Sufi: Mrs. Mukhyamantri
Mrs. Mukhyamantri लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Mrs. Mukhyamantri लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

-मिसेस मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर नापसंती


मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सांडगे वाळत घालणारी बाई पहिली का हो. !
विनोदच आहे हा.
महाराष्ट्रभर गाजलेली आज्या आणि शितलीची बॉर्डर वरची लव्ह स्टोरी संपून त्याजागी एक अशी मालिका आली ज्यावर सोशल मीडियावर बऱ्याच स्त्रियांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया देऊन पोस्ट लिहिल्या. मिसेस मुख्यमंत्री नावाने.
त्या पोस्टींवर कमेंट्सच्या माध्यमातून पुुुुरुषांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न ही केला.
मग मला प्रश्न पडला, आक्षेपार्ह असण्यासांरखं त्यात आहे काय ?
तेव्हा ट्रेलरवरून अंदाज आला.  ही मालिका काल्पनिक पात्र आणि घटनेवर आधारित आहे.  म्हणूनच त्यात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याची बावळट बायको हे समीकरण दाखवले आहे.
जर समजा तुम्हाला कोणी सांगितले. की मुख्यमंत्र्याची बायको ही गाडीवर वडे / सांडगे वाळत घालते तर? किंवा मग मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक चालू असताना बिनडोक सारखी दारातून डोकावून त्यांना आवाज देते, मुख्यमंत्री ऐकत नाही तेव्हा ती खट्याळ पणे म्हणते की, "अहो आज कुणी गडी माणूस नाही तेवढे दळण आणून देता का ?"
मग तिसऱ्या प्रोमोत हे दिसते की मुख्यमंत्री, इतर नेते आणि बायको कुठेतरी जात असते पण मध्येच म्हशी आड येतात तेव्हा बायको गाडीतून उतरते आणि म्हशींना त्यांच्या स्टाईलमध्ये हकलते.
हे हास्यास्पदच नाहीं का?
तरी सोशल मीडियावर स्त्री वादी स्त्रिया यावर बोलता, चिडता आणि भांडताय.
याचं कारण काय असेल ? म्हणजे स्त्रियांना हा विनोद आवडत नाही आणि पुरुषांना तो पटतोय. ?
मग मला वाटलं की विनोदासाठी यांच्याकडे असा बावळट नवरा का दाखवला गेला नाही?
मग प्रश्न येईल की या आधी अस झालं तेव्हा अशा स्त्रियांनी त्या लेखकाची पाठ थोपटली नाही. पण मग आज का या विनोदाच्या पद्धतीला गांभीर्याने घेतलं जात आहे?
तेव्हा मला आठवतात, ते नवरा बायकोचे मेसेजेस. जे प्रत्येक सोशल मीडियावर फिरत असतात. असे वाटते त्याचा आस्वाद घेण्याची सवय लग्न झाल्यानंतर प्रत्येक पुरुष स्वतःला लावतोच. याचाच पुढचा परिणाम म्हणजे आता तर स्त्रियाही हे स्वीकारून त्यावर हसतात. चला हवा येऊ द्या सारख्या प्रचंड लोकप्रिय शोज मधून याचे भागच्या भाग प्रसारित केले जातात.
यावर मन नाही भरत तर मी बघते माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका. तर तुम्ही म्हणाल बायकोला बिझनेस वुमेन दाखवायची तर त्याचा ग्राफ खालून वर असावाच. त्यासाठी बायकोने आधी बावळट असायलाच हवं. याचेच उदाहरण 'पुढचे पाऊल ' सीरियल. त्यामधील बायको धूळ पडलेला लॅपटॉप पाण्यात भिजवून वाळत घालते.
विनोद बुद्धीची वाहवा नाही करावी वाटत. वाटते,
आजही मराठी चित्रपटांना जसे चांगले दिवस येत आहे तसे मालिकांना केव्हा येणार?
मालिकांचे भाग लिहिताना कोणती मानसिकता डोक्यात असेल लेखकाच्या? या बायकोच्या अशिक्षित अडाणीपणाचा बोभाटा, त्यातून प्रेक्षकांकडून वाहवा, तिची भावनिक बाजू, नवऱ्याचा पुरुषीपणा याशिवाय   सिरियल बनणार कशा? आणि बनल्या तरी प्रेक्षक त्या स्वीकारतील? तर अशावेळी आठवण होते ,"एका लग्नाची दुसरी गोष्ट, दिल दोस्ती दुनियादारी सारख्या खुमासदार शैलीत उचलून धरलेल्या मालिकांची.
आज झी मराठी सारख्या ताकदीच्या वाहिनीवर यासारखी कृती दाखवली जाते. पुरुषांचे म्हणणे आहे की, इतक्यात या सीरियलचा प्रोमो बघून मत प्रदर्शन नको, कारण यात पुढे ट्विस्ट असतील. काय ट्विस्ट? कोणती वळणे? जास्तीत जास्त काय होईल ? एक बावळट गृहिणी बायको मुख्यमंत्री होऊन घरासह राज्य सांभाळेल. अशा स्क्रिप्ट लिहून काय होतं माहिती?
पहिले तर या अशा मालिका बघणारा वर्ग गृहिणी आणि जास्तीत जास्त कंटाळलेल्या पुरुषांचा असतो. त्यामुळे लेखक विचार करतो, या प्रेक्षक वर्गाच्या आवडीनुसार आणि अपेक्षेनुसार मालिका बनवू. म्हणजे माझी लेखणीही गाजेल आणि प्रेक्षकही खुश. पण असे प्रयोग खूप कमी होतात जिथे लेखक आपल्या लेखणीतून अनपेक्षित कलाकृती बनवतो. ज्यातून जास्त काही नाही पण आपण जे लिहिलं त्यातून मानसिकतेत बदल होतो.

मला माहिती आहे आपला समाज ना कीर्तनाने सुधारला ना तमाशाने बिघडला. पण मला हे चूक वाटतं, कारण गृहिणीच्या वागण्यात मालिकांमुळे नकळत एक बदल घडत असतो कारण मालिकांचे आयुष्य हे जास्त असते.  त्यामुळे बघणाऱ्यांच्या कानावर, डोळ्यावर, मनावर हे नकळत परिणाम करत असते. आणि एखादी गोष्ट सतत कानावर पडत राहिली की आपणही ती तशीच आहे असे मानून चालतो. त्यामुळे आपला समाज हा बदलत्या मानसिकतेचे नाटक करतो. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने विडंबन करून स्त्रियांचं सामर्थ्य पचनी पाडण्याचा लेखकाचा प्रयत्न प्रामाणिक का असेल पण या सगळ्याची गरज नाही वाटत.
कारण देश इतकी शतके पुढे गेला तरीही आजही बाष्कळ आणि बावचाळलेली विनोद बुद्धी बदललेली दिसत नाही. आपली पायामुळे आणि संस्कृती लोक सोडत नाही, सोडणार नाहीत. त्यामुळे हे असे केविलवाणे प्रयत्न एखाद्याच्या दुर्बुद्धी ला आवडणारे असतील पण त्याचे नकारात्मक परिणाम होत असतात.
विनोद बुध्दीचे प्रकार नसतात. तीही लिंग भेदात विभागलेली असते. हे माझं विधान काहीसं स्त्रीवादी असेलही पण मला चुकीचं वाटत नाही. कारण माझ्यासमोर दोन उदाहरणे उभी राहतात, एक काल संसदेत रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वापरलेली विनोद पद्धती आणि तीच विनोद बुद्धी  स्त्रियांवर विनोद करायचे म्हटले की तिचा कमीपणा लक्ष्यकेंद्री करून किंवा जास्तीत जास्त तिच्या शरिरपर्यंत मर्यादीत असते.

त्यामुळे स्त्रीवादी न होता हा केविलवाणा प्रयत्न नाकारण्याचे धाडस करेल. पण या मालिकेच्या पूर्व जाहिरतीवरून लेखक काहीतरी शिकेल, अशी अपेक्षा .

विनोदबुद्धी की मागासलेपणाचे प्रतिबिंब

by on जून २३, २०१९
-मिसेस मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर नापसंती मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सांडगे वाळत घालणारी बाई पहिली का हो. ! विनोदच आहे हा. मह...