दिल्लीतून... - Sufi

दिल्लीतून...




पुण्याची गरमी मागे टाकून आम्ही दिल्लीच्या दिशेने रवाना होत होतो. हळूहळू वेगवेगळ्या राज्यांची हवा अंगाला लागून जात होती...

माझ्या मनाची भावनाच कळत नव्हती. कारण चार भिंती ओलांडून आपल्याला दुसरं काही बघता येणार नाही, या घराच्या वातावरणामुळे पुढची अपेक्षा फारफार तर स्वतःचं काही झाल्यावर मग स्वखर्चाने बघू दुनिया, या तयारीत मन होतं. पण घरच्यांना अचानकच काय झालं नि मला हा आगळावेगळा अनुभव अपेक्षे आधीच वाट्याला आला. निर्धास्त आणि मुक्त झालं होतं मन...
प्रत्येक शहराची हवा, तिथलं निसर्ग नि वेगळा साचा हा नेहमीच माणसाला जिवंत ठेवायला मदत करतो. म्हणून, फार नाही पण एक स्वप्न माझं आयुष्यभरासाठी पुरेल ते 'भटकणं'.
कारणे कोणतीही असो, पण या फिरण्यात आपलंच पुण्यातलं आयुष्य नवीनच आपल्या समोर तयार होतं...
त्यामुळे फिरणं छंद होता मनाचा...
दिल्लीचा प्रवास सुरू झाला.
कालपर्यंत किमान सोशल मीडियामुळे जवळ वाटणारे चित्र आज माझ्यासमोर होते.


घराच्याभोवती खेळणारी पाऊलं आज राजधानीसारख्या भव्य शहरात पडणार होती. मन गांगरून गेलं होतं. अशावेळी माणसाला खरी थंडी ताप सर्दी खोकल्यासारखी हवा जाणवते. प्रत्येकवेळी तिची चाहूल ही नाविन्याची ओळख करून देणारी असते...

"राजस्थान गया लगता हैं । "
त्या प्रवाश्याचा तो आवाज... आहाहा ! पुण्याच्या पहाटेच्यावेळी हा आवाज कधीच आकर्षित करणारा नसतो, तो या प्रवासात येतो, जेव्हा पहाटेला आपल्या कॉटच्या खालचा नवा प्रवासी त्याच्या बायकोला कौतुकाने सांगतो, मी अर्धा लावलेला डोळा उघडत त्याच्या बायकोने चेहऱ्यावर घेतलेल्या पदराकडे बघत खिडकीच्या सळीतून झाडांमागून डोकावलेला सूर्य कौतुकाने बघते... मन ओढीने तिथल्या स्त्रिया, पुरुष आणि तिथली माती न्याहाळू लागतो... सोशल मीडियावर पाहिलेल्या फोटोत दिसतं तसं दृश्य डोळ्यात आणून मन राजस्थानला राजेरजवाड्यांत सजवलेलं पाहायला आतुर असतं पण दृश्य त्याहून खूप कोरडं आहे. तिथे दूरदूरवर निसर्गाचा नामोनिशाण आम्ही ज्या भागातून गेलो तिथे नव्हतंच. तरीही राजस्थानची उत्सुकता सुटत नाही कारण राजस्थानचा मूळ आत्मा मी पाहिलेला नसतो.
तो आत्मा पाहण्याची इच्छा, पुढच्या सहलीत रिजर्व्ह करीत मी ते सगळं त्या पहाटे न्याहाळू लागते.
सकाळची वेळ संपून दुपार होत जाते. तसं तसे आम्ही मित्रमंडळी एकत्र येऊन फावल्या वेळेतले खेळ खेळून एकमेकांचे अधिक घट्ट मैतर होऊ लागतो.
ट्रेनच्या डब्यात वातावरण नेहमीसारखेच वेगवेगळ्या लोकांनी आणि त्यांच्या सवयीनी भरलेले होतं. ट्रेनमधील तसा माझा हा दुसराच प्रवास.
हा प्रवास माझ्यासाठी पहील्या प्रवासापेक्षा वेगळा होता. कारण यावेळी मी एकटी जात नव्हते माझ्यासोबत मित्र कंपनीही होती. शिवाय, विशीच्या पुढे गेल्यानंतर मॅच्युर पण थोडे अवखळ होऊन अशा शैक्षणिक सहलींना जाण्यात खरं फिरणं असतं आणि आपल्या अवतीभोवती ओळखीच्या वाइब्ज असल्या की आपण मुक्त असतो. सांभाळायला कुणीतरी आहे या भावनेने व्यक्ती थोडा निष्काळजी होतो. मीही झाले.
मला तर राहून राहून आठवत होतं कि आपण दिल्लीच्या प्रवासात आहोत...
मनाला टवटवीत नि नवखं वाटावं म्हणून मी सतत स्वतःलाच धप्पा देऊन सांगत होते,
"यहिच तो ख्वाहिशें थी तेरी, देखा ताकद है तेरे सपनों में। दौड़े खींचे तेरेही पास आ गए। "
नकळत मन दिल्लीचा विचार करू लागतं...
दिल्ली जशी दिलवालोंकी म्हणून प्रसिद्ध तशीच ती असुरक्षित राज्य म्हणूनही प्रसिद्ध आहे. तिथली निर्भया आजही अंगात वाघनख्या सारखी टोचते. पण तरीही येथूनच सगळा भारताचा गाडा हाकला जातो. एखाद्या देशाचा राज्यकारभार चालवायचा, म्हणजे ते ठिकाण जितकं देशातील लोकांसाठी महत्त्वाचं, तितकच ते विलायतांसाठीही महत्त्वाचं.! त्यामुळे जसे स्वदेशींसाठी दिल्लीत वावरणे म्हणजे देशाचा स्वाभिमान नजरेत घेऊन ते राज्य बघणे असते, त्याचाच विरोधाभास म्हणजे विदेशींसाठी या राज्याच्या प्रत्येक घटनेची खबरबात ठेवणे काम असते. त्यामुळे स्वाभिमान आणि असुरक्षितता या दोन्ही तटबंदीने युक्त अशी ही दिल्ली आहे.
दिल्लीत वावरणे हे कधी मी स्वप्नातही बघितले नव्हते.
तसं याबद्दल लिहीन असा विचारही नव्हता केला. पण आपल्या राज्याव्यातिरिक्त दुसरे राज्य आपण बघतोय ही भावना फक्त मनात ठेवलीच जात नाही. कारण एका छोट्याशा झोपडीत वावरणार बालपण आणि त्यानंतर त्या एका फ्लॅटमधून गूगल आणि इंटरनेटवर आणि फारफार तर पुस्तक आणि नकाशावर दिसणारे राज्य होते हे.

लोक म्हणतात, राजकारणी मंडळीचे आवडते राज्य आहे दिल्ली. पण मला तसा फारसा त्यातला रस नव्हता खरा. पण पण जेव्हा पत्रकारिता सुरू केली. मी हळूहळू कानावर पडतय म्हणून बातम्या वाचू लागले आणि त्यातील थोडेसे दुवे समजून घेऊ लागले. पण तालुक्याचे ही स्वप्न न पाहिलेली मी आज ट्रेन मधून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा अशी बरीच राज्य, स्टेशन्स बघत नजर आणि मन एकमेकांशी घुटमळवत होते.
सुरुवतीपासूनच सांगायचं तर आमचा प्रवास सुरु झाला तो दुपारी पुण्याहून रात्री मुंबईला. त्यानंतर मुंबईवरून बांद्रा टर्मिनस ते हजरत निजामुद्दीनपर्यंतचा प्रवास हा एकूण दोन दिवसांचा प्रवास ठरला. त्यात अंदाजे ९८हून अधिक स्टेशन्स होती.
हा आमचा निजामुद्दीन स्टेशनला जाण्याचा प्रवास सुरू झाला. रात्रीच्या आलिशान प्रवासाला जाणे म्हणजे अविश्वसनीय होते. कारण घराच्या तटबंदीने घेरलेले आयुष्य या आठ दिवसाच्या दिल्ली प्रवासात वेगळ्या नजरेने दिसणारं होतं.
दिल्लीला जायचे ठरल्यापासून मी आतून खुश होते ते केवळ या कल्पनेनेच की, आजवरच्या आयुष्यात मी कधीच घराबाहेर एकटी थांबले नव्हते, तेही ८ दिवसांसाठी. त्यामुळे दिल्लीसारख्या ठिकाणी एकटं राहणं, खाणं पिणं, फिरणं, आणि तिथल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद एकटं राहून घ्यायचा ही एकमेव भावना आयुष्यात पहिल्यांदा होती. ती भलतीच खास होती!
भावना कल्लोळ शांत होत नव्हता.
पण तरीही सगळं आवडत होतं.
दोन दिवसांच्या प्रवासानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता हजरत निजामुद्दीन या ठिकाणी आम्ही उतरलो.
स्टेशनच्या नावाची ओढ लागली होती खरी, त्यानुसार हजरत निजामुद्दीन हे नाव निजामुद्दीन औलीया या सुफी संताच्या नावाने हे नाव पडले.
तिथेच निजामुद्दीनच्या स्टेशनवर लोकांना निरीक्षणायचं हे नकळत अंगवळणी पडलेले. पण त्या आधी दिल्ली भागातला चहा प्यायचा कारण त्याशिवाय सकाळी सहाची झोप उडणार नव्हती. आणि दिल्लीतील काहीच मिस करायचं नव्हतं. त्यामुळे आधी चहा. मग बाकी सगळं, असं करत तसेच दोन दिवस बिना आंघोळीचे काढून पारोसे चेहरे घेऊन आमची गॅंग त्या चहाच्या टपरीवर पोहोचले.

हर शौक इंसान का शौकीन होता। और बेशक चाय के नशे का हर इंसान का शौकीन हैं।
चहा पिऊन झाला... आता खरी ओढ लागली होती. दिल्ली फिरण्यासाठी खास बसची सोय होती..त्यामुळे तिथे उतरून आम्ही तडक इंटरनॅशनल युथ हॉस्टेल गाठले. सगळे अंघोळ करून स्वतःला बरं वाटेल म्हणून आपापल्या रुममध्ये पळाल्या. माझा हॉस्टेल प्रवास सुरू झाला...
क खोली, सात मुली आणि एक बाथरूम, एक टॉयलेट.
गेल्यागेल्या सगळ्यांनाच अंघोळ करायची. आणि त्यात दोन तासात तयार होऊन दिल्ली दर्शनास जायचं, हे अवघड झालं होतं. कारण त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या मनाने हे स्वीकारलं की, " मुलींना तयार होण्यापेक्षाही अंघोळीला जास्त वेळ लागतो." दोन तासात आमच्या खोलीतल्या फक्त तीन मुलींच्या अंघोळी झाल्या. शेवटच्या चार मुलींनी पाचपाच मिनिटात उरकलं, पर्याय नव्हता.
आणि अशाप्रकारे नाश्ता करून आम्ही २५ मार्चला दिल्लीतील सगळ्यात प्रशस्त आणि आवडत्या जागी पोहोचलो. कारण पत्रकारितेत खूप काही नाही पण अशा प्रशस्त जागांतील प्रशस्त वातावरणात जाऊन काहीतरी स्वतःच्या करियरच्या दिशेने महत्वाचं उचलायचंच हे कळलेल असतं.

आजची ओढ़ होती 'बीबीसी...'

तेच बीबीसी जे इंटरनेटवरून जगभरातल्या अनेकानेक ठिकाणी झळकते. पण आज ते दिल्लीतून इतक्या जवळून बघणं म्हणजे, मुळात मी दिल्लीत आहे हि भावनाच इतर सगळ्या भावनांना द्विगुणित करीत होती.
बीबीसीचे आकर्षण पत्रकारितेपासून अति जास्त वाढले होते. कारण तिथे जे आहे ते खूप कमी माध्यमांत आहे.
निःपक्षपाती बातमीदारी.
बीबीसी ही ब्रिटिश कंपनी असल्याने फारफार तर ती लंडनच्या बातम्या पक्षपातीपणे देईल. (तेही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही)
बीबीसी आजपर्यंत मी  अनुभवावरून तरी निःपक्षपाती वाटले. पण जेव्हा असे ब्रँड भारतात त्यांचे स्थान वसवतात, ते प्रगतीस उभारी देणारे ठरतात.
'काही वेळेला अशा कंपन्या या स्वदेशीवर घाला घालणाऱ्या असतात' असे म्हटले जात असले तरी, मला ते चूक वाटते कारण प्रत्येक देश हा परस्परावलंबी आहे. स्वावलंबी होऊन तो स्वतःच्याच परिघात अडकून राहतो. त्यामुळे बीबीसीचे यश हे मला खुपत नाही.
आज बीबीसीचे प्रसारण हे ४०हुन अधिक भाषांमध्ये आहे. हे सोपे काम नाही. दिल्लीत बीबीसीचे दोन फ्लोअरवर काम चालते. आम्ही दोन्हीही मजल्यावरील प्रत्येक विभागास भेट दिली. शिवाय लाईव्ह रेकॉर्डिंग.
प्रत्येक भाषेसाठी आवश्यक ते ४-५ विभाग आणि त्या विभागास कमीत कमी २-३ लोक (तेही कमी), असे ४० गुणिले १२ म्हणजे एका भाषेसाठी ३६० कर्मचारी आणि त्यातल्या त्यात बॉम्बिंग म्हणजे 'बीबीसी ही लंडनमधून सगळ्या भाषेत काम करत नाही' ही कंपनी अनेक देशांमध्ये कार्यरत आहे त्यामुळे त्या त्या देशांत कार्यरत मनुष्यसंख्या वेगळीच, हे निरीक्षण केल्यानंतर हे मनुष्यबळाचे गणित अधिक बळकट होत जाते.
बीबीसी होस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी, आंतरराष्ट्रीय बीबीसीचे ५ रेडिओ स्टेशन, न्यूज पोर्टल, लाईव्ह स्ट्रीमिंग वाहिनी, पॉडकास्ट अशाप्रकारचे विविध माध्यमांत बीबीसीचे स्वरूप आहे.
२ ऑक्टोबर २०१७ ला बीबीसीने गुजराती,पंजाबी, उर्दू, मराठी, तेलगू या भाषांमध्ये बीबिसीला उतरविले.
स्वाभाविकपणे बीबीसी हे मातृभाषेत आल्यानंतर मी त्याच्याकडे जास्त वळले.
माहितीनुसार, बीबीसी ही ब्रिटिश लोकांच्या फंडिंगवर म्हणजे टॅक्सवर चालते. त्यामुळे, बीबीसी वेबसाईट्स आणि संपूर्ण बीबीसी माध्यम हे जाहिरातींना कमी प्राधान्य देतात. बीबीसीचा मूळ उद्देश हाच आहे कि, स्थानिक माध्यमांवर लक्ष्य केंद्रित करून तळागाळांपर्यंत पोहोचणे आणि आंतरराष्ट्रीय बातम्या मराठीत आणणे.
बीबीसीचे आतील वातावरण अनुभवले जरी नसले तरी एका भेटीत बीबीसी हे सकारात्मक वाईब्जने भरलेले वाटले. कारण बीबीसी ही कुणालाच टाळत नाही. मुख्यत्वे त्यांच्या आखून दिलेल्या तत्वांवर ठाम असते म्हणून ती इतर माध्यमांतून उठून दिसते कारण बीबीसीची सुरुवात जेव्हा झाली त्यावेळी बीबीसीचे तत्व होते, "सुरुवातीच्या काळात खूप अपेक्षा ठेऊ नका. आणि आज जेव्हा कंपनीने यशाचा सन्मान मिळविला तेव्हाही बीबीसी या मतावर आहे कि, विश्वासार्हतेला पात्र ठरा." त्यामुळे सद्यपरिस्थिती जगभरातील माध्यमांसाठी बीबीसीची हि तत्वे आचरणात आणावी अशी ठरतात.
अशाप्रकारे, बीबीसी होस्ट कडून बीबीसीच्या ऑफिस बद्दल पुरेशी माहिती मिळाली. मनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात अनामिकपणे वाटून गेलं, त्या परफेक्ट आत्मविश्वासू स्वाभिमानी मुलीच्या सोबत तिच्या शेजारच्या डेस्क वर त्या कंप्युटर मध्ये डोकं घालून काहीतरी बीबीसी साठी लिहिणारी उद्या मी तिथे असेल. हेच वातावरण हीच दिल्ली आणि हेच ते बीबीसी...

अशा नोटवर मी बीबीसी सारख्या पहिल्या वहिल्या आवडत्या ठिकाणाला मनाच्या अनोळखी स्वप्नात अॅड् केलं.
(या पद्धतीचे ब्लॉग लिखाण हा केवळ आवडीचा अट्टाहास त्यामुळे, लिखाणातील काही दुव्यांमध्ये काही चुका आढळल्यास जरूर कळवावे)
-------
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा