रिटच रूह - Sufi

रिटच रूह

आम्ही दोघेही पडल्या पडल्या गुणगुणत होतो,

'रूह से चाहने वाले आशिक़,
बातें जिस्मों की करतें नहीं...|'


रेडिओवर चाललेलं हे गाणं ऐकता ऐकता त्याच्या केसांत बोटं फिरवत मी सहजच त्याला म्हटलं,
"जर का मीही आयुष्यात ही अशी चूक केली तर.?"
"तुला कळतंय ना तू काय म्हणतेय ?" तो अच्चानक अग्रेसिव्ह होऊन उठलाच...
"अब्सुल्युटली... सांग ना नेमकं काय होईल तु मला सोडून जाशील.?, मी सहजच म्हणत होते.
"तसा कुणी आहे का.?" त्याला पटापट साताठदहा प्रश्न विचारायचे होते लक्षात आलं माझ्या.
"असेलही. तुझ्या उत्तरावर पुढे सांगायचे की नाही ठरेल." मी त्याची फिरकी घेण्याच्या मूडमध्ये म्हटलं.
"तु असा जीव टांगणीला का लावतेयस.? आधी सांग काय झालंय नेमकं...? हॅव यू किस्ड इच अदर ?"
"डोन्ट गेट पजेसिव्ह. शांततेत बोलूया या विषयावर?" त्याने डायरेक्ट किस्सबद्दल विचारलं तेव्हा ठरवलं आता सिरियस्लीच बोलण्याची गरज आहे.
"हो... डिपेंड करतं की तू नेमकं काय केलयं.?" त्याचा दृष्टीकोण त्याच्या उत्तरांतून अजून जास्त कळत चालला होता. मीही कंटिन्यू केलं.
"आर यू सिरियस ? म्हणजे तु म्हणतोयस की, तु मी काहीतरी केलंय यावरून आपलं इतक्या वर्षांच नातं तोडून टाकशील.?
म्हणजे मीठी मारली असेल तर कशी मिठी?, कितीवेळ आणि का ? ? किंवा मग किस्स असेल तर कसा किस.? लिपलॉक की गालावर...? किंवा त्यापुढे इफ वी एन्ड अप इन बेड मग तर तिथे तु कुठलीच शक्यता न ठेवता ते नातं तोडून टाकणार असंच नं ...?"
"इट्स ऑब्वियस माय लव्ह!" हे त्याने ज्या टोनमध्ये म्हटलं, त्याने माझा राग वाढत चालला होता. कारण त्याला माझी याबद्दलची मतं, दृष्टीकोण चांगलाच माहिती होता. त्यामुळे त्याच्याकडून येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर मी शॉक होत होते. तरीही धुसर सगळं स्पष्ट व्हावं म्हणून मी प्रश्न विचारला...
"ओह्के...! आणि जर का आम्ही हे सगळं केलं असेल म्हणजे मीठीत घेण्यापासून किसपर्यंत आणि त्याहीपुढे जाऊन तु जो विचार करतोय तेही घडलं असेल तर.?"
"_______" तो काहीच बोलला नाही.
मी कंटिन्यू केलं,"आणि जर का तसं काही आमच्यामध्ये घडलं असेल आणि यापुढे आम्ही एकमेकांना भेटणारही नसू असं ठरवलं असेल तर? त्यामुळे यापुढे आमचा एकमेकांशी कसलाच संबंध येणार नसेल. तरीही तुला प्रोब्लेम असेल.?"
"तु आता खरंच माझ्या डोक्यात जातेयस. मला सुचत नाहीये काय बोलू... मला क्लियर सांग काय झालं आहे नेमकं.?"
"उम्म्म्मम्मम्मम,
मी फक्त विचार करत होते की जर लोकं म्हणतात, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या त्या दोन्ही व्यक्तींनी एकमेकांशी प्रामाणिक असलं पाहिजे. त्यातील एकाही व्यक्तीने त्या व्यक्तीव्यतिरिक्त तिऱ्हाइत व्यक्तीशी नातेसंबध (स्पष्टच म्हणायचे तर लैंगिकसंबंध) ठेवले तर ती व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीला फसवत असते."
त्याच्या चेहऱ्यावरचे भाव माझ्या प्रत्येक वाक्याला बदलत होते ... मी बोलत राहिले...
"पण मी खूप दिवसांपासून गोंधळात पडलेय. म्हणजे बघ हां नात्यात असलेली ती व्यक्ती आणि तिऱ्हाइत व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यांच आकर्षण कुठल्याच मार्गाने भावनिक नसतं. त्यामुळे त्यांच्या आकर्षणात निव्वळ निव्वळ ओढाताण असते एकमेकांच्या शरिराची. आणि ते आकर्षण थांबणही शक्य नसतं मग एका अशा अघोऱ्या क्षणी ती दोघे तो क्षण बिनधास्त अनुभवून घेतात. काही बेफिकिरीने, काही गिल्टने ..."
"तुझा मुद्दा कळेल मला स्पष्ट.? तु या विषयाबद्दल सकारात्मक दृष्टीकोण मांडून स्वतः जे काही केलंय त्याचं समर्थन करत नाहीयेस बरोबर?"
"आधी मला बोलू दे पूर्ण !
म्हणजे बघ नं मी एकदा तुला विचारलं होतं की, एखादी व्यक्ती आपल्याला का आवडू लागते.? किंवा त्याच व्यक्तीच्या प्रेमात आपण का पडतो.? तेव्हा तुच म्हणाला होतास नां, 'प्रेम हे भावनिक टेलिपथी जुळल्यावर, विचार जुळल्यावर होतं. असं खूप कमी व्यक्तींबद्दल वाटतं आयुष्यात. आणि माझ्यासाठी ती व्यक्ती 'तु' आहेस...'
तर मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे विचार केला तर मला एक प्रश्न सारखा पडतोय की, तिऱ्हाइत व्यक्तीने तुझ्या प्रिय व्यक्तीच्या निव्वळ त्वचा म्हणवणाऱ्या त्या शरीराला स्पर्श केला तर तु नातं तोडण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतोस.?"
"मला ना...______"
"तु थांब ... तुला आत्ता काही बोलता येणार नाही, किंबहुना सुचणारच नाही.
मला माहितीये तुला काय म्हणायचे आहे. हेच ना की, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीच्या हक्काचा तो स्पर्श असतो. तो त्या व्यक्तीच्या नावे केलेला एक 'स्वर्गीय क्षण' असतो."माझ्या या वाक्याने त्याच्या कपाळावरच्या रागीट आठ्यांचा शीण किंचित ओसरल्याचं जाणवलं. ही फक्त एका बाजूने विचार करतेय हा त्याचा भ्रम मी त्या एका वाक्याने दूर करत पुढे बोलू लागले...
"पण मग जर मी तो क्षण दुसऱ्या कुणा व्यक्तीबरोबर अनुभवला म्हणजे त्यानंतर मी तो क्षण तुझ्याबरोबर तितक्याच गहिरेपणाने अनुभवू शकणार नाही असं काही असतं का.?...
मग तर तुझा मागच्या चार प्रेयसींबरोबर तो क्षण आधीच अनुभवून झाला आहे. मग.?"
"तुमच्यात खरंच तसं काही घडलंय का.? मी शांततेत विचारण्याचा प्रयत्न करतोय हां... तू बाकीचे संदर्भ काय सांगत बसलीयस .. कित्ती ताणवणार आहेस अजून. घडाघडा काय ते बोलून टाक ना यार्र आता..." तो अंगाशी आलेलं सगळं सावरून बोलत होता.
"बघ हं... म्हणजे सध्याच्या परिस्थितीला तुला मी खुप बालिश वाटेल. पण एवढंच सांगावंस वाटत होतं, प्रेम आहे ते. त्यात शारीरिक क्षण महत्वाचा असतोच. कदाचित तोच असा क्षण असतो जिथे ती प्रेम करणारी दोघे या दुनियेपासून, सगळ्या स्वार्थापासून दूर होतात नि एकमेकांशी शरिराने तर जोडले जातातच पण ते भावनेनेही एकत्र येतात.
आकर्षण असतं तिथे फक्त शरीर ती क्रिडा उपभोगत असतं परंतु जिथे प्रेम असतं तिथे त्या व्यक्तीचा रोमरोम ते उपभोगून सुखी होत असतो. याशिवाय हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न की त्याने कुणाबरोबर शारीरिक संबंध ठेवावे.
पण आपल्या नात्यात, आतापर्यंतच्या या नाजूक संवादात मला अपेक्षा होती की, तू एकदा तरी काळजीपोटी विचारशील की,' तु तुझ्या मर्जीने तो क्षण अनुभवलास का.? किंवा कोण आहे तो मुलगा..? असं का घडलं अचानक.? किंवा मग माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तु असं काही करणारच नाहीस... किंवा तसं काही घडलंय तर मला नीट सांग काय झालं आहे, आपण त्यावर सोल्युशन काढू...
आणि सोल्युशन काही उरलंच नसतं तेव्हा तु खुशाल त्या नात्यापासून मोकळा झाला असता तर काहीच वाटलं नसतं.
पण्ण नाही तुला फक्त तो क्षण ऐकायचा होता नि त्यापुढे मी बोलायला सुरुवात केल्यापासून तुझ्या मनात ब्रेकअप ठरलंच होतं.
आपला संवाद सुरु झाल्या झाल्या तुझं ते ओव्हरपजेसिव्ह होणं मी मान्यही केलं कारण मला माहितीये प्रेम हे आकर्षणाशिवाय पुर्ण होणारे का ...? पण त्यानंतर तु ज्या अतिअविश्वासाने सगळं काही बोललास त्यामुळे मी मुद्दाम हे विरुद्ध फासे टाकले आणि तुझा 'नात्याचा आदर करतो. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे वगैरे वगैरे वगैरे' मुखवटे अस्से गळून पडले त्यावरून तरी वाटतंय मीच कुठेतरी या नात्याचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे.
बाय द वे, मी फक्त त्या गाण्याचे शब्द ऐकले,
"रुह से चाहने वाले आशिक़,
बातें जिस्मों की करतें नहीं...|"
नि कल्पनेने तुला हा प्रश्न विचारला.
पण या तुझ्या एकंदरीत अज्ञानी रिॲक्शनवरून एक सांगावसं वाटतंय,
"रुह और जिस्म पत्तीया दोनों एकही पेड कीं है।
दोनों के बीच एक बारीकसा धागा हैं उसें समझने में जल्दबाजी कर दीं हैं तुमनें|"

त्यामुळे शरीर आणि आत्म्यातील तो धागा शोध,
समज,
आत्मसात कर,
त्यातील वास्तव 'प्रत्यक्षात' पचव,
मग भेटू आपण...
बाय!

 मेरे बस दस प्रतिशत हिस्से से वाकिफ़ हो तुम, फिर कभी मिलेंगे॥



                                                           



1 टिप्पणी: