फक्त दुष्काळात दिसते हे मंदिर ! - Sufi

फक्त दुष्काळात दिसते हे मंदिर !



"दूर ५० मीटरवर एक बाबा उन्हाळ्यात पाणी, आईसक्रीम विकत बसलेले दिसतात."

त्यांच्याशी संवाद वाढवायचा, त्यांना म्हणायचं,
"काय हो बाबा, हि दगडं कशी पडली?" यावर ते त्यांच्या रोजच्या पर्यटनाची कॅसेट सुरू करतात.
त्यात एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली जाते, "ते तुम्हाला आवडतेय ना दूरवर ते झोपडीचं ठिकाण. तिथे अजिबात जाऊ नका ( दबक्या आवाजात).
हे काहीतरी थ्रिलिंग वाटत होतं म्हणून मी त्यांना विचारलं, "का हो बाबा? छान आहे कि ती झोपडी. या मंदिरासारखी पडलेलीही नाही."

त्यावर ते काहीच आश्चर्य न दाखवत म्हणू लागतात, "काही दशकापूर्वी त्याच दूरवरच्या झोपडीत एक वर्हाड गेलं होतं. तेव्हा झोपडीच्या तिथून लागलीच मंदिरात यायला भुयार होतं. लोकं पाण्यामुळे तिथून ये-जा करायचे. पण एके दिवशी त्या भुयारातून गेलेलं जोडपं अन त्यांच्याबरोबरच वऱ्हाड पुन्हा कुठे कधीच दिसलही नाही आणि मंदिरापर्यंत पोहोचलही नाही. त्यामुळे इथून जाताना थोडं जपून!
तेथील कोरडी जमीन, अनोळखी माणसे आणि हे वेगवेगळे किस्से यामुळे मनाचे आधीच भीतीने खिळखिळे झालेले फुफ्फुस हळूहळू स्वतःला समजावू लागताच ते पुढे म्हणतात,
"तुम्ही आता ज्या उंच कळसाला पाहत आहे ना, त्याची दगडं आतून पोखरली गेली आहे आणि ते बाजूचं वेगळं पडलेलं मंदिर आहे ना, त्याच्या आत गेले की एका वृत्तपत्राच्या पानावर कुंकवाचे सडे दिसतील. त्या आतल्या भागाला ओलांडण्याचे चुकूनही धाडस करू नका."
तरी बरे त्यांनी सांगायच्या पूर्वीच ते धाडस मनाने करून झालेलं होतं. त्यामुळे मनात कसलाच किंतु न ठेवता ते अनुभवले तरी.
त्यात वेगळं काही नव्हतं. कारण 'कुंकवाचा पडलेला लाल सडा हा मनाला अडवेंचर जगायला शिकवतो.'
मी ते डोळ्यासमोर आणून बाबांचं ऐकू लागते.
बाबा बोलू लागतात, "अन् त्याच एकट्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूच्या शिळांना दुसऱ्या एका बारीक दगडाने वाजवून पाहा. तिथे असलेल्या प्रत्येक पाच दगडातून वेगवेगळा आवाज येतो. हा प्रयोग मी करून पाहिलाच. तेव्हा मला कळलं प्रत्येक दगडाची ठेवण ही वेगळी आणि काही दगडे ढीली झाली आहेत. बरीच कारणं असू शकतात. त्यामुळे या गोष्टीला मी घाबरले नाहीच.
मग "हा मंदिराच्या बाजूलाच एवढ्या मोठ्या दगडांचा ढीग कसा? "

मी खूप वेळ त्या ढीगाकडे पाहत होते, तेव्हापासून डोक्यात सतत चालू होतंच. तोच ते म्हणाले, "हा मंदिराच्या बाजूलाच एवढा मोठा दगडांचा वेडावाकडा ढीग तो त्या काळात होता मोठा तटबंदी दरवाजा."
असे वाटले जसे काही वर्षांपूर्वी घडलेलं सगळंच कल्पनेच्या स्वरूपात माझ्यासमोर पात्रांसकट उभे राहिले. हा सगळा एका नव्वद वर्षाच्या मूर्त माणसांकडून मिळालेला 'पळसदेव'चा वसा.
यावरून त्यांना हे सांगायचं होतं की, आजही हे मंदिर म्हणजे पुरातन घटनांचं वास्तव्य असलेलं ठिकाण आहे.

मी होकारार्थी मान डोलावत पुढे आले खरी. पण डोक्यात या जुन्या समजुतीचे पारायण चालू होते.
उर्वरित प्रश्र्नांपैकी "नेमकं त्या जोडप्याचं काय झालं असेल ?" एवढा प्रश्न अनुत्तरित राहत होता.
तेव्हा मंदिराच्या इतिहासाची उत्सुकता चाळवली -
पळसदेव गावात असलेलं हे पळसनाथ मंदिर. चालुक्य राजाने, ८ ते ११ या तीन शतकांमध्ये हेमाडपंथी पद्धतीने बांधले. पुण्याहून हे मंदिर १३० किलोमीटरवर आहे. जायला साधारण ३ तास लागतात.
पुण्याहून सोलापूर रस्त्याने जाताना, भिगवाणच्या पुढे गेल्यानंतर उजनी धरणाची मागची बाजू दिसू लागते. त्या मागच्या बाजूचा रस्ता कापत कापत जेव्हा हळूहळू पुढे जाऊ लागतो.
तिथे दूरवर अर्ध्या पाण्यात एक जुन्या घडणीतलं मंदिर दिसू लागतं. हे काहीतरी चित्रपटाच्या शूटिंगची आठवण करून देणारं असतं. 
या मंदिराचा एक स्वतःचाच नियम असतो.
पाणी खूप असेल तर पाण्याचा फक्त वरचा भाग किंवा कळसच दिसतो. परंतु सध्या महाराष्ट्रातल्या दुष्काळाने होरपळलेल्या जमिनींमुळे पानी पातळी प्रचंड प्रमाणात खाली गेली आहे. त्यामुळे हे विदारक चित्रण असले तरीही, पळसदेव बघणाऱ्यांसाठी हा एक विचारात पाडणारा पण पर्वणी अनुभव असतो. 
कारण काही वळणे पार केल्यानंतर एका पॉईंटला पोहोचल्यानंतर स्वतःची वाहने आपण नेऊ शकत नसतो. केरळात असते तसं ह्या बाजूने त्या बाजूला जायचे तर प्रत्येकी ५० रुपये नाववाल्याला देऊन मंदिरापर्यंत पोहोचणे शक्य होते.

त्यानंतर हळूहळू वातावरणाचा अंदाज घेत मन प्रसन्न आणि नवं खाद्य मिळाल्यासारखे कावरबावर होऊन सगळचं न्याहाळू लागते. प्रवास पाण्यातून जाणारा असल्यामुळे मन मंदिरापर्यंत पोहोचण्याआधीच प्रसन्न होऊन जाते. नावाडी हे दिवसातून अशा अनेक पर्यटकप्रेमींना हे सुख देत असतात. त्यांची कमाई दिवसाला अंदाजे सातआठशे होते, असे हा प्रवास करताना त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर लक्षात येते.
इथे प्रामुख्याने दोन मंदिरं आणि एक धर्मशाळेची परस आहे.

या मंदिरांच्या आवारात जरी मन प्रसन्न होत असले तरी एका दृश्याने मनाची घालमेल होते कारण येथील मुख्य मंदिराच्या कळसाला ज्या आखीवरेखीव दगड, शिळांचा आधार आहे. त्यावर संपूर्ण टोकापर्यंत, कळसाच्या भागापर्यंत चपला घालून, धडधड आदळत वर जाता येणं शक्य आहे. 
हि एक व्यक्ती म्हणून लज्जास्पद मानसिकता आहे कारण येथे जाणारे लोक हे त्या मंदिराची डागडुजी किंवा बांधकाम बघायला न जाता ते तिथे सेल्फीज, टिकटॉक व्हिडीओज किंवा फोटोज काढून सोशल मीडियावर कुल दिसण्यासाठी जातात. त्यामुळे इथे एखादीतरी 'दिशादर्शक' पाटी असावी. जेणेकरून त्या मंदिराचे पावित्र्य आणि त्यावरील भाग विस्कळीत होणार नाही. 
१९७८ला जेव्हा उजनी धरण बांधले गेले त्यांनतर हे मंदिर फक्त इ.स. २००१, २०१३, २०१६, २०१९ ला पाण्याबाहेर आले होते. 
मंदिराच्या दिशेने गेल्यानंतर पात्रे, चौकोनी खांब, लवा, बेल, स्तंभ या पंचशाखांच्या पायाभरणीवर सुस्थितीत दिसते. नंदी, मरगळ, सुंदर शरीरयष्टी असलेले आणि अजंठा लेण्यांवर कोरलेले दगडातील शिल्प इथेही आहे, जुन्या दगडांना हे कोरलेले दगड शोभून दिसतात. 
मंदिराची भटकंती झाल्यानंतर पाऊलं आपोआप उजनी धरणाच्या पाण्याकडे जाऊ लागतात, कारण उन्हाच्या झळांनी लाही लाही झालेला प्रवास दूर लोटण्याचा प्रयत्न त्यात असतो. महाराष्ट्रातला दुष्काळ त्या उजनीच्या पाण्याच्या बाहेर असलेल्या जमिनीत भेगा खोदून खोदून झिरपलेला दिसतो. तेव्हा पायाला मेलेले मासे, खेकडे आणि बगळे लागतात. तरीही येथे येणाऱ्या पक्षांची उजनीसोबतची नाळ तुटत नाही. ते याचा मनसोक्त आनंद एखाद्या कट्ट्यावर बसून लुटत राहतात.



मन आतापर्यंत हा दुष्काळ स्वीकारण्याची तयारी करतो कारण प्रवासात आणलेली पाण्याची बाटली हि पळसदेव लागायच्या आधीच संपलेली असते आणि बाबांकडून विकत घेतलेल्या पाण्याने कोरड संपत नसते. जेव्हा दुष्काळ आपल्यापर्यंत पोहोचतो तेव्हा त्याची झळ, दाहकता आणि त्यातलं वास्तव याची धग जाणवू लागते. ते कोरडे दृश्य मनाला वाचा फोडू लागतं.


उजनीला आलात पण उजनीचे 'मासे' नाही खाल्ले असे मांसाहारी नाहीत. त्यामुळे भिगवणची खासियत म्हणून तिथल्या चवदार, बोटे चाखत बसावे अशा माशांचा धंदा करणारा व्यापारीही मंदिराच्या ५० मीटरनंतर तुमची वाट पाहत असतो.
परतताना जास्त काही नाही पण मंदिराचं सौंदर्य, गुपितांची कुपी अन् बाटलीच्या तळाला लागलेल्या पाण्याच्या घोटाचं महत्त्व अधोरेखित करून मन नाविन्याने पण खिन्न होऊन जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा