एप्रिल 2024 - Sufi


पदराच्या आडून जगणाऱ्या बायांचं आयुष्य कसं दिसतं याचं पडद्यावर केलेलं रेखाटन कमाल ताकदीचं आहे. यासाठी किरण रावला सलाम! रविवारी इतका फ्रेश कंटेंट पाहायला मिळाल्याचे सुख काही और आहे. 

एक असा चित्रपट ज्यात तुम्हाला हजारो वर्षांपासून ते एकविसाव्या शतकापर्यंत समाजाने केलेल्या फ्रॉडचा रोडमॅप दाखवला जातो. तेही अतिशय विनोदी पद्धतीने! पण या विनोदातूनही नेमका काय मेसेज प्रेक्षकांना द्यायचाय याचं सखोल ज्ञान स्क्रिप्ट रायटरला आहे. डायलॉग रायटरसमोर नतमस्तक व्हावं इतकी परिपूर्ण लेखणी हाताळली आहे. शिवाय चित्रपटात मुख्य भूमिकेत कोणीही प्रसिद्ध नट नटी नाहीये. तरीही चित्रपट खूप सुखाने प्रेक्षकांना जवळचा वाटतो. ज्यांनी चित्रपट पाहिलाय त्यांना मी पहिल्या वाक्यात कोणत्या फ्रॉडबद्दल बोलतेय हे लक्षात आले असेल. तर सांगते, सैराटमध्ये परश्या अन् आर्चीला साऊथमध्ये भेटलेली गाड्यावरची मावशी आठवा. तीच मावशी या चित्रपटातही समोसा वगैरेचा गाडा लावून स्वतंत्र आयुष्य जगत असते. छाया कदम कमालीचे अभिनयाचे स्किल असलेली मराठी अभिनेत्री! तिने या चित्रपटात जो भाषेचा लहेजा पकडला तो लाजवाब आहे. इथे ती घराचा पत्ता, सासरचा पत्ता माहीत नसलेल्या इन शॉर्ट हरवलेल्या एक नववधूला अर्ध्या चित्रपटात सहारा देते. यावेळी ती म्हणते, 

ई देस के लड़की लोग के साथ हज़ारों सालों से इक फ़्रौड़ चलरा, उ का नाम हैं “भले घर की बहु बेटी“ 

सलमान ख़ान का पता बता छोटू? यावर त्या टपरीवर काम करणारा छोटू सांगतो, गैलेक्सी अपार्टमेंट, बांद्रा, बंबई। 


तेव्हा छाया म्हणते, छोटू जिस घर कभी जानेवाला नहीं उसका पता उसने अपने आप याद कर लिया। और तुमको जिस घर पूरा ज़िंदगी रहना हैं वहाँ का पता तक याद नहीं। तुम्हड़ी अम्माने तुम्हें अच्छा नहीं बनाया हैं, गुड़बग़ (Fool) बनाया हैं। 

गुड़बग़ होना शर्म का बात नहीं हैं, लेकिन गुड़बग़ होने पर गर्व करना ई शर्म का बात हैं। 


इथला पूर्ण संवाद ऑलमोस्ट सगळ्या मुलींच्या बालपणापासून आईकडून होणाऱ्या संगोपनावर बोट ठेवतो आणि तेही खूप तीक्ष्णपणे! आई म्हणून बघताना अनेकींना हा संवाद टोचेल पण जर आपली मुलगी हरवल्यावर तिला तिच्या घरी जाता येईल इतकं सक्षम आपण नाही बनवले तर हा समाज तिचे शोषण करणारच. तिला घरचं सगळं काम येतं पण जर तिला घरीच जाता येत नाही तर तिच्या जिवंत असण्याचा काय फायदा? तिचा जन्म का फक्त याचं त्याचं ऐकून सगळ्यांना खूश ठेवण्यासाठी झालाय? 

त्या मुलीच्या वयापेक्षा लहान मुलगा पैसे कमवून घर चालवतो आणि मुलगी असल्यामुळे लग्न लावून द्यायचं? तिचं आयुष्य फक्त २ घरांपुरतं सीमित? या मुलगा मुलगी भेदाचे चित्रीत वर्णन कमाल सुंदर आहे. 

असंही आपल्या समाजात सोशिक, सहनशील बायकांनाच मान आहे. बंड करणाऱ्या बायकांची भीती वाटते. असंच काहीस मत छाया सुद्धा मांडते. 

चित्रपटात असलेला छोटू नामक पात्र वयाच्या ७ वर्षापासून काम करतो. त्यावर गाड्यावर काम करणारी नववधू छायाला विचारते, हम लड़कियों को काहें मौक़ा नहीं देते दादी? काहें हमको इतना लाचार बना देते हैं? छाया उपहासाने आणि सामंजस्याने हसून उत्तर देते, ती म्हणते, भीतीमुळे कदाचित! बाई धान्य उगवू शकते, बनवूही शकते. मूल जन्माला घालू शकते आणि वाढवूही शकते. 

बघायला गेलं तर बाईला पुरुषाची काही खास गरज नाहीये. पण ही गोष्ट जर बायांच्या लक्षात आली तर पुरुषांची वाट नाही लागणार? आता समजलं काय फ्रॉड सुरू आहे? … 

यावर जी नववधू नवऱ्याचं नाव घ्यायला पण घाबरते/

लाजते ती म्हणते, इथून घरी जाऊन छोटं मोठं का होईना पण काम नक्की करणार.  


चित्रपटाची बेसिक स्टोरिलाईन सांगू तर, नुकतंच लग्न झालेली सेम बॅचच्या टेलर वर्गाकडून सेम रंगाची शिवलेला शेरवानी ड्रेस आणि सेम ब्राऊन शूज घातलेले नवरे आणि सेम लाल रंगाची दुल्हन साडी, त्यावर नाकाच्या खालपर्यंत ओढलेली लाल ओढणी अशा झेरॉक्स कॉपी बनलेल्या या ३ जोडप्यात दोन जोडप्यांच्या बायकांची अदलाबदली होते. ही जोडपी मुलीच्या गावी लग्न करुन मुलीच्या सासरी ट्रेनने परतत असता. जसं काल रविवारी एकाच दिवशी एवढी लग्न होती जर अचानक सगळ्यांना एकत्र केलं असतं तर कोणाची बाई कोण अन् बाप्या कोण हे त्या जोडप्यांना कळलं नसतं. तसंच काहीस लापता लेडीज मध्ये घडतं. या चित्रपटातल्या कोवळ्या मुली तर नुकत्याच अंड्यातून बाहेर पडणार होत्या तेवढ्यात त्यांचं लग्न लावून देण्याचं समाजाचं प्रपोजल त्यांना आखून दिलेल्या बांगडीतच रहायला शिकवतं. अनोळखी माणसांच्या नजरेत पोर पडू नाही म्हणून घरचे हातावरच्या फोडासारख पोरीला जपता आणि एक दिवस अनोळखीच मुलाच्या हातात केवळ एक दिवसाच्या भेटीत तिला सुपूर्द करुन देता. तसंच या लापता लेडीजचं होतं. कधी गावाबाहेर न पडलेल्या या नववधू सासरी जाताना अचानक लापता होता. कारण ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे जेव्हा एका नववर त्याच्या डियर बायकोचा हात धरून गर्दीतून पळून जाऊन डायरेक्ट स्वतःच्या घरी जाऊन घुंघट काढून बघतो तर काय ? नवरीची अदलाबदली झालेली असते आणि इथून परिचय होतो पुष्पा राणी ऊर्फ जयाराणी उर्फ प्रतिभा रांता (खरे नाव), फूल कुमारी

उर्फ नितांशी गोयल आणि नेटफ्लिक्सवर मध्यंतरी आलेल्या जमताराच्या स्कॅमचा भाग असलेला स्पर्श श्रीवास्तवचा….  

पक्षपाती दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर हा चित्रपट महिला वर्गाला अतिशय आवडणारा आहे. लोक याला फेमिनिज्मचा प्रोपगंडा चित्रपट म्हणतील. पण याने साडीच्या पदराआड बाईच्या वाट्याला जे आलं ते झाकलं जाणार नाही. 

तुम्हीही कधी ना कधी अशा बाया पाहिल्याच असतील ज्याच्या डोक्यावरून हनुवटीपर्यंत लांब घुंघट आहे किंवा बुरख्यातील स्त्री पाहिलीच असेल. बुरख्यातील स्त्रीचे किमान डोळे उघडे असता. मात्र लांब घुंघट घेणाऱ्यांना मात्र पदर खाली ढळू देता येत नाही. या चित्रपटाला कदाचित हरयाणा, यूपी, बिहार, राजस्थानसारख्या भागातून विरोध झाला असावा किंवा होईल. कारण तिथल्या लोकांसाठी विषय तसा सेन्सिटिव असणार. चित्रपट कळत नकळत मुलींना न मिळणारे समान हक्क, समान संधी आणि फ्रीडम यावर खूप सामंजस्याने, प्रगल्भतेने भाष्य करते.  

एक बार घूँघट ले लिया तो सामने नहीं नीचे देखकर चलना सीख लेना| या डायलॉगने खरा चित्रपट सुरु होतो. 

आणि जैविक शेतीविषयक शिक्षण घेण्याची आवड असणाऱ्या जया राणीच्या धाडसी कहाणीनंतर चित्रपट संपतो. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये ज्योतीने चोरलेली एक बांगडी आणि त्या बांगडीतच मंगळसूत्र ठेवून म्हणते, ये मेरा नहीं हैं| हे चित्रित डिटेलिंग चित्रपटाला खूप सुंदर बनवते. यातून विशेष करून बाईचं आयुष्य बांगडी आणि मंगळसूत्रानंतर कसं वर्तुळात अडकते हे दाखवणारी ही फ्रेम ठरते. ज्योती राणीचं अपराधी असल्यासारखे सुरुवातीचे सिन चित्रपटाला खूप सुंदर वळण देतात. 

स्पर्श श्रीवास्तव मात्र कमालीचे काम करतो. तो फार मोठा आणि आर्टिस्टिक अभिनेता होणार यात शंका नाही. तो त्याच्या हरवलेल्या फूल कुमारीचा आणि त्याचा फोटो घेऊन तिचा खूप निरागसपणे शोध घेतो. पण फूल कुमारी सापडणार कशी? कारण त्या फोटोतसुद्धा तिने मानेपर्यंत घुंघट घेतलेला असतो. यावर तर एवढं हसू येतं 😂😂


पण घुंघट घालून राहणाऱ्या बाईचं आयुष्य कसं असेल हा साधा विचारही जास्त लोकांच्या डोक्यात आला नसेल. म्हणजे आपल्याकडे दिसणाऱ्या काही राजस्थानी, मारवाडी, गुजराती बायांना पाहून आम्हा मुलींमध्ये ही चर्चा तर व्हायची की हिला बाहेरच काय दिसत असेल? किंवा नवरे त्यांच्या बायकांना कसे ओळखता ? फक्त डोक्यावरच्या पदरावरून बायकोला ओळखायचं? आणि अशा कहाणीला धरून इतका सुंदर चित्रपट करावा म्हणजे खासच! 


माझा एक ऑफिस सहकारी राजस्थानी आहे. त्यांच्यात गावाकडे सुनेचा पदर खाली पडला नाही पाहिजे अशी प्रथा आहे. त्याची बायकोही आयटी कंपनीत कामाला आहे पण तीही या गोष्टी पाळते आणि पुण्यात आले की मग दोघे नॉर्मल माणसांसारखे राहतात. 

समाज हा दिखावा आणि हे मुखवटे का घालतो? आणि हास्यास्पद म्हणजे फक्त बायकांनाच? याचं उत्तर खरच “भीतीपोटी” हेच असावं! 

- पूजा ढेरिंगे

(हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल) 

#लापतालेडीज #LapataaLadies #2023Bestmovie

लापता लेडीज: लो बजेट, क्वालिटी कंटेंट

by on एप्रिल २९, २०२४
पदराच्या आडून जगणाऱ्या बायांचं आयुष्य कसं दिसतं याचं पडद्यावर केलेलं रेखाटन कमाल ताकदीचं आहे. यासाठी किरण रावला सलाम! रविवारी इतका फ्रेश कंट...