Sufi: आनंदी गोपाळ movie review
आनंदी गोपाळ movie review लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आनंदी गोपाळ movie review लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१३२ वर्षांपूर्वीचा हा प्रवास. 

एका व्यक्तीच्या आयुष्याचा फक्त २२ वर्षांचा हा प्रवास. 
एक प्रवास आणि एकच ध्येय ! 
आताच्या काळात नाही जमत हे. 
"अनेक ध्येय ठेवले कि मग एक पूर्ण होतं," या भ्रमिष्ठ समजुतीला आपला अभिमान मानत आपल्यासारखे स्वप्न पाहायला सुरुवात करतात. 
आनंदीबाई वेगळ्या होत्या आणि त्यांच्याबरोबर गोपाळरावही! 
'अस्स काहीतरी व्हावंच लागतं, ज्यामुळे आपलं स्वप्न आपल्याला मिळतं.'

"आनंदीबाई भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या."पण या केवळ वाक्यावर त्यांचं कर्तृत्व मापलं तर चुकीचं ठरेल, त्याकरिता हा चित्रपट!  
हि कथा जरी आनंदीबाई जोशींची असली तरी ती केवळ त्यांची नाही. 
ती कथा मला जास्त करून गोपाळराव जोशींची वाटली. ब्राह्मण कुळात जन्मलेले भयंकर टोकाचे आडमुठे गृहस्थ! 
आडमुठेपणा हा गोपाळरावांचा स्थायीभाव मानून चालले तरी तो चांगल्या विचारधारेला आणि योग्य दिशा देणारा स्थायीभाव होता. 

चार दिवस शिवायचं नाही, पारावरचे सगळेच शहाणे कसे असतात, आपल्या स्वतःच्याच बायकोचा हात धरून मिरवण्यातही लोक नावे ठेवत, त्यावेळी गोपाळराव जसे आनंदीबाईंच्या हातात हात घालून दिमाखात लोकांना दाखवत चालतात, धर्मांतर करण्याचा विचार का करावा लागतो, लग्न करताना मुलाची प्रमुख अट कोणती होती ?, एकमेकांना सोडून न जाण्यासाठी बांधून ठेवलेली ती बाह्यतः बालिश वाटणारी खूणगाठ कित्ती मोठी साथ आणि विश्वास देते मनाला,   
हे सीन, हि दृश्ये खूप सुंदर सहज पण नेमके मांडले, हाताळले. असे चित्रपट साकारताना कुठल्या धर्माला ठेच पोहोचू नये हे भान जपणे आवश्यक असते. 

सुंदर आहे तो क्षण, ज्यावेळी समुद्र किनारी तो निळा सदरा, डोक्यावर सफेद पगडी , आणि ते उपरण आणि शेजारी ती लाल तांबूस रंगाचे जरीचं लुगडं घातलेली, जरीच्या काठाची चोळी, कानात नाकात जुन्या घडणावळीतील मोत्याचे कानातले नि केसांच्या आंबाड्यात तो मोगऱ्याचा गजरा ' तिच्या ' हक्काचा गजरा. !
अजुन किती वाचायचं? म्हणत जेव्हा कंटाळवाण्या शब्दात आनंदीबाई बोलतात, तेव्हा त्या दोघांमधील संवाद सुरेख वाटतो.
ते म्हणतात,
'ज्ञान हे या समुद्रासारखे असते, अथांग पसरलेल, जगभर...'
 रुढींच तुटणे याचं सुंदर दृश्यातून दाखवले ... जेव्हा गजरा घेऊन गोपाळराव आनंदीबाईंच्या केसांत तिथेच गाजरवाल्याच्या समोरच माळतात, हे माळून लाजणं हे आजही चारचौघात लज्जेचा विषय वाटतो. पण त्या काळात हे स्वतंत्र विचार गोपाळ रावांनी केले. 
सदर चित्रपटात दाखविलेला पूर्वीचा आणि आधुनिक समाज यात मला विशेष अंतर आजही जाणवले नाही. त्या काळी समाज चुकीचं तर चुकीचं पण तोंडावर मान्य करणारा होता. आधुनिक काळात, समाजात आपण अग्रेसर विचारसरणीचे दिसणार नाहीत म्हणून या चुकीच्या गोष्टी मनात ठेवल्या जाऊ लागल्या नि वेळोवेळी याची जागा ढोंगी लोक घेऊ लागले आहेत. 
-----
कास्टिंगबद्दल बोलताना, 
मुख्य भूमिकेतील भाग्यश्री मिलिंद म्हणजेच आनंदी गोपाळ. भाग्यश्रीची ओळख बालक-पालक चित्रपटाच्यावेळेची. तिच्या अभिनयाची लकब लवचिक आहे. भारी फिट झाली ती त्या भूमिकेसाठी. 
भाग्यश्रीबद्दल जास्त बोलणे टाळते कारण जास्त आव्हानात्मक भूमिका हि गोपाळरावांची होती. अनेक भावनांचं अनेक रसायन त्या एका चेहऱ्यातील हावभावांतून दाखवायचे होते. भाग्यश्री (आनंदीबाई) हिला मात्र तिचा अल्लडपणा आणि मधील एका मोठ्या घटनेमुळे कणखरपणा या हावभावांचा अधिक वापर होता. त्यामुळे भाग्यश्री हिने सुरेख केलेच. 
माझ्या दृष्टीने गोपाळ जोशी हे आव्हानात्मक वाटले. त्यांच्यासाठी हा प्रवास एक लढाई होती. आणि ती लढाई तितक्या ताकदीने स्क्रीनवर आणणे गरजेचे होते.  
आणि अशावेळी मुख्य भूमिकेत ललित प्रभाकरला बघणे म्हणजे थोडासा किंतु मनात होता. कारण तो तरुण वयातील आणि तरुणीसाठीच्या भूमिका केलेला कलाकार होता. त्याचा दिल दोस्ती दुनियादारी या सिरियलमधील रोलही तसा खूप भाव खाऊन गेला. मुलींचा क्रश म्हणून गॉड गोंडस हँडसम असलेला ललित गोपाळराव कसा साकारणार, याबाबत साशंक असणे स्वाभाविक होते. परंतु, त्याने अचूकपणे हे पात्र साकारत आणि खुलवत नेले. 
त्याची भूमिका, त्याचा तिरसटपणा तर अंगावर तेव्हा येतो जेव्हा हा आडमुठे स्थायीभाव जेव्हा आनंदीबाई गरोदर असताना त्यांच्यावर ओरडले जाते नि मारले जाते. त्यावेळी त्याची चीड येते, राग येतो, कणव येते, तळमळ वाटते पण या सगळ्यात मोठ्ठ म्हणजे कडाडून राग येतो. आपली तळमळ खरी म्हणूनती चुकीच्यावेळी एखाद्यावर लादणे, चुकीचे हेही न्याय्य दर्शविले. 

--------
चित्रपट पाहताना,
जुन्या ढाच्याची, नव्वदीच्या आधीच्या कथांना घेऊन बनवलेली बायोपिक पाहण्यात कुतूहल वाटते. कारण त्या काळात मनोरंजनाची सुरुवात आणि त्याची गरज व महत्व हे त्याकाळी लोकां लेखी शून्य होते.  
परंतु आधुनिक काळात अशा जुन्या व्यक्तींची व्यक्तिमत्वे आणि त्यांच्यावर तांत्रिकदृष्ट्या काम करून साजरे केलेले हे सिनेमे, सुंदर वाटतात दृष्टीला. त्यासाठी त्या काळाचा फील आणण्यासाठी लागणाऱ्या मेहनतीची पूर्ण कल्पना नसली तरीहि अशा चित्रपटांत वापरलेली प्रकाशयोजना, फ्रेम, एडिटिंग, आधुनिकतेचा कणही दिसू नये याची घेतलेली काळजी हे तीन तासांत जज करून मोकळे होतो आपण, पण हेही आव्हान तंत्रज्ञानामुळे सुकर होऊ लागले. विशेष म्हणजे मला या अशा बायोपिकमध्ये चित्रपट चित्रीकरणासाठी वापरलेल्या जागा, तिथे वावरणाऱ्या लोकांचा पेहराव, त्या काळातील आपला भारत म्हणून जपलेली भौतिक वस्तूंची ठेवण हे पाहायला विशेष सुखदायक वाटतं. 
भले, लेखकाला, दिग्दर्शकाला माहिती आहे कि, त्याचं हे लिखाण किंवा स्क्रीनवर दिसणारी चलचित्रेही त्या त्या काळात ज्या व्यक्तीची ती कथा आहे तिच्यासाठी इतकी सुखकर नव्हती. पण जुन्यातील गंमत नि प्रेक्षकांपर्यंत त्याच्या आतील संदेश पोहोचविण्याचा हा छान प्रयत्न ठरतो. 
 -----------------------
या कथेत वाटत जाते कि, जेव्हा अशा स्त्रिया मोठे नाव कमावतात, आपल्या पितृसत्ताक पुरुषाने जर अनाठायी ठरवूनच टाकले तर त्याच्यात केवढा पुरुषार्थ केवढी मर्दानगी आहे कि एक 'आनंदी' तो घडवू शकेल. 
त्यांच्या डॉक्टर होण्याचं स्वप्न, स्वप्न का बनतं हे जेव्हा संवेदना जाग्या ठेऊन बघितलं जात तेव्हा चित्रपटाची तळतळ नि आनंदीबाईंनि त्यावेळी ठरवलेलं ते स्वप्न आजच्यासाठी किती महत्वाचं होतं हे कळत जातं. 
चित्रपटांमधील गाणी हि त्या त्या परिस्थितीला अगदीच पूरक असतात. परंतु गीतांमध्ये सगळ्यात सुंदर गीत आणि त्याचं संगीत जे आवडलं ते म्हणजे 
"'मैत्रीण माझी मीच मला अप्रूप माझे ! वाटा वाटा वाटा गं !
आणि ठेका येतो, 
दर्या दर्या ग, उरात शंभर लाटा ग! "
लहानपणी नवऱ्याने लावलेली अभ्यासाची कडाडून शिस्त...हीच लहानपणीची सवय हळूहळू आनंदीबाईंना स्वतःच अस्तित्व शोधून देते. त्या दोघांचा हा प्रवास ! 
संस्कृती, परंपरा, रीती रिवाज, धर्म थोतांड, पक्षपाती शासन आणि शिक्षण व्यवस्था याना धरून अनेक चित्रपट बनविले जातात, हा चित्रपटही त्यातलाच. पण वेगळा दृष्टीकोन देतात या जिद्दी कथा ! 
------ 
कथेबद्दल बोलू तर,
असामान्य जिद्दीची हि कहाणी आणि त्याला समांतरच गूढ प्रेमकथा!
गोपाळराव हट्टी आडमुठेचं असावे! 
आणि आनंदीबाई या परिस्थितीनुरूप बदल स्वीकारून जिद्दीने पुढे जाणाऱ्या. 
आपल्या 'पत्नीचं स्वप्न' हा गोपाळरावांसाठी अलंकार होता, केवढं सुंदर होतं हे. 
एका जिद्दी स्वप्नाची कथा आहे ही. स्वप्नांच्या जगात संधी मिळतात, त्या बघाव्या त्यातील निवडावी नि पुन्हा त्या स्वप्नाला घेऊन एक सतत चालत राहावं! 
गोपाळ नसते तर आनंदी नसती. किंवा डॉ. आनंदीबाई जोशी झाल्याही असत्या त्या. कारण म्हणतात नं, स्वप्न तुमच्या जन्माबरोबर जन्म घेतात, ते तुमच्याच नावी असतात. स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक ठरतात. 
कुटुंब व्यवस्था, पारतंत्र्य, स्त्री असणं, धर्म मोठा या गुंत्यांपेक्षा शिक्षण हे आदर वाढवते नि जर हा आदर दोघांनी मिळून मिळवायचा ठरवला तर होते सगळे छान, तो खरा संसार असतो! 
हा गुंता सुटला तर एकमेकांची स्वप्न पुरी केली तर होतो संसार ! 
सुंदर समीकरण वाटले, दोघांची स्वप्न एकत्र सूत बांधतात, हा खरा संसार!
----------------

अंतास, 
तो क्षण सुखाचा,
जेव्हा हे स्वप्न साकार होतं. आनंदीबाईंच्या हातात डॉक्टरकीची डिग्री येते. आणि गोपाळराव तिथे येतात, तो क्षण मौल्यवान, अगणित!
कडाडून भरून आलं, आवडलं, भावलं आणि याहूनही अधिक कदाचित!
एका स्वप्नामागे लागून त्या दोघांची धडपड, तो प्रवास, तो पाठलाग त्यातील पडणझडण आणि ते सगळं पूर्ण झाल्यांनंतर त्याने आनंदीबाईंना मिठीत घेणं जणू त्या स्वप्नाला कवेत घेणं होतं.
शेवट करताना तोच समुद्र, तोच पेहराव, त्याच लाटा आणि शेवटी एकमेकांची सोबत साथ, सुखकर ! 
-----------------

फक्त चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शकाने दाखवलेल्या सगळ्या यशस्वी महिला त्यांची नावे आणि त्यांचं कर्तृत्व हे इंग्रजी भाषेत टाकण्याऐवजी मराठीत टाकायला हवी होती. ती संकल्पना सुंदर आहे, पण प्रेक्षक हा बहुतकरून मराठी भाषिक असल्यामुळे त्यांना ते कळायला हवे, म्हणून वाटून गेले. 
फक्त मलाच जाणवले असेल, पण आनंदीबाई या कमी जाणवल्या, गोपाळरावांपेक्षा. हे कदाचित त्यावेळी तसेच घडलेही असेल. सत्य परिस्थिती, लेखकाचा या विषयातील व्यासंग आणि मुखतः या विषयाला हाताळतानाचा दृष्टिकोन.
पण तरीही वाटते, गोपाळरावांची बाजू उजवी दाखवली जास्त? असो, इतिहासातील संग्रहित सगळेच खोटे असते, नाहीतर सगळेच खरे !