Sufi: मातृदिन
मातृदिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मातृदिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


'आई...'
आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही.

नेहमीचे असंख्य विचार असणारं मन अशावेळी काय आठवून देतं माहिते?
"तिचा हिरव्या चुड्याने भरलेला दणकट हात, जो कधीही पडायचा उशीर असायचा... "
दणकट होती ती, आजही तितकीच स्थिर आणि त्याहून जास्त खमकी!
आज मला मुक्तपणा कळतोय, बंधने, गुलामी, अहं पणा कळतोय, स्वार्थी लोकांतील राजकारण कळतंय हे सगळं तिच्यातून मला आलेलं देणं आहे. कारण जेव्हा एक आई विचारांनी आणि कृतींनी दणकट असते तेव्हा तिच्यातील मातृत्वाबरोबर तिच्या विचारांचा अंशही आपल्यात वावरत असतो. पण तरीही सगळं कळून आपण या वरच्या गुणांचा भाग कधी व्हायचं नाही, हेही तिचंच देणं आहे.
एक शुद्ध आत्मा कसा जन्माला घालायचां आणि त्याची निर्मिती करून त्याला शिल्पकार जसा घडवतो तशी छाननी करीत घडवायचं हे एवढं विशाल व्याप्त काम ती मन लाऊन अगदी सहज, अलवार करून जाते.
आई हे वेगळं रसायन असतं, ज्यात खूप असतं. ती म्हणजे एक मोठीच्या मोठी बुदली आहे, ती कुठल्याच कलेतून व्यक्त करताना कमी पडत नाही, ती कधीच संपत नाही, ती वाढत जाते आणि निव्वळ वाढतच जाते.
आईसाठीचं काही आठवत असेल तर, 'माझ्याही नकळत तिला माझ्यातल्या लिखाणाची चाहूल माझ्या आजूबाजूच्या लोकांनी दिली होती आणि माझ्याही आधी तिला ती कळली होती.'
परीक्षेचे दिवस होते. माझं शिक्षण महानगरपालकेच्या शाळेतलं. तेव्हा त्या शाळेच्या आपुलकीबद्दल अन् गोंडस दिवसांबद्दल कधीतरी लिहिल, पण या शाळेतील एक महत्त्वाचा दिवस होता तो.
आमच्या वार्षिक परीक्षेचे दिवस होते ते. आणि परीक्षेला मराठीच्या पेपरात "माझा पहिला नंबर आला तर...? " हा निबंध आला होता. तेव्हा मी चौथीत असेल.
मोबाईल फोन गॅझेटच्या महागड्या सावलीलाही नव्हतो आम्ही. त्यामुळे घरच्यांनी लहानपणी लहान राहणं जमवून आणि जपून ठेवलं होतं. एवढं काहीच कळायचं नाही पण 'आई जवळची आहे, ती कळायची.'
'तिचं' कसं असायचं, दिवस तिथूनच सुरू व्हायचा अन् मधल्या दुपारच्या वेळेत जे लहानपणीच सुख असतं ते अनुभवायचं अन् रात्र पुन्हा तिच्याच जवळ संपायची. गणित आयुष्याचं इतकं सहज सोप्प होतं.
त्यामुळे आयुष्याच्या दुनियादारीपासून आईने खूप जपलं.
"आई घरकाम करायची, आम्ही नातेवाईकांकडे शिक्षण घ्यायचो आणि परिस्थिती ही आपल्या फेवरमध्ये नाहीये." या तीन वस्तुस्थिती माझ्या मनावर प्रोपोगांडा राबवावा तशा मनावर बिंबत होत्या. पण एका बाजूला याच वस्तुस्थिती मला मोठं करू लागल्या. तेव्हाही मला माहीत नव्हतं, हे लेखक बिखक नेमकी प्रकरण काय असतं, जे आजही मला कळत नाही .
पण मी लिहिलं होतं त्या निबंधात, तो जो  दिवस होताsssssss.. तो मला त्यावेळी काहीच कळला नव्हता 😅
मी निबंधात लिहिलेल्या दोनच ओळींनी माझ्या बाई अनपेक्षितपणे माझ्याकडे पाहू लागल्या होत्या. बाईंनी तसं या पूर्वी कधी पाहिलेच नव्हते म्हणून काहीच तर्क लागतं नव्हते. 
मॅडमने नेहमीप्रमाणे पेपर वाटायला घेतले. 
माझा नंबर आला. पण मला पेपरच दिला नाही, तो बाजूला ठेवला. सगळ्यांचे पेपर वाटले. मी रडवेली होऊन मॅडमकडे पाहू लागले. कारण नापास होणं म्हणजे आईच्या मेहनतीचा अपमान होता तो.
मी त्यांच्यासमोर बोलेल इतकी बिनधास्त नव्हतेच कधी. थोड्यावेळाने बाई उठल्या. मला समोर बोलावलं. माझा पेपर हातात घेतला. आणि संपूर्ण वर्गात तो निबंध वाचून दाखवला. मला खूपच कसतरी वाटलेल. मला तरीही काही कळलं नाही, ना माझ्या वर्गातल्या मुलांना हे कळलं. म्हणजे त्यात एवढं काय होतं ? ते कौतुक होतं का? मला तेही कळलं नव्हतं. पण मी चुकीचं काहीच केलं नाही एवढं मात्र मला माहित होतं आणि बाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेला येताना सोबतीला आईला घेऊन यायला सांगितलं.
आई धास्तीने आली की, नेमकं मी काय उद्योग करून ठेवलेय. कारण घरकामाला सुट्टी घेऊन येणं आम्हाला परवडणार नव्हतं. पण तरीही शिक्षणाच्या बाबतीत तिला तडजोड मान्यच नव्हती.
ती आली. मॅडमने कौतुकाने सांगितले, तुमच्या मुलीने काय लिहिलंय सांगितलं तुम्हाला? ती अजुनच घाबरून गेली. कारण तिला याची पूर्वकल्पनाच नव्हती. आई भोळेपणाने म्हणाली, नाही मला काहीच माहीत नाही, काय केलंय तिने?.
आता डोळे माझ्याकडे करून तिने डोळ्यांनीच रागाने विचारलं, पूजे अभ्यासाकडे लक्ष द्यायचे का नुसते उपद्व्याप करून ठेवतेय. ती खूप चिडून गेली होती. ती अजून चिडणारच तेव्हा मॅडम बोलल्या, " शाबासकी द्या तिला आणि या ओळी वाचा." आई साधारण शिकलेली त्यामुळे तिने वाचलं. 
मी लिहिलं होतं, "माझा पहीला नंबर आला तर, मला खूप आनंद होईल. पण मला खूप आनंद होईल कारण माझ्या आईला याचा खूप आनंद होईल. त्यामुळे खूप मोठ्ठं शिकून एक नंबर मिळवायचाय! " 
तिनेही माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मला पाणी दिसलं. 
पाणी म्हणू की शाबासकी म्हणू की ते आनंदाश्रु होते.? तिच्या कष्टाचं चीज होतंय, तिच्या कष्टाचं रोपटं पुढे खूप मोठं होणारे, तिच्या डोळ्यात तो विश्वास मला जवळ घेऊन कौतुकाची थाप दिल्यावर मला दिसला होता. नकळत्या वयात आई आपल्याला मोठ्ठी स्वप्न दाखवू लागते.
"गरिबीतून मोठ्ठं होण्याचं स्वप्न तिने त्या दिवशी मला दिलं होतं. "
परिस्थिती हे अपयशाचं कारण कधीच नसते. तुला ते करायचं आहे तेव्हा तुला कोणीच थांबवू शकणार नाही. ते आजही तिने मला कधीच थांबवलं नाही.
आईच्या डोळ्यात जेव्हा आपल्या कलेविषयी आदर आणि स्वप्न दिसतात, तो दिवस आपल्या आयुष्याचा सोहळा असतो. सुदैवाने हे लिखाणातील कौतुकाचे सोहळे मी तिच्या आनंदाश्रुच्या सौख्यात दोनदा अनुभवले. त्याला कसलीच बरोबरी नसते. ते सुख असतं, कुठल्याच किंतुशिवाय मिळालेलं एकमेव सुख!
त्यामुळे स्वतःच्या स्वप्नांना आईच्या शाबासकीचे तोरण लागले की स्वप्न पूर्ण वाटू लागतात आणि आयुष्य स्वर्ग वाटू लागतो. वास्तवाचे चटके सहन होणार नाही इतके असतील पण त्यातही सौख्याचा सागर तिच्या हाताच्या स्पर्शात असतो. 
वास्तव स्वीकारलं नाही तरीही ते असणारच आहे पण, त्या वास्तवातील कविता होणे तुम्हाला जमायला हवे! हे शिकवून अन् घडवून जाते ती ! 
अशा माऊलीला "मौल्यवान मातृदिनाच्या मातृमय शुभेच्छा !"

वास्तवातली कविता !

by on मे १२, २०१९
'आई...' आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही. नेहमी...