Sufi: मनातलं
मनातलं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मनातलं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


'आई...'
आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही.

नेहमीचे असंख्य विचार असणारं मन अशावेळी काय आठवून देतं माहिते?
"तिचा हिरव्या चुड्याने भरलेला दणकट हात, जो कधीही पडायचा उशीर असायचा... "
दणकट होती ती, आजही तितकीच स्थिर आणि त्याहून जास्त खमकी!
आज मला मुक्तपणा कळतोय, बंधने, गुलामी, अहं पणा कळतोय, स्वार्थी लोकांतील राजकारण कळतंय हे सगळं तिच्यातून मला आलेलं देणं आहे. कारण जेव्हा एक आई विचारांनी आणि कृतींनी दणकट असते तेव्हा तिच्यातील मातृत्वाबरोबर तिच्या विचारांचा अंशही आपल्यात वावरत असतो. पण तरीही सगळं कळून आपण या वरच्या गुणांचा भाग कधी व्हायचं नाही, हेही तिचंच देणं आहे.
एक शुद्ध आत्मा कसा जन्माला घालायचां आणि त्याची निर्मिती करून त्याला शिल्पकार जसा घडवतो तशी छाननी करीत घडवायचं हे एवढं विशाल व्याप्त काम ती मन लाऊन अगदी सहज, अलवार करून जाते.
आई हे वेगळं रसायन असतं, ज्यात खूप असतं. ती म्हणजे एक मोठीच्या मोठी बुदली आहे, ती कुठल्याच कलेतून व्यक्त करताना कमी पडत नाही, ती कधीच संपत नाही, ती वाढत जाते आणि निव्वळ वाढतच जाते.
आईसाठीचं काही आठवत असेल तर, 'माझ्याही नकळत तिला माझ्यातल्या लिखाणाची चाहूल माझ्या आजूबाजूच्या लोकांनी दिली होती आणि माझ्याही आधी तिला ती कळली होती.'
परीक्षेचे दिवस होते. माझं शिक्षण महानगरपालकेच्या शाळेतलं. तेव्हा त्या शाळेच्या आपुलकीबद्दल अन् गोंडस दिवसांबद्दल कधीतरी लिहिल, पण या शाळेतील एक महत्त्वाचा दिवस होता तो.
आमच्या वार्षिक परीक्षेचे दिवस होते ते. आणि परीक्षेला मराठीच्या पेपरात "माझा पहिला नंबर आला तर...? " हा निबंध आला होता. तेव्हा मी चौथीत असेल.
मोबाईल फोन गॅझेटच्या महागड्या सावलीलाही नव्हतो आम्ही. त्यामुळे घरच्यांनी लहानपणी लहान राहणं जमवून आणि जपून ठेवलं होतं. एवढं काहीच कळायचं नाही पण 'आई जवळची आहे, ती कळायची.'
'तिचं' कसं असायचं, दिवस तिथूनच सुरू व्हायचा अन् मधल्या दुपारच्या वेळेत जे लहानपणीच सुख असतं ते अनुभवायचं अन् रात्र पुन्हा तिच्याच जवळ संपायची. गणित आयुष्याचं इतकं सहज सोप्प होतं.
त्यामुळे आयुष्याच्या दुनियादारीपासून आईने खूप जपलं.
"आई घरकाम करायची, आम्ही नातेवाईकांकडे शिक्षण घ्यायचो आणि परिस्थिती ही आपल्या फेवरमध्ये नाहीये." या तीन वस्तुस्थिती माझ्या मनावर प्रोपोगांडा राबवावा तशा मनावर बिंबत होत्या. पण एका बाजूला याच वस्तुस्थिती मला मोठं करू लागल्या. तेव्हाही मला माहीत नव्हतं, हे लेखक बिखक नेमकी प्रकरण काय असतं, जे आजही मला कळत नाही .
पण मी लिहिलं होतं त्या निबंधात, तो जो  दिवस होताsssssss.. तो मला त्यावेळी काहीच कळला नव्हता 😅
मी निबंधात लिहिलेल्या दोनच ओळींनी माझ्या बाई अनपेक्षितपणे माझ्याकडे पाहू लागल्या होत्या. बाईंनी तसं या पूर्वी कधी पाहिलेच नव्हते म्हणून काहीच तर्क लागतं नव्हते. 
मॅडमने नेहमीप्रमाणे पेपर वाटायला घेतले. 
माझा नंबर आला. पण मला पेपरच दिला नाही, तो बाजूला ठेवला. सगळ्यांचे पेपर वाटले. मी रडवेली होऊन मॅडमकडे पाहू लागले. कारण नापास होणं म्हणजे आईच्या मेहनतीचा अपमान होता तो.
मी त्यांच्यासमोर बोलेल इतकी बिनधास्त नव्हतेच कधी. थोड्यावेळाने बाई उठल्या. मला समोर बोलावलं. माझा पेपर हातात घेतला. आणि संपूर्ण वर्गात तो निबंध वाचून दाखवला. मला खूपच कसतरी वाटलेल. मला तरीही काही कळलं नाही, ना माझ्या वर्गातल्या मुलांना हे कळलं. म्हणजे त्यात एवढं काय होतं ? ते कौतुक होतं का? मला तेही कळलं नव्हतं. पण मी चुकीचं काहीच केलं नाही एवढं मात्र मला माहित होतं आणि बाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेला येताना सोबतीला आईला घेऊन यायला सांगितलं.
आई धास्तीने आली की, नेमकं मी काय उद्योग करून ठेवलेय. कारण घरकामाला सुट्टी घेऊन येणं आम्हाला परवडणार नव्हतं. पण तरीही शिक्षणाच्या बाबतीत तिला तडजोड मान्यच नव्हती.
ती आली. मॅडमने कौतुकाने सांगितले, तुमच्या मुलीने काय लिहिलंय सांगितलं तुम्हाला? ती अजुनच घाबरून गेली. कारण तिला याची पूर्वकल्पनाच नव्हती. आई भोळेपणाने म्हणाली, नाही मला काहीच माहीत नाही, काय केलंय तिने?.
आता डोळे माझ्याकडे करून तिने डोळ्यांनीच रागाने विचारलं, पूजे अभ्यासाकडे लक्ष द्यायचे का नुसते उपद्व्याप करून ठेवतेय. ती खूप चिडून गेली होती. ती अजून चिडणारच तेव्हा मॅडम बोलल्या, " शाबासकी द्या तिला आणि या ओळी वाचा." आई साधारण शिकलेली त्यामुळे तिने वाचलं. 
मी लिहिलं होतं, "माझा पहीला नंबर आला तर, मला खूप आनंद होईल. पण मला खूप आनंद होईल कारण माझ्या आईला याचा खूप आनंद होईल. त्यामुळे खूप मोठ्ठं शिकून एक नंबर मिळवायचाय! " 
तिनेही माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मला पाणी दिसलं. 
पाणी म्हणू की शाबासकी म्हणू की ते आनंदाश्रु होते.? तिच्या कष्टाचं चीज होतंय, तिच्या कष्टाचं रोपटं पुढे खूप मोठं होणारे, तिच्या डोळ्यात तो विश्वास मला जवळ घेऊन कौतुकाची थाप दिल्यावर मला दिसला होता. नकळत्या वयात आई आपल्याला मोठ्ठी स्वप्न दाखवू लागते.
"गरिबीतून मोठ्ठं होण्याचं स्वप्न तिने त्या दिवशी मला दिलं होतं. "
परिस्थिती हे अपयशाचं कारण कधीच नसते. तुला ते करायचं आहे तेव्हा तुला कोणीच थांबवू शकणार नाही. ते आजही तिने मला कधीच थांबवलं नाही.
आईच्या डोळ्यात जेव्हा आपल्या कलेविषयी आदर आणि स्वप्न दिसतात, तो दिवस आपल्या आयुष्याचा सोहळा असतो. सुदैवाने हे लिखाणातील कौतुकाचे सोहळे मी तिच्या आनंदाश्रुच्या सौख्यात दोनदा अनुभवले. त्याला कसलीच बरोबरी नसते. ते सुख असतं, कुठल्याच किंतुशिवाय मिळालेलं एकमेव सुख!
त्यामुळे स्वतःच्या स्वप्नांना आईच्या शाबासकीचे तोरण लागले की स्वप्न पूर्ण वाटू लागतात आणि आयुष्य स्वर्ग वाटू लागतो. वास्तवाचे चटके सहन होणार नाही इतके असतील पण त्यातही सौख्याचा सागर तिच्या हाताच्या स्पर्शात असतो. 
वास्तव स्वीकारलं नाही तरीही ते असणारच आहे पण, त्या वास्तवातील कविता होणे तुम्हाला जमायला हवे! हे शिकवून अन् घडवून जाते ती ! 
अशा माऊलीला "मौल्यवान मातृदिनाच्या मातृमय शुभेच्छा !"

वास्तवातली कविता !

by on मे १२, २०१९
'आई...' आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही. नेहमी...
मादक आहेस, मोहक आहेस, सेक्शुअल ऑब्जेक्ट आहेस...
तू सुंदर आहे, तू रेखीव आहे, कोरीवही आहे... दुय्यम.
पूर्ण आहेस, स्पष्ट आहेस, आत्मविश्वासू आहे हे प्रथम!

सौंदर्यापलीकडे 'जे छान आहे ते तुझं करून घे !' 
तू अडकत जाते तुझ्या परिस्थितींमध्ये.
भीतीला तू जरा नाकारायला शिक !
जुन्या रस्त्यांचा पाया ठेव, पण वाट त्याला तुझी जोड!
तडजोड ही वाईट गोष्टींबाबत ठेऊ नकोसच बजावतेय समज.!
कारण 'छान'ची जागा जेव्हा तडजोड घेईल, सवय तुला होत जाईल.
त्यामुळे तू घसरत जाशील या गाळात.
त्यामुळे ठामपणे स्वच्छ प्रवाहाचा तू भाग बन !

छोटी रहा, सीमित रहा, मर्यादित रहा,
पण स्वयंप्रकाशित स्वच्छ रहा !

ताकद तुझ्या पायांत आहे, पैंजणात आहे, डोळ्यात भरल्या त्या घट्ट काळजात आहे,

एक कटाक्ष टाकण्याचा उशीर आहे.
गळ्यात सेक्शुअल ऑब्जेक्ट झाकणाऱ्या तुझ्या ओढणीत आहे,
ती समोरच्याच्या गळ्यात अडकण्याचा उशीर आहे.
तशी ती मनगटाच्या जोडीला तुझ्या बांगड्यांत आहे,
ते मनगट एखाद्याच्या मानगुटीवर आवळण्याचा उशीर आहे.!
हो ती वेणीला माळणाऱ्या गजर्याच्या दोऱ्यातही आहे,
त्या दोऱ्याने त्याच्या नरडीच्या तिथे कुस्करून मागे खेचायचा उशीर आहे!
तीच ताकद कानातल्या डुल्याच्या टोकदार दावणीत आहे,
त्या तारीने ओरडबडायचा किंवा त्याच्या उघड्या भागाला,
नाहीतर सरळ त्याच्या लिंगाला ओरडबडायचा उशीर आहे ...
त्यासाठी स्वतःची ताकद ओळख.!

सौंदर्यात मढवून ताकद तुझी बांधून ठेवली म्हणे...
आता या सगळ्या सौंदर्याच्या तारांनीच तू सजही नि त्याचा वापरही कर!
वापर कर चांगल्यासाठी, तुझं वाईट होताना ते चांगलं करण्यासाठी !
या सगळ्याची ताकद तुझ्या कणाकणात आहे.

तू स्वतःला सतत सांगत रहा, तुला नेमकं हवं काय आहे.
जाण याची तू स्वतःला करून दे !
तुझ्या कम्फर्टझोन मधून बाहेर पड, आव्हानं आहे पण वैयक्तिक आहेस या लढाईत याचा आनंद तुला असेल.
जन्म घेताना झगडून, नंतरही कसनुसं जगून मरायचं असेल तर, जगू नकोस स्पष्ट आहे. 
या पायांना हे असं जखडून ठेवण्यापेक्षा, पूर्वापारच्या बेड्यांना तू जिद्दीने तोडून टाक,
नि हे जखडलेले परंपरेच्या रक्तात माखलेल्या पायांतच ताकद आण, हवं तसं आयुष्य जगण्यासाठी !
रक्तबंबाळ तावदानांतून तू तुझ्या स्वप्नांना त्यांचं आकाश दे, आणि मुक्त हो ! 
स्वतःसाठी निदान... ?




कम्फर्टझोनमधून बाहेर पड...!

by on मार्च ०७, २०१९
मादक आहेस, मोहक आहेस, सेक्शुअल ऑब्जेक्ट आहेस... तू सुंदर आहे, तू रेखीव आहे, कोरीवही आहे... दुय्यम. पूर्ण आहेस, स्पष्ट आहेस, आत्मविश्व...

आज खूप दिवसांनी त्याची आठवण झाली ...प्रेम बीम नसावच ते, पण मला तो आवडायचा... त्याच्या मित्रांमुळे मला तो आवडायला लागला. मी बघितलं आणि त्याच्या मित्रांनी मला बघितलं. इथेच माझे कॉलेजचे दिवस सुरू झाले. मग मला कुछ कुछ होता है पण आवडला, नि राजा हिंदुस्थानीही आवडला.
कॉलेजमध्ये आपली पण एखादी लव्हस्टोरी असावी म्हणून ते प्रेम होत बहुदा... ! घरचे म्हणता म्हणून लग्नासाठी पोरगा बघावा तसं त्याचे मित्र आम्हाला चिडवता म्हणून आमची पण लव्हस्टोरी असावी. एवढा साधा आयुष्याचा मोटो होता. म्हणून एकच ध्येय, की त्याच्याबरोबर निदान पुढच्या इयत्तेत जाण्याएवढा अभ्यास करावा. मग त्यात कोणत्याही सरांची बोलणी खावी, अगदी गोड वाटायचं सगळं...
         खरं सांगायचं तर, त्यावेळी ना फेमची भूक, ना रीचनेसची बाडबिस्तर, नाही शाइनिंगची दुकान ... त्याने फक्त आहे तसं स्वीकाराव नि त्याच्या मित्रांनी असच जोडीनं चिडवत राहावं इतकंच काय ते वाटायचे. एकवेळेला स्वीकारलं नाही तरी चालेल, पण एकवार त्याने ते गोंडस हसून पहाव इतकंच. वेड होतं ते पुरतं. आजच्या रिचनेसमध्ये मी त्याच्या रिचस्माइलवर मरत होते. आजही ते सगळं आठवून स्वतःला निरागस बावळट म्हणण्याचा चान्स मी सोडत नाही.
          हॅहॅहॅ.... तो गॅदरिंगचा दिवस कसा विसरू!  ....कधी नाही ते साडी घालायचं मनावर घेतल. का ते सांगू नाही शकत. इश्श लाज वगैरे वाटते जरा. अशातच तो भरमसाठ झगा गावभर घेऊन कॉलेजपर्यंत जायचं, 'वैसे उसके लिए ना सही, लेकिन उसके एक झलक के लिये इतना तो बनता था यार' ...मी छान तयार होऊन गेले. मी सांगते, वायफळ तयार होणं होत ते.... टोटल वायफळ ! आयुष्यातला व्यर्थ दिवस.
          आमच्या एकतर्फ्या प्रेमाची चर्चा गावभर नसली तरी ग्रूपभर होती. त्यामुळे त्यांना आयता बकरा मिळाला होता....त्यांच्या चिडवण्याचा मला काडीमात्र फरक पडत नव्हता. फक्त तो का दिसत नाही?, एवढ एकच एक मनात घोळत होतं. कॉलेजमध्ये घुसल्यापासून डोळ्यात फक्त त्याची झलक होती. पण तो दिसायला तयार नव्हता. तसं कॉलेजच्या दिवसांत 'आपणही सुंदर दिसु शकतो हे ध्यानीमनीही नव्हतं'. त्याच काळात ती गारव्या हिरव्या रंगाची साडी, ओठांना लाल रंग, चेहऱ्याच्या कातडीला फाउंडेशन वगैरेचा झोलच नव्हता, आपली पौंड्स पावडरच ते तेज जे खुलवायची ते लाजवाब असायचं आपल्या नैसर्गिक त्वचेला कसला धक्का लागायचा नाही. नि ब्लश ? ब्लश हे गालांना लावलं जातं हे आत्ता कळण्याचे दिवस. त्या काळात हा ब्लश आनंदाने सजवायचा तो फक्त आपल्या प्रिय व्यक्तीच्या हातून. विकत न मिळणारा हा ब्लश भलता मौल्यवान वाटायचा.
हाच ब्लश चेहऱ्यावर येत नव्हता कारण तो अजूनही कॉलेजमध्ये आला नव्हता. की मग आला होता पण मला दिसत नव्हता ? माझी हुरहूर संताप वाढत होता.  शेवटी बळीचा बकरा बनले मी ! माझं गृपमध्ये लक्ष नाही हे बघून मित्रांनी  मला तो येईपर्यंत 'अलका याग्निकच्या आवाजातल घूंगट की आड से' कंटिन्यू एकामागे एक प्रोपोगंडा राबवावा तसं ऐकायला लावलं .... न ऐकण्याच्या आविर्भावात असलेली मी मित्रांनी त्याची शपथ दिल्यावर विरघळले होते.  आणि त्या रणरणत्या तापत्या उन्हात मी एका परफेक्ट सोलमेटसारखं ते गाणं कानातून रक्त येईपर्यंत ऐकत होते, ऐकत होते, ऐकतच होते! पण मी गाण्याचा एक शब्दही ऐकला नव्हता कारण माझी नजर, कान, डोळे हे फक्त आतुर होते त्याच्यासाठी.  तरी तो दिसला नाही.  ते सहा मिनटाचं गाणं तो दिसेपर्यंत कमीतकमी सहा-सात वेळा मी ऐकलं असेल, तेव्हा कळलं किती दुख त्या चित्रपटातल्या नटीला झालं असेल जेव्हा तिच्य शृंगारानंतर तिच्या प्रियकराने तिला पाहिलं नसेल ...पण मी मुलगी असुन मी लवकर आवरून आले याला का इतका वेळ लागतोय?. माझी स्वतःवर आणि त्या झग्यावर प्रचंड चीडचिड होत होती. आणि गेस व्हॉट फायनली तो दिसला नि यांनी 'जब तक ना पडे आशिक़ की नजर' म्हणून इशारा केला.. आणि चक्क या कॉलेजच्या एका वर्षाच्या नजरानजरमध्ये पहिल्यांदा तो हसला, मला विश्वास बसेना तो हसला होता. आयेहाय....! ते हसणं, त्याचे ते ओठ जे मला बघून हसले होते, आणि ते डोळे मला बघून दुजोरा देत होते की 'तु हे माझ्यासाठी केलं आहेस आणि मला ते कतल-ए- नजर' आवडलं आहे....  वूओवssssss माझा आनंदच कमी होत नव्हता.  काय गुदगुल्या होत होत्या म्हणून सांगू, गालावरचा तो ब्लश तर ओसंडून वाहत होता. बिकाउ ब्लश असता तर या ब्लशपुढे उडून गेला असता. हा मौल्यवान होता! 
          गोष्ट एवढ्यावरच थांबली नव्हती, तो हसलाही आणि थोड्यावेळाने मित्रांबरोबर त्याने पुढे जाऊन पुन्हा एकवार वळून मागे बघितले होते त्याने . मला त्याला ओरडावंस वाटत होतं की ' वेडाये का तू ? ऐसे देखकरही मार डालोगे तुम'.अहाहाsss अलका याग्निक मानवली होती. माझं सर्वांग त्याच्या त्या 'फिरसे मुडकर देखना तुम्हारा रास आ रहा हैं हमें, युं ऐसेही देखा करो ना हमें' म्हणत त्याचं स्वागत करत होती. .... मी खूsssssप खूप खुश होते.
           माझं साडीप्रकरण गाजलं होतं.  ते आजही मन शाहळून जातं ... त्याचा तेवढाच एक फोटो मेमरीमध्ये कॅप्चर झाला जो आजही कुठली अलमारी उघडून बघावा नाही लागत. आठवण आली की समोर माझ्या तो फोटो येउन ठाकतो.
 त्यानंतर बारावी झाली, कॉलेज संपलं, ती निरागसता ते प्रेम नावाचं व्यसनही सुटलं. या मोठ्या गोष्टींच्या गर्तेत ते ऊनही विसरले नि अलका याग्निकलासुद्धा. आठवणीत होतं फक्त त्याचं गोंडस हसणं  ..बस्स ती पहिली नि शेवटची स्टेप स्वतःच्या प्रेमासाठी आणि प्रेमाच्या तसल्लीसाठी. !
अशावेळी वर्तमानात डोकावून पाहिलं की वाटतं, कुठलं प्रेम करतात आजकालची ही सात-आठवीची मुलं ...?
          मला आठवतंय, ना त्याचा हात हातात घेतला ना हिमतीनं त्याच्या डोळ्यात कधी पाहिलं. उलट त्याला पाहून ब्लश करणं नि लाजणं हाच प्रेमातला नाजूकपणा होता, जीवंतपणा होता!
          ऊप्स ती केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स लॅब.. ते  विसरले तर कॉलेज आणि तो पूर्ण होईलच कसा  ? याची तर मज्जाच वेगळी असायची. त्याने मला वर नजर करुन पहावं म्हणून निमित्त करत आम्ही रोज उशीरा पोहोचायचो नि कितीतरी वेळ सरांची तीच ती बोलनीही खायचो. सर तिकडे बोलत बसायचे मी इकडे डोळ्यांचे चोचले पुरवायचे... कित्ती गोड चिडायचे ते सर .... आणि तेवढं करुनही सरांच मन भरायचं नाही ते आमच्या बॅच वेगवेगळ्या करायला जायचे. ये जुदाई मै भला होणे देती. मी बंड करून उठायचे नि म्हणायचे ' त्या लॅबमध्ये बर्नर, माचीसपेटी नाहीये सर, मॅडमने इकडेच पाठवलंय' आणि एवढ्या धाडसाने त्याच्याच बॅचमधे प्रॅक्टिकलला बसायचे. प्यार धाडस देता हैं कुछ भी करने का ... आणि हेच धाडस करत नजर मैत्रीणीशी भिडवत त्याच्याकडे हात करत बर्नरसाठी माचीस त्याच्याकडेच मागायची. नजरेला गुस्ताखी करण्याची संधीच द्यायची नाही. त्यामुळे सगळं बोलायचो पण बोलायचोच नाही.  अजब असायचं सगळं काही ....
             हाहाहा तो मराठीचा पेपर .... आज आठवतानासुद्धा कस ताजं वाटतय सगळं, जसं आत्ताच घडलं असावं नि मी चित्रपटात पाहत असावी.  त्याच्याकडे पेपर लिहायला परीक्षा पेपर नव्हता. मित्रांकडे मागितल्यानंतर मलाही मागितली. त्याने पहिल्यांदा काहितरी मागवलं आणि मी त्याला नकार द्यावा हे मला पटत नव्हतं म्हणून मी ' आहे  ना... पण बाथरुमला जाऊन येते मग देते.' म्हणून जी त्या कॉलेज स्टेशनरीत धूम ठोकली ती  माझ्याकडे नाही म्हणून परीक्षा सुरु व्हायचा शेवटच्या मिनिटापर्यंत बाहेर थांबून ती घेतलीच नि ती घेऊनच वरती आले. पण्ण माझं दुर्दैव हे की त्याआधीच त्याला परिक्षा पेपर मिळाल होता पण सुदैव हेच की परिक्षा निरिक्षकाने  पेपरला बसू दिलं. डर नापास व्हायचं नव्हतं रे कधी... दुसऱ्या वर्गात जाऊन बघायला कष्ट लागले असते ना जरा आणि स्वतःच्या वर्गातून त्याला बघण्याची मजाच काही और असायची. म्हणून ही उठाठेव !
          काय एक एक खूळ असायचं त्यावेळी मैत्रीणींच्या सांगण्यावरून नवीन ड्रेस घातला, नवीन हेअरस्टाईल केली की वाटायचं आधी त्याने बघावं एवढी साधी इच्छा आणि आणि आनंद असायचा तेव्हा. नाहीच कधी बघितलं तर थोडस हार्टफेल व्हायचंच यार्र प्यार नहीं था लेकीन एकतर्फा तो था त्यामुळे....'प्रेमात खचून नाय जायच बॉस ' हा मंत्रा कॉलेजभर पुरला ... पुढल्या दिवशी पुन्हा नवीन प्रयोग नवीन प्रयत्न, ना अहंकार ना ऍटिट्यूड ... सगळ कसं एकदम निर्मळ नि हार्मलेस होतं...
           सगळ झालं. आज तीन वर्षे झाली. सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्या असण्यापासून त्याची अटेंडेन्स लावण्यापर्यंत सगळंपण त्याला ना कधी कळलं, ना मला सांगावस वाटल ....
त्ते म्हणतात ना प्रश्न,भांडण,वाद आणि ब्रेकअप या गोष्टी प्रेम व्यक्त केल्यावर सुरू होतात म्हणून मी कधी बोललेच नाही.
 कारण त्याच्याबरोबर ब्रेकअपच दुख: नव्हत मला, फक्त माझ्या प्रेमाबरोबर मला ब्रेकअप नव्हतं करायच खरंच! जसं होतं तसं मस्त होतं, माझं होतं. यात मी खूश होते प्रचंड! ना अपेक्षा ना भीती. जो जवळच नाही, तो दूर जाण्याची भीती नसते आणि जो हृदयात आहे कित्येक वर्षापासून एकतर्फी प्रेमात, त्याने आपल्याला सोडावं हा लवलेश नसतो ....
"उसने कभी उस नजर से मुझे देखा नही बात अलग है,
लेकिन मे उसे उसी एकतर्फी-नजर से देखुंगी ये भी तेय है ||" या वाक्यातलं समाधान मला जपायचं होतं.
एकच समाधान असेल आयुष्यभर की, हे माझं हक्काच प्रेम ना लग्नानंतर मला आडवं येईल ना आत्ता ....
            फक्त ते दिवस असमंजस, खुळे निरागस आणि खऱ्या प्रेमाचे होते. ते परिकथेचे दिवस गेल्याचं थोडं दुख या समंजस आयुष्याचा ताण आला की मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आहे.  अन पहिला दिवस आठवल्यावर त्याचा चंपू तेल लावलेला चेहरा नि सेंड-ऑफच्या दिवशी स्पाईक्स केलेला चेहरा , दोन्ही बिफोर-आफ्टरसारखे आठवतील नि या बिफोर आफ्टरमधला एक अख्खा आठवणींचा जलाशय, त्याच्या हास्याने नि फक्त त्याच्या अस्तित्वाने तुडुंब भरलेला दिसेल ...

#shades of Love


ये उन दिनों की मोहब्बत हैं|

by on जुलै २४, २०१८
आज खूप दिवसांनी त्याची आठवण झाली ... प्रेम बीम नसावच ते, पण मला तो आवडायचा...  त्याच्या मित्रांमुळे मला तो आवडायला लागला. मी बघितलं आणि...
कुटंबातल्या नात्यांत...
धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो.
एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ?
असमान आसमंत अटळ होत जातो. निर्मितीकक्षा चिवट होतात आणि 'पुन्हा सगळ्यांनी एकत्र यावं' हा आविर्भावही कुणाच्या मनावर बिंबत नाही ...माणुस समुद्र नाही होऊ शकत, तो तितका विशाल नाही बनू शकत. त्याच्यात कुणाला आपलंस करण्याच सामर्थ्य नसतं...तो निस्वार्थ होणं म्हणजे ... असो ! 
सुरेश आज खूप दिवसांनी घरी आला. मी खुश होते. अम्मू पण खुश झाली. जाईच्या चेहर्यावर मात्र कडवट भेग विस्फारली. मन्याला काही कळणं तर अशक्य होतं. शेवटी प्रश्न होता सुरेशचा ...
नात्यांतल्या गैरसमजाचा, वादाचा हा खेळ खुऊप कडवट असतो. समजण्या आणि समजावण्यापलीकडचा ...
सुरेश आयुष्य जगला होता. 'रुबाबतील ढब' एक व्यक्तिमत्व होतं त्याचं. समोरचा बेधडक गार होऊन त्याचं ऐकायचा, असा तो होता. घरातल्या किंवा बाहेरच्या कुठल्याच नात्याला मानायचा न जपायचा तो. त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे सुस्पष्ट ढोंगीपणा होता. जेही होतं जगासाठी, जगाच्या दृष्टीने.. 
दूर कशाला जायचं, कालचंच उदाहरण सांगते.
शलाखाने (मैत्रीण) फेसबुकला स्टेटस टाकलं होतं,
"रिश्तोंसे खूबसूरत कोई दौलत नहीं होती, दौलत होकें भी रिश्ते ना हो तो आपकी खुशिया भी दुबली हो जाती है | "
त्यावर त्याने कॉमेंट केली:
"बहोत खूब शलाखा... आजकाल की जनरेशन कहाँ ईतना सोचती है ...."
सुरेश इथेच सिद्ध झाला.! 

पण.............
हो 'पण' आहेच.
स्वभावबद्ध प्रतिमा कधीकधी बदलतात. इतक्या की सुखद अपेक्षाभंग होतो आणि आवाक भाव जखडून मन जोखिमीने प्रश्न करून उठतात.
सुरेशने आज 'मला' घरी आणलं होतं. यावेळी घरी येताना त्याने स्वतःच्या पलिकडे बघण्याचे कष्ट घेतले होते. 
मन्याला बोटांनी अक्षरओळखीची पाटी आणि अम्मूसाठी साडी आणली होती .... सुरेशचं हे बदलणं अनपेक्षित होतं.! 
यासगळ्यात जाई मात्र कडाडून तापलेली होती. तिच्या रेखीव डोळ्यांत तो अंगार झळकला. अम्मूने हातानेच शांत केलं तिला. प्रेमळ सासू असली तरी सुरेशची ती आई होती. त्यामुळे स्वाभाविक तिचा कल सुरेशकडे जास्त होता.
भेगाळलेला राग तिचा एखाद्या नसेतून बाहेर येणार होताच, तोच रेडिओ 'सदाबहार'ला अलका याग्निकचं 'क्या तुम्हे याद हैं।' लागलं...
आणि...
आणि चक्क सुरेशने जाईचा हात हातात घेतला. तिला एका जेंटलमनसारखं 'वूड यू लाईक टू डॅन्स विद मि ?' विचारलं. अडखळत, गोंधळत जाईची पुरती धांदल होत, विचारांची फरफट होत ... हो? नाही? च्या वावरातच ती नकळत त्याच्याबरोबर संलग्न झाली होती.
घरात आम्ही सगळे होतो, अगदी आधीचेच सगळे ... पण त्याने घेतलेल्या या अनपेक्षित स्वभाव वळणाने आम्हीही चाटच पडलो...
घरात ही अशी कित्येक दिवसानंतर क्षणाक्षणावर, घरातल्या भिंतीभिंतींवर ख़ुशी बहरत होती. भेगाळलेल्या भिंतींत ती बसली होती. 
आता पुढे कित्येक वर्षे या दृष्ट लागल्या घरी पुन्हा कुणी रुसणार नव्हतं, रागावणार नव्हतं, अबोला धरणार नव्हतं....  
जाई खुश होती. कारण जाईसाठी भेट म्हणून खुद्द सुरेशच आला होता. तिला आता काहीच नको होत ... अम्मूची तर काळजी तेव्हाच मिटली,जेव्हा सुरेशने आईसाठी साडी घ्यावी, या विचाराने साडी आणली. अक्षरओळखीची पाटी आणून न सांगता त्याने मन्याची जबाबदारीही घेतली. 
आणि मी ?
माझं काय ?
मी तीच होते जी त्या रात्री सुरेशच्या आयुष्यात आले ....
"खुशी/आनंद/सुख"

त्यामुळे माणूस जेव्हा जेव्हा 'स्व' पलीकडे जाऊन बघतो तेव्हा त्याच्या आनंदाच्या कक्षा दुपटीने  विस्तारतात...  आणि म्हणून कित्येक कडवट रात्रीनंतर सुरेशच्या एका पुढाकाराने  ती रात्र 'माझी' ठरली .....


(वरती वापरलेले "मी, माझी, मला" हे शब्द "आनंद, ख़ुशी, सुख: या अर्थाने वापरले आहे. )

ती रात्र 'माझी' ठरली .....

by on जुलै ११, २०१८
कुटंबातल्या नात्यांत... धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो. एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ? असमान आसमंत अ...
आम्ही दोघेही पडल्या पडल्या गुणगुणत होतो,

'रूह से चाहने वाले आशिक़,
बातें जिस्मों की करतें नहीं...|'


रेडिओवर चाललेलं हे गाणं ऐकता ऐकता त्याच्या केसांत बोटं फिरवत मी सहजच त्याला म्हटलं,
"जर का मीही आयुष्यात ही अशी चूक केली तर.?"
"तुला कळतंय ना तू काय म्हणतेय ?" तो अच्चानक अग्रेसिव्ह होऊन उठलाच...
"अब्सुल्युटली... सांग ना नेमकं काय होईल तु मला सोडून जाशील.?, मी सहजच म्हणत होते.
"तसा कुणी आहे का.?" त्याला पटापट साताठदहा प्रश्न विचारायचे होते लक्षात आलं माझ्या.
"असेलही. तुझ्या उत्तरावर पुढे सांगायचे की नाही ठरेल." मी त्याची फिरकी घेण्याच्या मूडमध्ये म्हटलं.
"तु असा जीव टांगणीला का लावतेयस.? आधी सांग काय झालंय नेमकं...? हॅव यू किस्ड इच अदर ?"
"डोन्ट गेट पजेसिव्ह. शांततेत बोलूया या विषयावर?" त्याने डायरेक्ट किस्सबद्दल विचारलं तेव्हा ठरवलं आता सिरियस्लीच बोलण्याची गरज आहे.
"हो... डिपेंड करतं की तू नेमकं काय केलयं.?" त्याचा दृष्टीकोण त्याच्या उत्तरांतून अजून जास्त कळत चालला होता. मीही कंटिन्यू केलं.
"आर यू सिरियस ? म्हणजे तु म्हणतोयस की, तु मी काहीतरी केलंय यावरून आपलं इतक्या वर्षांच नातं तोडून टाकशील.?
म्हणजे मीठी मारली असेल तर कशी मिठी?, कितीवेळ आणि का ? ? किंवा मग किस्स असेल तर कसा किस.? लिपलॉक की गालावर...? किंवा त्यापुढे इफ वी एन्ड अप इन बेड मग तर तिथे तु कुठलीच शक्यता न ठेवता ते नातं तोडून टाकणार असंच नं ...?"
"इट्स ऑब्वियस माय लव्ह!" हे त्याने ज्या टोनमध्ये म्हटलं, त्याने माझा राग वाढत चालला होता. कारण त्याला माझी याबद्दलची मतं, दृष्टीकोण चांगलाच माहिती होता. त्यामुळे त्याच्याकडून येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर मी शॉक होत होते. तरीही धुसर सगळं स्पष्ट व्हावं म्हणून मी प्रश्न विचारला...
"ओह्के...! आणि जर का आम्ही हे सगळं केलं असेल म्हणजे मीठीत घेण्यापासून किसपर्यंत आणि त्याहीपुढे जाऊन तु जो विचार करतोय तेही घडलं असेल तर.?"
"_______" तो काहीच बोलला नाही.
मी कंटिन्यू केलं,"आणि जर का तसं काही आमच्यामध्ये घडलं असेल आणि यापुढे आम्ही एकमेकांना भेटणारही नसू असं ठरवलं असेल तर? त्यामुळे यापुढे आमचा एकमेकांशी कसलाच संबंध येणार नसेल. तरीही तुला प्रोब्लेम असेल.?"
"तु आता खरंच माझ्या डोक्यात जातेयस. मला सुचत नाहीये काय बोलू... मला क्लियर सांग काय झालं आहे नेमकं.?"
"उम्म्म्मम्मम्मम,
मी फक्त विचार करत होते की जर लोकं म्हणतात, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या त्या दोन्ही व्यक्तींनी एकमेकांशी प्रामाणिक असलं पाहिजे. त्यातील एकाही व्यक्तीने त्या व्यक्तीव्यतिरिक्त तिऱ्हाइत व्यक्तीशी नातेसंबध (स्पष्टच म्हणायचे तर लैंगिकसंबंध) ठेवले तर ती व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीला फसवत असते."
त्याच्या चेहऱ्यावरचे भाव माझ्या प्रत्येक वाक्याला बदलत होते ... मी बोलत राहिले...
"पण मी खूप दिवसांपासून गोंधळात पडलेय. म्हणजे बघ हां नात्यात असलेली ती व्यक्ती आणि तिऱ्हाइत व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यांच आकर्षण कुठल्याच मार्गाने भावनिक नसतं. त्यामुळे त्यांच्या आकर्षणात निव्वळ निव्वळ ओढाताण असते एकमेकांच्या शरिराची. आणि ते आकर्षण थांबणही शक्य नसतं मग एका अशा अघोऱ्या क्षणी ती दोघे तो क्षण बिनधास्त अनुभवून घेतात. काही बेफिकिरीने, काही गिल्टने ..."
"तुझा मुद्दा कळेल मला स्पष्ट.? तु या विषयाबद्दल सकारात्मक दृष्टीकोण मांडून स्वतः जे काही केलंय त्याचं समर्थन करत नाहीयेस बरोबर?"
"आधी मला बोलू दे पूर्ण !
म्हणजे बघ नं मी एकदा तुला विचारलं होतं की, एखादी व्यक्ती आपल्याला का आवडू लागते.? किंवा त्याच व्यक्तीच्या प्रेमात आपण का पडतो.? तेव्हा तुच म्हणाला होतास नां, 'प्रेम हे भावनिक टेलिपथी जुळल्यावर, विचार जुळल्यावर होतं. असं खूप कमी व्यक्तींबद्दल वाटतं आयुष्यात. आणि माझ्यासाठी ती व्यक्ती 'तु' आहेस...'
तर मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे विचार केला तर मला एक प्रश्न सारखा पडतोय की, तिऱ्हाइत व्यक्तीने तुझ्या प्रिय व्यक्तीच्या निव्वळ त्वचा म्हणवणाऱ्या त्या शरीराला स्पर्श केला तर तु नातं तोडण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतोस.?"
"मला ना...______"
"तु थांब ... तुला आत्ता काही बोलता येणार नाही, किंबहुना सुचणारच नाही.
मला माहितीये तुला काय म्हणायचे आहे. हेच ना की, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीच्या हक्काचा तो स्पर्श असतो. तो त्या व्यक्तीच्या नावे केलेला एक 'स्वर्गीय क्षण' असतो."माझ्या या वाक्याने त्याच्या कपाळावरच्या रागीट आठ्यांचा शीण किंचित ओसरल्याचं जाणवलं. ही फक्त एका बाजूने विचार करतेय हा त्याचा भ्रम मी त्या एका वाक्याने दूर करत पुढे बोलू लागले...
"पण मग जर मी तो क्षण दुसऱ्या कुणा व्यक्तीबरोबर अनुभवला म्हणजे त्यानंतर मी तो क्षण तुझ्याबरोबर तितक्याच गहिरेपणाने अनुभवू शकणार नाही असं काही असतं का.?...
मग तर तुझा मागच्या चार प्रेयसींबरोबर तो क्षण आधीच अनुभवून झाला आहे. मग.?"
"तुमच्यात खरंच तसं काही घडलंय का.? मी शांततेत विचारण्याचा प्रयत्न करतोय हां... तू बाकीचे संदर्भ काय सांगत बसलीयस .. कित्ती ताणवणार आहेस अजून. घडाघडा काय ते बोलून टाक ना यार्र आता..." तो अंगाशी आलेलं सगळं सावरून बोलत होता.
"बघ हं... म्हणजे सध्याच्या परिस्थितीला तुला मी खुप बालिश वाटेल. पण एवढंच सांगावंस वाटत होतं, प्रेम आहे ते. त्यात शारीरिक क्षण महत्वाचा असतोच. कदाचित तोच असा क्षण असतो जिथे ती प्रेम करणारी दोघे या दुनियेपासून, सगळ्या स्वार्थापासून दूर होतात नि एकमेकांशी शरिराने तर जोडले जातातच पण ते भावनेनेही एकत्र येतात.
आकर्षण असतं तिथे फक्त शरीर ती क्रिडा उपभोगत असतं परंतु जिथे प्रेम असतं तिथे त्या व्यक्तीचा रोमरोम ते उपभोगून सुखी होत असतो. याशिवाय हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न की त्याने कुणाबरोबर शारीरिक संबंध ठेवावे.
पण आपल्या नात्यात, आतापर्यंतच्या या नाजूक संवादात मला अपेक्षा होती की, तू एकदा तरी काळजीपोटी विचारशील की,' तु तुझ्या मर्जीने तो क्षण अनुभवलास का.? किंवा कोण आहे तो मुलगा..? असं का घडलं अचानक.? किंवा मग माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तु असं काही करणारच नाहीस... किंवा तसं काही घडलंय तर मला नीट सांग काय झालं आहे, आपण त्यावर सोल्युशन काढू...
आणि सोल्युशन काही उरलंच नसतं तेव्हा तु खुशाल त्या नात्यापासून मोकळा झाला असता तर काहीच वाटलं नसतं.
पण्ण नाही तुला फक्त तो क्षण ऐकायचा होता नि त्यापुढे मी बोलायला सुरुवात केल्यापासून तुझ्या मनात ब्रेकअप ठरलंच होतं.
आपला संवाद सुरु झाल्या झाल्या तुझं ते ओव्हरपजेसिव्ह होणं मी मान्यही केलं कारण मला माहितीये प्रेम हे आकर्षणाशिवाय पुर्ण होणारे का ...? पण त्यानंतर तु ज्या अतिअविश्वासाने सगळं काही बोललास त्यामुळे मी मुद्दाम हे विरुद्ध फासे टाकले आणि तुझा 'नात्याचा आदर करतो. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे वगैरे वगैरे वगैरे' मुखवटे अस्से गळून पडले त्यावरून तरी वाटतंय मीच कुठेतरी या नात्याचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे.
बाय द वे, मी फक्त त्या गाण्याचे शब्द ऐकले,
"रुह से चाहने वाले आशिक़,
बातें जिस्मों की करतें नहीं...|"
नि कल्पनेने तुला हा प्रश्न विचारला.
पण या तुझ्या एकंदरीत अज्ञानी रिॲक्शनवरून एक सांगावसं वाटतंय,
"रुह और जिस्म पत्तीया दोनों एकही पेड कीं है।
दोनों के बीच एक बारीकसा धागा हैं उसें समझने में जल्दबाजी कर दीं हैं तुमनें|"

त्यामुळे शरीर आणि आत्म्यातील तो धागा शोध,
समज,
आत्मसात कर,
त्यातील वास्तव 'प्रत्यक्षात' पचव,
मग भेटू आपण...
बाय!

 मेरे बस दस प्रतिशत हिस्से से वाकिफ़ हो तुम, फिर कभी मिलेंगे॥



                                                           



रिटच रूह

by on मे २६, २०१८
आम्ही दोघेही पडल्या पडल्या गुणगुणत होतो, 'रूह से चाहने वाले आशिक़, बातें जिस्मों की करतें नहीं...|' रेडिओवर चाललेलं हे गाणं ऐकत...