माझ्या एकांताची कहाणी ! - Sufi

माझ्या एकांताची कहाणी !

घराच्या बाहेर कॉरीडोअरमध्ये पायऱ्यांवर शांत बसायला मी जाते.
शांत म्हणताना हा 'शांत' शब्द सहज म्हणावा तसा का म्हणून जातो आपण? त्या शांsssssssत शब्दात कितीतरी गूढ आहे. आणि त्यापर्यंत अजूनतरी कुठला मनुष्य पोहोचलाच नसणारे. ते न जमणार काम आहे.
मोठं झाल्यावर आपण शांत कधी असतो? मला तरी मी अशी शांत कधी सापडलेच नाही. फारफार तर ही शांतता मला मी खुश असल्यावर मिळते. त्याशिवाय, शांततेच्या नावाखाली फक्त एकांत शोधणं असतं. एकांतातही असंख्य विचारांना मी का बळच आमंत्रित करीत असेल? 
हा एकांत मी 'माझा वेळ' म्हणून काढत असते आणि त्यातसुद्धा कुठलीच मला सुखावणारी गोष्ट नसते.
साधं उदाहरण आहे, बाहेर कॉरीडोअरमध्ये मी आज कितीतरी दिवसांनी बसले आहे, येरझारा घालणारी हवा, समाजातील निरव शांतता आणि रातकिड्यांचा आवाज एवढंच काय ते बॅकग्राऊन्डला आहे. तो आवाजही नको म्हणत कानांना हेडफोन लावून मी काय ऐकते? तर .... 'क्यों मैं जागूssss' हे एकट्याचं, एकांताचं आणि आयुष्याला कंटाळलेलं गाणं... 
म्हणजे अशाप्रकारे मी यशस्वीरीत्या एक घटका घटक्याने माझ्या विचारांची घुटन वाढवणारी बुदली भरत असते. तरीही मनाला माझ्या प्रश्न पडत राहतो, 'नेमकं तुला काय झालं आहे?'
'कुठे शोधू हा एकांत?' म्हणत जेव्हा हा एकांत मला सापडतो, मला स्वतः मुळेच दचकायला, घाबरायला होतं. कारण या शांततेच्यावेळी हा 'स्व' काय निर्णय घेईल मला याचा कुठलाच अंदाज येत नाही. 
अशात कुठेतरी स्वतःच्या स्वप्नांचा विचार करण्याचा मी थोडाफार प्रयत्न  करायला जाते, होतं काय माहिते...? मीच माझा आत्मविश्वास 'बघता येईल, वेळ येईल तेव्हा....' म्हणत त्याला जन्मुच देत नाही. 
शेवटी 'स्वप्न का पाहतो माणूस?' 
विचारते मी स्वतःला कधीतरी तो लहानपणीचा प्रश्न; 'काय व्हायचंय तुला...?'
मोठे झाल्यांनतर विशी पार केल्यानंतर प्रत्येकचजण डॉक्टर, इंजिनियरपेक्षाही 'मला शांत व्हायचंय...' म्हणणारा असतो.
'स्वप्न का पाहतो माणूस?'
जिवंत राहण्यासाठी म्हणणारी मी आहेच. 
पण त्यापुढे जाऊन, माझं बनलेलं एखादं स्वप्न हे माझ्या आवडीमुळे बनतं कि पैशांसाठी ते स्वप्न बनत असतं. ?
मनापासून सांगू तर माझं स्वप्न मला माहित नाही. आजही माहीत नाही. लोकं मला अशामुळे डेडबॉडी समजतील, मला ते मंजूर आहे. 
या आधी प्रत्येकवेळी स्वप्न पाहायला मला कुणीतरी भाग पाडलं आहे. पण तेही माझं चिरकाल स्वप्न नसतंच... 
लोकं म्हणतात, 'खूप मेहनत घे, खूप प्रसिद्ध होशील.!'
माझा प्रश्न असतो, का...? आणि झाले प्रसिद्ध मग... ?
लोकं असतील आजूबाजूला, सगळं जग मला ओळखेल, बेसुमार प्रेम चौफेर कानाकोपऱ्यातून बरसेल. ते तर आजही आहेच. 
ए पण नको, तेव्हा मिळणाऱ्या प्रेमात भेसळ असेल. आत्ताच मला मिळतंय ते प्रेम 'प्रेम' शब्दाला पूर्ण करणारं आहे. 
बरं तरीही वाटतं कधीतरी, 'व्हावं खूप मोठं सगळं जग ओळखेल एवढं' म्हणून खटाटोप घेणारं हे प्रामाणिक मनही असतं.... माणूस आहे ना. 
पण तेच प्रामाणिक मन सांगतं, 
'ते मोठं होणं कशासाठी माहिते का?' 
पैशांसाठी. 
आणि पैसे कशासाठी माहिते?
'हवं ते करण्यासाठी.' 
"मला हवं ते करायचंय..." हे स्वप्न आहे माझं. 
दुर्दैव प्रत्येकाच्या आयुष्याचं हेच असतं. स्वतःला वैयक्तिक हवं ते कधी करता येतच नाही , त्रास कुणालाच द्यायचा नसतो. फक्त स्वतःच्या आयुष्याच्या मानसिक, आंतरिक शांततेसाठी हवं ते करायचं असतं. 
आणि ते न करून आपण आपल्या या सुंदर आयुष्याची हसूनच एक चिरफाड करून टाकणारे आयुष्य एका कॉरीडोअरमध्ये छानपैकी डिजाईन करत असतो...
.
 मीही तेच करणारी एक डेडबॉडी बनत होते... ?  


४ टिप्पण्या:

  1. फारचं सुंदर लिखाण करतेस तु....!
    तुला शब्दरचणेची उत्तम जाण आहे असं जाणवतं..!

    लिखाण तुझे सतत वाचत राहूसं वाटतं...
    शब्द रचणेत तुझ्या हरवून जावसं वाटतं...!

    उत्तर द्याहटवा
  2. फारचं सुंदर लिखाण करतेस तु....!
    तुला शब्दरचणेची उत्तम जाण आहे असं जाणवतं..!

    लिखाण तुझे सतत वाचत राहूसं वाटतं...
    शब्द रचणेत तुझ्या हरवून जावसं वाटतं...!

    उत्तर द्याहटवा