कैफ मोगर्याची .! - Sufi

कैफ मोगर्याची .!



आनंद कुठे आहे ?... 
कुठल्याही रस्त्यावर?...
मन गांगरून, गोंधळून गेलेलं नि कुठल्याही निष्कर्षाला पोहोचत नव्हतं,
नजर फिरवली...
श्वास शांत केले, मन शांत करत सगळं डोक्यातील बाजूला ठेवत सगळीकडे एकवार पाहिलं. 
बाजारात कित्येक गृहिणी स्वतःतच रमत गमत उद्याच्या दिवसासाठी भाजीपाला खरेदी करीत होत्या...
 त्यांना माहितीही नव्हतं, त्यांच्या सौंदर्याचं नंदनवन याच बाजारात होतं. रोज असतं.
नंदनवन म्हणजे तोच तो... जो लाकडाची विणलेली पाटी गळयात अडकवून रोज कुठल्याच रोमँटिक भावनेविना तिथे उभा असतो ... 
मोगरा पारिजातकाचां सुवास पाटीत घेऊन त्या बाजारात उभा असतो, नियमित! 
 त्या गर्दीच्या ओढीत मीही त्या सुगंधाकडे खेचली जाते, गर्दीच्या रस्त्यावरून चालताना अलगद तो गहिरा सुवास चाफेकळी नाकाला स्पर्शून जातो, मनाच्या हरेक कानाकोपऱ्याला निस्वार्थ ताजं करून निखळ सुखवून तरीही तो पुरून उरतो नि पैसा क्या चीज विसरत माझा हात पाकिटात जातो नि मोगरेवाल्याकडून तो लाखमोलाचा सुवास विकत घेतला जातो ...
तो सुवास मी कोणाला देणार हे तेव्हा माझ्या मनालाही माहिती नसतं, तो आईलाही देऊ शकते नाहीतर प्रियकरालाही...
 पण कुणाकडून तरी शिकले होते, आपल्याकडचा मोगरा वाटता यायला हवा... !
तो कुणालाही देवो, पण मनाची उबदार भावना व्यक्त होईल त्या एका मोगऱ्याच्या नैसर्गिक अत्तराने! काही क्षण भन्नाट विकत मिळतात, मनाला त्याची पारख हवी. !मनाला मी आज ते अत्त्तर देण्यास समर्थ ठरले होते... 
 एक सुविचार निर्माण करण्यास मन आज तयार झाले होते,

झगमगत्या तरारी स्पर्धेच्या जगतात भिर्कावलेले मन एका अशा मदिरेजवळ विसावते, जिथे मनास ग्लानी मिळते एका न प्यायलेल्या मद्याची... हा सुवासाचा प्याला असा काही धुंदीत घेऊन जाऊन असेच कैक पॅक कित्येक मनांवर उधळून देतो, सुखवण्याची किमया साधतो!.... 
चिअर्स टू मोगर्याची कैफ !!! 💛


- पूजा ढेरिंगे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा