बापआई तू... - Sufi

बापआई तू...


"वडील (?)
कोण आहे हा व्यक्ती ?
शब्द नवा नाहीये पण माझ्यासाठी कोण आहे ... ?
त्याची माझ्या आयुष्यातली भूमिका काय आहे..?"
सगळं केवढं वेगळं आहे हे ....
मला या शब्दाचा त्रास होतोय हो ...!   ज़रा शांत बसाल तुम्ही? 
नका विचारू मला असले पाया नसलेले प्रश्न .... 
इतके दिवस त्रास नव्हता होत. मी बोथट झाले होते, पण आज अचानक शरीरातून सळसळती वीज जावी, दुखत्या भागावर घणाघाती आघात व्हावा तसं अंग आतून युद्ध करून उठलं, जेव्हा ऑडिटमधे मला 'वडिलांवर' बोलण्यास संगितले...
काय वेगळं आयुष्य आहे ना हे ...? म्हणजे​ नटसम्राटमध्ये म्हटलं तसं लुळ्यालाच चप्पल नसल्याच दुःख सांगावं, तसं आज एवढा सगळा स्टाफ सोडून वडिलांवर फ़क्त मीच बोलावं हे माझ्या वाटणीला यावं......? 
त्यावेळी हळवी वगैरे मुळीच झाले नाही मी ...एखादी जखम लहानपणापासून वाट्याला आली कि तिचं दुःख  तर होतंच नाही पण ती तिथे आहे कि नाही हेही  आयुष्याच्या लढाईत विसरून जातो, माझ्या आयुष्यात बापाचंही तसंच झालं एखाद्या जखमेप्रमाणे... 
पण खंबीर होऊन वाट्याला आलेला तो टास्क मी, वॉशरूममध्ये जाऊन मनात एकच विचार केला, "माझ्यासमोर असणाऱ्या या प्रत्येकाकडे आई-वडील या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, पण माझ्या आयुष्यात असणारी एकच व्यक्ती केवळ माझी आईच नाही तर ती माझी वडीलही आहे आणि जी आई मुलीचे वडील होऊ शकते ती मग कुठलीही भूमिका सहज निभावू शकते ...."
पण मी त्यांना असं संगितल की माझी आईच माझे वडील आहे तर.. ?
ते कसं  वाटेल ऐकायला? विशेष म्हणजे अनेकानेक मानसिक प्रश्नार्थक नजरांना मला सामोरं जावं लागणार तेव्हा त्यांना आश्चर्य नाही वाटणार किंवा वाटेलही पण ....
पण माझ्यासाठी त्यांचं आश्चर्य गौर करण्यासारख असेल? अज्जीबात नाही कारण त्यापेक्षा माझ्या या 'विश्वानं' हे सगळ आतापर्यंत निभावून आणणं, एक आई आणि एक बाई म्हणून ते कोण्या वीरपुरुषाहून कमी धैऱ्याचं नाही ठरणार! मी ते सांगण्यातच धन्यता मानेल... 
"त्रास होतो आता.?" बॅकग्राऊंडमधून प्रश्न येईल. 
"नाही रे ! त्रास नाही होतंय आता, सवय झाली नां... फक्त लहानपणी वडील शोधला, नाही मिळाला कुठेच. मग खोट्या आशांवर जगत राहीले. आयुष्य मोठं होत गेलं. मग आजूबाजूचे प्रश्न करायला लागले. त्यांच्या प्रश्नांनी मला कोड्यात पडायला व्हायचं.
मागे एकदा आईला विचारलंही, "आई, बाबा कुठे असतात गं ? ..... ती शांत राहिली आणि मी तिची शांतता समजण्याइतकी मोठी झालेली.  त्यामुळे मी तोच प्रश्न पुन्हा उच्चारला नाही. आयुष्यात कद्धीच!
बाबा होते ना... त्या दिवशी खरंतर त्यांना मिठीत घ्यायचं होत, थोडं सांगायचही होतं माझ्या भविष्याबद्दल, माझ्या जोडीदाराबद्दलही. पण त्यांना शेजारच्यांच लग्न पार पाडायच होतं, शिवाय जोशींची मुंजही होतीच .....
मला कळतच नाहीये प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला हक्काचा हीरो, माझ्या आयुष्यात साइडरोल का करून गेला...! 
असो ! 
म्हणूनच डोळ्यातला अभिमानाचा समुद्र तिच्या पायाशी ठेऊन म्हणते, " बापाचं जाऊदे ,पण आई भरभरून दिली, इतकी की बाप होऊनही ती पुरून उरली ........"
"हॅपी फादर्सडे आई ...."
तुझीच लाडली. 
(वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला मिळालेले वडील)



1 टिप्पणी: