कलेला वय कळत नसतं, तिच्यासाठी समर्पण महत्वाचं.! - Sufi

कलेला वय कळत नसतं, तिच्यासाठी समर्पण महत्वाचं.!


ज जेव्हा 'जावळी' बघायला जाऊयाच.' म्हणत मित्राने आग्रह केला तेव्हा "जावळी म्हणजे नेमकं काय असतं.? हे मला ठाऊक नव्हतं, ना वेळच्या अभावी जाणून घेण्याचं कुतूहल चावळलं."
पण वेगळ्या कार्यक्रमाला जाणार म्हणून मी वेगळ्याच उत्साहात होते.
"साहित्य, कलाक्षेत्रातील कुठलाच कार्यक्रम आपल्याला काहीच देणार नाही, असं होणार नसतं, त्यामुळे अपेक्षेची निराशा इथे होत नसते, यात मला आनंद असतो."
म्हणून 'जावळी'ला जाणं स्वीकारलं आणि त्यानुसार ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. ठराविक वेळ दवडता काही वेळातच समोर स्टेजवर या प्रयोगाचे प्रस्तुतकर्ते समोर येऊन 'जावळी'चा परिचय सांगू लागले.  मुळात त्यांच्या कंपनीने या नवख्या प्रयोगाचे आव्हान स्वीकारले ही कौतुकाची बाब, त्यापलीकडे जाऊन त्यांनी जी 'जावळी'ची ओळख करून दिली, त्यातून 'यशोदा'ला बघण्याचं आणि हे नेमकं आहे तरी काय? हे कुतूहल मनाच्या गडबडीत खूप उफाळून आलं.
जावळीचा थोडक्यात परिचय त्यांनी दिला तो असा;
देवदासी स्त्रियांनी सुरु केलेली हि नृत्यापरंपरा... जावळी...
जावळी म्हणजे केरळ किंबहुना दक्षिण भारतात उगम पावलेल्या शास्त्रीय संगीत आणि नृत्यातील नायक-नायिकांवर आधारित पारंपरिक नृत्यांपैकी एक. तेथील प्रादेशिक भाषेतून त्या काळातील संस्कृती, समाज, प्रेम आणि शृंगार रसाची भावना अर्पण करणारी ही रचना. मुरुगा किंवा कृष्णासारख्या देवतांना आणि कधीकधी संरक्षणासाठीदेखील हे नृत्य समर्पित केले जात असे. देवदासींनी सुरु केलेली हि नृत्यपरंपरा म्हणजे नृत्यांचा पाया होती. परंतु कालांतराने ब्रिटिशांनी  देवदासींना 'वेश्यांचा' दर्जा दिल्यामुळे ही कलाही लोकांनी तुच्छ समजण्यास सुरुवात केली. त्यामुळे 'या अशा नृत्यप्रकाराला मी येणं, का त्याचा आस्वाद घेणं हे मला आता आवडू लागलं.'
आता मनात अनेक प्रश्न उभे राहिले, म्हणजे प्रत्यक्षात जावळी म्हणजे तमाशासारखं काही असणार का? मग हा प्रकार तिथल्या लोकांचा आपल्याला काय उमजणार तो,? मग यात शास्त्रीय नृत्यप्रकाराचा टच असेल का ? असे अनेक प्रश्न समोर आले.
आणि त्यातच समोर 'यशोदा' आली.
स्टेजवरच्या त्या एका लाईटीच्या प्रकाशात तिचा शृंगार आणि त्यात नटलेली ती सुंदर फ्रेमिंग होती. तिच्या शरीरयष्टीत 'मला इथे बसलेल्या प्रत्येकाला जावळी समजवायची आहे, त्यांच्यापर्यत पोहोचवायची आहे.' हे ठासून दिसत होतं.

जावळी बघताना, या नृत्यप्रकारात एक सामर्थ्य जाणवते कि,  'एक भावना त्या मनाच्या डोहातील प्रत्येक काठाने अनुभवावी आणि ती कशी व्यक्त करावी, ती व्यक्त करण्याची ताकद जावळीत आहे.  त्याचबरोबर, डोळ्यांतील हालचाली, त्यातली चुळबुळ आणि सगळ्याच ठिकाणी प्रियकराला बघण्याची कंठी आलेली आस....' या प्रेमयातना, प्रेमकंठी भावना हे सगळं अगदीच तंतोतंत त्या नजरेच्या बाहुल्यांतून प्रेक्षकांसमोर सादर करून त्यांनाही स्वप्रेमाच्या भावनेत सामावून घेणं हे मुख्य असतं. किती सुंदर संकल्पना आहे कि, माझ्या प्रेमाचा इजहार, माझं प्रेम मी उघडउघडपणे आलेल्या प्रत्येकाला सांगून ते साजरं करू शकते. जावळी ही मुळातच कमी लोकांसाठी सादर केली जात असे. आजही ५०-६० (त्या मानाने बरेच प्रेक्षक) लोकांच्या प्रतिसादात जावळी सादर झाली. त्यामुळे याला 'मेजवानी' असेही संबोधतात. मेजवानी या शब्दाचा उगम हा 'मेजवाण' या शब्दापासून झाला. मेजवान म्हणजे यजमान (किंवा त्या काळातील जमीनदार). या नृत्यप्रकारात जमीनदार घरी जेवणासाठी आलेल्या पाहुण्यांना देवदासी स्त्रियांकडून 'जावळी'ची मेजवानी देत असे.   
हा नृत्याचा प्रकार असला तरी या नृत्यप्रकारातून नृत्यांगना बहुअंशी अभिनयाला जोडली जाते.
यात मुख्यत्वे जावळी, पदम आणि वर्णम असे प्रकार असतात.
हे सगळं वर्णन आणि माहिती केवळ एका कुचिपुडी आणि देवदासी नृत्यांगना 'यशोदा राव ठाकूर' हिला बघून सुचत जाते.
कारण मुळात हा नृत्यप्रकार इतका कमी आणि काळाच्या गतीत दुर्मिळ होत गेल्यामुळे हे नृत्य युट्युबसारख्या ठिकाणी दुर्मिळ एखाददोन चित्रफितींतून रंगवलेलं त्यामुळे 'जावळीसारखे' प्रयोग बघणे डोळ्याला, डोक्याला आणि मनाला एक चवदार खुराक असतो.
सादर नृत्यकलेतील जावळीची थीम प्रामुख्याने 'श्रृंगारावर आणि प्रेमावर' आधारित होती. त्यामुळे माझ्या मनाला अजूनच ताजेतवाने करण्याची क्षमता मला त्यात जाणवत होती.
मला समजलेल्या या नृत्यात यशोदा ठाकोर यांनी प्रेमातील अनेक अवस्थांचे प्रत्येक वेगळ्या लकबीने सादरीकरण केले आहे.
त्यातील स्वीय-  या पहिल्या प्रकारात यशोदा तिच्या हातवारे आणि नजरेतून सांगते कि, एक विवाहित स्त्री आहे, जिच्याकरिता तिचा चंद्रही आणि तिचं आकाशही तिचा पतीच आहे. तिचा स्वर्ग तोच आहे. ती पूर्णपणे त्याला कमिटेड आहे.  - अशी स्त्री जी पतीशिवाय कुणाचाच विचार करत नाही... कारण तिची धारणा आहे कि, "तू एकटा आहेस, जो मला या जगातील सगळं देणारं आहेस..." अशा भावनेने नटलेली आणि त्याची आतुरतेने वाट पाहणारी ती स्त्री आहे.
परकीय या दुसऱ्या प्रकारात ती सांगते, हि स्त्री एक विवाहित स्त्री आहे, परंतु तिचे परपुरुषाबरोबर भावनिक संबंध आहेत. याचे वर्णन हातांच्या मुद्रांनी वर्णाताना ती सांगते कि काल हि स्त्री त्या परपुरुषाला भेटण्यास जात नाही. तेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा परपुरुष तिला विचारतो कि, "काल तू मला भेटली का नाहीस? "
त्यावेळी ती म्हणते, "काल मला माझ्या लग्नाच्या पतीच्या डोळ्यात प्रेम दिसले. मग थांबले"
काहीसा असुरक्षित होत तो विचारतो " मग आज का आलीस?"
ती म्हणते, "आज त्याच मनाने आणि डोळ्यांनी तहानलेपणाने तुला एकदा बघण्याची इच्छा व्यक्त केली. मग आले"

आणि सामान्य या तिसऱ्या प्रकारात यशोदा सांगते, "एक स्त्री आहे. जी विवाहितही नाही आणि तिला प्रियकरहि नाही. ती मादक आहे, तिच्या शरीराकडे पाहून कामुक अवस्था उचंबळून येते. तिला तिच्या शरीर संपत्तीचा आणि शृंगाराचा गर्व आहे आणि त्यामुळे ती त्याच थाटात तिच्या कट्ट्यावर बसलेली असते. तिच्या त्या एका ग्राहकाची वाट पाहत. कारण ती वेश्या असते. तिचा आवडता ग्राहक आलेला नसल्यामुळे तिच्याजवळ आलेल्या दुसऱ्या ग्राहकाशी ती जो संवाद साधते तो मजेशीर आणि 'ग्राहकांतही आवडता ग्राहक असणं' हे नवखेपण देणारा आहे. ती सेक्स वर्कर....तिला तिच्या सौंदर्याचा मोरपिशी अहंकार आहे. ती तिच्या कोठीवर आलेल्या पुरुषाला म्हणते की, "तू स्वतःला माझ्या लायक समजतोस?..." यावर त्यांच्यात वाद होऊन ती त्याला काढून देते आणि तिच्या त्या एका ग्राहकाच्या प्रतीक्षेत तळमळत राहते.

चौथ्या प्रकारात यशोदा समाजवते, एक अविवाहित मुलगी आहे जिला तिच्या प्रियकराने फसवले आहे. आणि त्यामुळे ती मुलगी तिच्या प्रियकराला या नृत्यातून प्रश्न करते की,  'का?'
केवळ 'का?' या प्रश्नाचे स्वरूप ती या नृत्याचा आधार घेऊन व्यक्त करते.
तोयाचक्षी म्हणजेच पाचव्या प्रकारात ती सांगते कि, १६ वर्षाची मुलगी प्रेमात पडते. तिला प्रेम या भावनेची ओळख नसते. ती तिचं प्रेम उघडेपणाने व्यक्त करते आणि या न कळत्या वयात ती तिच्या मैत्रिणीला तिच्या प्रियकराला बोलावून आणायला सांगते.
ती म्हणते, " माझी नजर शांत होणार नाही तो समोर आल्याशिवाय... त्यामुळे तू जा आणि त्याला घेऊनच ये!"
( नृत्यांगना यशोदा ४६ वर्षाच्या आणि त्यांनी साकारलेली मुलगी हि १६ वर्षाची. त्या मुलीच्या भावना, तिचं प्रेम आणि तिचा भोळेपणा हे त्यांनी डोळ्यांनी आणि पायांतील त्या झपझप पडणाऱ्या हालचालींनी आणि पैंजनाने व्यक्त करताना समजते,
"कलेला वय कळत नसतं, तिच्यासाठी समर्पण महत्वाचं.! "

सहाव्या प्रकारात म्हणजेच जावळीच्या शेवटी गप्तुवर्स येते... यात नृत्याची रचना म्हणजेच कोरियोग्राफी ठरवलेली नसते. मनात चाललेला कल्लोळ प्रेक्षकांसमोर नृत्यकलेतून मुक्तपणे सादर करणे हा त्यातला शेवटचा प्रकार. यात लाऊड संगीत असते. ज्यात तळमळ असते. अति दुःख असते, अति प्रेम असतं,  किंवा अति हुरहुरही असते. हा प्रकार प्रामुख्याने भावना अनावर झाल्यावर त्या व्यक्त करण्यासाठी केला जातो. या प्रकारात यशोदाने तरुणवयीन मुलीची भूमिका साकारून नृत्य केले आहे, ती यातून सांगते कि, त्या रात्री त्या मुलीत आणि तिच्या प्रियकरात प्रणयक्रीडेचे काही क्षण रंगले होते. त्यात त्याने तिचे चुंबन घेऊन तिला स्पर्श केला आहे आणि तो निघून जो निघून गेला आहे तो परतलाच नाही पुन्हा... त्याची वाट बघत ती बेचैन आणि रुखरुखीत झाल्यामुळे ती पुन्हा तिच्या सखीला घडलेला प्रकार सांगते आणि त्याला बोलवायला पाठवते आहे.
असे हे जावळीचे अनेक प्रकार सादर करताना यशोदा ठाकोर कमालीच्या भिन्न व्यक्ती भासत होत्या. कारण प्रत्येक अवस्थेतील परिस्थिती हि वेगळी असल्यामुळे ते सादर करणे तेवढेच जिकिरीचे कार्य होते. परंतु त्यांचे स्वतःच्या आवडीसाठी आणि कलेसाठी असलेले समर्पण हि एवढीच गोष्ट त्यांना कळली होती. आणि ती अंगातील प्रत्येक नसेल भिनवून त्यांनी हे सादरीकरण केले होते आणि सभागृहातील प्रत्येकाला स्वतःकडे खेचून घेऊन थांबण्यास भाग पडले होते.

या सादरीकरणावरून जाणवते कि, जावळी गातांना संगीतकार लयीचे आणि वळणाचे स्वातंत्र्य अंगीकारून हि रचना करतात आणि नृत्यांगना या गीतातील शब्दांना अंतर्मनात घेऊन त्यांच्याशी आपापल्या भावनेशी एकरूप होऊन खेळतात.
यातील संगीत लाऊड म्हणजेच वरच्या पट्टीतील असते, त्यात प्रामुख्याने 'वायोलिन, मृदुंगा आणि नटुवङ्म('टाळ' सारखे एक वाद्य) या वाद्यांचा वापर केला जातो. हे संगीत आकर्षक असते त्यामुळेच यावर सादर होणारी नृत्य हि हलक्या शैलीची म्हणजेच नाजूक हातवार्यांचा वापर करून केली जातात. त्यामध्ये संगीताची भाषा हि स्थानिक लोकांची बोलीभाषा आणि वर्णन कामुक रचनेने केले जाते.

जावळीची खासियत ही असते कि, त्यात असंख्य मुद्रा असतात. पण या कलेचे वेगळेपण असे कि यातील अनेक मुद्रा ह्या नैसर्गिकरित्या त्या नृत्यांगनेच्या अंतर्मनातून येतात. उदाहरणार्थ नर्तिकेला लाजणं किंवा शृंगार करणं हे शिकावं लागत नाही...  
यशोदाने वर्णिलेली, समजवलेली आणि मला वैयक्तिकपणे आवडलेली तिची अदा म्हणजे, " नृत्यातून कामुक किंवा मादकपणा दाखवताना स्त्रियांनी लाऊड होऊन छाती बाहेर काढून त्या पद्धतीचे एक्स्प्रेशन दाखवण्यापेक्षा नजरेतून आणि शरीराच्या चालीतून लयीतून आतल्या आत मुद्रा करून तो मादकपणा दाखवावा. कारण प्रणयक्रीडा हा चारचौघांपेक्षा त्या दोघांतील संवाद आहे त्यामुळे त्याचे सादरीकरण उघड्यावर पण खाजगीत करावं कारण एखाद्या नृत्याचे सादरीकरण करताना कधीच आपण त्याचा एक भाग सादर नसतो, आपण ती परंपरा पुढे नेत असतो... त्यामुळे ती कला जबाबदारीने सादर करणं हि कलाकाराची जबाबदारी असते. " 
             आजच्या जावळीने माझ्या छंदाच्या, ज्ञानाच्या आणि प्रेमाच्या कक्षा अधिक वृंदावल्या. जावळी जितकी आवडली तितकीच समजली आणि आपलीशी वाटली. काय बघावं आणि काय स्वीकारावं यासाठी सगळंच पाहावं आणि सगळ्याच कलांचा आस्वाद घ्यावा. त्यानंतर आवडीनिवडीचा प्रश्न ठेवावा कारण आपल्या रोजच्या अनुभवण्यावर आपल्या विचारांची श्रीमंती वाढत जाते. त्यामुळे रोज काहीतरी नवं घ्यावं मनाच्या समाधानासाठी, जावळी त्यातलीच!

(जावळीची भाषा, उच्चार आणि अर्थ आणि या प्रकाराची आज समजली ती माहिती सोडून मला अतिरिक्त माहिती नसल्यामुळे या लिखाणात काही अंशी चुका असू शकतात. जाणकारांनी क्षमा करून त्या चुका दुरुस्त कराव्या, हि विनंती.)

1 टिप्पणी: