Sufi


'आई...'
आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही.

नेहमीचे असंख्य विचार असणारं मन अशावेळी काय आठवून देतं माहिते?
"तिचा हिरव्या चुड्याने भरलेला दणकट हात, जो कधीही पडायचा उशीर असायचा... "
दणकट होती ती, आजही तितकीच स्थिर आणि त्याहून जास्त खमकी!
आज मला मुक्तपणा कळतोय, बंधने, गुलामी, अहं पणा कळतोय, स्वार्थी लोकांतील राजकारण कळतंय हे सगळं तिच्यातून मला आलेलं देणं आहे. कारण जेव्हा एक आई विचारांनी आणि कृतींनी दणकट असते तेव्हा तिच्यातील मातृत्वाबरोबर तिच्या विचारांचा अंशही आपल्यात वावरत असतो. पण तरीही सगळं कळून आपण या वरच्या गुणांचा भाग कधी व्हायचं नाही, हेही तिचंच देणं आहे.
एक शुद्ध आत्मा कसा जन्माला घालायचां आणि त्याची निर्मिती करून त्याला शिल्पकार जसा घडवतो तशी छाननी करीत घडवायचं हे एवढं विशाल व्याप्त काम ती मन लाऊन अगदी सहज, अलवार करून जाते.
आई हे वेगळं रसायन असतं, ज्यात खूप असतं. ती म्हणजे एक मोठीच्या मोठी बुदली आहे, ती कुठल्याच कलेतून व्यक्त करताना कमी पडत नाही, ती कधीच संपत नाही, ती वाढत जाते आणि निव्वळ वाढतच जाते.
आईसाठीचं काही आठवत असेल तर, 'माझ्याही नकळत तिला माझ्यातल्या लिखाणाची चाहूल माझ्या आजूबाजूच्या लोकांनी दिली होती आणि माझ्याही आधी तिला ती कळली होती.'
परीक्षेचे दिवस होते. माझं शिक्षण महानगरपालकेच्या शाळेतलं. तेव्हा त्या शाळेच्या आपुलकीबद्दल अन् गोंडस दिवसांबद्दल कधीतरी लिहिल, पण या शाळेतील एक महत्त्वाचा दिवस होता तो.
आमच्या वार्षिक परीक्षेचे दिवस होते ते. आणि परीक्षेला मराठीच्या पेपरात "माझा पहिला नंबर आला तर...? " हा निबंध आला होता. तेव्हा मी चौथीत असेल.
मोबाईल फोन गॅझेटच्या महागड्या सावलीलाही नव्हतो आम्ही. त्यामुळे घरच्यांनी लहानपणी लहान राहणं जमवून आणि जपून ठेवलं होतं. एवढं काहीच कळायचं नाही पण 'आई जवळची आहे, ती कळायची.'
'तिचं' कसं असायचं, दिवस तिथूनच सुरू व्हायचा अन् मधल्या दुपारच्या वेळेत जे लहानपणीच सुख असतं ते अनुभवायचं अन् रात्र पुन्हा तिच्याच जवळ संपायची. गणित आयुष्याचं इतकं सहज सोप्प होतं.
त्यामुळे आयुष्याच्या दुनियादारीपासून आईने खूप जपलं.
"आई घरकाम करायची, आम्ही नातेवाईकांकडे शिक्षण घ्यायचो आणि परिस्थिती ही आपल्या फेवरमध्ये नाहीये." या तीन वस्तुस्थिती माझ्या मनावर प्रोपोगांडा राबवावा तशा मनावर बिंबत होत्या. पण एका बाजूला याच वस्तुस्थिती मला मोठं करू लागल्या. तेव्हाही मला माहीत नव्हतं, हे लेखक बिखक नेमकी प्रकरण काय असतं, जे आजही मला कळत नाही .
पण मी लिहिलं होतं त्या निबंधात, तो जो  दिवस होताsssssss.. तो मला त्यावेळी काहीच कळला नव्हता 😅
मी निबंधात लिहिलेल्या दोनच ओळींनी माझ्या बाई अनपेक्षितपणे माझ्याकडे पाहू लागल्या होत्या. बाईंनी तसं या पूर्वी कधी पाहिलेच नव्हते म्हणून काहीच तर्क लागतं नव्हते. 
मॅडमने नेहमीप्रमाणे पेपर वाटायला घेतले. 
माझा नंबर आला. पण मला पेपरच दिला नाही, तो बाजूला ठेवला. सगळ्यांचे पेपर वाटले. मी रडवेली होऊन मॅडमकडे पाहू लागले. कारण नापास होणं म्हणजे आईच्या मेहनतीचा अपमान होता तो.
मी त्यांच्यासमोर बोलेल इतकी बिनधास्त नव्हतेच कधी. थोड्यावेळाने बाई उठल्या. मला समोर बोलावलं. माझा पेपर हातात घेतला. आणि संपूर्ण वर्गात तो निबंध वाचून दाखवला. मला खूपच कसतरी वाटलेल. मला तरीही काही कळलं नाही, ना माझ्या वर्गातल्या मुलांना हे कळलं. म्हणजे त्यात एवढं काय होतं ? ते कौतुक होतं का? मला तेही कळलं नव्हतं. पण मी चुकीचं काहीच केलं नाही एवढं मात्र मला माहित होतं आणि बाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेला येताना सोबतीला आईला घेऊन यायला सांगितलं.
आई धास्तीने आली की, नेमकं मी काय उद्योग करून ठेवलेय. कारण घरकामाला सुट्टी घेऊन येणं आम्हाला परवडणार नव्हतं. पण तरीही शिक्षणाच्या बाबतीत तिला तडजोड मान्यच नव्हती.
ती आली. मॅडमने कौतुकाने सांगितले, तुमच्या मुलीने काय लिहिलंय सांगितलं तुम्हाला? ती अजुनच घाबरून गेली. कारण तिला याची पूर्वकल्पनाच नव्हती. आई भोळेपणाने म्हणाली, नाही मला काहीच माहीत नाही, काय केलंय तिने?.
आता डोळे माझ्याकडे करून तिने डोळ्यांनीच रागाने विचारलं, पूजे अभ्यासाकडे लक्ष द्यायचे का नुसते उपद्व्याप करून ठेवतेय. ती खूप चिडून गेली होती. ती अजून चिडणारच तेव्हा मॅडम बोलल्या, " शाबासकी द्या तिला आणि या ओळी वाचा." आई साधारण शिकलेली त्यामुळे तिने वाचलं. 
मी लिहिलं होतं, "माझा पहीला नंबर आला तर, मला खूप आनंद होईल. पण मला खूप आनंद होईल कारण माझ्या आईला याचा खूप आनंद होईल. त्यामुळे खूप मोठ्ठं शिकून एक नंबर मिळवायचाय! " 
तिनेही माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मला पाणी दिसलं. 
पाणी म्हणू की शाबासकी म्हणू की ते आनंदाश्रु होते.? तिच्या कष्टाचं चीज होतंय, तिच्या कष्टाचं रोपटं पुढे खूप मोठं होणारे, तिच्या डोळ्यात तो विश्वास मला जवळ घेऊन कौतुकाची थाप दिल्यावर मला दिसला होता. नकळत्या वयात आई आपल्याला मोठ्ठी स्वप्न दाखवू लागते.
"गरिबीतून मोठ्ठं होण्याचं स्वप्न तिने त्या दिवशी मला दिलं होतं. "
परिस्थिती हे अपयशाचं कारण कधीच नसते. तुला ते करायचं आहे तेव्हा तुला कोणीच थांबवू शकणार नाही. ते आजही तिने मला कधीच थांबवलं नाही.
आईच्या डोळ्यात जेव्हा आपल्या कलेविषयी आदर आणि स्वप्न दिसतात, तो दिवस आपल्या आयुष्याचा सोहळा असतो. सुदैवाने हे लिखाणातील कौतुकाचे सोहळे मी तिच्या आनंदाश्रुच्या सौख्यात दोनदा अनुभवले. त्याला कसलीच बरोबरी नसते. ते सुख असतं, कुठल्याच किंतुशिवाय मिळालेलं एकमेव सुख!
त्यामुळे स्वतःच्या स्वप्नांना आईच्या शाबासकीचे तोरण लागले की स्वप्न पूर्ण वाटू लागतात आणि आयुष्य स्वर्ग वाटू लागतो. वास्तवाचे चटके सहन होणार नाही इतके असतील पण त्यातही सौख्याचा सागर तिच्या हाताच्या स्पर्शात असतो. 
वास्तव स्वीकारलं नाही तरीही ते असणारच आहे पण, त्या वास्तवातील कविता होणे तुम्हाला जमायला हवे! हे शिकवून अन् घडवून जाते ती ! 
अशा माऊलीला "मौल्यवान मातृदिनाच्या मातृमय शुभेच्छा !"

वास्तवातली कविता !

by on मे १२, २०१९
'आई...' आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही. नेहमी...

आयुष्याला नेहमी दोन वाटा असतात, "एकतर करायचं, नाहीतर सोडून द्यायचं... "
'तिच्या' चेहऱ्यावरही तेच होतं...
रात्रीचे नऊ वाजले होते. आम्ही डी मार्ट वरून परतत होतो ...
मला रात्र आवडते कारण ती जिवंत असते. तिच्या सानिध्यात श्वास मुक्तपणे घ्यावेसे वाटतात, श्र्वासांच अस्तित्व जाणवत. मी सहसा रात्रीच्या वेळी बाहेर पडत नाही त्यामुळे कधीतरी बाहेर पडल्यानंतर " माझ्यासाठी रात्र म्हणजे वेगळी नशा असते."
त्या नशेत मी धुंद होते. बसमध्ये गर्दी नव्हती. पण अनेक चेहरे थकलेले होते. बस ' खानापूर ' असल्यामुळे त्यातून प्रवास करणारे चेहरे हे दिवसभर कष्ट करून थकलेले, कष्टाचे बोलके चेहरे, हातावर पोट असलेले...
त्यामुळे या बसमध्ये शीण होता... पण बस मिळाली, रिक्षाचे जादाचे पैसे वाचले, याचा सुस्कारा त्या प्रत्येकाच्या मनात होता... बस सुरू झाली... साधारण एक किलोमीटर गेल्यानंतर बस एका स्टॉप नसलेल्या ठिकाणी थांबली.
अचानकच...
विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत सगळ्यांनी "नेमकं काय झालं.?" म्हणून बाहेर पाहिलं, मीही डोकावले.
तर बसच्या कंडक्टरला त्याच्या नशेची तलफ आली होती...
तो त्याच्या नशेशी इतका प्रामाणिक की, त्याने दुनियेला विसरून स्वतःची इच्छा पूर्ण केली...
ते मला इतकं सुंदर वाटलं की, कसं एखादा माणूस परिस्थितीला विसरून स्वतःच्या आयुष्यात 'राजा ' म्हणून जगू शकतो, त्याच्या त्या 'असण्याला ' मनात बसवून गाडी पुढे जाणार होतीच. पण क्षणाचा वेळ न गमवता मी हातातल्या मोबाईलचा कॅमेरा ओपन करून तो क्षण माझ्याकडे घेतला... त्याचं वास्तव काहीही असो तो माझ्यासाठी या दुनियेत, 'आयुष्याला जिंकलेला माणूस होता. '



मी क्लिक केला आणि माझ्या जवळच बसलेल्या (इतक्या वेळात माहीत नसलेल्या) मावशीने माझ्या त्या क्रियेला दाद देत खुदकन हसल्या...
मला स्वतःच मी प्रॉम्प्ट वाटले. आवडले. पण पुढे त्यांना बोलायचं होतं...
" ए हे कित्ती लग्गेच झालं... मस्त केलं फोटो काढला..." दैनंदिन आयुष्यातील संवादापेक्षा हे वाक्य वेगळं होतं.
प्रत्युत्तर देण्यापेक्षा मी त्यावेळी फक्त एक ओळखीची स्माईल दिली.
"कुठे उतरणार... ? "
त्यांच्या नजरेशी नजर मिळाली, त्यामुळे मी वेगळच काहीतरी निरखत राहिले,
आणि त्यामुळे मला लगेच उत्तर सुचलं नाही.
पण पुढे " उममम.... हां xyz इथे."
मग 'थोड सेकंदभर बोलू का यांच्याशी?'असा सहज विचार मनात आला,
म्हटलं, "तुम्हाला?"
त्या लगेच म्हणाल्या, "वडगाव..."
मी प्रश्नार्थक नजरेने पाहिले... त्यांनी कन्टिन्यू केलं.
" बाई काय करू मग, ही बस आतपर्यंत जात नाही
... पण बस लवकर येत नाही. त्यामुळे आता बाहेरच उतरून चालत जावं लागेल घरापर्यंत."
"होना तेच म्हटलं बस खानापूर मग वडगाव कसं? "
पण बरं झालं याच बसमध्ये चढल्या. तशी बसची संख्या कमीये. त्यात रात्रीचं वाट पहावत नाही. घरी जावं वाटतं आपल्यापल्या. " मी त्यांच्या कलाने बोलले.
"आपलं कोण सांगून ऐकतं? त्यात इथून रोज दहाला घरी पोहोचायच. त्यांनतर पुढे स्वयंपाक... असं वाटतं ना कुणीतरी म्हणावं गेल्या गेल्या की झोपून घे. मी खुशाल झोपेल." त्या सलग बोलू लागल्या...
" मुलगी नसते का घरी?" मी सहज स्वाभाविक प्रश्न विचारला.
" लग्न झाली त्यांची. घरी सासू, नवरा आणि मुलगा असतो."
मी म्हटलं, " मुलगा काय शिकतो? "
त्यांना माझ्याशी बोलून आधार वाटत होता, अनोळखी पण आवडता संवाद होता तो.
" त्याचं शिक्षण झाले, तो आता मुलांना स्विमिंग शिकवतो, काय म्हणतात त्याला?
म्हटलं, " स्विमिंग ट्रेनर." हे समजल्यानंतर मला विचारावं वाटलेलं की, 'तो लवकर येतो मग तो स्वयंपाक करून नाही ठेवत का?' पण म्हटलं आई आहे ती. आणि तेही ' मुलाची आई' म्हणून माझं वास्तविकतेने बोलणं मी टाळलं.
"हां तेच... " त्या म्हटल्या. मी माझ्या विचारातून बाहेर पडले.
"त्यात मालकीण इतकी राबवून घेते. कसंही वागवायच कामाला म्हणून?. त्यात कळतही नाही इतक्या लांब जायचं, तरी कधी लवकर सोडत नाही" त्या सांगत होत्या.
" कुठे कामाला जातात तुम्ही.? " त्यांच्या आयुष्याचा भाग होत मी विचारलं.
" डेक्कनला ... "
मग मी डोक्यात गणित करून त्यांना विचारले, " म्हणजे तुम्हाला दोन बस बदलून यावं लागलं असणार. "
" दोन नाही तीन. तिथून डायरेक्ट बसही नाही. देवही कसा कोणाला देतो तर भरभरून आणि काहींच्या नशिबी फक्त कष्टच..... मोठ्ठा पौज घेऊन त्या सलग बोलू लागल्या. " पण जे चाललं ते छान आहे. "
पुढे म्हटल्या, "तू हॉस्टेलवर की घरी राहते. " माझ्याबद्दल सांगितल्यानंतर स्वाभाविक प्रश्न विचारला, " भाऊ नाही तुला? "
मी खुश होत म्हटलं, " नाही."
आजवरचा युनिव्हर्सल डायलॉग त्याही बोलल्या पुढे, "त्याला काय, आजकाल मुलीही काय कमी नाहीये."
मला आता सवयीचं झालं त्यामुळे मी पुढे म्हटलं , "मुलगा मुलगी काय फरक नसतो मावशी. शिक्षण असेल तर मुलगा मुलगी फरक पडत नाही."
"होना... " माझ्या मताशी सहमत होत्या पुढे म्हणाल्या, " हो बाई, शिक्षणावर खर्च करावा. आपलं लाईफ मस्त करावं, लग्न करावं पण ' चांगला पार्टनर ' पाहून. पार्टनर चांगलाच बघ, कितीही वेळ लागू.
त्यांच्या त्या दोन इंग्लिश शब्दांनी मला आतूनच खूप सही वाटलं, मी ऐकू लागले, " एक चांगला पार्टनर खूप महत्त्वाचाय . मी माझ्या मुलींची लवकर दिली लग्न लाऊन. पण आता बघते, पश्र्चाताप होतो. घर सांभाळून नोकरी करतात, पण गुलामीसारखं ."
मला धीर मिळाला त्यांच्या पुढारलेल्या विचारांनी मी म्हटलं, " हो बरोबरे. म्हणूनच भर शिक्षणावर आहे. कारण उद्या लग्न झाले, पार्टनर चांगला नसला तरी आपण स्वतंत्रपणे सक्षम असायला हवे. "
हो बाळा, शिक मोठी हो...
माझं स्टॉप आला.
निघताना म्हटले, "काळजी घ्या..."
मी सहजच आपल्या माणसांना म्हणते तसं आपोआप तोंडातून निघून गेलेलं... त्या मावशींना ते इतकं इतक्क हृदयाला भारी वाटलं, "हसतच म्हटल्या घेते बाई काळजी..." आणि हे सगळं त्या पुन्हा त्यांच्या बरोबरच्या मैत्रिणीला खूप आपुलकीने सांगू लागल्या, आपोआप त्या बसभर पसरलेला तो हास्याचा सुखद गारवा दोघींच्या मनास सुखावून गेला, भेट संपली, संवाद संपला पण त्या घटनेने, तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि शीण याने एका कष्टाशी ओळख झाली. एका प्रवासाच सार्थक झालं...

"एका अनोळखीबरोबर इतक्या वैयक्तिक, चार भिंती आडच्या गप्पा होऊ शकतात? ..." हा प्रश्न स्वतःला विचारून आयुष्याचं दुःख हलकं होऊन जातंय...
मध्येच प्रश्न पडतात, आधुनिक विचारसरणी गरिबातल्या गरिबापर्यंत पोहोचली, आजकाल मोबाईल आले सगळ्यांकडे मग तरीही आज त्या माऊलीला गृहिणी म्हणून जगता येत नाही. का तो मुलगा तिला म्हणू शकला नाही की, 'खूप झाले कष्ट घरी बस आता.' आज अशा गृहिणी आहे ज्यांना गृहिणी बनून कमीपणा वाटतो, पण या अशा स्त्रिया असतात ज्यांना जन्मल्यापासून आजपर्यंत कष्टाचाच दिवस घालवावा लागतो. ज्यांच्या आयुष्याला 'सुंदर आयुष्याचा एक तुकडाही नसतो, त्यामुळे अशांचा कैवारी म्हणत देव त्यांना आधार वाटत असतो, त्यावेळी मला देव जवळचा वाटतो. आयुष्याचा काहीसा भाग देवाच्या नावे देत तरी जगतात या माऊली..."

काय बोलू.?
एवढंच की,
वाईट वाटलं, आनंद झाला, सुख मिळालं एका अनोळखी, अनम्मोल, एका सच्च्या भेटीचं.

एक कष्ट बोलके...!

by on एप्रिल ३०, २०१९
आयुष्याला नेहमी दोन वाटा असतात, "एकतर करायचं, नाहीतर सोडून द्यायचं... " 'तिच्या' चेहऱ्यावरही तेच होतं... रात्रीचे नऊ...


ळूहळू सगळच बदलू लागले...
मीही बदलत चालले.
मी मोठी होते, मला अनुभव येऊ लागले.
बरे वाईट म्हणत म्हणत खूप लोक भेटू लागली. खूप भेटली म्हणून काही मागे सुटत गेली.

भावनिक पातळीवर कसं सावराव यात अडकत गेले. वयाच्या अशा परिस्थितीत आले की जूनून की भावनिक होणं?
दोघांपैकी एक निवड.
सुरुवात म्हणून मी दोन्ही निवडून रस्त्याला लागते.
पहिली शिडी उत्तम चढते, स्वतःच्या गर्वाचाही हेवा वाटायचा इतका आनंद वाटू लागला, मग दुसरी शिडी ... धत्त!
रस्ता दुभागत जातो. दोघांपैकी एकच निवडण अनिवार्य होते.
परिस्थितीला अनुकूल अस मी भावनिक होणं निवडते, लोकांशी बोलू लागते, घरच्या समस्यांना प्राधान्य देऊ लागते. 
सगळं ठीक चालू असतं. पण त्याकाळात जूनून मागे पडलेला असतो. त्यावेळी मध्ये एकच शिडी म्हणत म्हणत काळ बराच गेलेला असतो. स्वतः लाच मागे वळून पाहण्यात मी स्वतःलाच मागे सोडून येते. 
आता पुन्हा जूनून शोधू पाहते, काहीतरी राहतं म्हणत मी पुन्हा लोकांत जाते. 
त्याच लोकांमध्ये कुणीतरी मला टोकतं. 
तेव्हा मला कळतं, लोकांमध्ये गेले की मी स्वतःलाच कणाकणाने खाऊ लागते. 
कारण आजकाल मी स्वतःचीच उरतं नाही आणि शेवटी जूनून इज ऑल अबाऊट यू!

जेव्हा मीच नसणार तर जिंदगी काय उरणार?
डेड सोल !
मेलेला आत्मा!
का असं?
तर वाटतं,
जेव्हा जिवंत होते तेव्हाच स्वच्छंदी आत्मा बनले असते. त्या 'स्व' मधील छंदच सोडून गेला तर बाकी उरणार तरी काय? ...
भावनिक होण? लोकांसाठी?

कितपत जगवेल मला?
किमान माझा छंद मला जगवेल तितकं तरी.?
विश्वास कुछ अलगही कह रहा है,
मेरा जूनून मुझमे दबी हर खुशी को नीचोड लेगा |
मरी आत्मा अगर कुछ खौंफ हैं ना तो मैं तबाही मचा दुंगा।

- पूजा
Image source: pintrest

डेड सोल !

by on एप्रिल २२, २०१९
ह ळूहळू सगळच बदलू लागले... मीही बदलत चालले. मी मोठी होते, मला अनुभव येऊ लागले. बरे वाईट म्हणत म्हणत खूप लोक भेटू लागली. खूप भेटली म्हणू...


न्योतैमोरी 

हे नाव वेगळचं होतं. असं काहीतरी जे कुठल्यातरी भाषेतील कशाच तरी नाव असेल.
माणसाचं सगळ्यात जिवंत गुण म्हणजे त्याला उत्सुकता असते, कसलीही...
काल एका मित्राने विचारले की, न्योतैमोरीबद्दल ऐकलंय.?
आमच्या ग्रुपने एकमेकांकडे पाहिलं नि टाळ्या देत, याचं काहीतरी भलतच म्हणत, "म्हटलं नाही, काय संबंध, काय आहे ते?
आणि त्याच काय ? "
"तुम्ही ना ... या जगात फक्त खायला नि जायलाच आलाय." तो एकदम ऐतिहासिक काहीतरी शिकून आल्यासारखं बोलू लागला.
"बरं सांगून टाक काय ते, उगाच जुलाब व्हायचे नाहीतर" त्याला प्रोत्साहन देत त्याला विचारलं.
तोही आपलं सगळेजण ऐकताय या आनंदाने सांगू लागला...
"काल रात्री सहज वुट लावलं अन् त्यावर एका वेबासिरिजचा उल्लेख होता 'फुह से फैंटेसी'
आज जाऊन सर्च कर... कळेल मग."

फैंटेसी... म्हणजे विलक्षण कल्पना.
या शब्दात अडकलेली आमची पिढी नेहमीच एक्साईटेड असते कारण डार्क फैंटेसी म्हणजे गडद कल्पना. हे म्हणजे भलतच शारीरिक क्रियेशी संलग्न असतं.

यात अनेक प्रकारच्या शारीरिक अवयवांचे आकर्षण व्यक्तींना असते. त्यांना कधी एखाद्याच्या हातांचे आकर्षण असते, कधी ओठांचे, कधी ओठांवरील गुलाबी रंगाचे, कधी कुणाच्या कुरळ्या केसांचा आकर्षण तर कधी कुणाला स्तनांच्या आकारांचे आकर्षण तर एखाद्याला एखाद्याच्या पायांचे आकर्षण असते. हे फैंटेसी प्रकरण इतर प्रेमांपेक्षा भारी वेगळं असतं. त्यात प्रेम शरीरावर असतं तेही संपूर्ण शरीर असेलच असे नाही, ते प्रेम एका विशिष्ट भागावर असते खरे !
त्यामुळे या फैंटेसी नावामुळेच आम्ही सगळे घरी येऊन गुपचूप हे सर्च करणार हे ठरलं होतच.
मी घरी आले. डोक्यात 'फैंटेसी' चक्र फिरत होतेच.
अन् रात्री निवांत झाल्यावर मम्मी शेजारी असताना सर्च केलं.
अबब ... लगेच क्लोज !
अशावेळी मोबाईल पण शट डाऊन करता येतो, कळतं... डोक्यात तेच तिने पाहिलं तर नसेल ते चित्र ... शिट!
मग शेवटी ती झोपल्यानंतर मी पुन्हा सर्च केलं.
'न्योतैमोरी'.... हे नाव टाकताच, त्याच्या समोरच न्योतैमोरी मॉडेल्स म्हणून रेकमेंडेशन आले...
एक नग्न शरीर. आणि त्या शरीरावर नुसत्याच हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या पसरवलेल्या.

आणि ती मॉडेल म्हणजे काय मॉडेल असते. एकदम चुणचुणीत शरीराची, ते शरीर म्हणजे कुठूनही कुठलच अधिकच मांस बाहेर न आलेलं, त्या शरीरावरील प्रत्येक अवयव हे सुयोग्य पद्धतीने साचेबंद अन् इतकी सुंदर की भारतीय आई असती तर तिने रोज दृष्ट काढली असती अशी.
पण हा प्रकार मनाची उत्सुकता शिगेला नेत होता. वयही तसं होतच.
मग त्या नग्न शरीरावर पसरलेल्या खाद्यांनाचं गूढ शोधण्याच्या भागडीत पडले मी.
का कुणी त्याचा शोध न घ्यावा...? म्हणजे कल्पना करा आणि फक्त डोळ्यासमोर आणा, एका नग्न स्त्रीच्या शरीरावर गळ्यापासून स्तनांपासून, योनिपासून पायापर्यंत भाज्याच भाज्या. त्यास सुशी म्हणत.
मी "असं का? नेमकं ही पद्धत तरी काय आहे ? आणि अशा मॉडेल्स का असतात?" याची उत्तरे शोधू लागले.
उत्तर गूगल केलं पण थेअरी आली. ते नको होतं. मग मित्राने जिक्र केलं त्यावरून वेबसिरिज सर्च केली.
बघायला सुरुवात केली. हे काहीतरी भन्नाट होतं. म्हणजे वेबसिरिजमध्ये कथा नेमकी अशी सुरू होते की, भारतात न्योतिमोरी या कार्यक्रमाचे प्रयोग असतात आणि अशा कार्यक्रमाला भारतीयांचा प्रतिसाद उदंड असतो. तेव्हा कंपनीत नोकरी करणारे ३-४ भारतीय पुरुष जेव्हा न्योतैमोरी जेवणासाठी जातात तेव्हा त्यांची तारांबळ कशी उडते ते इतकं कट टू कट दाखवलं आहे की, म्हणजे भारतात स्त्रीचं उघड शरीर किती आकर्षणाचा आणि बाऊ केल्याचा विषय आहे, ते वास्तविकतेला धरून अचूक दाखविले आहे.
वेबसिरिजचा विषय खरेतर खूप वेगळा होता. नव्या गोष्टी शिकाव्याशा आणि महत्त्वाचं म्हणजे जाणून घ्याव्याशा वाटतात.
पण तरीही वेबसीरिजची सुरुवात झाली आणि त्या मॉडेलला बघून माझ्या मनात असंख्य भावना येऊ लागल्या.
या मॉडेल्सना सुशी मॉडेल्स म्हणतात.
माझं मन स्तब्ध झालं होतं. जेव्हा त्या एका चार फूट उंच मेजवानी टेबलवर केंद्रस्थानी ती शांत स्त्री आकृती अशीच निर्जीवासारखी पडलेली. जशी जन्मास आली तशीच अगदी.
म्हणजे अशी आकृती समोर आहे आपल्या आणि तिच्याकडे बघत डोळे झाकून अंतरंगात पहावं इतकी शांतता त्या चेहर्यावर की चुकूननंतर निरिक्षिताना नजर खालच्या अंगांकडे कुठेतरी जावी.
मग कळले की ही पद्धत मूळची जपानची. ते त्यांचं जेवण हे एका नग्न स्त्रीच्या शरीरावर पसरवून खातात. त्या शरीरावरून ते अन्न ( अन्नाला सुशी म्हणून संबोधतात) आपल्या ताटात घ्यायचं.
सुशी हे जर नग्न स्त्रीच्या शरीरावर असेल तर त्यास न्योतैमोरी म्हणतात.
पण जर सुशी पुरुष मॉडेल्सच्या अंगावर पसरलेले असेल तर त्यास नंतैमोरी म्हटले जाते.

हा प्रकार सामुराई कालखंडात घडत असे. राजे महाराजांच्या काळात अनेक यशस्वी लढायानंतर उत्सव म्हणून गैशा घरामध्ये 'न्योतैमोरी' होत असे.

बघितलं तर हा एका खुबसुरत कलेचा तुकडा आहे, असे  तिथल्या मॉडेल्सना आतून वाटते. किंबहुना त्यांना तसं ट्रेन केलं जात.
त्यांच्याकरीता किती आव्हानात्मक असेल की, त्या एका पोजिशनमध्ये एक तासाहून अधिक वेळ तसचं निर्जीव झोपून राहायचं. जणू एखादा चित्रकार चित्र
रंगवीत असेल त्यास ती बोलकी फ्रेम स्तब्ध लागते, तशीच या मॉडेल्सची ट्रेनिंग करून घेतली जाते.

परंतु मॉडेल्स सांगतात, जेव्हा अशा ठिकाणी राजे जेवण करत असायचे, तेव्हा ताटात हे सगळं घेतल्यानंतर ते जेवण, त्यातला एक एक घास चावताना ते आजूबाजूला बघत असायचे परंतु काही राजे लोक दारूचा घोट घेत घेत त्या स्त्रीच्या शरीरावरील कुठल्यातरी एखाद्या विशिष्ट अवयवाला एकच एकटक न्याहाळत बसायचे.

भारतातून या दृश्यास बघितले तर त्यास या अशा रिवाजांचा निषेध म्हणून नाकारले तर जाईल पण 'चवीनं' बघितलं जाईल आणि नजरेनं ' खाल्लही' जाईल. भारतात याची स्वीकृती सहज होणे नाही, पण मॉडेल्सच्या डेडीकेशनला सलाम!

(या पद्धतीचे ब्लॉग लिखाण हा केवळ आवडीचा अट्टाहास त्यामुळे, लिखाणातील काही दुव्यांमध्ये काही चुका आढळल्यास जरूर कळवावे)

कला सफर ; न्योतैमोरी

by on एप्रिल २१, २०१९
न्योतैमोरी   हे नाव वेगळचं होतं. असं काहीतरी जे कुठल्यातरी भाषेतील कशाच तरी नाव असेल. माणसाचं सगळ्यात जिवंत गुण म्हणजे त्याला उत्सु...


"काही गोष्टी सुटत नाहीत यार... 

सोडाव्या लागतात..."



साला तुमच्या डोक्यात दारूच येणार ना...

शेवटचा दिवस ए कॉलेजचा....

यार आपली बॅच, आपली सगळ्यांची दोस्ती... आणि या टिम्बटिम्बापुढे भरणाऱ्या कित्ती आठवणी दोन वर्ष देऊन जातात.
कॉलेजच्या दिवसांत सगळेजण एकमेकांचे नसून एकमेकांचे होतो...


मी- ते कोणतं ठिकाण रे?मला आठवेचना...ते बघ ना फुल्ल जंगल ए. मग त्यातून मध्ये जाऊन ते आत धबधबा... नावच आठवेना...
शी बाबा... माझी मेमरी ना.. असला राग येतो ना कधी कधी म्हणजे ना... पत्रकारितेत येऊन नावच लक्षात राहत नाही काय ***पणा हा?
तो - देवकुंड ... 😂😂 आणि तो माझ्या स्वभावाला वाकिफ होऊन फिदीफिदी हसायला लागला...
मी - हां... तेच तेच ...हसतो काय हरामखोरा तू काय झंडे गाडले का एवढ्या वर्षांत...
तो - यंदा पण जायचंय कुत्रे. समझी क्या?मी - जाऊ की!पण ... मन मायूस झालं होतं...
यंदा सगळं किती बदलेल ना रे .?
कॉलेज नसेल, ऑफिस असेल.
मग सुट्ट्या घ्यायच्या. तेही आपल्याच आनंदासाठी तिर्हाईताकडून परवानगी... माणूस किती उधार होत जातो ना.? किती वेगळं.तो - उलट भारी की... आपण आझाद होऊन जाऊ. आणि घ्यायची मग सुट्टी.

तुला
काय, कष्टाने एक सुट्टी घ्यायची... वेळेत यायचं, पाऊस असेल तर आजारी पडेल या भीतीनं भिजताना पण विचार करायचा, उन्हात भाजायचं असेल ते पण ऑफिसात टॅन पडलेलं अंग कसं दिसेल याचा विचार. उद्या पुन्हा ऑफिसला जायचं याची टिकटिक. कारण रोज रोज सुट्टी द्यायला आपला बाप तर नाही, ना आपले मास्तर.

त्यात घाणेरडं फीलींगच हे होतं कि कॉलेज सुटणार...

हातातले सगळेच उनाड क्षण, उनाड दिवस, अवखळ फिरणं, बागडण, चुका करणं, चौकटीतल्या आयुष्याला लावारिस करून , सगळं सोडून दूर कुठेतरी कॉलेज बंक करून निसर्गाच्या सानिध्यात जायचं, ते बंकींगचं खोटं कोणालाही विकणं हे कॉलेजमध्ये शक्य पण ऑफिस सुरू केलं की हे खोटं स्वतःलाच विकायचं.

सगळच अंगावर घ्यायचं. जगायचं तेही सहज नाही प्लॅन करून....
आज बाहेर कडाक्याच्या उन्हात पाऊस पडताना पाहिलं... हेच तर कॉलेजचे दिवस असतात. सगळं आयुष्य भकास कोरड असतं, त्यातला सावन म्हणजे हे कॉलेज डेज असतात.

या दिवसांचा भूतकाळ होणार, हि कल्पना मनाचा थरकाप उडवत होती....

मनात सगळंच येत होतं, कॉलेजच्या पहिल्या दिवसाची अनोळखी नजर, ते अपघातानेच कितीतरी चेहऱ्याना भेटून, तेच कमीने एका आठवड्यात हक्काचे सोबत बनायचे, रोज टकल्या पकवणार म्हणत म्हणत कॉलेज मास्तरांची खेचायची, आणि एकाच त्या हातावर कित्येक टाळ्या पडायच्या... स्साला टेलिपॅथी हि फक्त कॉलेजच्या मित्रांमध्येच असते जेव्हा समोरचा टीचर 'आयुष्यात कधी सिरीयस होणार, हि दुनियादारी आता नाही कळायची... तुम्ही तिघे बाहेर उभे र्हा म्हणायचे' त्यांच्या या अशा सिरीयस लेक्चरला आज शेवटच्या दिवशी सिरीयस व्हावं वाटत....

स्साला हे कॉलेज कुठेच सुरु होऊन कुठेच संपत नाही... 



यात मैत्री येड्यासारखी निस्वार्थी भिनभिनत नसानसात भिनत असते... असाइनमेंट, पहिला नंबर वरून स्वार्थीपणा, आपला ग्रुप, कूलनेस, मूवीला जायचं, त्यातच सगळ्या रस्त्याभर आपलाच आवाज आणि त्यात एखाद्याच्या सामानाची सेटिंग लावणं, बळच कुणाचंतरी नाव कुणाशीही जोडून त्यांना फुल्ल सिरीयस करायचं, कशावर विनोद होत नसला तरी हसायचं मात्र पार बेंबीच्या देठापासून.... मग गर्लफ्रेंड नावाचा भरती भक्कम खांब यायचा, तिला सामान, टप्पा, पत्रा, थवा, पाखरू म्हणून चिडवायचं.
त्या आनंदाला लेबल द्यायची गरज नसायची....
#daywellspent #withfriends या हॅशटॅगचा सपोर्ट नसायचा... कारण मित्रांच्या सोबतीची खुशनशीबी हीच कि एकत्र आल्यावर मोबाईल फोन्स नावाचा दुश्मन आम्हा मित्रांपासून बाहेर पडायचा. स्साला बालपणीचा फील हे दिवस कायम ठेवता... आणि या बालिशपणाला उभारी देता ते हे कमीने मित्र....
स्साला कोण कोणाचं नसतं पण नात्याला दृष्ट लागावी असले हरामी असता....

आज सेंड ऑफ सारख्या दिवशी 'ए गपेय, मी नाही रडणार' म्हणत म्हणत त्याच हरामी चेहऱ्यांवर खूप मौल्यवान आयुष्य हातातून जातंय कि काय याची लकेर डोळ्यांतून पडत होती...

आज आक्ख कॉलेज लाईफ आठवताना एका पॉईंटला मला 'आईएम रिअली गौना मिस माय कॉलेज डेज' मधील ओळी आठवून एकटं वाटतं होतं,

"आईएम रिअली गौना मिस माय कॉलेज डेज....

मिलके लिखना वो जर्नल्स, और सब्मिशन लास्ट मिनिटपर।।।

एक्जाम्स की वो तैयारी, वो लिखना वो तीन घंटे।

और बहार आके वो कहना, स्सालाsss क्या बेक्कार पेपर सेट किया था यार "

यापेक्षा वेगळी फिलिंग नाहीये...

फेरवेलचा दिवस येतो, सगळ्या आठवणी समोर येतात... अश्रू अनावर असतात. रडावसं वाटत नाही, एकमेकांना खोट्या सांत्वनाची झालर लावून आतल्या आत सगळेच रडत असतात. इतकं कसं हे नातं तेवढ्या दिवसांत आयुष्यभराचं वाटू लागत?

'मला वाटतं इतका का बाऊ करतेय ...' मित्र म्हणतो तसं, 'मी ओव्हर रिअॅक्ट करतेय...'
बरं होत असेल ओव्हररिऍक्ट. पण का होऊ नको?
सांग ना, म्हणजे जन्माच्या चौथ्या अजाणत्या वर्षांपासून मी शिक्षणाच्या शाळेच्या पायऱ्या चढले, त्यानंतर कॉलेजच्या.
त्यात कुठलाही गॅप नव्हता. आणि आज हे अचानकच, अचानक नाहीये पण तरीही सगळं असं थांबणार ...


'जबाबदार' हा शब्द वाटणीला येणार... 

इतरांसारखे मीही ते गोडच मानून घेणार पण तरीही मला झेपवेल ते? 

कॉलेजमध्ये जे आजपोहतर खूप फिरायच, कॅमेरा घेऊन रॉयल एनफिल्डला किक मारून मौसम मस्ताना म्हणत 'हम जो चलने लगे' गात, बेफाम जगाची फिकीर नसल्यासारखं फिरणं हि स्वप्न त्या कॉलेजच्या हवेत बेफिक्रे उधळून ठेवलेलं आता खरंच जमेल? ... 


सर- चला आत चला दोघे ...
मी - ए चल जाऊ उगाच सरांनी बघितलं आहे, आता बंक मारणं इम्पॉसिबल...तो - आता सरांमुळे आपला प्लॅन कॅन्सल करायचा का...?गप्प तू चल... शपथ ए दोस्तीची....
अन दुसऱ्या मिनिटाला आम्ही तिथून पसार...
मित्राकडून पुढचा किस्सा कळणार...
सरांना आम्ही न दिसल्यामुळे सर मित्राला विचारता, त्यावर तो म्हणतो, तिला पाळी आली होती त्यामुळे ती गेली.
सर - आणि त्याला ? कधीपासून? 

साला सगळं मिळेल, हे कुठून मिळणार?
याला मोल नाही... मोती आहे हे असे दोस्त आयुष्यासाठी...

कॉलेज म्हणजे दुसरं आयुष्यच असतं.... ज्यात सगळंच वास्तवाच्या पल्याड असतं. अन माझ्या या दुसऱ्या आयुष्याच्या संपूर्ण बेफिक्रे प्रवासात मला करण जोहरच्या फिल्ममध्ये असतं ते न अनुभवल्याचा पश्चाताप नसणारे...

भीती सगळ्यात जास्त होती ती, 'आपण कॉन्टॅक्टमध्ये राहूच ना' या वाक्याची . कारण माझ्या बॅकग्राऊंडला " हम रहे या न रहे कल....sss" या गाण्याचा आवाज जास्त होता.. 
उद्या मला फेबूला स्टोरी अपलोड करून "कहाँ हो मेरे कमीने दोस्तो" म्हणावं नको लागायला भीती याची वाटते...
स्साला हि फिलिंग कितीही लिहावि, लिहून संपत नाही...
साला ... मेन मॅटरच हा होणार आहे, यापुढे मी चुका करणार त्याला माफी नसणार. त्या प्रत्येक चुकितून मला जाणतेपणी काहीतरी शिकावच लागणार...

आज पहिल्यांदा इतकी ओझ्याने भरली आहे मी. 
आजपर्यंत आनंद हा निस्वार्थ होता, त्यात आपलेपणाचा वास होता, मित्रांच्या सोबतीचा सहवास होता, एका बेस्टेस्ट फ्रेंडचा हक्क होता, मार्गदर्शकांचा आयुष्यात टॉप वर नेण्याचा प्रयत्न होता... एकटं झाल्यासारखं वाटतं. किती व्यापलं जात आयुष्य हे कॉलेजच्या दिवसांनी .... वाटतं एवढंच आयुष्य असावं.... पण जाणीव वास्तवाची करून घ्यावी लागते. या क्षणापासूनच समजवावं लागतं मनाला, 'व्हा रेडी मॅडम... आता दुनियादारीत उतरण्याशिवाय पर्याय नाही!'


यारी ये बेफिक्री ...।

by on एप्रिल १५, २०१९
"काही गोष्टी सुटत नाहीत यार...  सोडाव्या लागतात..." साला तुमच्या डोक्यात दारूच येणार ना... शेवटचा दिवस ए कॉलेजचा......



पुण्याची गरमी मागे टाकून आम्ही दिल्लीच्या दिशेने रवाना होत होतो. हळूहळू वेगवेगळ्या राज्यांची हवा अंगाला लागून जात होती...

माझ्या मनाची भावनाच कळत नव्हती. कारण चार भिंती ओलांडून आपल्याला दुसरं काही बघता येणार नाही, या घराच्या वातावरणामुळे पुढची अपेक्षा फारफार तर स्वतःचं काही झाल्यावर मग स्वखर्चाने बघू दुनिया, या तयारीत मन होतं. पण घरच्यांना अचानकच काय झालं नि मला हा आगळावेगळा अनुभव अपेक्षे आधीच वाट्याला आला. निर्धास्त आणि मुक्त झालं होतं मन...
प्रत्येक शहराची हवा, तिथलं निसर्ग नि वेगळा साचा हा नेहमीच माणसाला जिवंत ठेवायला मदत करतो. म्हणून, फार नाही पण एक स्वप्न माझं आयुष्यभरासाठी पुरेल ते 'भटकणं'.
कारणे कोणतीही असो, पण या फिरण्यात आपलंच पुण्यातलं आयुष्य नवीनच आपल्या समोर तयार होतं...
त्यामुळे फिरणं छंद होता मनाचा...
दिल्लीचा प्रवास सुरू झाला.
कालपर्यंत किमान सोशल मीडियामुळे जवळ वाटणारे चित्र आज माझ्यासमोर होते.


घराच्याभोवती खेळणारी पाऊलं आज राजधानीसारख्या भव्य शहरात पडणार होती. मन गांगरून गेलं होतं. अशावेळी माणसाला खरी थंडी ताप सर्दी खोकल्यासारखी हवा जाणवते. प्रत्येकवेळी तिची चाहूल ही नाविन्याची ओळख करून देणारी असते...

"राजस्थान गया लगता हैं । "
त्या प्रवाश्याचा तो आवाज... आहाहा ! पुण्याच्या पहाटेच्यावेळी हा आवाज कधीच आकर्षित करणारा नसतो, तो या प्रवासात येतो, जेव्हा पहाटेला आपल्या कॉटच्या खालचा नवा प्रवासी त्याच्या बायकोला कौतुकाने सांगतो, मी अर्धा लावलेला डोळा उघडत त्याच्या बायकोने चेहऱ्यावर घेतलेल्या पदराकडे बघत खिडकीच्या सळीतून झाडांमागून डोकावलेला सूर्य कौतुकाने बघते... मन ओढीने तिथल्या स्त्रिया, पुरुष आणि तिथली माती न्याहाळू लागतो... सोशल मीडियावर पाहिलेल्या फोटोत दिसतं तसं दृश्य डोळ्यात आणून मन राजस्थानला राजेरजवाड्यांत सजवलेलं पाहायला आतुर असतं पण दृश्य त्याहून खूप कोरडं आहे. तिथे दूरदूरवर निसर्गाचा नामोनिशाण आम्ही ज्या भागातून गेलो तिथे नव्हतंच. तरीही राजस्थानची उत्सुकता सुटत नाही कारण राजस्थानचा मूळ आत्मा मी पाहिलेला नसतो.
तो आत्मा पाहण्याची इच्छा, पुढच्या सहलीत रिजर्व्ह करीत मी ते सगळं त्या पहाटे न्याहाळू लागते.
सकाळची वेळ संपून दुपार होत जाते. तसं तसे आम्ही मित्रमंडळी एकत्र येऊन फावल्या वेळेतले खेळ खेळून एकमेकांचे अधिक घट्ट मैतर होऊ लागतो.
ट्रेनच्या डब्यात वातावरण नेहमीसारखेच वेगवेगळ्या लोकांनी आणि त्यांच्या सवयीनी भरलेले होतं. ट्रेनमधील तसा माझा हा दुसराच प्रवास.
हा प्रवास माझ्यासाठी पहील्या प्रवासापेक्षा वेगळा होता. कारण यावेळी मी एकटी जात नव्हते माझ्यासोबत मित्र कंपनीही होती. शिवाय, विशीच्या पुढे गेल्यानंतर मॅच्युर पण थोडे अवखळ होऊन अशा शैक्षणिक सहलींना जाण्यात खरं फिरणं असतं आणि आपल्या अवतीभोवती ओळखीच्या वाइब्ज असल्या की आपण मुक्त असतो. सांभाळायला कुणीतरी आहे या भावनेने व्यक्ती थोडा निष्काळजी होतो. मीही झाले.
मला तर राहून राहून आठवत होतं कि आपण दिल्लीच्या प्रवासात आहोत...
मनाला टवटवीत नि नवखं वाटावं म्हणून मी सतत स्वतःलाच धप्पा देऊन सांगत होते,
"यहिच तो ख्वाहिशें थी तेरी, देखा ताकद है तेरे सपनों में। दौड़े खींचे तेरेही पास आ गए। "
नकळत मन दिल्लीचा विचार करू लागतं...
दिल्ली जशी दिलवालोंकी म्हणून प्रसिद्ध तशीच ती असुरक्षित राज्य म्हणूनही प्रसिद्ध आहे. तिथली निर्भया आजही अंगात वाघनख्या सारखी टोचते. पण तरीही येथूनच सगळा भारताचा गाडा हाकला जातो. एखाद्या देशाचा राज्यकारभार चालवायचा, म्हणजे ते ठिकाण जितकं देशातील लोकांसाठी महत्त्वाचं, तितकच ते विलायतांसाठीही महत्त्वाचं.! त्यामुळे जसे स्वदेशींसाठी दिल्लीत वावरणे म्हणजे देशाचा स्वाभिमान नजरेत घेऊन ते राज्य बघणे असते, त्याचाच विरोधाभास म्हणजे विदेशींसाठी या राज्याच्या प्रत्येक घटनेची खबरबात ठेवणे काम असते. त्यामुळे स्वाभिमान आणि असुरक्षितता या दोन्ही तटबंदीने युक्त अशी ही दिल्ली आहे.
दिल्लीत वावरणे हे कधी मी स्वप्नातही बघितले नव्हते.
तसं याबद्दल लिहीन असा विचारही नव्हता केला. पण आपल्या राज्याव्यातिरिक्त दुसरे राज्य आपण बघतोय ही भावना फक्त मनात ठेवलीच जात नाही. कारण एका छोट्याशा झोपडीत वावरणार बालपण आणि त्यानंतर त्या एका फ्लॅटमधून गूगल आणि इंटरनेटवर आणि फारफार तर पुस्तक आणि नकाशावर दिसणारे राज्य होते हे.

लोक म्हणतात, राजकारणी मंडळीचे आवडते राज्य आहे दिल्ली. पण मला तसा फारसा त्यातला रस नव्हता खरा. पण पण जेव्हा पत्रकारिता सुरू केली. मी हळूहळू कानावर पडतय म्हणून बातम्या वाचू लागले आणि त्यातील थोडेसे दुवे समजून घेऊ लागले. पण तालुक्याचे ही स्वप्न न पाहिलेली मी आज ट्रेन मधून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा अशी बरीच राज्य, स्टेशन्स बघत नजर आणि मन एकमेकांशी घुटमळवत होते.
सुरुवतीपासूनच सांगायचं तर आमचा प्रवास सुरु झाला तो दुपारी पुण्याहून रात्री मुंबईला. त्यानंतर मुंबईवरून बांद्रा टर्मिनस ते हजरत निजामुद्दीनपर्यंतचा प्रवास हा एकूण दोन दिवसांचा प्रवास ठरला. त्यात अंदाजे ९८हून अधिक स्टेशन्स होती.
हा आमचा निजामुद्दीन स्टेशनला जाण्याचा प्रवास सुरू झाला. रात्रीच्या आलिशान प्रवासाला जाणे म्हणजे अविश्वसनीय होते. कारण घराच्या तटबंदीने घेरलेले आयुष्य या आठ दिवसाच्या दिल्ली प्रवासात वेगळ्या नजरेने दिसणारं होतं.
दिल्लीला जायचे ठरल्यापासून मी आतून खुश होते ते केवळ या कल्पनेनेच की, आजवरच्या आयुष्यात मी कधीच घराबाहेर एकटी थांबले नव्हते, तेही ८ दिवसांसाठी. त्यामुळे दिल्लीसारख्या ठिकाणी एकटं राहणं, खाणं पिणं, फिरणं, आणि तिथल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद एकटं राहून घ्यायचा ही एकमेव भावना आयुष्यात पहिल्यांदा होती. ती भलतीच खास होती!
भावना कल्लोळ शांत होत नव्हता.
पण तरीही सगळं आवडत होतं.
दोन दिवसांच्या प्रवासानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता हजरत निजामुद्दीन या ठिकाणी आम्ही उतरलो.
स्टेशनच्या नावाची ओढ लागली होती खरी, त्यानुसार हजरत निजामुद्दीन हे नाव निजामुद्दीन औलीया या सुफी संताच्या नावाने हे नाव पडले.
तिथेच निजामुद्दीनच्या स्टेशनवर लोकांना निरीक्षणायचं हे नकळत अंगवळणी पडलेले. पण त्या आधी दिल्ली भागातला चहा प्यायचा कारण त्याशिवाय सकाळी सहाची झोप उडणार नव्हती. आणि दिल्लीतील काहीच मिस करायचं नव्हतं. त्यामुळे आधी चहा. मग बाकी सगळं, असं करत तसेच दोन दिवस बिना आंघोळीचे काढून पारोसे चेहरे घेऊन आमची गॅंग त्या चहाच्या टपरीवर पोहोचले.

हर शौक इंसान का शौकीन होता। और बेशक चाय के नशे का हर इंसान का शौकीन हैं।
चहा पिऊन झाला... आता खरी ओढ लागली होती. दिल्ली फिरण्यासाठी खास बसची सोय होती..त्यामुळे तिथे उतरून आम्ही तडक इंटरनॅशनल युथ हॉस्टेल गाठले. सगळे अंघोळ करून स्वतःला बरं वाटेल म्हणून आपापल्या रुममध्ये पळाल्या. माझा हॉस्टेल प्रवास सुरू झाला...
क खोली, सात मुली आणि एक बाथरूम, एक टॉयलेट.
गेल्यागेल्या सगळ्यांनाच अंघोळ करायची. आणि त्यात दोन तासात तयार होऊन दिल्ली दर्शनास जायचं, हे अवघड झालं होतं. कारण त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या मनाने हे स्वीकारलं की, " मुलींना तयार होण्यापेक्षाही अंघोळीला जास्त वेळ लागतो." दोन तासात आमच्या खोलीतल्या फक्त तीन मुलींच्या अंघोळी झाल्या. शेवटच्या चार मुलींनी पाचपाच मिनिटात उरकलं, पर्याय नव्हता.
आणि अशाप्रकारे नाश्ता करून आम्ही २५ मार्चला दिल्लीतील सगळ्यात प्रशस्त आणि आवडत्या जागी पोहोचलो. कारण पत्रकारितेत खूप काही नाही पण अशा प्रशस्त जागांतील प्रशस्त वातावरणात जाऊन काहीतरी स्वतःच्या करियरच्या दिशेने महत्वाचं उचलायचंच हे कळलेल असतं.

आजची ओढ़ होती 'बीबीसी...'

तेच बीबीसी जे इंटरनेटवरून जगभरातल्या अनेकानेक ठिकाणी झळकते. पण आज ते दिल्लीतून इतक्या जवळून बघणं म्हणजे, मुळात मी दिल्लीत आहे हि भावनाच इतर सगळ्या भावनांना द्विगुणित करीत होती.
बीबीसीचे आकर्षण पत्रकारितेपासून अति जास्त वाढले होते. कारण तिथे जे आहे ते खूप कमी माध्यमांत आहे.
निःपक्षपाती बातमीदारी.
बीबीसी ही ब्रिटिश कंपनी असल्याने फारफार तर ती लंडनच्या बातम्या पक्षपातीपणे देईल. (तेही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही)
बीबीसी आजपर्यंत मी  अनुभवावरून तरी निःपक्षपाती वाटले. पण जेव्हा असे ब्रँड भारतात त्यांचे स्थान वसवतात, ते प्रगतीस उभारी देणारे ठरतात.
'काही वेळेला अशा कंपन्या या स्वदेशीवर घाला घालणाऱ्या असतात' असे म्हटले जात असले तरी, मला ते चूक वाटते कारण प्रत्येक देश हा परस्परावलंबी आहे. स्वावलंबी होऊन तो स्वतःच्याच परिघात अडकून राहतो. त्यामुळे बीबीसीचे यश हे मला खुपत नाही.
आज बीबीसीचे प्रसारण हे ४०हुन अधिक भाषांमध्ये आहे. हे सोपे काम नाही. दिल्लीत बीबीसीचे दोन फ्लोअरवर काम चालते. आम्ही दोन्हीही मजल्यावरील प्रत्येक विभागास भेट दिली. शिवाय लाईव्ह रेकॉर्डिंग.
प्रत्येक भाषेसाठी आवश्यक ते ४-५ विभाग आणि त्या विभागास कमीत कमी २-३ लोक (तेही कमी), असे ४० गुणिले १२ म्हणजे एका भाषेसाठी ३६० कर्मचारी आणि त्यातल्या त्यात बॉम्बिंग म्हणजे 'बीबीसी ही लंडनमधून सगळ्या भाषेत काम करत नाही' ही कंपनी अनेक देशांमध्ये कार्यरत आहे त्यामुळे त्या त्या देशांत कार्यरत मनुष्यसंख्या वेगळीच, हे निरीक्षण केल्यानंतर हे मनुष्यबळाचे गणित अधिक बळकट होत जाते.
बीबीसी होस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी, आंतरराष्ट्रीय बीबीसीचे ५ रेडिओ स्टेशन, न्यूज पोर्टल, लाईव्ह स्ट्रीमिंग वाहिनी, पॉडकास्ट अशाप्रकारचे विविध माध्यमांत बीबीसीचे स्वरूप आहे.
२ ऑक्टोबर २०१७ ला बीबीसीने गुजराती,पंजाबी, उर्दू, मराठी, तेलगू या भाषांमध्ये बीबिसीला उतरविले.
स्वाभाविकपणे बीबीसी हे मातृभाषेत आल्यानंतर मी त्याच्याकडे जास्त वळले.
माहितीनुसार, बीबीसी ही ब्रिटिश लोकांच्या फंडिंगवर म्हणजे टॅक्सवर चालते. त्यामुळे, बीबीसी वेबसाईट्स आणि संपूर्ण बीबीसी माध्यम हे जाहिरातींना कमी प्राधान्य देतात. बीबीसीचा मूळ उद्देश हाच आहे कि, स्थानिक माध्यमांवर लक्ष्य केंद्रित करून तळागाळांपर्यंत पोहोचणे आणि आंतरराष्ट्रीय बातम्या मराठीत आणणे.
बीबीसीचे आतील वातावरण अनुभवले जरी नसले तरी एका भेटीत बीबीसी हे सकारात्मक वाईब्जने भरलेले वाटले. कारण बीबीसी ही कुणालाच टाळत नाही. मुख्यत्वे त्यांच्या आखून दिलेल्या तत्वांवर ठाम असते म्हणून ती इतर माध्यमांतून उठून दिसते कारण बीबीसीची सुरुवात जेव्हा झाली त्यावेळी बीबीसीचे तत्व होते, "सुरुवातीच्या काळात खूप अपेक्षा ठेऊ नका. आणि आज जेव्हा कंपनीने यशाचा सन्मान मिळविला तेव्हाही बीबीसी या मतावर आहे कि, विश्वासार्हतेला पात्र ठरा." त्यामुळे सद्यपरिस्थिती जगभरातील माध्यमांसाठी बीबीसीची हि तत्वे आचरणात आणावी अशी ठरतात.
अशाप्रकारे, बीबीसी होस्ट कडून बीबीसीच्या ऑफिस बद्दल पुरेशी माहिती मिळाली. मनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात अनामिकपणे वाटून गेलं, त्या परफेक्ट आत्मविश्वासू स्वाभिमानी मुलीच्या सोबत तिच्या शेजारच्या डेस्क वर त्या कंप्युटर मध्ये डोकं घालून काहीतरी बीबीसी साठी लिहिणारी उद्या मी तिथे असेल. हेच वातावरण हीच दिल्ली आणि हेच ते बीबीसी...

अशा नोटवर मी बीबीसी सारख्या पहिल्या वहिल्या आवडत्या ठिकाणाला मनाच्या अनोळखी स्वप्नात अॅड् केलं.
(या पद्धतीचे ब्लॉग लिखाण हा केवळ आवडीचा अट्टाहास त्यामुळे, लिखाणातील काही दुव्यांमध्ये काही चुका आढळल्यास जरूर कळवावे)
-------
क्रमशः

दिल्लीतून...

by on एप्रिल ११, २०१९
पुण्याची गरमी मागे टाकून आम्ही दिल्लीच्या दिशेने रवाना होत होतो. हळूहळू वेगवेगळ्या राज्यांची हवा अंगाला लागून जात होती... माझ्...


आनंद कुठे आहे ?... 
कुठल्याही रस्त्यावर?...
मन गांगरून, गोंधळून गेलेलं नि कुठल्याही निष्कर्षाला पोहोचत नव्हतं,
नजर फिरवली...
श्वास शांत केले, मन शांत करत सगळं डोक्यातील बाजूला ठेवत सगळीकडे एकवार पाहिलं. 
बाजारात कित्येक गृहिणी स्वतःतच रमत गमत उद्याच्या दिवसासाठी भाजीपाला खरेदी करीत होत्या...
 त्यांना माहितीही नव्हतं, त्यांच्या सौंदर्याचं नंदनवन याच बाजारात होतं. रोज असतं.
नंदनवन म्हणजे तोच तो... जो लाकडाची विणलेली पाटी गळयात अडकवून रोज कुठल्याच रोमँटिक भावनेविना तिथे उभा असतो ... 
मोगरा पारिजातकाचां सुवास पाटीत घेऊन त्या बाजारात उभा असतो, नियमित! 
 त्या गर्दीच्या ओढीत मीही त्या सुगंधाकडे खेचली जाते, गर्दीच्या रस्त्यावरून चालताना अलगद तो गहिरा सुवास चाफेकळी नाकाला स्पर्शून जातो, मनाच्या हरेक कानाकोपऱ्याला निस्वार्थ ताजं करून निखळ सुखवून तरीही तो पुरून उरतो नि पैसा क्या चीज विसरत माझा हात पाकिटात जातो नि मोगरेवाल्याकडून तो लाखमोलाचा सुवास विकत घेतला जातो ...
तो सुवास मी कोणाला देणार हे तेव्हा माझ्या मनालाही माहिती नसतं, तो आईलाही देऊ शकते नाहीतर प्रियकरालाही...
 पण कुणाकडून तरी शिकले होते, आपल्याकडचा मोगरा वाटता यायला हवा... !
तो कुणालाही देवो, पण मनाची उबदार भावना व्यक्त होईल त्या एका मोगऱ्याच्या नैसर्गिक अत्तराने! काही क्षण भन्नाट विकत मिळतात, मनाला त्याची पारख हवी. !मनाला मी आज ते अत्त्तर देण्यास समर्थ ठरले होते... 
 एक सुविचार निर्माण करण्यास मन आज तयार झाले होते,

झगमगत्या तरारी स्पर्धेच्या जगतात भिर्कावलेले मन एका अशा मदिरेजवळ विसावते, जिथे मनास ग्लानी मिळते एका न प्यायलेल्या मद्याची... हा सुवासाचा प्याला असा काही धुंदीत घेऊन जाऊन असेच कैक पॅक कित्येक मनांवर उधळून देतो, सुखवण्याची किमया साधतो!.... 
चिअर्स टू मोगर्याची कैफ !!! 💛


- पूजा ढेरिंगे

कैफ मोगर्याची .!

by on एप्रिल १०, २०१९
आनंद कुठे आहे ?...  कुठल्याही रस्त्यावर?... मन गांगरून, गोंधळून गेलेलं नि कुठल्याही निष्कर्षाला पोहोचत नव्हतं, नजर फिरवली... श्वास...
मादक आहेस, मोहक आहेस, सेक्शुअल ऑब्जेक्ट आहेस...
तू सुंदर आहे, तू रेखीव आहे, कोरीवही आहे... दुय्यम.
पूर्ण आहेस, स्पष्ट आहेस, आत्मविश्वासू आहे हे प्रथम!

सौंदर्यापलीकडे 'जे छान आहे ते तुझं करून घे !' 
तू अडकत जाते तुझ्या परिस्थितींमध्ये.
भीतीला तू जरा नाकारायला शिक !
जुन्या रस्त्यांचा पाया ठेव, पण वाट त्याला तुझी जोड!
तडजोड ही वाईट गोष्टींबाबत ठेऊ नकोसच बजावतेय समज.!
कारण 'छान'ची जागा जेव्हा तडजोड घेईल, सवय तुला होत जाईल.
त्यामुळे तू घसरत जाशील या गाळात.
त्यामुळे ठामपणे स्वच्छ प्रवाहाचा तू भाग बन !

छोटी रहा, सीमित रहा, मर्यादित रहा,
पण स्वयंप्रकाशित स्वच्छ रहा !

ताकद तुझ्या पायांत आहे, पैंजणात आहे, डोळ्यात भरल्या त्या घट्ट काळजात आहे,

एक कटाक्ष टाकण्याचा उशीर आहे.
गळ्यात सेक्शुअल ऑब्जेक्ट झाकणाऱ्या तुझ्या ओढणीत आहे,
ती समोरच्याच्या गळ्यात अडकण्याचा उशीर आहे.
तशी ती मनगटाच्या जोडीला तुझ्या बांगड्यांत आहे,
ते मनगट एखाद्याच्या मानगुटीवर आवळण्याचा उशीर आहे.!
हो ती वेणीला माळणाऱ्या गजर्याच्या दोऱ्यातही आहे,
त्या दोऱ्याने त्याच्या नरडीच्या तिथे कुस्करून मागे खेचायचा उशीर आहे!
तीच ताकद कानातल्या डुल्याच्या टोकदार दावणीत आहे,
त्या तारीने ओरडबडायचा किंवा त्याच्या उघड्या भागाला,
नाहीतर सरळ त्याच्या लिंगाला ओरडबडायचा उशीर आहे ...
त्यासाठी स्वतःची ताकद ओळख.!

सौंदर्यात मढवून ताकद तुझी बांधून ठेवली म्हणे...
आता या सगळ्या सौंदर्याच्या तारांनीच तू सजही नि त्याचा वापरही कर!
वापर कर चांगल्यासाठी, तुझं वाईट होताना ते चांगलं करण्यासाठी !
या सगळ्याची ताकद तुझ्या कणाकणात आहे.

तू स्वतःला सतत सांगत रहा, तुला नेमकं हवं काय आहे.
जाण याची तू स्वतःला करून दे !
तुझ्या कम्फर्टझोन मधून बाहेर पड, आव्हानं आहे पण वैयक्तिक आहेस या लढाईत याचा आनंद तुला असेल.
जन्म घेताना झगडून, नंतरही कसनुसं जगून मरायचं असेल तर, जगू नकोस स्पष्ट आहे. 
या पायांना हे असं जखडून ठेवण्यापेक्षा, पूर्वापारच्या बेड्यांना तू जिद्दीने तोडून टाक,
नि हे जखडलेले परंपरेच्या रक्तात माखलेल्या पायांतच ताकद आण, हवं तसं आयुष्य जगण्यासाठी !
रक्तबंबाळ तावदानांतून तू तुझ्या स्वप्नांना त्यांचं आकाश दे, आणि मुक्त हो ! 
स्वतःसाठी निदान... ?




कम्फर्टझोनमधून बाहेर पड...!

by on मार्च ०७, २०१९
मादक आहेस, मोहक आहेस, सेक्शुअल ऑब्जेक्ट आहेस... तू सुंदर आहे, तू रेखीव आहे, कोरीवही आहे... दुय्यम. पूर्ण आहेस, स्पष्ट आहेस, आत्मविश्व...

१३२ वर्षांपूर्वीचा हा प्रवास. 

एका व्यक्तीच्या आयुष्याचा फक्त २२ वर्षांचा हा प्रवास. 
एक प्रवास आणि एकच ध्येय ! 
आताच्या काळात नाही जमत हे. 
"अनेक ध्येय ठेवले कि मग एक पूर्ण होतं," या भ्रमिष्ठ समजुतीला आपला अभिमान मानत आपल्यासारखे स्वप्न पाहायला सुरुवात करतात. 
आनंदीबाई वेगळ्या होत्या आणि त्यांच्याबरोबर गोपाळरावही! 
'अस्स काहीतरी व्हावंच लागतं, ज्यामुळे आपलं स्वप्न आपल्याला मिळतं.'

"आनंदीबाई भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या."पण या केवळ वाक्यावर त्यांचं कर्तृत्व मापलं तर चुकीचं ठरेल, त्याकरिता हा चित्रपट!  
हि कथा जरी आनंदीबाई जोशींची असली तरी ती केवळ त्यांची नाही. 
ती कथा मला जास्त करून गोपाळराव जोशींची वाटली. ब्राह्मण कुळात जन्मलेले भयंकर टोकाचे आडमुठे गृहस्थ! 
आडमुठेपणा हा गोपाळरावांचा स्थायीभाव मानून चालले तरी तो चांगल्या विचारधारेला आणि योग्य दिशा देणारा स्थायीभाव होता. 

चार दिवस शिवायचं नाही, पारावरचे सगळेच शहाणे कसे असतात, आपल्या स्वतःच्याच बायकोचा हात धरून मिरवण्यातही लोक नावे ठेवत, त्यावेळी गोपाळराव जसे आनंदीबाईंच्या हातात हात घालून दिमाखात लोकांना दाखवत चालतात, धर्मांतर करण्याचा विचार का करावा लागतो, लग्न करताना मुलाची प्रमुख अट कोणती होती ?, एकमेकांना सोडून न जाण्यासाठी बांधून ठेवलेली ती बाह्यतः बालिश वाटणारी खूणगाठ कित्ती मोठी साथ आणि विश्वास देते मनाला,   
हे सीन, हि दृश्ये खूप सुंदर सहज पण नेमके मांडले, हाताळले. असे चित्रपट साकारताना कुठल्या धर्माला ठेच पोहोचू नये हे भान जपणे आवश्यक असते. 

सुंदर आहे तो क्षण, ज्यावेळी समुद्र किनारी तो निळा सदरा, डोक्यावर सफेद पगडी , आणि ते उपरण आणि शेजारी ती लाल तांबूस रंगाचे जरीचं लुगडं घातलेली, जरीच्या काठाची चोळी, कानात नाकात जुन्या घडणावळीतील मोत्याचे कानातले नि केसांच्या आंबाड्यात तो मोगऱ्याचा गजरा ' तिच्या ' हक्काचा गजरा. !
अजुन किती वाचायचं? म्हणत जेव्हा कंटाळवाण्या शब्दात आनंदीबाई बोलतात, तेव्हा त्या दोघांमधील संवाद सुरेख वाटतो.
ते म्हणतात,
'ज्ञान हे या समुद्रासारखे असते, अथांग पसरलेल, जगभर...'
 रुढींच तुटणे याचं सुंदर दृश्यातून दाखवले ... जेव्हा गजरा घेऊन गोपाळराव आनंदीबाईंच्या केसांत तिथेच गाजरवाल्याच्या समोरच माळतात, हे माळून लाजणं हे आजही चारचौघात लज्जेचा विषय वाटतो. पण त्या काळात हे स्वतंत्र विचार गोपाळ रावांनी केले. 
सदर चित्रपटात दाखविलेला पूर्वीचा आणि आधुनिक समाज यात मला विशेष अंतर आजही जाणवले नाही. त्या काळी समाज चुकीचं तर चुकीचं पण तोंडावर मान्य करणारा होता. आधुनिक काळात, समाजात आपण अग्रेसर विचारसरणीचे दिसणार नाहीत म्हणून या चुकीच्या गोष्टी मनात ठेवल्या जाऊ लागल्या नि वेळोवेळी याची जागा ढोंगी लोक घेऊ लागले आहेत. 
-----
कास्टिंगबद्दल बोलताना, 
मुख्य भूमिकेतील भाग्यश्री मिलिंद म्हणजेच आनंदी गोपाळ. भाग्यश्रीची ओळख बालक-पालक चित्रपटाच्यावेळेची. तिच्या अभिनयाची लकब लवचिक आहे. भारी फिट झाली ती त्या भूमिकेसाठी. 
भाग्यश्रीबद्दल जास्त बोलणे टाळते कारण जास्त आव्हानात्मक भूमिका हि गोपाळरावांची होती. अनेक भावनांचं अनेक रसायन त्या एका चेहऱ्यातील हावभावांतून दाखवायचे होते. भाग्यश्री (आनंदीबाई) हिला मात्र तिचा अल्लडपणा आणि मधील एका मोठ्या घटनेमुळे कणखरपणा या हावभावांचा अधिक वापर होता. त्यामुळे भाग्यश्री हिने सुरेख केलेच. 
माझ्या दृष्टीने गोपाळ जोशी हे आव्हानात्मक वाटले. त्यांच्यासाठी हा प्रवास एक लढाई होती. आणि ती लढाई तितक्या ताकदीने स्क्रीनवर आणणे गरजेचे होते.  
आणि अशावेळी मुख्य भूमिकेत ललित प्रभाकरला बघणे म्हणजे थोडासा किंतु मनात होता. कारण तो तरुण वयातील आणि तरुणीसाठीच्या भूमिका केलेला कलाकार होता. त्याचा दिल दोस्ती दुनियादारी या सिरियलमधील रोलही तसा खूप भाव खाऊन गेला. मुलींचा क्रश म्हणून गॉड गोंडस हँडसम असलेला ललित गोपाळराव कसा साकारणार, याबाबत साशंक असणे स्वाभाविक होते. परंतु, त्याने अचूकपणे हे पात्र साकारत आणि खुलवत नेले. 
त्याची भूमिका, त्याचा तिरसटपणा तर अंगावर तेव्हा येतो जेव्हा हा आडमुठे स्थायीभाव जेव्हा आनंदीबाई गरोदर असताना त्यांच्यावर ओरडले जाते नि मारले जाते. त्यावेळी त्याची चीड येते, राग येतो, कणव येते, तळमळ वाटते पण या सगळ्यात मोठ्ठ म्हणजे कडाडून राग येतो. आपली तळमळ खरी म्हणूनती चुकीच्यावेळी एखाद्यावर लादणे, चुकीचे हेही न्याय्य दर्शविले. 

--------
चित्रपट पाहताना,
जुन्या ढाच्याची, नव्वदीच्या आधीच्या कथांना घेऊन बनवलेली बायोपिक पाहण्यात कुतूहल वाटते. कारण त्या काळात मनोरंजनाची सुरुवात आणि त्याची गरज व महत्व हे त्याकाळी लोकां लेखी शून्य होते.  
परंतु आधुनिक काळात अशा जुन्या व्यक्तींची व्यक्तिमत्वे आणि त्यांच्यावर तांत्रिकदृष्ट्या काम करून साजरे केलेले हे सिनेमे, सुंदर वाटतात दृष्टीला. त्यासाठी त्या काळाचा फील आणण्यासाठी लागणाऱ्या मेहनतीची पूर्ण कल्पना नसली तरीहि अशा चित्रपटांत वापरलेली प्रकाशयोजना, फ्रेम, एडिटिंग, आधुनिकतेचा कणही दिसू नये याची घेतलेली काळजी हे तीन तासांत जज करून मोकळे होतो आपण, पण हेही आव्हान तंत्रज्ञानामुळे सुकर होऊ लागले. विशेष म्हणजे मला या अशा बायोपिकमध्ये चित्रपट चित्रीकरणासाठी वापरलेल्या जागा, तिथे वावरणाऱ्या लोकांचा पेहराव, त्या काळातील आपला भारत म्हणून जपलेली भौतिक वस्तूंची ठेवण हे पाहायला विशेष सुखदायक वाटतं. 
भले, लेखकाला, दिग्दर्शकाला माहिती आहे कि, त्याचं हे लिखाण किंवा स्क्रीनवर दिसणारी चलचित्रेही त्या त्या काळात ज्या व्यक्तीची ती कथा आहे तिच्यासाठी इतकी सुखकर नव्हती. पण जुन्यातील गंमत नि प्रेक्षकांपर्यंत त्याच्या आतील संदेश पोहोचविण्याचा हा छान प्रयत्न ठरतो. 
 -----------------------
या कथेत वाटत जाते कि, जेव्हा अशा स्त्रिया मोठे नाव कमावतात, आपल्या पितृसत्ताक पुरुषाने जर अनाठायी ठरवूनच टाकले तर त्याच्यात केवढा पुरुषार्थ केवढी मर्दानगी आहे कि एक 'आनंदी' तो घडवू शकेल. 
त्यांच्या डॉक्टर होण्याचं स्वप्न, स्वप्न का बनतं हे जेव्हा संवेदना जाग्या ठेऊन बघितलं जात तेव्हा चित्रपटाची तळतळ नि आनंदीबाईंनि त्यावेळी ठरवलेलं ते स्वप्न आजच्यासाठी किती महत्वाचं होतं हे कळत जातं. 
चित्रपटांमधील गाणी हि त्या त्या परिस्थितीला अगदीच पूरक असतात. परंतु गीतांमध्ये सगळ्यात सुंदर गीत आणि त्याचं संगीत जे आवडलं ते म्हणजे 
"'मैत्रीण माझी मीच मला अप्रूप माझे ! वाटा वाटा वाटा गं !
आणि ठेका येतो, 
दर्या दर्या ग, उरात शंभर लाटा ग! "
लहानपणी नवऱ्याने लावलेली अभ्यासाची कडाडून शिस्त...हीच लहानपणीची सवय हळूहळू आनंदीबाईंना स्वतःच अस्तित्व शोधून देते. त्या दोघांचा हा प्रवास ! 
संस्कृती, परंपरा, रीती रिवाज, धर्म थोतांड, पक्षपाती शासन आणि शिक्षण व्यवस्था याना धरून अनेक चित्रपट बनविले जातात, हा चित्रपटही त्यातलाच. पण वेगळा दृष्टीकोन देतात या जिद्दी कथा ! 
------ 
कथेबद्दल बोलू तर,
असामान्य जिद्दीची हि कहाणी आणि त्याला समांतरच गूढ प्रेमकथा!
गोपाळराव हट्टी आडमुठेचं असावे! 
आणि आनंदीबाई या परिस्थितीनुरूप बदल स्वीकारून जिद्दीने पुढे जाणाऱ्या. 
आपल्या 'पत्नीचं स्वप्न' हा गोपाळरावांसाठी अलंकार होता, केवढं सुंदर होतं हे. 
एका जिद्दी स्वप्नाची कथा आहे ही. स्वप्नांच्या जगात संधी मिळतात, त्या बघाव्या त्यातील निवडावी नि पुन्हा त्या स्वप्नाला घेऊन एक सतत चालत राहावं! 
गोपाळ नसते तर आनंदी नसती. किंवा डॉ. आनंदीबाई जोशी झाल्याही असत्या त्या. कारण म्हणतात नं, स्वप्न तुमच्या जन्माबरोबर जन्म घेतात, ते तुमच्याच नावी असतात. स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक ठरतात. 
कुटुंब व्यवस्था, पारतंत्र्य, स्त्री असणं, धर्म मोठा या गुंत्यांपेक्षा शिक्षण हे आदर वाढवते नि जर हा आदर दोघांनी मिळून मिळवायचा ठरवला तर होते सगळे छान, तो खरा संसार असतो! 
हा गुंता सुटला तर एकमेकांची स्वप्न पुरी केली तर होतो संसार ! 
सुंदर समीकरण वाटले, दोघांची स्वप्न एकत्र सूत बांधतात, हा खरा संसार!
----------------

अंतास, 
तो क्षण सुखाचा,
जेव्हा हे स्वप्न साकार होतं. आनंदीबाईंच्या हातात डॉक्टरकीची डिग्री येते. आणि गोपाळराव तिथे येतात, तो क्षण मौल्यवान, अगणित!
कडाडून भरून आलं, आवडलं, भावलं आणि याहूनही अधिक कदाचित!
एका स्वप्नामागे लागून त्या दोघांची धडपड, तो प्रवास, तो पाठलाग त्यातील पडणझडण आणि ते सगळं पूर्ण झाल्यांनंतर त्याने आनंदीबाईंना मिठीत घेणं जणू त्या स्वप्नाला कवेत घेणं होतं.
शेवट करताना तोच समुद्र, तोच पेहराव, त्याच लाटा आणि शेवटी एकमेकांची सोबत साथ, सुखकर ! 
-----------------

फक्त चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शकाने दाखवलेल्या सगळ्या यशस्वी महिला त्यांची नावे आणि त्यांचं कर्तृत्व हे इंग्रजी भाषेत टाकण्याऐवजी मराठीत टाकायला हवी होती. ती संकल्पना सुंदर आहे, पण प्रेक्षक हा बहुतकरून मराठी भाषिक असल्यामुळे त्यांना ते कळायला हवे, म्हणून वाटून गेले. 
फक्त मलाच जाणवले असेल, पण आनंदीबाई या कमी जाणवल्या, गोपाळरावांपेक्षा. हे कदाचित त्यावेळी तसेच घडलेही असेल. सत्य परिस्थिती, लेखकाचा या विषयातील व्यासंग आणि मुखतः या विषयाला हाताळतानाचा दृष्टिकोन.
पण तरीही वाटते, गोपाळरावांची बाजू उजवी दाखवली जास्त? असो, इतिहासातील संग्रहित सगळेच खोटे असते, नाहीतर सगळेच खरे ! 
पत्र संवाद जसा काळाच्या मागे गेला...
सराईत शापितासारखे 'शब्दही' दगडासारखे बेसुमार दिसू लागले... 

मज भीती आज ही इतकीच वाटली,
पत्रव्यवहाराच्या त्या काळात मज आभासी लेखिका म्हणवलं तरी गेलं असतं ?

डिजिटल हे जग झाले,
शब्द सुमार वाढतच गेले...
शब्द स्वस्त झाली,
त्यास किंमत न उरता,
त्याचीच किंमत केली ...

वो भी दिन थे,
लोग गुलजार पढ़ने के लिए छह माह इंतजार करते थे।
आज तिस किमया म्हणवत,
एका श्वासात गुगल भाऊ गुलजारांना न वाचता समोर आणून ठेवतो.

म्हणूनच
ना पत्र , ना तार, ना शब्दांस वजन राहिले...

वाहून गेल्या लाखोल्या शब्दांच्या ,
कमेंट लाईक शेअरच्या दिखाऊ आभासात...

आजही ते दिवस किती ओले वाटतात...
एssक सुंsssदरंस खुराडे, वर वाळक्या झाडांचं छप्पर, बाहेर गोठ्यात नवं कुटुंब नि त्या गोठ्यातील सुवासाचा घरभर सुवास ... नि या सगळ्याला बांधून ठेवणारं एक काssटेरी कुंपण.
काटे सजावटीला वापरावे असे ते साधे दिवस होते. 
एक अशीच सायंकाळ यावी, पाखरांच्या थव्यासवे जोडीला तार पत्राची धाडावी.

पत्राची गुंडाळी ती सोडत वरूनच त्या ' पत्रास कारण की...' चे हजारो अर्थ चाळावे.

अंधार हा दाटून यावा, अंधारास विझवत तोरण ते कंदिलांच यावं... त्या उजेडास तव साक्षी मानत, डोळ्यांत अंदाजाचा कस लावत एखादा अंदाज निपाजत जावा नि पत्र लिहिण्यास कारण की... क्षण सुटत न्यावा....

पेटल्या चुलीतील विस्तवाची ती खरी परीक्षा व्हायची...

'पत्रास कारण...' आनंदाचे निघाले तव विस्तवासही दिवे लागायचे. एका कागदाची किमया ती ही अशीच बहरत कित्येक मनी सौख्य भरायची...

पण,
पण....

जर कारणास पत्र ठरले, तर तोच विस्तव राख नि धगधगता निखारा दिसायचा.

' पत्रास कारण की... ' तेवढाच एक क्षण हा दूर गावाच्या पल्याडहून मिळालेलं एक सरप्राइज ठरायचा.

ज्याच्या 'अचानक' एका सेकंदात आयुष्याचा मायना बदललेला असायचा.

आज वाटते, एका कागदाची किंमत त्या म्हाताऱ्याला विचारावी,
प्रेमाची किंमत त्या गावठी संसारी गृहिणीला विचारावी
नि

एका 'शब्दाची' किंमत या अशा लेखकासच विचारावी.
- पूजा

अचानकच....

by on फेब्रुवारी ०६, २०१९
पत्र संवाद जसा काळाच्या मागे गेला... सराईत शापितासारखे 'शब्दही' दगडासारखे बेसुमार दिसू लागले...  मज भीती आज ही इतकीच वाटली, प...