सप्टेंबर 2018 - Sufi


"अगरबत्तीचा धूर... जर मी अगरबत्ती पेटवून तिला आयताकृती हवाबंद डबीत कोंडून घेतलं तर ?
निर्जीव ती, श्वास कोंडेल तरी तिचा...?
तिचा श्वास कोंडण्याची मी वाट का पाहावी ?
आपण आपल्या आयुष्याच्या पलीकडे जाऊन का कुणाच्या आयुष्यावर ताबा मिळवायचा प्रयत्न करत असतो?
पण तरीही तिची दमछाक एक सोहळा म्हणून पाहण्यासाठी मी तसं करत जाते... 
तेव्हा, तिची घुसमट, नाकातोंडाचा श्वास संपून, शरीरातला होता नव्हता श्वास संपवत ती शेवटच्या क्षणी श्वास सोडून द्यायला जाते तेव्हा ती विझून जाईल का... ? असा हा निर्दयी आनंद मी या उघड्या डोळ्यांनी पाहू लागते.
मग अशावेळी जर थोड्या माणुसकीच्या लेबलाला जागत मी मरणाच्या दारातून तिला बाहेर काढलं तर नेमकं तिचं काय होईल? या शक्यतांना मी सजवू लागते. 
तिला बाहेर काढल्यावर श्वास एकदाचा मोकळा झाल्याच्या आनंदात (?) भपक्याचा लोटच्या लोट बाहेर पडेल तिथे...  धुराचा...? 
ती राख, चिंगारी आणि अंगारा वाटेल?
आणि तेव्हाच ती कधीही भडका करून पेट घेण्याची शंकाही मी तिच्यावर घेईल.
कारण, जे तिला बाहेर काढल्यानंतर घडेल ते सगळं एका घुसमटलेल्या जीवाचा तळतळाट असेल."
ही घुसमट, हा तळतळाट म्हणजे तांडव आहे. या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच वास्तविक घटना, ज्यांना पूर्वीपासून रितीरिवाजांची तोरणे लावून सोहळ्यासारखं साजरा केलं जातं, त्या या समाजमान्य रिवाजांच्या अवडंबराचा तांडव म्हणजे हे पुस्तक.

हे पुस्तक अनेकदा अनेकांच्या तोंडून मौखीकरित्या माझ्यापर्यंत पोहोचलं होतं पण त्याच्याशी प्रत्यक्ष भेट ही या रविवारच्या कातरवेळी झाली.
गॅलरीत कपात एक अस्खलित अद्रक घातलेला कडक चहा घेऊन सायंकाळच्या वेळात हे पुस्तक मी हातात घेतलं, बाकी काही नाही चहातील कडकपणा, त्याचा रोजचा तळफळाट, त्याच रोजचं उकळणं आज पहिल्यांदा मला खूप जवळून जाणवलं, कि मग मी पुस्तकाच्या पहिल्या पानावरूनच पूर्वीच्या वास्तवातल्या प्रत्येक गोष्टीला आताच्या वास्तवात रिलेट करू लागले होते? 
माझ्या मनाच्या प्रत्येक विचारांत किंचितसा बदल झालेला जाणवत होता मला.
पुस्तकाची पाने जसजशी पुढे जात होती. माझे डोळे सुसारासारखे मोठे होत, त्या काळातल्या प्रत्येक रिवाजामुळे तापत होते.  
पुस्तकाच्या ४५व्या पानावर मी होते. जिथे सतीप्रथेचं त्या काळातील ते वर्णन अगदी हुबेहूब मांडलं होतं. त्या क्षणापुर्वी मी कधीच सतीप्रथा काय असतं याबद्दल जागरूक नव्हते. फक्त पतीच्या चितेत, जिवंत पत्नीही सती जाते, एवढी या प्रथेची तोंडओळख होती. पण काल जेव्हा या आताच्या जगात मुलगी म्हणून वावरत असताना मी हा सतिप्रसंग या उघड्या डोळ्यांनी, मनाने आणि शरीराने वाचला, तेही कुठल्याच बंधनाविना. तेव्हा मला अभिमान वाटत नव्हताच कि माझी त्यातून सुटका झाली. मला अभागी वाटत होतं त्या सती गेलेल्या कित्येक स्त्रियांसाठी.  
त्यावर बोलण्याआधी ते वर्णन मला आधुनिक पिढीपर्यंत पोहोचवावे वाटते, तो प्रसंग असा होता... 

"सतीचा माळ ( सती जाण्याचं वर्णन पहिल्यांदाच वाचल म्हणून पुस्तकातील वर्णन जसच्या तसं टाईप करून टाकत आहे )
माळावर झाडाखालीच्या हालचालीला वेग आला होता. खणल्याचा धुपधुप आवाजही येत होता. पाद्री आपल्या मांगरातून निघून खाली सतीच्या माळाच्या बाजून चालायाला लागला. तिथं वरच्या बाजूला बरीच गच्च झाडी होती, त्याच्या आडोशाला तो उभा राहीला. तिथं त्यांनी कमरभर खोल एक खड्डा खणला होता. त्या खड्यात लाकडं टाकून चिता रचाली होती. आता ते पाचसहाजण झाडाझाडांच्या बुंध्यांशी बसून वाट पाहत होते. सगळे उगी चिडचीप होते. कुणी कुजबुजत ही नव्हता. इतक्यात अकस्मात ढोल बडवल्याचा, झांज वाजवल्याचा आवाज येऊ लागला. काही वेळान आवाज जवळ आला आणि कानालाच भिडला. पाद्री अत्यंत धिर होऊन आवाजाच्या दिशेने पाहत होता. वाजंत्र वाजवीत, माणसांचा घोळका त्या बाजूनं येत होता. सर्वात पुढे खंद्यावर एक तिरडी होती. तिरडीच्या मागून पांढरी वस्त्र परिधान केलेली, मळवट भरलेली एक स्त्री चालत होती. स्त्री कसली ती, एक पंधरा सोळा वर्षाची मुलगीच होती. ती गोरी कृश बांध्याचीच होती. रडून रडून तिचे डोळे सुजलेले होते. आत्ताही सारखी रडत होती. स्फुंदून स्फुंदून  रडताना मध्येच तिचा श्वास छातीत अडखळत होता. पायही लडबडत होते. गुंगीची औषधं घेतल्यासारखी मधूनच झोकांड्या देत होती.
त्या घोळक्यात काही स्त्रिया ही होत्या. ते सर्व माळवरच्या सीमेवर येताच थबकले. बरोबरच्या स्त्रिया काही वेळ छाती बडवून घेत मोठ्यामोठ्यानं रडल्या. मळवट भरलेल्या स्त्रीला नमस्कार करून त्या निघून गेल्या. ढोलताशे अवसर आल्यासारखे मोठ्यामोठ्यानं वाजतच होते. ढोल तर इतका मोठा होता, वाजवणाऱ्याच्या गळ्यापासून ढोपरापर्यंत लोंबत होता. 
त्यांनी तिरडी आणून 'वाट संपली रे देवा' म्हणत खड्यातल्या चितेजवळ ठेवली. त्या सती स्त्रीला एका दगडावर तिथंच बसवलं. मग तिरडीचे पाश कोयत्यानं कचाकच तोडून प्रेत खाली चितेवर ठेवलं. बरोबर खांद्यावर पेटत्या गोवऱ्या आणि पाण्याच्या लहान मडक्याची कावड घेऊन एक लहान मुलगा आला होता. तो ईं ईं करून सारखा रडत होता. मधूनच तो भिऊनसा एखाद्याला विचारत होता,  "वाहिनीला आणि कशाला आणलंत हो तुम्ही इथं".
तो मेलेल्याचा धाकटा भाऊ प्रेताला अग्नी देणार होता. त्या खांद्यावर जाणत्यांनी पाण्यानं भरलेलं मडकं दिलं. पाठीमागून त्या मडक्याला कोयत्याची चोच मारून भोक पाडलं. ती गळकी धार सांडीत त्यानं त्या स्त्रीसह चितेला तिन प्रदक्षिणा घातल्या, मग मडकं तसंच फोडून टाकलं भूमीवर आपटून. आता परता ढोल, झांज, ताशा रंवरंवत वाजत होते.
सती स्त्रीला आणून त्यांनी खड्याच्या कडेला एका दगडावर आणून उभी केली. एकीकडं ती रडत होती. दुसरीकडं दगडावर तोल सावरून उभं राहायचा प्रयत्न करत होती. परत परत तिचा तोल जात होता. पाद्री सिमाँवला वाटलं, निःसंशय या लोकांनी तिला गुंगीच काही खाऊ घातलं आहे. ती गरीब असाहाय्य स्त्री, ते दांडगे पुरूष, वाजणारी वाजंत्रं यांमुळे तो संभ्रमित होता, भयग्रस्त झाला होता. त्याला काहिच सुचत नव्हतं. पुढं होण्याचं धाडसही होत नव्हतं. तो पुतळ्यासारखा स्तब्ध उभा होता. 
ढोल आभाळापर्यंत वाजत होता. ती स्त्री त्या खड्यातल्या नवऱ्याच्या प्रेताकडं पहायलाही तयार नव्हती. दिवस आता बराच वर आला होता. तरी वराच्या कदंब वृक्षाच्या पानांतून अजून काळोख गळतोय असं वाटतं होतं. चितेवरचं ते प्रेत कधीपासून कुजायला टाकलं आहे, त्याचं पोट फुगलं आहे. त्याला बुट्टाण दुर्गंधी मारतेय असं उगीच वाटतं होतं. तिथं पूर्ण जिती जिवंत होती ती स्त्री. ती व्याकूळ होऊन रडत होती आणि सर्वांगानं थरथरत होती. 
कुणीतरी उंडेलच्या तेलाचा मटका चितेवर रिता केला होता. बरंच सरण तेलानं भिजून गेलं होतं. त्या मुलानं चुडतांची चूड पेटत्या गोवऱ्यांवर पेटवून घेतली आणि चितेला अग्नी दिला. तेलासह सरण पेटू लागलं. शिळेवर उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे एक वयस्क माणूस गेला आणि त्यानं ढोलताशांचा आवाज भेदीत मोठ्यामोठ्यानं म्हटलं, "आयाव मरण मेल्यास स्वर्गाचं द्वार तुला उघडं होईल. नवऱ्याच्या चितेत तुझ्या पापाचं जळून भस्म होईल. तुला मुक्ती मिळेल. तुला मोक्ष मिळेल. जन्मोजन्मी तुला हाच नवरा मिळेल.
तू देवीच्या पदवीला पोचशील.
तू अंखड आयाव राहशील.
तू मोठी पतिव्रता होशील.
आता कचरू नकोस. भिऊ नकोस. आनंदानं नवऱ्याच्या चितेच्या अग्नीचा स्वीकार कर".
चितेच्या अग्नीच्या उठलेल्या ज्वाळा एकदम तिच्या अंगावर आल्या. त्या तापानं ती एकदम मागे सरकली. तेव्हाच त्या वयस्क माणसानं आपल्या दोन्ही मुठी पाठीमागून तिच्या कमवरेवर टेकवून तिला आगीत ढकलून दिलं. तेव्हाच वरच्य लोकांनी हरहर महादेवाचा गजर केला. वाजंत्रं उच्छादं मांडल्यासारखी वाजत होती. झांजेचा झ्या झ्या आवाज कानावर झापडं टाकत होता. 
चितेवर पडलेली ती मोठ्यामोठ्यानं किंकाळ्या मारत होती. अकस्मात तिनं चितेतून बाहेर उडी मारली आणि ती खड्याच्या कडेवर आपटली. तिथं एक माणूस हातात लांब दांडा घेऊन उभा होता. त्यानं तिला पुन्हा आगीत ढकलली. तिच्या किंकाळ्या चालूच. 
पाद्रीला ते पाहवलं नाही. तो दुखावला, तिरमिरला, देहभान विसरून चितेकडं धावला. "काय करता तुम्ही हे, दुष्ट पाप्यांनो? देवा नरकात ढकलेल तुम्हांला."
तो त्या स्त्रीला ओढून घेण्यासाठी आगीत हात घालून पाहत होता. पण चारपाच जणांनी त्याला ओढून, बाजूला नेऊन जमिनीवर आपटला. एकानं हातातल्या काठीनं त्या मारलं, "हा परधर्माचि चांडाळ आमचा मरणविधी भ्रष्टवायला आला आहे. आमची क्षत्रियांची वंशपरंपरा आहे ती. चल चालायला लाग इथून."
पाद्री सिमाँव उठला आणि धडपडता चालायला लागला. त्याला आता चितेच्या दिशेला पाहण्याचंही धाडस नव्हतं. पण आता त्या स्त्रीचा आवाज मावळला होता. तिचा आता कोळसा होऊ घातला होता.
पाद्री जड पावलांनी आपल्या मांगराशी परत येत होता. मांगराच्या दाराशी पोचल्यावर त्यानं मागं वळून पाहिलं. वाजंत्रांचा आवाजही आता थंडावला होता. सतीच्या माळावर आता भयान थंड शांतता पसरली होती. तिथं आता आगीचे लोट नव्हते तर चितेतून फक्त काळा धूर उठत होता. जळून गेलेल्या मानवी मांसाचा वासही त्यात मिसळला होता. तो बुरसा धूर झाडाझुडपांतून पसरून होता. त्यानं सूर्याचा उजेडही खाऊन टाकला होता.
- तांडव, महाबळेश्वर सैल." 
-------------------------
हे वाचून होतं... 
मी निशब्द होते.... मला बोलायचं असतं किंवा नाही. माहिती नाही. परंतु, माझा राग अनावर झालेला असतो....
कारण त्यांच्या मानण्याप्रमाणे 'देवी तेव्हा होता येतं जेव्हा जिवंत स्त्री चितेत मारून टाकली जाते.'
कधी जन्मली असेल ना ही सडकी मानसिकता?
तिचा जन्म झाल्याझाल्या त्या माणसाने स्वतःच्या मनाला मारून का टाकलं नाही?
आणि पुढे वाचताना 'तिथे एक क्षत्रिय म्हणतो, आपल्या मरणविधीत हा त्रयस्थ व्यक्ती व्यत्यय आणत आहे? ' 
म्हणजे जिवंत माणसाला जपण्यापेक्षा, या धर्मांधांना हे मरणाचे सोहळे धर्मरक्षक बनवतात ? 
'आजच्या घडीला तरी ही परिस्थिती वेगळी आहे का?' हा सहज प्रश्न मनात येतोच, माझं मन 'फक्त त्याचं स्वरूप बदललं', इतकंच उत्तर देतो.  
यापलीकडे जाऊन माझा संताप तेव्हा होतो जेव्हा हे सगळं घडवून आणण्यासाठी, गावातल्याच बायांना धाय मोकलून रडायला लावलं जातं, ढोल आभाळापर्यंत वाजवायची ऑर्डर दिली जाते, म्हणजे या सगळ्या आवाजाच्या झंझावातात याची खबरदारी घेतली जाते कि, 'सती जाणाऱ्या त्या बाईच्या मरणाचा आवाज तसूभरही बाहेर पडलाच नाही पाहिजे.' 
एक एक ओळ वाचताना माझा अक्षरशः ओळीओळीला संताप वाढत होता, त्या बाईच्या वेदनेने अंगावर काटा येऊन नसानसातून जाणारा श्वास मला अडखळत म्हणतो, 'तू भाग्यवान आहेस, या पिढीत जन्माला आलीस.' 
तेव्हा माझा संताप होतो कारण, "आज म्हणतात खून करणं पाप आहे, पण हा तर समाजमान्य खून होत होता. आणि तेव्हाच्या काळी काय आणि आताच्या पिढीत काय, जसं तेव्हाच्या काळी सती जाणं, हा खून होता. तसं आताच्या काळात मुलीच्या मनाविरुद्ध लग्न लावून देणं हा जिवंतपणी त्या मुलीच्या आयुष्याचा, इच्छेचा, स्वप्नांचा खून आहे."
तीव्रता कमी झाली, पण स्त्रियांना या काय तर प्रत्येक युगात सहनच करावं लागलं आहे. स्त्रियांनाच फक्त... अभ्यासक्रम आणि स्वरूप फक्त वेगळं झालं.  
या पुस्तकांची पन्नासच पाने वाचून झाली आहे. त्यामुळे यात सखोल असं काही लिहणार नाही. फक्त या वास्तवाशी माझ्यासारखी अनेक मुलं फक्त तोंडओळखीने ओळखत असतील तर एकदा याची दीर्घ ओळख करून घेण्यासाठी 'तांडव'ची सुरुवात कराच... 
नावाप्रमाणेच आहे पुस्तक.



मरणाच्या सोहळ्याचा 'तांडव'

by on सप्टेंबर १४, २०१८
"अगरबत्तीचा धूर... जर मी अगरबत्ती पेटवून तिला आयताकृती हवाबंद डबीत कोंडून घेतलं तर ? निर्जीव ती, श्वास कोंडेल तरी तिचा...? ...
घराच्या बाहेर कॉरीडोअरमध्ये पायऱ्यांवर शांत बसायला मी जाते.
शांत म्हणताना हा 'शांत' शब्द सहज म्हणावा तसा का म्हणून जातो आपण? त्या शांsssssssत शब्दात कितीतरी गूढ आहे. आणि त्यापर्यंत अजूनतरी कुठला मनुष्य पोहोचलाच नसणारे. ते न जमणार काम आहे.
मोठं झाल्यावर आपण शांत कधी असतो? मला तरी मी अशी शांत कधी सापडलेच नाही. फारफार तर ही शांतता मला मी खुश असल्यावर मिळते. त्याशिवाय, शांततेच्या नावाखाली फक्त एकांत शोधणं असतं. एकांतातही असंख्य विचारांना मी का बळच आमंत्रित करीत असेल? 
हा एकांत मी 'माझा वेळ' म्हणून काढत असते आणि त्यातसुद्धा कुठलीच मला सुखावणारी गोष्ट नसते.
साधं उदाहरण आहे, बाहेर कॉरीडोअरमध्ये मी आज कितीतरी दिवसांनी बसले आहे, येरझारा घालणारी हवा, समाजातील निरव शांतता आणि रातकिड्यांचा आवाज एवढंच काय ते बॅकग्राऊन्डला आहे. तो आवाजही नको म्हणत कानांना हेडफोन लावून मी काय ऐकते? तर .... 'क्यों मैं जागूssss' हे एकट्याचं, एकांताचं आणि आयुष्याला कंटाळलेलं गाणं... 
म्हणजे अशाप्रकारे मी यशस्वीरीत्या एक घटका घटक्याने माझ्या विचारांची घुटन वाढवणारी बुदली भरत असते. तरीही मनाला माझ्या प्रश्न पडत राहतो, 'नेमकं तुला काय झालं आहे?'
'कुठे शोधू हा एकांत?' म्हणत जेव्हा हा एकांत मला सापडतो, मला स्वतः मुळेच दचकायला, घाबरायला होतं. कारण या शांततेच्यावेळी हा 'स्व' काय निर्णय घेईल मला याचा कुठलाच अंदाज येत नाही. 
अशात कुठेतरी स्वतःच्या स्वप्नांचा विचार करण्याचा मी थोडाफार प्रयत्न  करायला जाते, होतं काय माहिते...? मीच माझा आत्मविश्वास 'बघता येईल, वेळ येईल तेव्हा....' म्हणत त्याला जन्मुच देत नाही. 
शेवटी 'स्वप्न का पाहतो माणूस?' 
विचारते मी स्वतःला कधीतरी तो लहानपणीचा प्रश्न; 'काय व्हायचंय तुला...?'
मोठे झाल्यांनतर विशी पार केल्यानंतर प्रत्येकचजण डॉक्टर, इंजिनियरपेक्षाही 'मला शांत व्हायचंय...' म्हणणारा असतो.
'स्वप्न का पाहतो माणूस?'
जिवंत राहण्यासाठी म्हणणारी मी आहेच. 
पण त्यापुढे जाऊन, माझं बनलेलं एखादं स्वप्न हे माझ्या आवडीमुळे बनतं कि पैशांसाठी ते स्वप्न बनत असतं. ?
मनापासून सांगू तर माझं स्वप्न मला माहित नाही. आजही माहीत नाही. लोकं मला अशामुळे डेडबॉडी समजतील, मला ते मंजूर आहे. 
या आधी प्रत्येकवेळी स्वप्न पाहायला मला कुणीतरी भाग पाडलं आहे. पण तेही माझं चिरकाल स्वप्न नसतंच... 
लोकं म्हणतात, 'खूप मेहनत घे, खूप प्रसिद्ध होशील.!'
माझा प्रश्न असतो, का...? आणि झाले प्रसिद्ध मग... ?
लोकं असतील आजूबाजूला, सगळं जग मला ओळखेल, बेसुमार प्रेम चौफेर कानाकोपऱ्यातून बरसेल. ते तर आजही आहेच. 
ए पण नको, तेव्हा मिळणाऱ्या प्रेमात भेसळ असेल. आत्ताच मला मिळतंय ते प्रेम 'प्रेम' शब्दाला पूर्ण करणारं आहे. 
बरं तरीही वाटतं कधीतरी, 'व्हावं खूप मोठं सगळं जग ओळखेल एवढं' म्हणून खटाटोप घेणारं हे प्रामाणिक मनही असतं.... माणूस आहे ना. 
पण तेच प्रामाणिक मन सांगतं, 
'ते मोठं होणं कशासाठी माहिते का?' 
पैशांसाठी. 
आणि पैसे कशासाठी माहिते?
'हवं ते करण्यासाठी.' 
"मला हवं ते करायचंय..." हे स्वप्न आहे माझं. 
दुर्दैव प्रत्येकाच्या आयुष्याचं हेच असतं. स्वतःला वैयक्तिक हवं ते कधी करता येतच नाही , त्रास कुणालाच द्यायचा नसतो. फक्त स्वतःच्या आयुष्याच्या मानसिक, आंतरिक शांततेसाठी हवं ते करायचं असतं. 
आणि ते न करून आपण आपल्या या सुंदर आयुष्याची हसूनच एक चिरफाड करून टाकणारे आयुष्य एका कॉरीडोअरमध्ये छानपैकी डिजाईन करत असतो...
.
 मीही तेच करणारी एक डेडबॉडी बनत होते... ?  


माझ्या एकांताची कहाणी !

by on सप्टेंबर ०४, २०१८
घराच्या बाहेर कॉरीडोअरमध्ये पायऱ्यांवर शांत बसायला मी जाते. शांत म्हणताना हा 'शांत' शब्द सहज म्हणावा तसा का म्हणून जातो आपण? त्...