ऑगस्ट 2018 - Sufi
आजचा दिवस हा सगळ्या फोटोग्राफर्सच्या जिव्हाळ्याचा दिवस असतो. जीव असलेल्या कॅमेराबद्दल पार जीव ओवाळावा इतकं प्रेम येतं नि एक फोटोग्राफीचा काळ डोळ्यासमोरून जातो....

बदलत्या काळासोबत किती गोष्टी बदलतात. आणि
बदल हा या फोटोग्राफीचा सगळ्यात प्रमुख नियमच जणू !
जसं जसं काळ बदलत गेला, तेव्हा तेव्हा हा काळ कैद करून ठेवलाय तो या कॅमेराने. कॅमेराने काळही स्विकारला नि तोच काळ सतत कैद करण्याचं अमीष फोटोग्राफर्सला सूपूर्दही केलंय. फोटोग्राफीने सामान्यातल्या सामान्याला अमीर बनण्याची मुभा दिली. स्वतःच्या निव्वळ वेगळ्या दृष्टीने, दृष्टीकोणाने स्वातंत्र्य दिलं स्वतःच असं वास्तविक आयुष्य कल्पनेत जगण्याचं.
एकदा हातात कॅमेरा आला की सुरुवात जरी स्ट्रीट फोटोग्राफी, कॅन्डीड फोटोग्राफी,  पोट्रेचर फोटोग्राफी यांचे अगणित प्रयत्न करून होत असली तरी, त्याचा शेवट कुठे नसतो, हे फोटोग्राफीचं गूढ असतं. माणूस रोज नवीनपणे खुश होऊ शकतो ही ताकद तिच्यात असते.
कालपर्यंत घर कॉलेजचा उंबरठा सोडून, दुसरे कुठलेही स्वप्न न जगणारा हाच फोटोग्राफर आपल्याच विश्वात अमीरांचा बादशाह होऊन स्वप्न बघतो ट्रॅव्हलर बनण्याचं, जगभर फिरून ते जग आपल्या कॅमेराने कैद करून स्वत: जगून लोकांपर्यंत ते सुपूर्द करण्याचं... आणि इथेच त्याच्याही नकळत एका गरिबाचं एक व्यक्तीमत्व नकळत पडद्याआड तयार होत असतं. तो एक फोटोग्राफर म्हणून वृद्धिंगत होत असतोच, पण घडवत असतो स्वतःच एक संवेदनशील मन आणि त्याचबरोबर एक भटका ट्रॅव्हलर, ट्रेकर, आणि एक जगाला जगापर्यंत पोहोचवण्याचा दुवा.
वैयक्तिक पातळीवर, तसं माझ्यासाठी फोटोग्राफी ही डीएसएलआरपासून सुरु झाली नाही.  तिची सुरुवात ही टकटक मोबाईलपासून.
तसं मनात ठेवलं नि फोटो काढला, अशा अर्थी मी कधी फोटोग्राफीकडे वळलेच नाही.
हे तंत्रज्ञान असलं तरी माझ्यासाठी हे जादूचं खेळणं होतं, जे मला आनंदी ठेवत होतं.
लहानपणी माझ्यासाठी हे फोटोग्राफीचं जग एका दुरदेशी असलेल्या आणि कधीही आपल्या हाती न लागणारं खेळणं होतं. पण मोठी होत गेले. शिक्षण घेता घेता कॉलेजच्या कॅंपसला कॅमेराचं वरदान मिळालं नि मला ते दिसलं. हातात ते वेव्ह फोनमधून न येणारे, सगळे ब्लर्ड फोटो खचाखच न खचता क्लिक करायला लागले. हळूहळू न दिसणारं स्वप्न माझ्यासमोर येउ लागलं नि नकळत मित्राने उधार म्हणून कॅमेरा माझ्याकडे ठेवायला दिला. त्यातून जन्म झाला एका तोडक्या मोडक्या फोटोग्राफरचा ! आणि वाटायला लागलं 'या क्षणी मी या आयुष्याचे सगळ्यात सुंदर क्षण जगतेय.' जेव्हा मी हातात हा कॅमेरा घ्यायचे. त्यामुळे लिखाणाचं भूत होतंच त्यात कॅमेराने आपलंस केलं नि माझी दृष्टी मोट्ठी होऊ लागली.  हा माझा अनुभव आणि मी घडले, चुकून उधार कॅमेरा हातात आल्यानंतर...
माझ्यासाठी फोटोग्राफीचा सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे आरशातली फोटोग्राफी...
या प्रकारात ना कुणा  फोटोग्राफरची गरज असते. तिथे असतो फक्त तुम्ही आणि कॅमेरा. त्याला हॅण्डल करून त्यातून स्वतःला कसं सुंदर दिसावायचं ही जोखीम भयंकर मोहक असते. 
ती कशी त्याची ही उदाहरणं ;


तसं लोक म्हणतात, "एक फोटो हजारो शब्द व्यक्त करतो.", पण एक फोटोग्राफ घ्यायला हजारो क्लिक्स काढून बघावे लागतात, हे अव्यक्तच राहते. त्यामागे आवड, छंद जरी असला तरीही तिथे शारिरीक कष्ट अव्यक्त असतात. मन सुखी असतं पण शरीराला सूज येउन जाते. पण फिकर त्याची नसते, हजारोतून एक निवडणं ही दुसरी जोखीम असते.

सध्याच्या परिस्थितीला अल्मोस्ट लोकांसाठी फोटोग्राफी हे एक फॅड झालं आहे. हातात कॅमेरा आला कि ऑटोवर कॅमेरा टाकायचा आणि ते क्लिक बटनची जागा शोधायची आणि एकेक फोटो काढत बसायचं. आक्षेप तिथे माझा नाही, पण हे किती दिवस ? ऑटोच्या पुढे जाऊन मॅन्युएलवरही प्रयत्न करून केव्हा बघणार ? तिथेच खुश राहणारे हे असतात. म्हणजे एखाद्या खेळण्याला मोठ्या आनंदाने विकत घ्यायचं नि त्याला नीट न्यायही द्यायचा नाही? त्याचा लोक करतात तसाच वापर करायचा ? ? नवीन असं काहीच नाही? अशावेळी वाटतं पुढे जावं त्यांनी. त्यात मजा आहे, त्यात नशा आहे. ती समजून घ्यावं त्यांनी. असो ! ही ज्याची त्याची आवड... यापुढे जाऊन काही लोक म्हणतात मला यातील तांत्रिक बाबी समजत नाही. चुकत आहेत तुम्ही. फोकस तुमचा चुकतोय. आयएसओ , अपर्चर, शटरस्पीड, या सगळ्या भंपक कल्पना आहे. जोड याची हवीच,
 पण 'प्रकाश' हा याचा महत्वाचा जोडीदार ठरतो. तो ओळखता यायला हवा आणि तोचतोचपणा फोटोत आणण्यापेक्षा आपल्या दृष्टिकोनाला आव्हान देता यायला हवं, मग 'डीएसएलआर आहे म्हणून फोटो काढतो.' हे टोमणे बंद होतात.

बाय दी वे, 'बीहाईंड दी सिन... ' म्हणजे 'दिसणाऱ्या फोटोच्या मागे काय घडतं? 'हे फोटोग्राफीत सगळ्यात मोठं वरदान किंवा शापही असतो म्हणा....
जर फोटोमागे घडतं ते सगळं आपल्याला हवं तसं असेल तर तो फोटो आपल्याला हवा तसा मिळतच नाही. याशिवाय फोटो ज्याचा क्लिक करणार असतो त्यांच्यात आणि फोटोग्राफरमध्ये अंडरस्टॅन्डिंग आणि मॅच्युरपणा नसेल तर सगळा फोटोशूट फ्लॉप जाऊन मग त्या शूटला नीट करावं लागतं फोटोशॉप किंवा स्नॅपसीडसारख्या एडिटिंग ॲप्समध्ये.
पण या दोनच गोष्टी नसतात फोटोच्या मागे. तिथे असते धम्माल, फेक कॅन्डीड काढण्याचे भयानक भारी प्रयत्न. त्याचबरोबर माझ्या अनुभवावरुन तरी हे फेक कॅन्डीडच फोटोग्राफरला बेस्ट आणि इतरांहूनही वेगळा फोटो, फ्रेम देतात. त्यामुळे हा बीहाइण्ड दी सिन एक अनोखा आणि प्रत्येक शूटला वेगळा माहोल देणारा भाग असतो.

फोटोग्राफीने जसं फोटोग्राफरला विश्व दिलं तसंच, स्वतःच विश्व दिलं या 'नजरेला.' नजरेलाही एक विश्व असतं, तिलाही आपलं मन कुठल्यातरी माध्यमातून व्यक्त करता येतं. या विश्वात माणसाच्या मनातलं नजर व्यक्त करते आणि त्याच नजरेला व्यक्त व्हायचं असतं तेव्हा हा  कॅमेरा तिचं माध्यम बनतं.
या सगळ्याअनुभवांतून एक मोडकीतोडकी फोटोग्राफर झाल्यानंतर एकच घटित कळलं,
"निसर्गापेक्षा सुंदर फोटोग्राफर नाही आणि माणसांच्या डोळ्यांपेक्षा सुंदर लेन्स नाही."
तरीही स्वतःसाठी करत राहू या कॅमेराचे लाड आणि बनू होममेड खुशीचा हकदार!


जग फोटोग्राफरचं !

by on ऑगस्ट १९, २०१८
आजचा दिवस हा सगळ्या फोटोग्राफर्सच्या जिव्हाळ्याचा दिवस असतो. जीव असलेल्या कॅमेराबद्दल पार जीव ओवाळावा इतकं प्रेम येतं नि एक फोटोग्राफीचा ...
दोस्त ....
म्हणे दोस्त...
नीट बघा बरं दोघांना...  दोस्त दिसता का हो ते ?
"त्यातला एक तुम्हाला बाप वाटेल आणि दुसरा त्या बापाने दत्तक घेतलेला मुलगा..."
याव्यतिरिक्त,
तुम्ही लोकं वेडे असतात त्यांना मित्र म्हणतात...
तुमची काही चुक नाहीच म्हणा ते दोघे हरामी, तुम्हाला जे दाखवायचं तेच दाखवता..
बघायची तुम्हाला त्यांची यारीच, तर जा त्या ठिकाणी (ते ही त्यांनी येऊ दिल तर ) जिथे ते दोघे मित्रांशी खोटं बोलून गपचुप कुठेतरी फिरायला जाताय... लोकांसमोर शांततेचे ते पुतळे बसतात, पण नजरेनेच ते एकमेकांचा आनंद बनता .... जा अशा ठिकाणी,  जिथे ते एकमेकांच्या सोबतीने रडतात... आणि जा अशाही ठिकाणी, जिथे ते एकमेकांच्या सोबत नसू या भावनेने रडतात... जा  तिथेही जिथे ते निव्वळ शांत बसलेले असतात स्मशानांतता असते आणि तरीही ते निशब्द बोलतात ...
पण अशावेळी तुम्ही कुठे असता माहिते ? तुम्ही असतात त्यांच्या व्यावहारिक मैत्रीत ...
चांगलंय तेही, त्यांनाही तुम्हाला तिथेच तर ठेवायचं असतं...
'व्यावहारिक मैत्रीच' तर फक्त ते तुम्हाला दाखवू पाहतात...
किंवा फार फारतर तुम्ही असतात, मुलगा मुलगी मित्र नसतातच म्हणजे हे एकत्र सिनेमाला जाता, एकत्र खाता, हातात हात घालून फिरता हे सगळं पाहून समाज बनून या पवित्र बंधनाला तुम्ही दुषणं देता, स्वतःच्या बुद्धीच्याआकाराएवढे!
आणि मग तुम्ही त्यांच्या मैत्रीवर स्वार्थी जळून त्यांच्यात फाटे फोडतात... आणि तिथेच त्यांची मैत्री सिद्ध होऊ लागते...
एक गोष्ट सांगू? ...
"दोस्त कभी सस्ता नहीं होता...
मी गेल्यावर माझी किंमत कळेल, यापेक्षा दोस्त  असतानाची किंमत कैकपटींनी जास्त असते. तेव्हा त्याची किंमत ठेवा." !
फक्त आठवण करून देते, मित्राला गृहीत धरणं,  मोठी चुक असते ...
त्यावरच गोष्ट आहे...
मित्र होतो आम्ही दोघे, तीव्र जिवाला जीव देणारे ... एकमेकांशिवाय कॉलेजचा एक दिवस जगलो नव्हतो.कॉलेज संपलं आणि मैत्री...?
पावसाळ्याचे दिवस चालू होते...
बाहेर धोधो पाऊस कोसळत होता. टेलिव्हिजनवर बातम्या चालू होत्या. आम्ही दोघे आमच्या कॉलेज दिवसातले किस्से रंगवत होतो. दिवस तो 3 ऑगस्ट होता, बर्रोबर मागच्या वर्षी आम्ही लडाखला गेलो होतो...
आज के दिन मौसम , कुदरत सगळं इतकं सुंदर जुळून आलं होतं की मी वाट पाहत होते तो मला म्हणेल 'चले?'
तो अर्ध वाक्य म्हणायला आलाच मी "ऑफ कोर्स एस्स" ... म्हणून पूर्ण केलं.
आणि क्षणही न दवडता आम्ही गाडी, कपडे, पैसे, दोरी, कॅमरा आणि एक हरवलेली मुस्कुराहट घेऊन लग्गेच निघालो ...
वातावरण बाप झालं होतं...
वातावरणात मैत्रीचा गंध पसरला होता... यारी पें हमारे कुछ जादा ही प्यार आ राहा था|
लडाख म्हणजे आमची यारी होती.
जिच्यात प्रचंड ओढ होती आणि प्रत्येकाच्या आयुष्यातलं ते स्वप्न, फक्त माझ्या वाट्याला येऊन पूर्ण होत होतं, तेही प्रत्येक फ्रेंडशिपडेच्या दिवशी..! एकमेकांना नकळत दिलेलं ते प्रोमिसच होतं, "कोणी मरत जरी असेल तरी फ्रेंडशिपडे पुढे ढकलला जाणार नाही. भेटायचं म्हणजे भेटायचंच. फिक्सच!."
ठरल्याप्रमाणे निघालो आम्ही.
आम्ही जुने किस्से पुन्हा आठवत, कॉलेजमधल्या पिंकी चिंकीला आठवत, पहिल्या प्रेमाच्या, पहिल्या ब्रेकअपला शिव्या घालत,  हळूच 'एखादा हॅंडसम मुलगा ओवर्टेक करून गेला की त्याच्यावर मी लाइन मारत आणि सुंदरशी मुलगी गाडी चालवत गेली की त्याला दाखवत' आम्ही आमचे दिवस पुन्हा आणून जगत होतो. हा आनंद एका वर्षभरात मी वेड्यासारखा मिस्स केला होता... आयुष्याच्या गर्तेत हा फुकटचा, होममेड आनंद मी विसरूनच गेले होते. पैसा करीअरच्या घाईत मी माझा आनंदच दावणीला लावलेला होता. आज भेटणं कशापेक्षाही जास्त महत्वाचं होतं नाहीतर पुढे होणार होतं ते कसं झालं असतं?
तसं मध्ये एक वर्षाचा गॅप गेला होता. आमचा एकमेकांशी कॉंटॅक्ट झालेला नव्हता. तरी आज भेटलो होतो आम्ही. आम्ही भेटलो तेव्हा या मधल्या एका वर्षाबद्दल टेलिपथीने ठरवलंच असावं की "मधल्या काळात काय झालं हे गौण आहे कारण आजचा दिवस आपला आहे. ते आपण सगळ नंतर बोलूया. काय भांडायचं नंतर भांडूया..."
या'नंतर'च्या भरवशावर आमच्या प्रवासात एक पूल आला, त्यावर खड्डे जमले होते. बाहेर बेधडक पाऊस कोसळत होता... मागच्यावेळी हेच खड्डे आम्ही "चल डरपोक , हम हम हैं, जायें या नहीं जायें? हम नहीं सोचतें. चल एक जान होके पार करते है।..."
पण यावेळी तो त्याचं तो पुढे गेला, मी माझं...
आणि अर्ध्यात तो पूल एक दोरी निसटून खाली कोसळला...आणि क्षणात काय झालं माझ्या डोळ्यासमोर कळलंच नाही. श्वास लिटरली अडकले होते...
यावेळी वेगवेगळे गेलो म्हणून मी मरणार होते...
'मेरी यारी मुझ में जान भी डालती है।' हे मला त्या क्षणी कळत होतं. माझं भानच गेलं होतं... हे घडणं प्लॅन नव्हतं मग असं कसं घडत होतं, मी घाबरून गेले होते. तितक्यात तो मागून जिवाच्या आकांताने ओरडायला लागला होता, "हर्रामीsssss, कित्ती मिस्स केलंय तुला कल्पना नाहीये भूता आणि त्याचा बदला मला लडाखला पोहोचून घ्यायचाय, तुला वाचायचंय कळतंय का... तु ब्रेव्ह गर्ल आहेस. धीर सोडू नको. नाहीतर मी दुसरा मित्र कुठून शोधू?" ... ते ऐकून जागी होऊन मी गाडी सोडून दिली,
आणि म्हणाले, "शोधूनही मिळेल काळ्या?" मला या परिस्थितीतपण त्याचा राग आला होता. माझी रिप्लेसमेंट मला नकोचे. तो करणारही नाहीये खात्री असून त्याची गच्ची पकडून त्याला जाब विचारायचा म्हणून तरी मला वाचायचं होतं ... एका  हाताने त्या पुलाची सुटलेली दोरी घट्ट पकडली. मोठय़ाने श्वास घेतला पण त्याचं तोंड बघण्यासारखं झालं होतं, ते डोळे सुसरासारखे मोठेठे  झाले होते ... त्याचा जीव अर्ध्यात येऊन पडला होता...
त्याचा तो थरकाप, माझ्याप्रतीचं प्रेम पार डोळ्यातून बाहेर आलं होतं पहिल्यांदा ... त्याच्या डोळ्यात "मला रहायचंय तुझ्याबरोबर आयुष्यभरासाठी, कधीही न सोडण्यासाठी...." दिसत होतं... हे मी त्या चार भिंतीच्या आत कोंदटलेल्या ऑफीसात मिस्स केलं होतं...
तो घाई करत, आहे तसा गाडीवरुन खाली उतरला. मी त्याच्याकडे पाहीलं आणि " यारर्र  सॉरी यारर्र्रsssssss..... का कस माहिती नाही पण तुला गृहीत धरू लागले होते... हे एवढे दिवस तुझ्याविना राहणं म्हणजे माझ्यातली मीच शिल्लक राहिली नव्हते... मला जगायचंय" म्हटलं
..
"एएएएएएssss बाई, नंतर लेक्चर झाड ना... मरायवर आलीयययय इथे... आधी बाहेर निघ इथून फिल्मी कुठली... " तो विव्हळत होता..
आणि आरडाओरडा करून, आरोळ्या देउन लोकांची मदत मागत होता. शेवटी कुणाची वाट न पाहता, एका ठिकाणी खरचटवून का असेना, त्याने मला रस्सीने व्यवस्थित बाहेर काढून एका सुरक्षित जागी ठेवलं होतं, माझ्या हक्काच्या मिठीत...! त्याचा जीव माझ्यात परत आला होता ... मला माझ्यात जीव जाणवायला लागला होता....
तेव्हा मला कळलं होतं जीव जाणं काय असतं आणि आपला जीव जाताना दुसऱ्या कुणाचा जीव जात असतो ते काय असतं.... आणि हाच तो हरामी एका अशाच क्षणी आपला होतो आयुष्यभरासाठी!!!
पण या घटनेमुळे,
तिथे तो माझा बाप झाला होता ...असा बाप जो माझ्यासाठी धडपड करत होता, ज्याला त्याच्या मुलाला जगवायचं होतं,  वाढवायचं होतं. ज्याचे त्याला सगळे लाड पुरवायचे होते. ज्याला माझ्यावर निस्वार्थ प्रेम करायचं होतं, जो माझ्या यशावर न जळणारा एकमेव प्राणी असतो या पृथ्वीवर...
त्यावेळी मला कळलं होतं तो त्याच्यातल्या मला कधी मरू देणार नव्हता मला कळलं होतं.... आणि म्हणून दोस्ती म्हणजे 'एकच व्यक्ती असते जेव्हा शोलेचं ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तुम जैसे चुतियोंका सहारा, यारों दोस्ती बडी ही हसीन, मेरी जिंदगी सवारी म्हणत जो गडी कुठल्याही गडबडीशिवाय तुमच्या शेजरी येतो तो हा व्यक्ती असतो .."
स्साला ही दोस्ती नाही, स्वार्थ असतो...
स्साला ही दोस्ती नाही, जीव असतो...
स्साला ही दोस्ती नाही, शरीर असतं...
स्साला ही दोस्ती नाही, श्वास असतो..
स्साला ही दोस्ती नाही, बाप असतो...
म्हणूनच ही दोस्ती कुठल्याच बंधनात न बसता प्रत्येक नात्याची कमी पूर्ण करणारं वरदान असतं ...

दोस्त नहीं, तो बाप असतो ...

by on ऑगस्ट ०५, २०१८
दोस्त .... म्हणे दोस्त... नीट बघा बरं दोघांना...  दोस्त दिसता का हो ते ? "त्यातला एक तुम्हाला बाप वाटेल आणि दुसरा त्या बापाने दत्...


आज खरं सांगू ??? तू एकदा प्रश्न विचारलेलास..."इतकं कसं लिहितेस तू.? तेही माझ्यासारख्या विषयावर...?"
आज त्याचं उत्तर द्यावसं वाटतंय...
             जेव्हा वेगळे झालो आपण... आठवण तुझी इतकी घट्ट यायची की त्या आठवणींची ती मिठी सुटायचीच नाही किंवा कदाचित मला ती सोडावीशीच वाटायची नाही... तुझं इतक्क जीवजाणं व्यसन लागलं होतं की त्याची नशा उतरवावी वाटायची नाही. रात्र-रात्र थरकाप व्हायचा 'तू सोबत नाही' या भावनेने ... तो थरकाप तू तुझ्या हातात घ्यावा त्यासाठी तरी तू सोबत असावा वाटायचास...
          अनेकदा खोटे भास मी स्वतःच्या मनाला खरे करून सांगितले आठवतंय मला कारण माझा विश्वास होता, "एकदा खरं प्रेम केलं की तिथे ब्रेकअपसारखे नसते उपद्व्याप नसतातच..  प्रेमच प्रेम असतं. सुरुवातीलाही आणि शेवटपर्यंतही." वाटलं होतं, अशावेळी तरी तू येऊन माझ्या बोलण्याला खरं करशील.... पण हळूहळू तू त्या प्रत्येक ठिकाणी कुठेच आला नाहीस, तेव्हा मी लपेटून घ्यायला लागले स्वतःला, माझ्या लेखनीच्या आकारात, उकारात, शब्दांत ... त्यांच्या अस्तित्वाने किमान आपल्यातली ती सतत पोखरणारी शांतता मला तोडायची होती म्हणून स्वतःला मी गुरफटवत गेले त्या निळ्या काळ्या शाईच्या गर्तेत ...
         तू त्या कल्पनेतही माझ्या कित्ती जवळ असायचास वेड्या. जसा खरोखर सोबत आहेस__फक्त एका श्वासाच काय ते अंतर... त्या कल्पनेतही स्वतःचाच इतका हेवा वाटायचा आणि त्यामुळे तिथेच अशा खुऊपशा रात्री मी अशाच निवाआआअंत घालवायचे. आणि त्या चार भिंतीत आपलं दोघांमधलं 'लग जा गले' शोधत राहायचे...
         तुला आठवतंय, त्यावेळी मी तुला "माझ्या घरी येऊन मला मिठीत घेऊन दाखव मग मानेल तुझ्या प्रेमाला" म्हटलेलं... त्यावेळी नेमकं घरी कुणी नसल्याचा स्मार्ट डाव तू खेळला होतास शहाण्या ... मी चितपट झाले होते, संपले होते तुझ्या त्या एका प्रेमातल्या कटाक्षाने नि नंतरच्या अघुर्‍या "तू माझीच आहेस फक्त कळलं.?" या भावनेने ...
         सध्या भोवती वास्तवात नाहीयेस तू ... पण या स्वतःला स्वतःच्या लिखाणात लपेटून घेतल्यामुळे तिथे तू नसूनही तू माझा आहेस आणि तू नसल्याचे दुख मला तिथे तू नसतानाही त्यातून बाहेर पडल्यावर खुश करून पाठवत आहे... तुला लपेटण्यापेक्षा या शाईला लपेटून मी तुला 'तू माझा असल्याचा' हक्क तर दाखवूच शकते, जी वास्तवात एक कल्पना आहे...!!!
शेवटच एक सांगू...?
काल शेवटचं ठरलंय...
काल तुझ्या त्या 'एका आठवणीबरोबर' मी कितीतरी वेळ खेळत बसले होते ...
थोड्या गप्पाही झाल्या...
तुझ्या येण्याची आम्ही दोघींनी आतुरतेने वाट पाहिली ...
मी थोड़ी जास्तच नेहमीसारखं!
न राहवून ती म्हणालीच, "बावळट आहेस का गं तू.? तो आला असता तर मी आले असते का.? तू इतकी आंधळेपणाने कशी कुणाची होऊ शकतेस.? ... "
ती आपलं बोलत राहिली, बोलत राहिली नि मी तिच्या त्या बोलण्यातही तुझं 'येणं' शोधत राहिले...
शेवट निघताना तटस्थपणे तीच म्हणाली;
            यापुढे लक्षात ठेव,
आपण तिघे एका ठिकाणी नसूच शकतो ... स्पष्ट नाही...
त्यामुळे स्विकारून टाक त्याचं माझ्यातलं असणं,
तो फक्त माझ्यात असेल यापुढे आता ... आणि यार्र्र आता बस कर हा आठवणींचा पसारा, तोचतोपणा आणि बरोबरची ती जुनी शाई. आऊटडेटेड झाली आता...
विचार मीही तोच करायला लागलेय !
कारण, आठवणींचा समुद्र तुझा अंगावर येतोय आता,
माझ्यासकट माझं पूर्णत्वच घेऊन जातोतू.
सवड दे मला थोडीशी,
घट्ट रुतून बसते किनाऱ्याला.
तीर स्वतःचे बांधायचे आहे,
त्यात राहतील तुझ्या आठवणी, मीही पूर्ण !

शाईतल्या ईकारात 'तू '...

by on ऑगस्ट ०२, २०१८
आज खरं सांगू ??? तू एकदा प्रश्न विचारलेलास... "इतकं कसं लिहितेस तू.? तेही माझ्यासारख्या विषयावर...?" आज त्याचं उत्तर द्यावस...