Sufi: office romance
office romance लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
office romance लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


पाऊस नेहमीसारखा बरसत होता.
वातावरण काहीसं असं होतं... नोकरीच्या निर्जीव भिंती, मनाला लागलेलं बंधन, समोर कॉम्प्युटरची निगरगट्ट भिंत, शेजारी पाण्याची बॉटल अन् माझ्या डोळ्यात खिडकीच्या काचेला चिकटलेले ते थेंब... हळूच आत शिरलेली रोमँटिक हवा, झाडांच्या पानांवर धोधोधोधोधो बरसणारा तो...
याला काय अर्थये.?
त्याने मनसोक्त स्वतःच्या असण्याचा आनंद घ्यायचा आणि आम्ही ते बाटलीच्या आत बंद झालेलं पाणी तोंडात टाकून मुक्त उडण्याची सगळीच तहान भागवायची.?
नैराश्यात ते ऑफिसाच रटाळ काम करत मी ना उम्मीद बसले होते.  तोच ऑफिसात उमीद येते. ऑफिसात उमेद आहे,  आशा आहे एक विरणारी आशा.!
एक अनावधाने समोर आलेला क्षण! ज्याच्याकडे मी फक्त बघतच राहिलेले क्षणभर !
या ऑफिसच्या आझादी कोंडलेल्या माहोलात अलगद दरवाजा उघडला. एक थंड वाऱ्याचा झोका आला नि एक चमचमीत पिळदार शरीरयष्टी असलेला पुरुष केसांच्या हालचालीला दोन्ही हाताने मागे करून त्या अंगाला चिकटलेल्या टाईट सफेद शर्टाच्या बाह्या वरती सरसावत ऑफिसमध्ये शिरला... रोमँटिकपणा मी मनात दडवत त्याच्याकडे फक्त एकवार बघत मनात सगळा खेळ सुरु केला...
पांढऱ्या सदऱ्यात लपेटलेला तो ओल्या कपड्यात ओल्या मातीतलं शिल्प भासत राहिला. त्याची प्रत्येक हालचाल माझ्या मनात प्रणयक्रिडेची आशा जागवत होता. या वातावरणाला जागत हृदयाच्या आत गंटागळ्या खाणारं मन बॅकग्राऊंडला 'हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले' म्हणत म्हणत अचानक त्याच्या सोबतीला गेले. चित्रपटात जसं सलमान खान ऐश्वर्याच्या मागे पळत विदेशात जाऊन गाणं म्हणू लागतो ना अगदी तसं!
Captured: Pooja Dheringe
या मूडमध्ये एकदम हातात हात घालून मॅरेथॉनमध्ये धावावे तसे आम्ही कात्रजच्या टोकाच्या टेकडीवर पळत पळत गेलो. एकमेकांकडे बघण्याची फुरसत काढून बघणार होते मी त्याच्या शरीरावरून ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबांना पण पाऊस इतका घनदाट बरसु लागतो की मनाला बेफान होऊन त्याची बेगम होऊन भिजायचच असतं.
दोघेही अल्लड होऊन त्या टेकडीच्या रस्त्याने पाखरासांरखे बेछूट रस्ता कापू लागतो. जाताना एका पॉईंटला दोघे थकून जातो. थांबावं वाटतं, पण दूरवर एक दिवा चमकलेला दिसतो, तिथे जाईपर्यंत हाय खायची नाही म्हणून त्या टपरीवर  जायची स्पर्धाच लागते.
एका पॉईंटला तर इतकी सुंदर अत्तर शिंपडणारी बाभूळ लागते, तिचं सौंदर्य पाहून  दोघांच्या पावलांची हालचाल एकाच ठिकाणी स्तब्ध होते. तो हळूहळू पाऊल टाकत माझ्या जवळ येऊ लागतो. मी स्वतः ला त्याच्या जवळ नेत दूर जाऊ लागते.  त्या काळ्याकुट्ट बाभळीच्या काट्यांच्या खाली छपराला गळती लागावी तसे थेंब दोघांवर बरसू लागतात. दोघांची हालचाल थांबते. तो माझ्या जवळ आलेला असतो. मी आधीपासूनच त्याची झालेली असते. तो बघत राहतो. काजवेही आमच्यात सामावून गेलेले असावे, एवढी शांतता पसरते. पावसाच्या तडाख्यात मध्येच एखाद्या विजेचं येणं होतं. हिंदी चित्रपटात ती त्याच्या कवेत जाते, तसं खऱ्या आयुष्यात कुठलाच सीन होत नाही.
वीज येऊन जाते. वास्तवातील मुलगी मात्र स्वतःच्या चारित्र्यावर सफेद चादर पांघरून स्वतःलाच कोंडून घेत राहते. ती विजेला घाबरून त्याच्या मिठीत जात नाही आणि तोही शाहरुख खान होत नाही. पण हेच वास्तव धावत जातं जेव्हा वरती तो बरसत असतो,
मनात एक ना अनेक हरहुन्नरी भावना उफाळत असतात पण बाईने आधी पुरुषाच्या जवळ तरी जावं का? मनात किंतू येतो आणि पुरुषात हे क्षण सोडण्याचा संयम मात्र नसतो. तोच मी निशब्द आणि स्तब्द होते.
शेवटी त्याने मला आहे तसं जवळ घेण्याच्या अपेक्षेविरहित मीच जाते... त्या कुठला अबला नारीची पांढरी चादर दूर भिरकावून देत, त्याच्या त्या सरसावलेल्या पांढऱ्या सदऱ्याला गच्च धरत मिठीत घेऊन त्याच्या त्या वरच्या बटणाला खाडकन तोडत त्याच्या 'असण्याला' मिठीच्या आकाशात संपूर्ण घेऊन इतकं घट्ट करते की, ही रात्र या मिठीच्या आकाशात अशीच घट्ट राहावी अन् त्याचे चुंबन माझ्या कपाळाच्या क्षितिजावर दीर्घकाळ असावं ! ज्याचं कुण्या अडगळीतल्या चित्रकाराने पंचवीस वर्षानंतर जसच्या तसं काळं-निळं चित्र काढावं. लोकांनी त्या चित्रात जाऊन अनुभवावा माझ्या ऑफिसातल्या स्वप्नातल्या पांढऱ्या राजकुमाराला नि त्या शरीरयष्टीला अन् त्या रोमान्सला जसच्या तसे हुबेहूब.!  
.
पण, "रोमान्स त्याला काढता येईल?"
माझ्या या अडखळत्या स्वप्नांत मी कुठे हरवून गेले होते माझं मलाही कळलं नाही. पण त्याच्या पापण्यांचा थेंब माझ्या कपाळावर पडला तेव्हा माझी तंद्री तोडून मी त्याच्याकडे आकाशाकडे एकटक पहावे तसे पहातच राहिले. त्या नजरेत या मादक निसर्गातील अवकाशाचा स्पर्श होणं शक्य वाटलं!
त्याचा स्पर्श होऊ लागला होता. एक मादक रसायन जेव्हा स्पर्श करतो, रोमांच उभे राहतात अंगभर.
काहीच सोडावं वाटतं नाही. पण ती झोपडी आमची वाट पाहत असते.
तरीही त्याचा मादक स्पर्श माझ्या सर्वांगावर हावी होऊन गेलेला असतो. या क्षणाला समाजाचे गालबोट लावण्याआधी आम्ही दोघे एकमेकांना स्वतःच्या हबकत्या स्थितीत ठेऊन चालू लागलो.
अशावेळी स्वतःच्या श्वासांचा वावर उघड्या अंगावर होऊ लागतो. सगळ्या धमण्यांत तेवढंच काय ते जीवंत वाटत असतं.
शेवटी श्र्वासांच्या गतीत पाऊलांचा खेळ करत आम्ही झोपडी पर्यंत येतो खरे! आता मात्र समाज आजूबाजूला होता. 'मर्यादांचा बांध या मोकळ्या शेताला घातला गेला होता' या ठिकाणी मात्र आम्ही एकमेकांकडे बघून सगळ्या शारिरीक अनुभूतीच्या कल्पनांचा स्वर्ग गाठत होतो.
कल्पनेच्या दुनियेची मला खरंच मजा वाटते, हे जग जे आपलं नाही, जे जगू शकत नाही, याची किंचितही खंत मनाला भासू देत नाही.
या दुरून दिसलेल्या झोपडीत एक काजळीत सत्तरी गेलेला कंदील होता, एक सत्तरीची आजी, एक स्टोव आणि तीन पाच लोकांची गर्दी.
आम्ही दोघे पावसाने ओलेचिंब नि कुडकुडत अवघडलेल्या स्थितीत आत आलो. त्यातल्या तिन्ही मुलांनी माझ्याकडे वळून पाहिलं नि दोन मुलींनी त्याच्याकडे वळून पाहिलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.

शरीराचं आकर्षण खरंच इतकं ऍट्रॅक्टिव्ह असतं का?
इतकं सुंदर असतं की एक महोल तयार होतो, कुठल्याही अत्तराविना एकमेकांकडे बेहकले जाण्याचा माहोल. पण आम्हाला त्या माहोलचा भाग व्हायचं नव्हतं. आम्ही एकमेकांतच पुरेसे आणि तरीही खूप जास्त प्रेम करायला उरलेले असे होतो. 
आम्ही दोन चहा मागवले. आजीने तिच्या जुन्या काळातला मटका चहा दिला. चहाची चव ही खरी, त्यात त्याचं माझ्या खांद्यावर हात टाकणं, हळूहळू झोपडी बाहेरचा चंद्र दाखवत माझ्या गालाला ओढ लावणं.
मी तर क्षणात विरघळून गेले होते. इतकं सगळं गोड्ड अन् स्वप्न सुख होतं... ते इथे संपत नाहीच, आम्ही आमच्या मनात असताना टिक म्हणत टेप ऑन होतो, अंहा ss अहहाह अन्हा अहहाहा " टीप्प टीप बरसा पानी"
उफ !
तन, मन आणि संपूर्ण जगच प्रेमाच्या धुंदीत बुडालेलं होतं आणि त्याचं जवळ असणं? हे कुठल्याच उपमेच्या बंधनात अडकतच नव्हतं. त्याचा सहवास बस! याहून सुख नव्हतं .
ते गाणं लागलं त्याने माझ्याकडे, मी त्याच्याकडे अन त्या पाच जणांनी आम्हा दोघांकडे पाहिलं. कारण नकळत आम्ही एकमेकांच्या इतक्या जवळ आलो होतो की, एकमेकांचे ओठ एकत्र होण्याचा उशीर होता. ते अधीर होऊन आमच्याकडे पाहू लागले होते.
तितक्यात,
"असाइन्मेंट झालेली दिसतेय ?" जवळून आवाज आला.
आं? मी गोंधळून जागी झाले...
ओह ओह ओह गॉड. कसे हे भारतीय लोक्स यार. ! मोक्याच्या क्षणी सुख गेलं... हे ऑफिसवाले प्रेमही करू देत नाही यार....
मग काय,
त्याबाहेरच्या 'टीप टीप बरसा 'ला  खिडकीच्या कांचांत रंगवून, तीच काच पुन्हा पुसून टाकून मी त्या निगरगट्ट स्क्रीनकडे लक्ष देत त्या कल्पनेच्या विश्वाला उद्गारवाचक चिन्ह लावून झोपडीच्या काळया बाकावर ठेऊन आले.
अशी कल्पनेतली प्रेमं खरे किती खुशनसीब होऊन हवं तसं जगून घेता, नाही.?
ऑफिसवाल्यांचाही एक अलगच रोमान्स असतो, मनातल्या मनात शिजणारा आल्हाददायी गुपचूप क्षण असतो !...