जगभर 'अशीच' मासिक पाळी ! - Sufi

जगभर 'अशीच' मासिक पाळी !


भारतातील मासिक पाळीचे एकंदरीत स्वरूप समजल्यानंतर हीच परिस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी असेल, या विषयाचा टॅबू, व्याप्ती आणि दृष्टिकोन कसा असेल हे समजून घेणे औत्सुक्याचे होते. पुढारलेले देश म्हणजे पुढारलेली मुक्त मानसिकता का? हे प्रश्नचिन्ह डोक्यात होतं. तोच याचा अभ्यास सुरू केला...
जगात आणि आश्चर्य वाटेल पण भारतातही काही चांगल्या प्रथा आहेत, ज्यात मुलींची पहिली मासिक पाळी साजरी केली जाते. या शोधानंतर काही देशांतील मासिक पाळी संबंधित प्रथांबाबत समजले ते खालीलप्रमाणे;

१. दक्षिण भारत : 
आपल्या भारत देशात भलेही पाळी विषयी अनेक गैरसमज आणि मान्यता असल्या तरी देखील, दक्षिण भारतात ह्यासंबंधी एक चांगली परंपरा बघायला मिळते. ज्यानुसार जेव्हा मुलीला पहिली पाळी येते तेव्हा तिची पूजा केली जाते.

२. फिलिपिन्स : 
फिलिपिन्समध्ये जेव्हा कुठल्या मुलीला पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिची आई तिची पाळीची पॅण्टी स्वतः धुते आणि त्यानंतर त्या पॅण्टीला मुलीच्या चेहऱ्यावर लावल्या जाते. ह्यामागे त्यांची अशी मान्यता आहे की, ह्यामुळे मुलीच्या चेहऱ्यावर मुरूम येत नाही. तसेच मुलीला तीन पायऱ्यांवरून उडी देखील मारावी लागते. ह्याचा अर्थ असा की तिला तीन दिवसांची पाळी राहील.
३. आईसलंड :
आईसलंड येथे मुलीला तिच्या पहिल्या पाळीवेळी रेड केक खायला मिळतो. हा केक लाल आणि पांढरा असतो, जो तिची आई बनवते.

४. जपान : 
जपान येथे मुलीच्या पहिल्या पाळीवेळी तिची आई ‘Sekihan’ नावाचा एक पारंपारिक पदार्थ बनवते. ह्या पदार्थात तांदूळ आणि बिन्स असतात. ह्यावेळी संपूर्ण कुटुंब ह्या पदार्थाचा आस्वाद घेतात आणि मुलीची पहिली पाळी साजरी करतात.

५. ब्राझील :
ब्राजीलमध्ये तर ही एक ब्रेकिंग न्यूज असते. नातेवाईकांमध्ये ह्याची घोषणा केली जाते आणि ही बातमी साजरी केली जाते.

६. इटली :
इटली येथे पहिल्या पाळी नंतर मुलीला ‘Signorina’ (miss/young lady) असे म्हणून संबोधले जाते. येथे देखील सर्वांना ही बातमी सांगितली जाते. एवढच नाही तर लोकं मुलीचे अभिनंदन करण्यासाठी देखील येतात.

७. दक्षिण अफ्रीका :
दक्षिण आफ्रिका येथे मुलीला तिच्या पहिल्या पाळी वेळी एक ग्रँड पार्टी दिली जाते. त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या जातात. पण पाळी दरम्यान त्यांना तीन दिवस घरातून बाहेर जाण्यास मनाई असते तसेच त्यांना पुरुष आणि लहान मुलांपासून देखील दूर राहण्यास सांगितले जाते.


८. इस्त्राइल : 
इस्त्राइल येथे मुलीला पहिल्या पाळीच्या वेळी मध खाऊ घातला जातो. ह्यामागे अशी मान्यता आहे की ह्यामुळे तिला तिच्या पुढील मासिक पाळीत त्रास होणार नाही.


९. कॅनडा : 
कॅनडा येथे मुलींच्या पहिल्या पाळी संबंधी एक विचित्र प्रथा आहे. येथे पहिली पाळी आल्यावर ती मुलगी एक वर्षांपर्यंत बेरी खाऊ शकत नाही. एक वर्षानंतर तिला जेवढ्या वाटेल तेवढ्या बेरी ती खाऊ शकते.

१०. तुर्की : 
तुर्की येथे देखील पहिल्या पाळी संबंधी एक विचित्र प्रथा पाळली जाते. येथे मुलीला पहिली पाळी आल्यावर तिच्या कानशिलात लगावली जाते.

११ आसाम: 
आसामच्या कामाख्या देवीचं मंदिर एक शक्तिपीठ म्हणून पाहिलं जातं. हे मंदिर गुवाहाटी इथे आहे. कामाख्या देवीला "Menstruation Goddess" असा दर्जा दिला आहे - म्हणजे 'मासिक पाळीची देवी'. एकीकडे शक्तिपीठ म्हणून कामाख्या देवीची पूजा केली जाते तर दुसरीकडे मासिक पाळीबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धांना वाव दिला जातो.

१२. नेपाळ :
नेपाळच्या खासकरून पश्चिम भागामध्ये आजही मासिक पाळीच्या चार दिवसांत स्त्रियांना घराबाहेर, गावाबाहेर एका छोटय़ा खोलीत, ज्याला ‘छोपाडी’ म्हणतात, तिथे जाऊन राहावे लागते. काही जणींना गोठय़ात त्यांचे ‘ते चार’ दिवस काढावे लागतात, तर काही जणी त्यांच्या घराच्या खालच्या अंधाऱ्या जागेत चार दिवस राहतात, असं सांगितलं जातं.

मासिक पाळी या गोष्टीकडे आपण कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलंच नाही. भारतातच नव्हे तर जगातील अशा बऱ्याच देशांमध्ये मासिक पाळीबद्दल आजही निष्ठुर, निर्दयी अंधश्रद्धा पाळल्या जातात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा