Sufi: talk to people
talk to people लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
talk to people लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


सुचत नाही कधी कधी... सुन्न व्हायला होतं. सगळं आयुष्य रुक्ष वाटू लागतं. जेव्हा डोकं 'डिप्रेशन ' नावाच्या राक्षसाच्या तोंडात जाऊ लागते. मन हात वर करून त्या खोलात जाणाऱ्या ' स्वतःला ' बाहेर ओढत असते, पण डोक्यातल्या डिप्रेशनने स्वतःवर ताबा मिळवलेला असतो.
नकारात्मक सहवास, एकटेपणा, स्वतःशीच बोलणे, तर्क वितर्क लाऊन स्वतःवर प्रेम न करणे, स्वतः बद्दल शंका उपस्थित करणे, खूप खूप मेहनत करून सतत अपयशच येणे, करीयरच्या टप्प्यात आपल्याला हे जमत नाहीये अस वाटणे यामुळे हे डिप्रेशन अधिकाधिक वाढू लागतं.
माझं तसचं होऊ लागलंय.
माझं वय कमी आहे असं आजूबाजूचे म्हणतात.
हेही म्हणतात की, तू राहते, दिसते, हसते सगळं नॉर्मल आहे. मग डिप्रेशन आलंय कसलं. ?
मी माझ्या मनात येणारे असंख्य नकारात्मक विचार टाळू लागते. पण तरीही हे डिप्रेशन जात नाही... मला वाटतं की हा कुठेतरी माझा नाही, माझ्या पिढीचा आणि येणाऱ्या पिढीचा दोष आहे.
त्यानंतरच्या पिढ्या या जन्मतः तयारीनिशी येतील. पण आम्ही जे जन्मलो ते सगळे अर्ध्य्या हळकुंडाने पिवळे होऊन आलो, आणि आजही तसेच आहोत.
वाटते, टिकाव लागावा या स्पर्धेच्या युगात.
वाटते, हातातून काहीच सुटू नये.
वाटते, आपण करू शकतो काहीतरी अचंबित मग का करू नये?
नव्वदीत जन्मल्यांचा हा एकंदरीत  प्रॉब्लेमच झाला आहे. एकतर ते ना तळ्यात ना मळ्यात. ते इतके भरकटले आहे की रस्ताच स्पष्ट नाही आणि रस्ता स्पष्ट नसला की आयुष्याची फरफट होते. आणि ही फरफट म्हणजे "डिप्रेशन."

हे लिहिण्याचे कारण माहिते? काल सोशल मीडियावर एकाने त्याची आत्महत्येची नोट शेअर केली. " मी तुमच्यापासून खूप खूप लांब जात आहे. आई बाबा मला क्षमा करा"
"आत्महत्या? ". मी शंकेने स्वतःलाच विचारले.
"नाही तो असं करणं शक्य नाही. " मीच त्याचं उत्तरही दिले. पण तरीही ही नोट म्हणजे काय होतं ? हे मला सुरुवातीला कळलं नाही. कारण ज्या व्यक्तीने हे लिहिलं होतं, तिच्याबरोबर माझे अनेकदा बोलणं झालेलं. चांगला चोविशितला तरुण तो.
लगेच तातडीने फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्याचं नाव शोधलं आणि कॉल लावला. फोन स्विच ऑफ होता. मला त्या पोस्टचा तर्क लावायचा नव्हता. कारण तो आत्महत्या करेल, असं कधी मनातही आलेलं नव्हतं. कारण, तो आताच्या पिढीतला तरुण होता. पण तो 'आताच्या पिढीतला' हे मी अनवधानाने विसरत होते.
तेव्हा मी स्वतःपासून विचार करू लागले. ही आताची तरुण पिढी म्हणजे नव्वदीत जन्मलेली उनाड बालकं. ज्यांना लहानपणी वाटायचे, आयुष्य हे  लहानपणी नकळत, निरागसपणे जगण्यासाठी आणि मोठं झालं की, जाणते होऊन पोटा पाण्यापुरत कमावण्यासाठी असते. हे आयुष्याचं प्लॅनिंग जणू लहान असतानाच त्यांचं ठरलेलं होतं.
पण मधल्या काही काळात तंत्रज्ञानाचा वापर जो भरमसाठ वाढला आणि झपाट्याने स्पर्धा वाढू लागल्या, तेव्हा वर्गातल्या एका विद्यार्थ्याला पहिलं येऊन चालत नाही, या स्पर्धेत चिरडले जाऊ नये म्हणून प्रत्येकाला स्वतःची ओळख घेऊन फरफट करत का होईना रस्ता कापावा लागतो. तसं या नव्वदितल्या मुलांचं झालं.
ही स्पर्धा म्हणजे कोणतंही ध्येय असो, चालत रहा, जिथे चालणं थांबेल तिथे तुमचे विचार थांबतील. आणि विचार थांबतील तेव्हा तुम्ही या स्पर्धेच्या खूप मागे गेलेलं असाल.
मला भीती हीच वाटते, जर आपण मागे पडलो या स्पर्धेतून तर?

आताच्या तरुणाईसाठी दोन गोष्टी एका तराजूत असतात,
"जगणं आणि स्पर्धा."
जगायचं म्हणजे आठवड्यातील पाच दिवस नोकरी, रात्री निवांत झोप, घरातल्यांबरोबर जेवण, आठवड्याचे शनिवार रविवार सुट्टी आणि सोमवार पासून पुन्हा कातरवेळी फिरायला गेलेलं मन जागेवर आणून कामाला लागणे. पण जेव्हा हाच तराजू स्पर्धेच्या पारड्याकडे झुकवावाच लागतो तेव्हा मात्र हाच तरुण दिवस-रात्र फोनचा डब्बा डोळ्यासमोर धरून स्वतःच्या प्रत्येक इंद्रियांची कसब लावत, स्वतःच्या आतल्या कसोटीला पिळून काढून पणाला लावतो. मग त्यातून कुठेतरी वाहवा मिळाली की तेवढ्यापुरता मनाला, डोक्याला शांतता. कारण स्पर्धेच्या जगात आज जे आहे ते उद्या अदृश्य झालेलं असतं . उद्या नवीन काहीतरी हवंच. रोजचा दिवस आपला नसतो. त्यामुळे रोजचा दिवस आपलाच असावा, या हट्टापोटी आता आता तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकलेली तरुण पिढी रात्र रात्र फोनच्या डब्ब्यात तळागाळात काहीतरी शोधत, बनवत राहते. असं करत करत नोकरीवरून आलेला दिवस संपून पहाटे ४- ५ वाजेपर्यंत स्वतःच्या छंदाचे लाड पुरवत पुन्हा सकाळी १० च्या नोकरीसाठी कंबर कसून , मनाची तयारी करून त्याच उत्साहात ते तयार होतात.
पण हा उत्साह जुन्या पिढीसारखा म्हातारपणापर्यंत टिकत नाही. याचे कारणच ही, तरुणाई ही कमी-अधिक वेगाच्या रेषेत पुढे जाते. समतोल नाही यात. यामुळे डोक्यावर ताण येऊ लागतो.
शिवाय या स्पर्धेच्या युगात डोक्याच्या प्रत्येक तंतूला कामाला लावलेलं असताना घरात गेलं की घरातल्यांची वेगळीच अपेक्षा असते. पिढीतले हे अंतर त्यावेळी समजून सांगण्याच्या परिस्थितीमध्ये तरूणाई नसते. त्यामुळे घरातल्यांनी फायद्याचे सांगितले तरी ते टाळले जाते. यामुळे हळूहळू घरातून खटके उडू लागतात. आणि परिणामी, बाहेरचे टेंशन असतेच त्यात घरातून बाहेर पडताना बाहेरचे टेंशन यामुळे डोकं सतत जड वाटू लागतं. आपण हसायचा प्रयत्न केला तरी हसू येत नाही, कुणाला मदत करावी वाटते पण शरीरात उर्जाच शिल्लक राहत नाही किंवा मग कधीतरी हे सगळं आपण करतोय ते चूक करतोय हे कळत असूनही आपण स्वतःच्या मनातल्या मनातच चिडचिड करू लागतो. सगळं जग दुष्ट वाटू लागतं.
यात हळूहळू एकेका घटनेची भर पडत जाते आणि ही डोक्यातल्या गच्च भरलेल्या किड्यांची संख्या वाढू लागते. मनाला कोचे पडून जातात, पोखरून जाते आपलीच विचार शक्ती. तरीही हे थांबत नाही आणि अस करत करत सगळे आतले प्रयत्न करून झाले की मन थकते. मग ताबा मेंदू घेऊ लागतो आणि मेंदूकडे ताबा जाऊन गोष्टी अधिकच अनपेक्षित घडू लागतात. आणि शेवटी मनासमोर हार मानलेला मेंदू आत्महत्येच्या खोल दरीत मारून टाकायला जातो स्वतःला.
यानंतर मला बोलावंसं वाटतं...

आमची पिढी चुकतेय.

स्पर्धा आहेत.
खूप आहेत.
आता तर जागतिकीकरणानंतर त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाल्या आहे. पण आपण थोडे थांबूया. थोडासा कणाकणाने विचार करूया. थोडासा या मौल्यवान आयुष्याचा विचार करूया! 
पूर्णच थांबून जाण्यापेक्षा आपली स्पर्धेत राहण्याची गती मंद ठेवूया, जितकी तुम्हाला झेपेल तेवढीच आणि एक मात्र करूया, फोनच्या डब्ब्यात सुख शोधणं बंद करू.
एकटेपणा आला की फोन घेतो आपण. हे घाणेरडं व्यसन आहे. कारण जेव्हा मनाला संवाद करायचा असतो तेव्हा जीवंत माणसेच लागतात समोर. पण सोशल मीडियावर होणारा संवाद हा डोक्याने केला जातो. कारण चॅटिंग करताना, पोस्ट करताना, कमेंट करताना आपण नेहमीच प्रत्येक शब्दाचा विचार करतो. डोक्याला विचार करण्यासाठी वेळ देतो. पण तसं प्रत्यक्षात माणूस समोर असेल अशावेळी बोलताना आपले हावभाव, आपले मन जो स्वभाव असेल तसं व्यक्त होत जातो. 
सतत डोक्याने होणारा मशिनसारखा संवाद तुमच्या मनाच्या उत्साहाला, ऊर्जेला अधिक निकामी करत आहे.
"दिवसातून किमान ५ लोकांबरोबर बोला, यामुळे तुम्ही विचार न करता मनापासून बोलाल" आणि जेव्हा कमी विचार असतील तेव्हा कामही अधिक होईल आणि हळूहळू स्वतःचं अस्तित्व तयार होईल. जेव्हा मन सुदृढ असेल तेव्हा आयुष्य सुंदर वाटेल.
डीप्रेशनचा प्रवास सुरू होतो. हे तडकाफडकी नसतं. कारण डिप्रेशन हा डोक्याने घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे अशा आत्महत्येच्या वाटेवर जाणाऱ्या तरुणाईने लोकांशी बोलावं. कोणीही अनोळखी असो बोलायचं. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या आयुष्याचा विचार करायचा. रस्त्यावर जाणाऱ्या किती लोकांच्या चेहऱ्यावर आज हसू आहे हे बघायचं. जगात एवढी लोकसंख्या आहे त्यात स्वतःला कशात तरी सतत गुंतवून ठेवायचं. त्याशिवाय हे एकटेपण दूर होणार नाही.
एकटेपणाचा मोह असतो, ते व्यसन करू नका...
नाहीतर स्वतःच स्वतःचा इतका तिरस्कार करू लागाल की स्वतःचाच जीव घ्याल !
त्यामुळे समाज कितीही खराब, सडक्या मनोवृत्तीचा म्हणत असलो आपण तरी त्यातले आपले आवडते लोकं निवडायचे आणि त्यांच्याशी मूर्त स्वरूपात तोंडाने बोलायचं. व्यक्त व्हायचं. ही खरी  प्रक्रिया सुरू करायची...
एवढाच एक उत्तम उपाय डिप्रेशन विरोधात लढण्यासाठी मला वाटतो. कारण हे तंत्रज्ञानाच्या युगात कंप्युटरच्या निर्जीव दगडासमोर बसणे, सोशल मीडियावर पोस्ट करणं, त्यावरच जगणं, खुश होणं, हे मशिनच्या प्रजातीचे लक्षण.
मशीन होणं माणसाला जमणार नाही, त्यामुळेच तो डिप्रेशनमध्ये जातो. त्यावर लोकांचा लोकांबरोबर असलेला मुक्त संवाद वाढायला हवा, एवढेच कळकळीने वाटते.