एक कष्ट बोलके...! - Sufi

एक कष्ट बोलके...!


आयुष्याला नेहमी दोन वाटा असतात, "एकतर करायचं, नाहीतर सोडून द्यायचं... "
'तिच्या' चेहऱ्यावरही तेच होतं...
रात्रीचे नऊ वाजले होते. आम्ही डी मार्ट वरून परतत होतो ...
मला रात्र आवडते कारण ती जिवंत असते. तिच्या सानिध्यात श्वास मुक्तपणे घ्यावेसे वाटतात, श्र्वासांच अस्तित्व जाणवत. मी सहसा रात्रीच्या वेळी बाहेर पडत नाही त्यामुळे कधीतरी बाहेर पडल्यानंतर " माझ्यासाठी रात्र म्हणजे वेगळी नशा असते."
त्या नशेत मी धुंद होते. बसमध्ये गर्दी नव्हती. पण अनेक चेहरे थकलेले होते. बस ' खानापूर ' असल्यामुळे त्यातून प्रवास करणारे चेहरे हे दिवसभर कष्ट करून थकलेले, कष्टाचे बोलके चेहरे, हातावर पोट असलेले...
त्यामुळे या बसमध्ये शीण होता... पण बस मिळाली, रिक्षाचे जादाचे पैसे वाचले, याचा सुस्कारा त्या प्रत्येकाच्या मनात होता... बस सुरू झाली... साधारण एक किलोमीटर गेल्यानंतर बस एका स्टॉप नसलेल्या ठिकाणी थांबली.
अचानकच...
विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत सगळ्यांनी "नेमकं काय झालं.?" म्हणून बाहेर पाहिलं, मीही डोकावले.
तर बसच्या कंडक्टरला त्याच्या नशेची तलफ आली होती...
तो त्याच्या नशेशी इतका प्रामाणिक की, त्याने दुनियेला विसरून स्वतःची इच्छा पूर्ण केली...
ते मला इतकं सुंदर वाटलं की, कसं एखादा माणूस परिस्थितीला विसरून स्वतःच्या आयुष्यात 'राजा ' म्हणून जगू शकतो, त्याच्या त्या 'असण्याला ' मनात बसवून गाडी पुढे जाणार होतीच. पण क्षणाचा वेळ न गमवता मी हातातल्या मोबाईलचा कॅमेरा ओपन करून तो क्षण माझ्याकडे घेतला... त्याचं वास्तव काहीही असो तो माझ्यासाठी या दुनियेत, 'आयुष्याला जिंकलेला माणूस होता. '



मी क्लिक केला आणि माझ्या जवळच बसलेल्या (इतक्या वेळात माहीत नसलेल्या) मावशीने माझ्या त्या क्रियेला दाद देत खुदकन हसल्या...
मला स्वतःच मी प्रॉम्प्ट वाटले. आवडले. पण पुढे त्यांना बोलायचं होतं...
" ए हे कित्ती लग्गेच झालं... मस्त केलं फोटो काढला..." दैनंदिन आयुष्यातील संवादापेक्षा हे वाक्य वेगळं होतं.
प्रत्युत्तर देण्यापेक्षा मी त्यावेळी फक्त एक ओळखीची स्माईल दिली.
"कुठे उतरणार... ? "
त्यांच्या नजरेशी नजर मिळाली, त्यामुळे मी वेगळच काहीतरी निरखत राहिले,
आणि त्यामुळे मला लगेच उत्तर सुचलं नाही.
पण पुढे " उममम.... हां xyz इथे."
मग 'थोड सेकंदभर बोलू का यांच्याशी?'असा सहज विचार मनात आला,
म्हटलं, "तुम्हाला?"
त्या लगेच म्हणाल्या, "वडगाव..."
मी प्रश्नार्थक नजरेने पाहिले... त्यांनी कन्टिन्यू केलं.
" बाई काय करू मग, ही बस आतपर्यंत जात नाही
... पण बस लवकर येत नाही. त्यामुळे आता बाहेरच उतरून चालत जावं लागेल घरापर्यंत."
"होना तेच म्हटलं बस खानापूर मग वडगाव कसं? "
पण बरं झालं याच बसमध्ये चढल्या. तशी बसची संख्या कमीये. त्यात रात्रीचं वाट पहावत नाही. घरी जावं वाटतं आपल्यापल्या. " मी त्यांच्या कलाने बोलले.
"आपलं कोण सांगून ऐकतं? त्यात इथून रोज दहाला घरी पोहोचायच. त्यांनतर पुढे स्वयंपाक... असं वाटतं ना कुणीतरी म्हणावं गेल्या गेल्या की झोपून घे. मी खुशाल झोपेल." त्या सलग बोलू लागल्या...
" मुलगी नसते का घरी?" मी सहज स्वाभाविक प्रश्न विचारला.
" लग्न झाली त्यांची. घरी सासू, नवरा आणि मुलगा असतो."
मी म्हटलं, " मुलगा काय शिकतो? "
त्यांना माझ्याशी बोलून आधार वाटत होता, अनोळखी पण आवडता संवाद होता तो.
" त्याचं शिक्षण झाले, तो आता मुलांना स्विमिंग शिकवतो, काय म्हणतात त्याला?
म्हटलं, " स्विमिंग ट्रेनर." हे समजल्यानंतर मला विचारावं वाटलेलं की, 'तो लवकर येतो मग तो स्वयंपाक करून नाही ठेवत का?' पण म्हटलं आई आहे ती. आणि तेही ' मुलाची आई' म्हणून माझं वास्तविकतेने बोलणं मी टाळलं.
"हां तेच... " त्या म्हटल्या. मी माझ्या विचारातून बाहेर पडले.
"त्यात मालकीण इतकी राबवून घेते. कसंही वागवायच कामाला म्हणून?. त्यात कळतही नाही इतक्या लांब जायचं, तरी कधी लवकर सोडत नाही" त्या सांगत होत्या.
" कुठे कामाला जातात तुम्ही.? " त्यांच्या आयुष्याचा भाग होत मी विचारलं.
" डेक्कनला ... "
मग मी डोक्यात गणित करून त्यांना विचारले, " म्हणजे तुम्हाला दोन बस बदलून यावं लागलं असणार. "
" दोन नाही तीन. तिथून डायरेक्ट बसही नाही. देवही कसा कोणाला देतो तर भरभरून आणि काहींच्या नशिबी फक्त कष्टच..... मोठ्ठा पौज घेऊन त्या सलग बोलू लागल्या. " पण जे चाललं ते छान आहे. "
पुढे म्हटल्या, "तू हॉस्टेलवर की घरी राहते. " माझ्याबद्दल सांगितल्यानंतर स्वाभाविक प्रश्न विचारला, " भाऊ नाही तुला? "
मी खुश होत म्हटलं, " नाही."
आजवरचा युनिव्हर्सल डायलॉग त्याही बोलल्या पुढे, "त्याला काय, आजकाल मुलीही काय कमी नाहीये."
मला आता सवयीचं झालं त्यामुळे मी पुढे म्हटलं , "मुलगा मुलगी काय फरक नसतो मावशी. शिक्षण असेल तर मुलगा मुलगी फरक पडत नाही."
"होना... " माझ्या मताशी सहमत होत्या पुढे म्हणाल्या, " हो बाई, शिक्षणावर खर्च करावा. आपलं लाईफ मस्त करावं, लग्न करावं पण ' चांगला पार्टनर ' पाहून. पार्टनर चांगलाच बघ, कितीही वेळ लागू.
त्यांच्या त्या दोन इंग्लिश शब्दांनी मला आतूनच खूप सही वाटलं, मी ऐकू लागले, " एक चांगला पार्टनर खूप महत्त्वाचाय . मी माझ्या मुलींची लवकर दिली लग्न लाऊन. पण आता बघते, पश्र्चाताप होतो. घर सांभाळून नोकरी करतात, पण गुलामीसारखं ."
मला धीर मिळाला त्यांच्या पुढारलेल्या विचारांनी मी म्हटलं, " हो बरोबरे. म्हणूनच भर शिक्षणावर आहे. कारण उद्या लग्न झाले, पार्टनर चांगला नसला तरी आपण स्वतंत्रपणे सक्षम असायला हवे. "
हो बाळा, शिक मोठी हो...
माझं स्टॉप आला.
निघताना म्हटले, "काळजी घ्या..."
मी सहजच आपल्या माणसांना म्हणते तसं आपोआप तोंडातून निघून गेलेलं... त्या मावशींना ते इतकं इतक्क हृदयाला भारी वाटलं, "हसतच म्हटल्या घेते बाई काळजी..." आणि हे सगळं त्या पुन्हा त्यांच्या बरोबरच्या मैत्रिणीला खूप आपुलकीने सांगू लागल्या, आपोआप त्या बसभर पसरलेला तो हास्याचा सुखद गारवा दोघींच्या मनास सुखावून गेला, भेट संपली, संवाद संपला पण त्या घटनेने, तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि शीण याने एका कष्टाशी ओळख झाली. एका प्रवासाच सार्थक झालं...

"एका अनोळखीबरोबर इतक्या वैयक्तिक, चार भिंती आडच्या गप्पा होऊ शकतात? ..." हा प्रश्न स्वतःला विचारून आयुष्याचं दुःख हलकं होऊन जातंय...
मध्येच प्रश्न पडतात, आधुनिक विचारसरणी गरिबातल्या गरिबापर्यंत पोहोचली, आजकाल मोबाईल आले सगळ्यांकडे मग तरीही आज त्या माऊलीला गृहिणी म्हणून जगता येत नाही. का तो मुलगा तिला म्हणू शकला नाही की, 'खूप झाले कष्ट घरी बस आता.' आज अशा गृहिणी आहे ज्यांना गृहिणी बनून कमीपणा वाटतो, पण या अशा स्त्रिया असतात ज्यांना जन्मल्यापासून आजपर्यंत कष्टाचाच दिवस घालवावा लागतो. ज्यांच्या आयुष्याला 'सुंदर आयुष्याचा एक तुकडाही नसतो, त्यामुळे अशांचा कैवारी म्हणत देव त्यांना आधार वाटत असतो, त्यावेळी मला देव जवळचा वाटतो. आयुष्याचा काहीसा भाग देवाच्या नावे देत तरी जगतात या माऊली..."

काय बोलू.?
एवढंच की,
वाईट वाटलं, आनंद झाला, सुख मिळालं एका अनोळखी, अनम्मोल, एका सच्च्या भेटीचं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा