बाबूमुशाय...! - Sufi

बाबूमुशाय...!

एक गोष्ट सांगते,
एक 'ख़ुशी' आणि एक 'खामोश आयुष्य' असतं. एक दिवस या खामोश आयुष्यात ख़ुशी येते.
आयुष्य हैराण होतं. कारण या खामोशीमुळे कधीच त्याच्याजवळ कुणीही आलेलं नसतं, ना येणार असल्याच्या पूर्वखुणा असतात पण, ख़ुशी येते...
प्रचंड ख़ुशी येते. आयुष्य खुश राहायला लागतं. आयुष्याला माहीत असतं, खूप कमी वेळ 'ख़ुशी' माझी आहे, तरीहि आयुष्य खुशीच्या अधीन होत जात. ॲडिक्शन वाढत जातं.... 
ख़ुशी एका मिनीटाला खूपशा आत्म्यांना जिवंत करते ताकद देते, त्यांच्या कित्येक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या ओठांना खरं हसायला शिकवते... 
पण तो क्षण येतोच, ख़ुशीची वेळ संपते... तिला जायचं नसतं , मृत्यूने कवटाळलेलं असतं आणि तिच्या थांबण्यासाठी प्रार्थना करणारे हातही तिला सोडत नसतात.
'काहीतरी जादू होईल' या आशेवर आयुष्य खुशीच्या लंबी उम्रची दुवा मागतो पण आयुष्याने उशीर केलेला असतो, ख़ुशी मरते.
आणि मग मागून आवाज येतो
"बाबूमुशाय ज़िंदगी और मौत उपर वाले के हाथ है ... उसे ना तो आप बदल सकते है ना मैं ... "

अशा धाटणीतला हा 'आनंद' चित्रपट ...

आताच्या माध्यमांतून डायलॉग्जमध्ये सर्रास 'बाबूमोशाय' हे विशेषण वापरलं जातं. पण त्या बेंगॉली शब्दाचा खरा प्रवास आणि ट्रेंड 'आनंद'ने सुरु केला. विविध संस्कृतीचा गोडवा पोहोचवून, एकमेकांच्या संस्कृतीबद्दल आवड निर्माण करण्याची ताकद चित्रपटांमध्ये असते खरी.!
जुने चित्रपट बघताना संयम खूप असावा लागतो कारण त्यांची कथा आताच्या कथानकांसारखी (म्हणजेच आधी घटना, मग फ्लॅशबॅक आणि शेवटी ट्विस्ट) या  तीन टप्प्यात न सांगता, ती तशी हळूहळू उलगडत आणि रंगत जाणारी असते. त्यामुळे त्यासाठी 'दिग्दर्शकाच्या' कामावर विश्वास असणं फार महत्वाचं ठरतं, आपला संयम सत्कारणी लागतो.
'आनंद' हा तसा एका ओळीतील चित्रपट. थोडक्यात, चित्रपटातल्या नायकाला  'आपण मरणार असं कळतं' तेव्हा तो हे गांभीर्याने हाताळणारं आयुष्य कशा प्रकारे जगू लागतो त्याची हि कथा.
अगदी सरळ, साधा आणि अस्खलित खुश चित्रपट. ना कुठला भडक इफेक्ट, ना एक्सटेर्नल व्हीएफएक्सचा अति वापर, नाही कुठल्या पात्रांचा बळजबरीचा अभिनय. चित्रपटाचे संगीत, याबद्दल वेगळे काय सांगू चित्रपट हा १९७०चा तरीही, आजच्या तरुणाईत 'कहीं दूर जब दिन ढल जाए साँझ की दुल्हन बदन चुराए' हे गीत माहिती नसणारे अपवादच. आणि एवढ्यावर हे गाणं थांबत नाही त्याचे अनेकानेक रूपं बनत आधुनिकतेत मॅशअप बनत जातात त्यामुळे त्या गाण्याचे बोल, संगीत आणि ती धून आजही कातरवेळेत आयुष्य सुकर करण्यासाठी गुणगुणणारे असंख्य आहेत. हे त्या चित्रपटाचे यश ! 
आकर्षक गोष्ट म्हणजे अत्यंत साधं चित्रण आणि इफेक्ट्सपेक्षा चित्रपटाच्या कथेवर केलेला फोकस. त्यात पर्वणी म्हणजे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या एकत्र अभिनयाची जुगलबंदी आणि गुलजार यांच्या लेखणीची भर.
खरेतर वेगळी अशी नाही पण, खूप विचारपूर्वक आणि लोकांना सामावून घेईल अशा ठेवणीतली संहिता (स्क्रिप्ट). 'गुलजार' हे अनेकांना त्यांच्या शायरीच्या किस्स्यांकरिता प्रसिद्ध वाटणारे व्यक्तिमत्व आहे, पण या चित्रपटातील त्यांचे लेखन हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक भावनेला न्याय देणारे ठरते.
चित्रपट संहितेत थोडासा बदल आणि वेगळेपण म्हणजे चित्रपटाशी जोडलं जावं म्हणून वापरलेल्या मराठी, बेंगाली आणि हिंदी या भाषेचा टच. आणि हे सगळं लेखन तेव्हा यशस्वी ठरतं जेव्हा चित्रपटासाठी अचूक पात्र पारखली जातात. आणि त्यामुळे चित्रपटातील प्रमुख आकर्षण म्हणजे डायलॉग डिलिव्हरी, ती इतकी सुरेख कि इतके दिवस शुंभ असणारा मनुष्यही शेवटात 'आनंद'च्या मृत्यूवेळी विरघळेल.
आणि हे सगळं निरीक्षण करीत करीत आपण येतो, चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात ... हा टप्पा इतका काळजातला वाटतो कि तो असा समीक्षणातून सांगण्यापेक्षा अनुभवावा इतका जिवंत आहे, इतका वैयक्तिक दुःख हलकं करणारा आहे.
आणि याच शेवटच्या टप्प्यात दिग्दर्शकाची खरी परीक्षा असते, कारण चित्रपटाच्या शेवटात एवढी ताकद आणावी लागते कि, चित्रपटगृहाच्या बाहेर पडल्यावरही तुम्हाला प्रेक्षकांच्या मनात, चर्चेत जिवंत ठेवायचं असतं.  त्यासाठी त्या कथेचा क्रम आणि ठेवण तशी जुळवून आणायला हवी. ते या चित्रपटास काठोकाठ लागू होते.  दिवा लावायला जावा नि लाईट यावी, इतका परफेक्ट टाईमिंग/ इतका तंतोतंत शेवट दिग्दर्शक मुखर्जींनी या चित्रफितीतून गुंफला आहे.
चित्रपट डोळ्यासमोरून असा निघून जाताना दिसतो, फक्त तीन तासांची चित्रफीत असते ती. पण आपल्या आनंदाचा आणि विचारांचा 'किस्सा' बनून जाते आणि पडदा पडायच्या आतच आपण 'आनंद' व्हायला लागतो. आणि आपण स्वतःला जाणीव करून द्यायला लागतो कि, "बाबूमुशाय, ज़िंदगी बड़ी होनी चाहिए ... लंबी नहीं" 

बाकी काही नाही, चित्रपट पाहिल्यावर स्वतःच्या आयुष्याचं डोक्यावर असलेलं ओझं किंचितसं हलकं होऊ लागतं.

#Must_watch
#Best_composition_of_Indian_cinema



२ टिप्पण्या: