जानेवारी 2019 - Sufi
भाई…. 

नाव आणि लहानपण यामुळे गाजलेला कुणीतरी व्यक्ती पडद्यावर दिसणार म्हणून उत्सुकतेने आणि महत्त्वाचं म्हणजे अपेक्षेने चित्रपट बघायला जावं. पण बदल्यात  ? 
चित्रपट आहे छान. पण हा पूर्वार्ध होता, कदाचित पुढे मांजरेकर पूर्वर्धाचं समीक्षण पाहून उर्वरित पु.ल अजून खोलात जाऊन विनोदी साकारतील… ही अपेक्षा!
मनापासून चित्रपटात काहीतरी कमी जाणवतच राहिली. कारण पुलं देशपांडे यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर मधूनच म्युझिक आणि मोजक्या संवादामुळे पुलं बघायचाच असे ठरले. कारण लहानपणीपासून जसं चार्ली चॅप्लिन तसे महाराष्ट्रात पुलं. असं होतं म्हणून उत्सुकता टोकाची होती. 
मांजरेकर यांनी प्रयत्न हा केला की, जनसमुदायाला खऱ्या अर्थाने पुल कळावे. पण ते कळावे म्हणून तो बायोपिक गांभीर्याने करावा हे बंधन नव्हतं. दुर्दैवाने तसं घडलं.
आपण कोणती जबाबदारी घेतोय, त्याचा पडद्यावर साकारल्यानंतर होणारा परिणाम हे अत्यंत जोखमीचे काम असते. मी मुळीच हे म्हणणार नाही की, दिग्दर्शनास मेहनत घेतली नाही. मांजरेकर हे मुळात चित्रपट क्षेत्रात मुरलेले. त्या व्यक्तीने चित्रपट क्षेत्रात अभिनयापासून, प्रोडक्शन, लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. त्यामुळे त्याच्या कार्यावर आक्षेप किंवा टीका हा मुळात विनोद ठरेल. पण मी केवळ एक प्रेक्षक म्हणून मला पुलं किती भावले आणि का नाही भावला हे सांगण्याचा हा प्रयत्न केला…
मुळात “ज्या माणसाचा यूएसपीच/ वैशिष्ट्यच हशा पिकवणं आहे. त्याच्या चित्रपटाला चित्रपट गृहात सगळे गंभीर. ?   हा भलताच विरोधाभास घडून आला म्हणायचं.” हातावर मोजण्या इतके विनोद सोडले तर उर्वरित चित्रपट मांजरेकर टाईप्स आहे.
तरीही एकंदरीत जुळवाजूळव छान आहे.
चित्रपटाचा प्रवाह हा एक वेगळा प्रयोग वाटला. कारण , ” मृत्यूच्या वेळी आपल्या जवळ किती व्यक्ती असतात त्यावरून त्याची श्रीमंती दिसते. ” आणि सादर चित्रफितीत पुल देशपांडे या अवलियाची श्रीमंती त्या हॉस्पिटलच्या आवारात घोंगावत , फिरत प्रत्येकाच्या मनातले पुल दर्शवताना  दिसते. हा प्रयोग आणि बायोपिक सादर करण्याची पद्धत आवडली. वेगळी वाटली. पण जर चित्रपट हा बायोपिक बनवला, तेव्हाच एक प्रमुख गोष्ट त्यात असायलाच हवी, “ज्या व्यक्तीचा बायोपिक बनतोय ती व्यक्ती” ती व्यक्ती केवळ असून चालत नाही, तीच व्यक्ती ठासून असायला हवी, एवढी ताकद त्या व्यक्तिरेखेत हवीच. आणि व्यक्तिरेखेत असेल तर ती दिग्दर्शनातही उतरायलाच हवी.
संपूर्ण चित्रपट पुलंबरोबर फिरत असला तरी भाई खूप कमी दिसले, किंवा दिसलेही तरी त्यांच्या आजूबाजूचे पात्र जास्त उठून दिसले. सुनीता हे माझं या पूर्वार्धात सगळ्यात आवडत आणि न्याय्य पात्र. भूमिका ज्या भरभक्कम जबाबदारीने इरावती हर्षे ( सुनीता) यांनी साकारली. तेवढी एकमेव भूमिका ही अतीव सुंदर आणि खरी वाटली. मुळात ती भूमिका अभिनय नाही, जवळची वाटला. त्याप्रमाणेच भाई साकारलेला सागर देशमुख हेही भूमिकेस साजेसे होते खरे पण दिग्दर्शन करताना पुलंचा लहेजा आणि दिसणं काठोकाठ जुलवलं असलं तरी त्यांचा विनोदी किंवा कॉमिक टाईमिंग जे म्हणतात, ते जमायला आणि तितकी मजबूत डायलॉग डिलीव्हरी नाही जमली, जाणवलं. ज्या व्यक्तीची दहावीला बटाट्याची चाळ वाचली,  केवळ पुस्तकातून लोकांच्या मनावर राज्य करून त्यांना हसवण्याचं शस्त्र पेलवलं होतं, पोट धरून धरून हसण्याचं द्योतक असलेला हा अवलिया, दहावीला मराठीच्या कुमारभारती मुळे आपलासा झाला होता. ती जादू दहावीला मराठी शिकवणाऱ्या शिक्षकाची होती की पुलंची ? हा प्रश्न चित्रपट पाहिल्यानंतर पडतो. कारण हेच पुलं आज तर दृकश्राव्य माध्यमातून समोर आले. म्हणतात ना छापील पेक्षा दृकश्राव्य ची ताकद जास्त मग तरीही चित्रपटाची ताकद कमजोर का पडली. तरीही जसं म्हणते की कुठलाही चित्रपट काही. ना काही छान देऊन जातो. तसं या  चित्रपटातील घरगुती ड्रामा हा सुंदर वाटतो, थोडा नेहमीचा आहे पण ओरिजनल आहे. तसेच आवडता सिन म्हणजे सुनीता आणि पुलंची भेट… अतिशय आकर्षक आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कोण्या एका सौंदर्यवती स्त्रीला पाहून वाटेल तशा स्वरूपाची ही भेट. तेवढ्या ठिकाणी मात्र किंचितसे पुलं दिसले. वाटतं तो संवाद तर ट्रेलरमध्येही पूर्ण झाला, मग अजून कशाला चित्रपट.? पण आहे, त्याशिवाय ही चित्रपट उरतो. पुलं न संपणार पुस्तक आहे. 
सुनीता म्हणजे पुलंची दुसरी बायको. कट्टर स्त्रीवादी. त्यामुळे कणखर, खमकी आणि स्वतंत्रही. पण लग्न झाल्यानंतर आयुष्याचा भार वाटून घ्यायला लागतेच सोबत्याची साथ. आणि तेव्हा जर पुलंसारखा व्यक्ती असेल, जो लेखक आहे, गाण्यांना देणारा आहे, पेेेटी वादनाची आवड, शिवाय नाटकाचीही आवड, असे लोकं कलेत जास्त रमतात. त्यांना बाहेर वास्तवात घडणारं सगळं केवळ ढोंगीपणा वाटतो.  तेव्हा सहाजिकपणे संसारात दुर्लक्ष होऊन साथ न मिळाल्याने सूनिताने गर्भवती असल्याची बातमी समजताच दुसऱ्या दिवशीच गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. हा संदेश खूप कमी लोकांना पटेल की अशा वेळी पुलं न चिडता आईला म्हणतात, “योग्यच केलं तिने. तू दुखावली असणार पण आजी म्हणून तू बाळाला जपशील, वाढवशील पण त्या बाळाची सुरुवात आणि शेवट हा तिच्याच जवळ होणार आहे. त्यामुळे तेवढं स्वातंत्र्य तर नक्कीच तिला आहे.” हे संवाद लेखन आणि प्रस्तुती मनाला भावली. या आजच्या जगात ती स्वीकारलीच जावी असे वाटत राहते.
याशिवाय चित्रपटातील बाळासाहेब ठाकरे, पंडित भीमसेन जोशी यांचं अस्तित्व सुरेख वर्णिले. परंतु तरीही जी सर यायला हवी ती जमली नाही, वाटलेले की नाही काही तर शेवटी वसंता, पंडित भीमसेन आणि पुलंची मैफिल भाव खाऊन वाह वां मिळवेल परंतु साफ हरले तिथे. पण हो चित्रपटाचं संगीत रुचकर आहे, संपूर्ण चित्रपटाला भक्कम आधार वाटला संगीताचा. 

एका वाक्यात सांगायचे तर, पुलं चित्रपटगृहात बघण्यापेक्षा ट्रेलरमध्ये जास्त उजळून दिसले… प्रसिद्धीमुळे चित्रपट उचलला गेला तरीही काहीतरी अपूर्णत्व जाणवत राहिले.
याव्यतिरिक्त चित्रपटाला स्क्रिनिंग मिळण्यावरून वाद चालू असणारच. पण बघावा चित्रपट, मराठी आहे म्हणून नाही पण महाराष्ट्रातल्या अशा हरहुन्नरी लोकांशी चित्रपटी ओळख तरी असायलाच हवी नं… 

हास्याचे 'पुलं' चित्रपटगृहात कोमेजले !

by on जानेवारी ०५, २०१९
भाई….  नाव आणि लहानपण यामुळे गाजलेला कुणीतरी व्यक्ती पडद्यावर दिसणार म्हणून उत्सुकतेने आणि महत्त्वाचं म्हणजे अपेक्षेने चित्रपट बघायल...