूला राहिला, पण त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना भेटलो...
आणि भेटलो ते आयुष्यभरासाठी.... 😍😍

"कसं असतं ना... आपली एखादी चूकही आपल्याला आयुष्यभराची आनंदाची शिदोरी देऊन जाते... "  
हे सगळं आज आठवून न राहवून मला त्यांची आठवण अनावर झाली. व्यक्ती असा अर्ध्यात सोडून जाऊ नाही. साथ सोबतीची आहे ती अर्धवट राहायला नको, वाटतं.
 पण आता मात्र पानावलेल्या डोळ्यांतुन अश्रू पडून चिठ्ठीतील अक्षरे पुसण्याआधी मला पुन्हा त्यांच्या अक्षरातले ते शब्द वाचायचे होते.
माझं तरुण्यातलं प्रेम उभारून येऊन, आत्ता ती चिठ्ठी वाचताना सोबतीला त्यांचा हात असावा राहून राहून वाटत होतं...
शेवटी नाईलाजाने मी ती चिठ्ठी भराभरा उघडली....
उत्सुकता शिगेला पोहोचली होती...
काळ्या अक्षरात मजकूर होता,
"मी गेलो तरी लाल टिकली लावत जा सरकार (नानांच्या आवाजात).
आपल्यावर शोभून दिसते ओ...
समाजाची चिंता कशाला करता..?
काळी लावताच ना ? फक्त रंग बदलून लाल लावा ...
देवा शपथ तुमच्या गोर्या मुखड्यावर भारी शोभून दिसते ती ..."

हे सगळं वाचून मात्र खरंच वाटलं, अश्रू पडून चिठ्ठीतली अक्षरे मिटली असती तर फार बरं झालं असतं...
ते सोबत असायलाच हवे ना...
का लालची काळी करावी लागली असती.?
एकदा एकमेकांचे झालो की वेगळे का व्हावं लागतं... ?
तरीही या माणसाच्या आग्रहाखातर मी आरशात जाऊन तो एक यशस्वी प्रयत्न केला....
"खास दिसत होते मी.
मला आवडले मी.
इवलुशी कमी होती, ती त्यांच्या किफायती तारीफदार शब्दांची."
पण मी चिठ्ठी स्वीकारली आणि त्यातील शब्दही ....

#Colourful_Shades
#Change_Is_Beautiful

-सूफी


चित्रपट सुरू होतो, बघते तर काय
"आताची पिढी नाही हो जास्त थिएटर, नाटकाकडे वळत. आमच्या काळात... " असं म्हणत म्हणत निम्म्याहून अख्खं चित्रपटगृह तरुणाईने भरलं होतं. आजचा आणि कालचा बदल अनुभवायला.
" ... आणि काशीनाथ घाणेकर" बघायला.
पिढी घटकानघटका निर्माण होते, बदलते. त्यामुळे बदल ठरलेला. पण म्हणून कला बदलत नाही, नष्ट होत नाही, तिची रूपं बदलतात...

जगतो, वाढतो, धडपडतो, प्रेक्षकांच्या लायक बनतो, माज करतो, वावरतो आणि तो बनतोच तितक्यात त्याचा प्रयोग संपतो, आणि तो होतो काशिनाथ घाणेकर ...

"बालगंधर्व रंगमंदिरात आधी रांगा लाऊन तिकिटे तेही दररोज नाटक आणि लोक गर्दी करायचे. आज ती मजा नाही राहिली.." हा संवाद आणि ही सगळी चित्रफित जेव्हा समोरुन जाते, तेव्हा वाटतं, दाखवावं यांनाही की आजही नामांकित करंडकं पटकाऊन गर्वात कॉलेजभर फिरतात मुलं.
याशिवाय, चित्रपटात दर्शविलेले वाडे, पोशाख, दोन वेण्या, जुने कॅमेरे, तसच संगीत, तेच त्या काळाला साजरं असं एडिटिंग,  तोच ठेहराव बघताना शेजारच्या प्रेक्षकाला टाळलं तर तुम्ही रमून जातात.
छान सुरेख आपल्या भारतीय संस्कृतीत साजेसा असा काशिनाथ असतो. श्रीमंत, देखणा, डोळ्यांत घारा रंग, गोरी गरगरीत त्वचा, नाकावर माज, आणि पाठीशी लग्न करायला म्हणून घरच्यांच्या हट्टाची डॉक्टर ही पदवी.
सुरुवातीला एका कटमध्ये समोर घडणारं सगळं प्रत्येक संसारी पुरुषबाईच्या आयुष्यातलं. 'घरोघरी मातीच्या चुली' वाटतं. पण जेव्हा सगळी दुनिया दावणीला टांगून आतला कलाकार घानेकरांणा
डिवचू लागतो, स्वस्थ बसू देत नाही तेव्हा, तो बाहेर इतरांनाही जाणवतो. मिसेस घाणेकरांनाही जाणवू लागतो तो.
कलाकाराच्या संसारी आयुष्यात त्याला समजणारा जोडीदार नाही, मन असावं लागतं. त्या जोडीदाराला रादर मनाला एक कला यायला हवी स्वतंत्र, नाहीतर निदान तो प्रेक्षक असावा, रसिक. तसं नसल्यास त्याची मिसेस घाणेकर होते.
मिसेस घानेकरांचं म्हणणं तसं योग्य होतंच, " दुसऱ्या बाईकडे गेलेला माणूस परत घरी तरी येतो, नाटकात गेलेला माणूस परत येत नाही..." वाक्य नाही, संवाद नाही हे वास्तव होतं. पण कसा येणार तो माणूस आपल्या कलेतून बाहेर.? एकतर तो प्रामाणिक राहू शकतो, नाहीतर समाजातला ढोंगी...
शेवटी बायको सोडून जाते.
मुळात चित्रपटाची मजा तेव्हा येऊ लागते, जेव्हा तुम्ही घाणेकर खऱ्या अर्थाने पचवू लागतात.
मुख्य नायकाच्या भूमिकेतील आणि घाणेकर उर्फ सुबोध भावे.  सुरुवातीला वाटतं, 'हा मेंघळट आहे, याला नाय जमायचं. हा आणि घाणेकर?'
असं म्हणतच सुरुवातीला नकारात्मकता स्वीकारत भावे उत्तमरित्या मोठा होत जातो, आणि जसजसं तो मोठा होतो तसतसे तो कलेला, त्याच्या पॅशनला ज्यापद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, ते इतर सुबोध भावेपेक्षा वेगळं ठरतं. तो आवडत जातो हळूहळू.
बायको सोडून जाण्याआधीच कांचन त्याच्या आयुष्यात येते.
कांचन आणि घाणेकरांची कथा पडद्यावर बघणं सुंदर वाटतं.
कांचन ही ती फिलींग आहे जेव्हा आपल्याला माहिती नसतं आपण कुणालातरी आवडतोय...आणि आपण बेफिकीर वावरत असतो. कांचन हे पात्र असतंच आयुष्यात, नाही?
ती कांचन होती.
आणि काशिनाथ होताच तसा प्रेमात पडण्यासारखा.
कलाकार नाही तरी निदान प्रेक्षक होता आलं पाहिजे, प्रेक्षक कांचन होती.
चित्रपटाच्या मध्यावर मला प्रश्न पडतो की, कांचन हवीच का आयुष्यात?... जी सांगेल तुम्हाला की, 'तुम्ही गर्दीत हरवताय...'
कांचन घाणेकरांच्या आयुष्यात आली.
जेव्हा आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीच्या जवळ, खुप जवळ जात असतो. आपलं मन हेलावतं, कसलातरी सुखद विचार करुन हा क्षण लांबवावा असा खेद करत मागे जावं वाटतं का? घाणेकर जातोही, धाडसी वाटायला लागतो घाणेकर तिथे, पण त्याच अगतीकतेने वाऱ्यासारखे माघारी वळून तो तिथेच कवेत घेतो कांचनला.
तिथेच घडतं रंगमंचामागचं ते घाणेकरांचं पहिलं चुंबन... तिथे वापरलेेेला कॅमेरा हा खास आवडला.
त्यानंतर घाणेकरांची बायको निघून जाते, कांचन मिळत नसते.
प्रेम मिळत नसतं तोवर माणूस त्यासाठी जीवही द्यायला तयार असतो. घाणेकर तर नाटक सोडायला तयार होणार होते. कांचन बायको नव्हती तोवर ती प्रेयसी होती, प्रतिक्षेनंतर जेव्हा लग्न होतं तेव्हा तिची गृहिणी झाली. त्यांच्या नात्यात पुढे औपचारिकताच उरते.
मनात चालू राहतं,
जो कलाकार  कधीतरी दुसऱ्यावर अवलंबून सुरुवात करतो, तोच हळुहळू घडवतो पुढे कित्येक रोजगार, कित्येक कलाकार, कितीतरी प्रेक्षक पण जेव्हा तो इतरांना घडवायला लागतो, तेव्हा मात्र स्वतःला घडवायचं विसरून जातो...
आतापर्यंत चित्रपटात तसं सगळं गोडीगोडी साजरंसंगीन चालु असतं....
चित्रपटाचं मध्यांतर होतं आणि चित्रपट मनात चालू असतो आणि  कल्पना येतेच की आता खरी घाणेकरांची ( किंवा मग कलाकाराची?) वाताहत सुरू होणार.  'नटसम्राट' ची कुठेतरी घाणेकरांबरोबर तुलना सुरू होते.
पण मी तसं करणं टाळते.
दोन वेगळ्या कलाकारांचा धर्म 'नाटक ' असला तरी आयुष्य आणि तेथील त्यांचं जगणं यांची सरमिसळ करणं हा त्यांच्या मेहनतीचा अपमान ठरला असता. 
चित्रपट पुढे पुढे सरकत जातो.
तेव्हा गर्विष्ठ घाणेकरांतून बाहेर येत घाणेकरांची
वेगवेगळी रूपे समोर येत जातात. त्याच्या भोवताली असणाऱ्या माणसांचं आयुष्य, त्याच्यामुळे बदललेले ते लोक यांची पात्र नवखणाण्यासारखी ठरतात. पंतांपासून, त्यांच्या सेवकापर्यंत. काहीकाही नाजूक ठिकाणी पंत खूप भावतो मनाला. कलेतल्या 'कलाकाराची' कदर करणारे खूप कमी असतात, पंत त्यातले होते, शेवटपर्यंत राहतात. हे बघण्यासारखं वाटतं.
मध्यांतर होतं,
आणि घाणेकर पर्वाच्या अस्ताकडे चित्रपट जातो,
वाटतं जेव्हा कलाकार आपटतो धाडकन, तेव्हा तो नाटकाची पाटी लिहिणारा माणूसही बेदरकार क्षणभरही विचार न करता त्या नाट्यगृहाबाहेरील फलाकावरचं ते प्रसिद्ध नाव खोडतो, त्याच्या त्या फडक्याने. तो आय ओपनर असतो त्या प्रयोगाच्या यशाचा, अपयशाचा आणि त्या कलाकाराचा.
त्यामुळे लोकप्रियतेची नशा चढावी पण भिनु देऊ नये. नाहीतर स्वतःच स्वतःत बेचिराख होणं मान्य करावं लागतच.
.......
एक खरा कलाकार नेहमी एका खऱ्या ' प्रेक्षकाच्या' शोधात असतो, त्याची वाट तो प्रत्येक प्रयोगाला त्याच आतुरतेने पाहत असतो. त्याच्यासाठीच हा काय तो अट्टाहास असतो त्याचा.
जेव्हा कलाकार नाकारला जातो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने स्वतः कडे बघतो, शोधतो आणि घडतो.
असं झालं नाही तर अपयश त्याला माहित नसतं त्यामुळे तो स्वतःला लोकांसमोर केवळ ' दाखवत '
असतो, शो ऑफ, फक्त बहिरुप्या म्हणून कुणाचातरी!
याशिवाय चित्रपटाचं संगीत:
"दोन वयातील जाई का अशी गंधाळली...." किंवा मग "सभोवती नसे कुणी लाजते मनात मी...." किती सहज, सोप पण खास गायलंय ते. आमचे सर म्हणायचे, सोप्प लिहिणं जास्त अवघड असतं. आणि तितकंच ते गायलाही अवघड पण तितकंच ते चटकन मनाचा ठाव घेणारं वाटलं मला.
कलाकृती घडते तेव्हा;
लेखक लिहितो, शब्द ऐका हां,
"समशेर संभाजीचं शस्त्र नव्हतं स्वभाव होता..."
म्हणजे कित्ती सुंदरपणे नटाला ते समजावून सांगावं, हा संवाद मला खेचून घेतोच. पण 'रायगडाला जाग येते तेव्हा...' हे शीर्षक जेव्हा लेखकाला सापडतं, आनंद तो कुठला हिरा कोळशातून मिळाला यापेक्षा वेगळा नसतो. बास्स एक शब्द आणि आनंद ... केवढी वेगळी संपती आहे ही, आतला आनंद देणारी....सगळा खेळ शब्दाशब्दाने फिरतो इथे. माणसाआधी इथे महत्व येतं, तुम्ही तुमच्या आतील कलेशी किती बांधिलकी ठेवतात याला.
अपयशाच्या वेळी व्यक्ती जेवढे विचार करतो तेवढे तो एका दिवसातही करत नसेल हे घाणेकरांच्या प्रत्येक अपयशावेळी उलगडत जातं.
याच जगातील आणखी एक सत्य म्हणजे
कलाकारासारखा मूडी माणूस जगात कुठेच नाही, कुठ्ठेच नाही...
आणि त्यावर शाप म्हणजे रंगभूमीवर प्रत्येक दिवसाचा ' मॅन आॅफ दि मॅच' बदलणारा. त्यामुळे कलाकाराला रोज नवं काहीतरी द्यावच लागतं. साचलेपण येऊन चालत नाही कला. नाहीतर त्याच्या कलेची डबघाई सुरू होते, मरत जातो तो, भिकार होतो तो याच कौतुकात.
त्यासाठी कलाकाराने जपावं स्वतःला. नाहीतर मध्याननंतर त्यांचा एकतर डॉ. श्रीराम लागू होतो नाहीतर ...आणि घाणेकर. कला म्हटलं की स्पर्धक आले. प्रत्येक कलाकारासाठी त्याचा तो खोचक बिंदू ठरलेला असतो.ज्याचा एक शब्द किंवा एक टिंबही मनाला लागतो. घाणेकरांसाठी ते डॉ. लागू होते. लागूंनी ही कलेची स्पर्धा छान, सुरेख आणि खेळकर ठेवली.
याशिवाय, रंगमंचा'मागे' घडणारं कुठे टिपलं जात नसलं तरी या चित्रपटात मात्र हेच दाखवण्याची धडपड केलेली दिसते.
तसेच लेखक, नटांची भांडणं कायमचीच. प्रयोग कथेमुळे हाऊसफुल झाला की अभिनयामुळे हा लेखक- नटांतला सौदाच जणू!
-----
चित्रपट शेवटावर येतो,
आणि
घाणेकर तिथेच संपतो, जेव्हा ध्वजनिधीसाठी तो खूप जास्त पैसे त्या मुलीच्या हातावर ठेवतो. ती  खुश होते. ती म्हणते, एवढे? ... तो ' ठेव ' म्हणतो. तोही खुश होतो. तेव्हा ती आनंदाने सगळ्यांना बोलावते आणि विचारते नाव काय तुमचं? ...
कलाकाराचा माज, साज, आणि आतापर्यंतचं सगळच एका प्रश्नाने संपतं. पैशाने श्रीमंती दाखवता येते, मनाने श्रीमंत होता येत नाही.
आणि म्हणून वाटतं, प्रेक्षकाच्या हाताखालची कठपुतली असतो कलाकार. प्रेक्षक त्याला विकृतपणे जगवू शकतो आणि मारुही शकतो. त्यामुळे कलाकाराने माज करूनच घ्यावा त्याच्या हक्काचा असतो कारण असही कलाकारासाठी एकच अनादिकाळापर्यंत सत्य उरतं, ते म्हणजे,
--------
कलाकाराची माती होते,
शेवटी फक्त कला उरते.... 

( हा चित्रपट आत्मचरित्रपट असला तरी ' घाणेकर 'मला ठावूक नाहीत म्हणून चित्रपट मला आवडत जातो.)

#बघावाच_असं_काही_नाही_पण_बघावा_असा_आहे

- पूजा Dheringe

...आणि काशीनाथ घाणेकर

by on नोव्हेंबर १७, २०१८
चित्रपट सुरू होतो, बघते तर काय "आताची पिढी नाही हो जास्त थिएटर, नाटकाकडे वळत. आमच्या काळात... " असं म्हणत म्हणत निम्म्याहून...