Sufi

-मिसेस मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर नापसंती


मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सांडगे वाळत घालणारी बाई पहिली का हो. !
विनोदच आहे हा.
महाराष्ट्रभर गाजलेली आज्या आणि शितलीची बॉर्डर वरची लव्ह स्टोरी संपून त्याजागी एक अशी मालिका आली ज्यावर सोशल मीडियावर बऱ्याच स्त्रियांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया देऊन पोस्ट लिहिल्या. मिसेस मुख्यमंत्री नावाने.
त्या पोस्टींवर कमेंट्सच्या माध्यमातून पुुुुरुषांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न ही केला.
मग मला प्रश्न पडला, आक्षेपार्ह असण्यासांरखं त्यात आहे काय ?
तेव्हा ट्रेलरवरून अंदाज आला.  ही मालिका काल्पनिक पात्र आणि घटनेवर आधारित आहे.  म्हणूनच त्यात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याची बावळट बायको हे समीकरण दाखवले आहे.
जर समजा तुम्हाला कोणी सांगितले. की मुख्यमंत्र्याची बायको ही गाडीवर वडे / सांडगे वाळत घालते तर? किंवा मग मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक चालू असताना बिनडोक सारखी दारातून डोकावून त्यांना आवाज देते, मुख्यमंत्री ऐकत नाही तेव्हा ती खट्याळ पणे म्हणते की, "अहो आज कुणी गडी माणूस नाही तेवढे दळण आणून देता का ?"
मग तिसऱ्या प्रोमोत हे दिसते की मुख्यमंत्री, इतर नेते आणि बायको कुठेतरी जात असते पण मध्येच म्हशी आड येतात तेव्हा बायको गाडीतून उतरते आणि म्हशींना त्यांच्या स्टाईलमध्ये हकलते.
हे हास्यास्पदच नाहीं का?
तरी सोशल मीडियावर स्त्री वादी स्त्रिया यावर बोलता, चिडता आणि भांडताय.
याचं कारण काय असेल ? म्हणजे स्त्रियांना हा विनोद आवडत नाही आणि पुरुषांना तो पटतोय. ?
मग मला वाटलं की विनोदासाठी यांच्याकडे असा बावळट नवरा का दाखवला गेला नाही?
मग प्रश्न येईल की या आधी अस झालं तेव्हा अशा स्त्रियांनी त्या लेखकाची पाठ थोपटली नाही. पण मग आज का या विनोदाच्या पद्धतीला गांभीर्याने घेतलं जात आहे?
तेव्हा मला आठवतात, ते नवरा बायकोचे मेसेजेस. जे प्रत्येक सोशल मीडियावर फिरत असतात. असे वाटते त्याचा आस्वाद घेण्याची सवय लग्न झाल्यानंतर प्रत्येक पुरुष स्वतःला लावतोच. याचाच पुढचा परिणाम म्हणजे आता तर स्त्रियाही हे स्वीकारून त्यावर हसतात. चला हवा येऊ द्या सारख्या प्रचंड लोकप्रिय शोज मधून याचे भागच्या भाग प्रसारित केले जातात.
यावर मन नाही भरत तर मी बघते माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका. तर तुम्ही म्हणाल बायकोला बिझनेस वुमेन दाखवायची तर त्याचा ग्राफ खालून वर असावाच. त्यासाठी बायकोने आधी बावळट असायलाच हवं. याचेच उदाहरण 'पुढचे पाऊल ' सीरियल. त्यामधील बायको धूळ पडलेला लॅपटॉप पाण्यात भिजवून वाळत घालते.
विनोद बुद्धीची वाहवा नाही करावी वाटत. वाटते,
आजही मराठी चित्रपटांना जसे चांगले दिवस येत आहे तसे मालिकांना केव्हा येणार?
मालिकांचे भाग लिहिताना कोणती मानसिकता डोक्यात असेल लेखकाच्या? या बायकोच्या अशिक्षित अडाणीपणाचा बोभाटा, त्यातून प्रेक्षकांकडून वाहवा, तिची भावनिक बाजू, नवऱ्याचा पुरुषीपणा याशिवाय   सिरियल बनणार कशा? आणि बनल्या तरी प्रेक्षक त्या स्वीकारतील? तर अशावेळी आठवण होते ,"एका लग्नाची दुसरी गोष्ट, दिल दोस्ती दुनियादारी सारख्या खुमासदार शैलीत उचलून धरलेल्या मालिकांची.
आज झी मराठी सारख्या ताकदीच्या वाहिनीवर यासारखी कृती दाखवली जाते. पुरुषांचे म्हणणे आहे की, इतक्यात या सीरियलचा प्रोमो बघून मत प्रदर्शन नको, कारण यात पुढे ट्विस्ट असतील. काय ट्विस्ट? कोणती वळणे? जास्तीत जास्त काय होईल ? एक बावळट गृहिणी बायको मुख्यमंत्री होऊन घरासह राज्य सांभाळेल. अशा स्क्रिप्ट लिहून काय होतं माहिती?
पहिले तर या अशा मालिका बघणारा वर्ग गृहिणी आणि जास्तीत जास्त कंटाळलेल्या पुरुषांचा असतो. त्यामुळे लेखक विचार करतो, या प्रेक्षक वर्गाच्या आवडीनुसार आणि अपेक्षेनुसार मालिका बनवू. म्हणजे माझी लेखणीही गाजेल आणि प्रेक्षकही खुश. पण असे प्रयोग खूप कमी होतात जिथे लेखक आपल्या लेखणीतून अनपेक्षित कलाकृती बनवतो. ज्यातून जास्त काही नाही पण आपण जे लिहिलं त्यातून मानसिकतेत बदल होतो.

मला माहिती आहे आपला समाज ना कीर्तनाने सुधारला ना तमाशाने बिघडला. पण मला हे चूक वाटतं, कारण गृहिणीच्या वागण्यात मालिकांमुळे नकळत एक बदल घडत असतो कारण मालिकांचे आयुष्य हे जास्त असते.  त्यामुळे बघणाऱ्यांच्या कानावर, डोळ्यावर, मनावर हे नकळत परिणाम करत असते. आणि एखादी गोष्ट सतत कानावर पडत राहिली की आपणही ती तशीच आहे असे मानून चालतो. त्यामुळे आपला समाज हा बदलत्या मानसिकतेचे नाटक करतो. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने विडंबन करून स्त्रियांचं सामर्थ्य पचनी पाडण्याचा लेखकाचा प्रयत्न प्रामाणिक का असेल पण या सगळ्याची गरज नाही वाटत.
कारण देश इतकी शतके पुढे गेला तरीही आजही बाष्कळ आणि बावचाळलेली विनोद बुद्धी बदललेली दिसत नाही. आपली पायामुळे आणि संस्कृती लोक सोडत नाही, सोडणार नाहीत. त्यामुळे हे असे केविलवाणे प्रयत्न एखाद्याच्या दुर्बुद्धी ला आवडणारे असतील पण त्याचे नकारात्मक परिणाम होत असतात.
विनोद बुध्दीचे प्रकार नसतात. तीही लिंग भेदात विभागलेली असते. हे माझं विधान काहीसं स्त्रीवादी असेलही पण मला चुकीचं वाटत नाही. कारण माझ्यासमोर दोन उदाहरणे उभी राहतात, एक काल संसदेत रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वापरलेली विनोद पद्धती आणि तीच विनोद बुद्धी  स्त्रियांवर विनोद करायचे म्हटले की तिचा कमीपणा लक्ष्यकेंद्री करून किंवा जास्तीत जास्त तिच्या शरिरपर्यंत मर्यादीत असते.

त्यामुळे स्त्रीवादी न होता हा केविलवाणा प्रयत्न नाकारण्याचे धाडस करेल. पण या मालिकेच्या पूर्व जाहिरतीवरून लेखक काहीतरी शिकेल, अशी अपेक्षा .

विनोदबुद्धी की मागासलेपणाचे प्रतिबिंब

by on जून २३, २०१९
-मिसेस मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर नापसंती मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सांडगे वाळत घालणारी बाई पहिली का हो. ! विनोदच आहे हा. मह...


"दूर ५० मीटरवर एक बाबा उन्हाळ्यात पाणी, आईसक्रीम विकत बसलेले दिसतात."

त्यांच्याशी संवाद वाढवायचा, त्यांना म्हणायचं,
"काय हो बाबा, हि दगडं कशी पडली?" यावर ते त्यांच्या रोजच्या पर्यटनाची कॅसेट सुरू करतात.
त्यात एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली जाते, "ते तुम्हाला आवडतेय ना दूरवर ते झोपडीचं ठिकाण. तिथे अजिबात जाऊ नका ( दबक्या आवाजात).
हे काहीतरी थ्रिलिंग वाटत होतं म्हणून मी त्यांना विचारलं, "का हो बाबा? छान आहे कि ती झोपडी. या मंदिरासारखी पडलेलीही नाही."

त्यावर ते काहीच आश्चर्य न दाखवत म्हणू लागतात, "काही दशकापूर्वी त्याच दूरवरच्या झोपडीत एक वर्हाड गेलं होतं. तेव्हा झोपडीच्या तिथून लागलीच मंदिरात यायला भुयार होतं. लोकं पाण्यामुळे तिथून ये-जा करायचे. पण एके दिवशी त्या भुयारातून गेलेलं जोडपं अन त्यांच्याबरोबरच वऱ्हाड पुन्हा कुठे कधीच दिसलही नाही आणि मंदिरापर्यंत पोहोचलही नाही. त्यामुळे इथून जाताना थोडं जपून!
तेथील कोरडी जमीन, अनोळखी माणसे आणि हे वेगवेगळे किस्से यामुळे मनाचे आधीच भीतीने खिळखिळे झालेले फुफ्फुस हळूहळू स्वतःला समजावू लागताच ते पुढे म्हणतात,
"तुम्ही आता ज्या उंच कळसाला पाहत आहे ना, त्याची दगडं आतून पोखरली गेली आहे आणि ते बाजूचं वेगळं पडलेलं मंदिर आहे ना, त्याच्या आत गेले की एका वृत्तपत्राच्या पानावर कुंकवाचे सडे दिसतील. त्या आतल्या भागाला ओलांडण्याचे चुकूनही धाडस करू नका."
तरी बरे त्यांनी सांगायच्या पूर्वीच ते धाडस मनाने करून झालेलं होतं. त्यामुळे मनात कसलाच किंतु न ठेवता ते अनुभवले तरी.
त्यात वेगळं काही नव्हतं. कारण 'कुंकवाचा पडलेला लाल सडा हा मनाला अडवेंचर जगायला शिकवतो.'
मी ते डोळ्यासमोर आणून बाबांचं ऐकू लागते.
बाबा बोलू लागतात, "अन् त्याच एकट्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूच्या शिळांना दुसऱ्या एका बारीक दगडाने वाजवून पाहा. तिथे असलेल्या प्रत्येक पाच दगडातून वेगवेगळा आवाज येतो. हा प्रयोग मी करून पाहिलाच. तेव्हा मला कळलं प्रत्येक दगडाची ठेवण ही वेगळी आणि काही दगडे ढीली झाली आहेत. बरीच कारणं असू शकतात. त्यामुळे या गोष्टीला मी घाबरले नाहीच.
मग "हा मंदिराच्या बाजूलाच एवढ्या मोठ्या दगडांचा ढीग कसा? "

मी खूप वेळ त्या ढीगाकडे पाहत होते, तेव्हापासून डोक्यात सतत चालू होतंच. तोच ते म्हणाले, "हा मंदिराच्या बाजूलाच एवढा मोठा दगडांचा वेडावाकडा ढीग तो त्या काळात होता मोठा तटबंदी दरवाजा."
असे वाटले जसे काही वर्षांपूर्वी घडलेलं सगळंच कल्पनेच्या स्वरूपात माझ्यासमोर पात्रांसकट उभे राहिले. हा सगळा एका नव्वद वर्षाच्या मूर्त माणसांकडून मिळालेला 'पळसदेव'चा वसा.
यावरून त्यांना हे सांगायचं होतं की, आजही हे मंदिर म्हणजे पुरातन घटनांचं वास्तव्य असलेलं ठिकाण आहे.

मी होकारार्थी मान डोलावत पुढे आले खरी. पण डोक्यात या जुन्या समजुतीचे पारायण चालू होते.
उर्वरित प्रश्र्नांपैकी "नेमकं त्या जोडप्याचं काय झालं असेल ?" एवढा प्रश्न अनुत्तरित राहत होता.
तेव्हा मंदिराच्या इतिहासाची उत्सुकता चाळवली -
पळसदेव गावात असलेलं हे पळसनाथ मंदिर. चालुक्य राजाने, ८ ते ११ या तीन शतकांमध्ये हेमाडपंथी पद्धतीने बांधले. पुण्याहून हे मंदिर १३० किलोमीटरवर आहे. जायला साधारण ३ तास लागतात.
पुण्याहून सोलापूर रस्त्याने जाताना, भिगवाणच्या पुढे गेल्यानंतर उजनी धरणाची मागची बाजू दिसू लागते. त्या मागच्या बाजूचा रस्ता कापत कापत जेव्हा हळूहळू पुढे जाऊ लागतो.
तिथे दूरवर अर्ध्या पाण्यात एक जुन्या घडणीतलं मंदिर दिसू लागतं. हे काहीतरी चित्रपटाच्या शूटिंगची आठवण करून देणारं असतं. 
या मंदिराचा एक स्वतःचाच नियम असतो.
पाणी खूप असेल तर पाण्याचा फक्त वरचा भाग किंवा कळसच दिसतो. परंतु सध्या महाराष्ट्रातल्या दुष्काळाने होरपळलेल्या जमिनींमुळे पानी पातळी प्रचंड प्रमाणात खाली गेली आहे. त्यामुळे हे विदारक चित्रण असले तरीही, पळसदेव बघणाऱ्यांसाठी हा एक विचारात पाडणारा पण पर्वणी अनुभव असतो. 
कारण काही वळणे पार केल्यानंतर एका पॉईंटला पोहोचल्यानंतर स्वतःची वाहने आपण नेऊ शकत नसतो. केरळात असते तसं ह्या बाजूने त्या बाजूला जायचे तर प्रत्येकी ५० रुपये नाववाल्याला देऊन मंदिरापर्यंत पोहोचणे शक्य होते.

त्यानंतर हळूहळू वातावरणाचा अंदाज घेत मन प्रसन्न आणि नवं खाद्य मिळाल्यासारखे कावरबावर होऊन सगळचं न्याहाळू लागते. प्रवास पाण्यातून जाणारा असल्यामुळे मन मंदिरापर्यंत पोहोचण्याआधीच प्रसन्न होऊन जाते. नावाडी हे दिवसातून अशा अनेक पर्यटकप्रेमींना हे सुख देत असतात. त्यांची कमाई दिवसाला अंदाजे सातआठशे होते, असे हा प्रवास करताना त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर लक्षात येते.
इथे प्रामुख्याने दोन मंदिरं आणि एक धर्मशाळेची परस आहे.

या मंदिरांच्या आवारात जरी मन प्रसन्न होत असले तरी एका दृश्याने मनाची घालमेल होते कारण येथील मुख्य मंदिराच्या कळसाला ज्या आखीवरेखीव दगड, शिळांचा आधार आहे. त्यावर संपूर्ण टोकापर्यंत, कळसाच्या भागापर्यंत चपला घालून, धडधड आदळत वर जाता येणं शक्य आहे. 
हि एक व्यक्ती म्हणून लज्जास्पद मानसिकता आहे कारण येथे जाणारे लोक हे त्या मंदिराची डागडुजी किंवा बांधकाम बघायला न जाता ते तिथे सेल्फीज, टिकटॉक व्हिडीओज किंवा फोटोज काढून सोशल मीडियावर कुल दिसण्यासाठी जातात. त्यामुळे इथे एखादीतरी 'दिशादर्शक' पाटी असावी. जेणेकरून त्या मंदिराचे पावित्र्य आणि त्यावरील भाग विस्कळीत होणार नाही. 
१९७८ला जेव्हा उजनी धरण बांधले गेले त्यांनतर हे मंदिर फक्त इ.स. २००१, २०१३, २०१६, २०१९ ला पाण्याबाहेर आले होते. 
मंदिराच्या दिशेने गेल्यानंतर पात्रे, चौकोनी खांब, लवा, बेल, स्तंभ या पंचशाखांच्या पायाभरणीवर सुस्थितीत दिसते. नंदी, मरगळ, सुंदर शरीरयष्टी असलेले आणि अजंठा लेण्यांवर कोरलेले दगडातील शिल्प इथेही आहे, जुन्या दगडांना हे कोरलेले दगड शोभून दिसतात. 
मंदिराची भटकंती झाल्यानंतर पाऊलं आपोआप उजनी धरणाच्या पाण्याकडे जाऊ लागतात, कारण उन्हाच्या झळांनी लाही लाही झालेला प्रवास दूर लोटण्याचा प्रयत्न त्यात असतो. महाराष्ट्रातला दुष्काळ त्या उजनीच्या पाण्याच्या बाहेर असलेल्या जमिनीत भेगा खोदून खोदून झिरपलेला दिसतो. तेव्हा पायाला मेलेले मासे, खेकडे आणि बगळे लागतात. तरीही येथे येणाऱ्या पक्षांची उजनीसोबतची नाळ तुटत नाही. ते याचा मनसोक्त आनंद एखाद्या कट्ट्यावर बसून लुटत राहतात.



मन आतापर्यंत हा दुष्काळ स्वीकारण्याची तयारी करतो कारण प्रवासात आणलेली पाण्याची बाटली हि पळसदेव लागायच्या आधीच संपलेली असते आणि बाबांकडून विकत घेतलेल्या पाण्याने कोरड संपत नसते. जेव्हा दुष्काळ आपल्यापर्यंत पोहोचतो तेव्हा त्याची झळ, दाहकता आणि त्यातलं वास्तव याची धग जाणवू लागते. ते कोरडे दृश्य मनाला वाचा फोडू लागतं.


उजनीला आलात पण उजनीचे 'मासे' नाही खाल्ले असे मांसाहारी नाहीत. त्यामुळे भिगवणची खासियत म्हणून तिथल्या चवदार, बोटे चाखत बसावे अशा माशांचा धंदा करणारा व्यापारीही मंदिराच्या ५० मीटरनंतर तुमची वाट पाहत असतो.
परतताना जास्त काही नाही पण मंदिराचं सौंदर्य, गुपितांची कुपी अन् बाटलीच्या तळाला लागलेल्या पाण्याच्या घोटाचं महत्त्व अधोरेखित करून मन नाविन्याने पण खिन्न होऊन जाते.



सुचत नाही कधी कधी... सुन्न व्हायला होतं. सगळं आयुष्य रुक्ष वाटू लागतं. जेव्हा डोकं 'डिप्रेशन ' नावाच्या राक्षसाच्या तोंडात जाऊ लागते. मन हात वर करून त्या खोलात जाणाऱ्या ' स्वतःला ' बाहेर ओढत असते, पण डोक्यातल्या डिप्रेशनने स्वतःवर ताबा मिळवलेला असतो.
नकारात्मक सहवास, एकटेपणा, स्वतःशीच बोलणे, तर्क वितर्क लाऊन स्वतःवर प्रेम न करणे, स्वतः बद्दल शंका उपस्थित करणे, खूप खूप मेहनत करून सतत अपयशच येणे, करीयरच्या टप्प्यात आपल्याला हे जमत नाहीये अस वाटणे यामुळे हे डिप्रेशन अधिकाधिक वाढू लागतं.
माझं तसचं होऊ लागलंय.
माझं वय कमी आहे असं आजूबाजूचे म्हणतात.
हेही म्हणतात की, तू राहते, दिसते, हसते सगळं नॉर्मल आहे. मग डिप्रेशन आलंय कसलं. ?
मी माझ्या मनात येणारे असंख्य नकारात्मक विचार टाळू लागते. पण तरीही हे डिप्रेशन जात नाही... मला वाटतं की हा कुठेतरी माझा नाही, माझ्या पिढीचा आणि येणाऱ्या पिढीचा दोष आहे.
त्यानंतरच्या पिढ्या या जन्मतः तयारीनिशी येतील. पण आम्ही जे जन्मलो ते सगळे अर्ध्य्या हळकुंडाने पिवळे होऊन आलो, आणि आजही तसेच आहोत.
वाटते, टिकाव लागावा या स्पर्धेच्या युगात.
वाटते, हातातून काहीच सुटू नये.
वाटते, आपण करू शकतो काहीतरी अचंबित मग का करू नये?
नव्वदीत जन्मल्यांचा हा एकंदरीत  प्रॉब्लेमच झाला आहे. एकतर ते ना तळ्यात ना मळ्यात. ते इतके भरकटले आहे की रस्ताच स्पष्ट नाही आणि रस्ता स्पष्ट नसला की आयुष्याची फरफट होते. आणि ही फरफट म्हणजे "डिप्रेशन."

हे लिहिण्याचे कारण माहिते? काल सोशल मीडियावर एकाने त्याची आत्महत्येची नोट शेअर केली. " मी तुमच्यापासून खूप खूप लांब जात आहे. आई बाबा मला क्षमा करा"
"आत्महत्या? ". मी शंकेने स्वतःलाच विचारले.
"नाही तो असं करणं शक्य नाही. " मीच त्याचं उत्तरही दिले. पण तरीही ही नोट म्हणजे काय होतं ? हे मला सुरुवातीला कळलं नाही. कारण ज्या व्यक्तीने हे लिहिलं होतं, तिच्याबरोबर माझे अनेकदा बोलणं झालेलं. चांगला चोविशितला तरुण तो.
लगेच तातडीने फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्याचं नाव शोधलं आणि कॉल लावला. फोन स्विच ऑफ होता. मला त्या पोस्टचा तर्क लावायचा नव्हता. कारण तो आत्महत्या करेल, असं कधी मनातही आलेलं नव्हतं. कारण, तो आताच्या पिढीतला तरुण होता. पण तो 'आताच्या पिढीतला' हे मी अनवधानाने विसरत होते.
तेव्हा मी स्वतःपासून विचार करू लागले. ही आताची तरुण पिढी म्हणजे नव्वदीत जन्मलेली उनाड बालकं. ज्यांना लहानपणी वाटायचे, आयुष्य हे  लहानपणी नकळत, निरागसपणे जगण्यासाठी आणि मोठं झालं की, जाणते होऊन पोटा पाण्यापुरत कमावण्यासाठी असते. हे आयुष्याचं प्लॅनिंग जणू लहान असतानाच त्यांचं ठरलेलं होतं.
पण मधल्या काही काळात तंत्रज्ञानाचा वापर जो भरमसाठ वाढला आणि झपाट्याने स्पर्धा वाढू लागल्या, तेव्हा वर्गातल्या एका विद्यार्थ्याला पहिलं येऊन चालत नाही, या स्पर्धेत चिरडले जाऊ नये म्हणून प्रत्येकाला स्वतःची ओळख घेऊन फरफट करत का होईना रस्ता कापावा लागतो. तसं या नव्वदितल्या मुलांचं झालं.
ही स्पर्धा म्हणजे कोणतंही ध्येय असो, चालत रहा, जिथे चालणं थांबेल तिथे तुमचे विचार थांबतील. आणि विचार थांबतील तेव्हा तुम्ही या स्पर्धेच्या खूप मागे गेलेलं असाल.
मला भीती हीच वाटते, जर आपण मागे पडलो या स्पर्धेतून तर?

आताच्या तरुणाईसाठी दोन गोष्टी एका तराजूत असतात,
"जगणं आणि स्पर्धा."
जगायचं म्हणजे आठवड्यातील पाच दिवस नोकरी, रात्री निवांत झोप, घरातल्यांबरोबर जेवण, आठवड्याचे शनिवार रविवार सुट्टी आणि सोमवार पासून पुन्हा कातरवेळी फिरायला गेलेलं मन जागेवर आणून कामाला लागणे. पण जेव्हा हाच तराजू स्पर्धेच्या पारड्याकडे झुकवावाच लागतो तेव्हा मात्र हाच तरुण दिवस-रात्र फोनचा डब्बा डोळ्यासमोर धरून स्वतःच्या प्रत्येक इंद्रियांची कसब लावत, स्वतःच्या आतल्या कसोटीला पिळून काढून पणाला लावतो. मग त्यातून कुठेतरी वाहवा मिळाली की तेवढ्यापुरता मनाला, डोक्याला शांतता. कारण स्पर्धेच्या जगात आज जे आहे ते उद्या अदृश्य झालेलं असतं . उद्या नवीन काहीतरी हवंच. रोजचा दिवस आपला नसतो. त्यामुळे रोजचा दिवस आपलाच असावा, या हट्टापोटी आता आता तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकलेली तरुण पिढी रात्र रात्र फोनच्या डब्ब्यात तळागाळात काहीतरी शोधत, बनवत राहते. असं करत करत नोकरीवरून आलेला दिवस संपून पहाटे ४- ५ वाजेपर्यंत स्वतःच्या छंदाचे लाड पुरवत पुन्हा सकाळी १० च्या नोकरीसाठी कंबर कसून , मनाची तयारी करून त्याच उत्साहात ते तयार होतात.
पण हा उत्साह जुन्या पिढीसारखा म्हातारपणापर्यंत टिकत नाही. याचे कारणच ही, तरुणाई ही कमी-अधिक वेगाच्या रेषेत पुढे जाते. समतोल नाही यात. यामुळे डोक्यावर ताण येऊ लागतो.
शिवाय या स्पर्धेच्या युगात डोक्याच्या प्रत्येक तंतूला कामाला लावलेलं असताना घरात गेलं की घरातल्यांची वेगळीच अपेक्षा असते. पिढीतले हे अंतर त्यावेळी समजून सांगण्याच्या परिस्थितीमध्ये तरूणाई नसते. त्यामुळे घरातल्यांनी फायद्याचे सांगितले तरी ते टाळले जाते. यामुळे हळूहळू घरातून खटके उडू लागतात. आणि परिणामी, बाहेरचे टेंशन असतेच त्यात घरातून बाहेर पडताना बाहेरचे टेंशन यामुळे डोकं सतत जड वाटू लागतं. आपण हसायचा प्रयत्न केला तरी हसू येत नाही, कुणाला मदत करावी वाटते पण शरीरात उर्जाच शिल्लक राहत नाही किंवा मग कधीतरी हे सगळं आपण करतोय ते चूक करतोय हे कळत असूनही आपण स्वतःच्या मनातल्या मनातच चिडचिड करू लागतो. सगळं जग दुष्ट वाटू लागतं.
यात हळूहळू एकेका घटनेची भर पडत जाते आणि ही डोक्यातल्या गच्च भरलेल्या किड्यांची संख्या वाढू लागते. मनाला कोचे पडून जातात, पोखरून जाते आपलीच विचार शक्ती. तरीही हे थांबत नाही आणि अस करत करत सगळे आतले प्रयत्न करून झाले की मन थकते. मग ताबा मेंदू घेऊ लागतो आणि मेंदूकडे ताबा जाऊन गोष्टी अधिकच अनपेक्षित घडू लागतात. आणि शेवटी मनासमोर हार मानलेला मेंदू आत्महत्येच्या खोल दरीत मारून टाकायला जातो स्वतःला.
यानंतर मला बोलावंसं वाटतं...

आमची पिढी चुकतेय.

स्पर्धा आहेत.
खूप आहेत.
आता तर जागतिकीकरणानंतर त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाल्या आहे. पण आपण थोडे थांबूया. थोडासा कणाकणाने विचार करूया. थोडासा या मौल्यवान आयुष्याचा विचार करूया! 
पूर्णच थांबून जाण्यापेक्षा आपली स्पर्धेत राहण्याची गती मंद ठेवूया, जितकी तुम्हाला झेपेल तेवढीच आणि एक मात्र करूया, फोनच्या डब्ब्यात सुख शोधणं बंद करू.
एकटेपणा आला की फोन घेतो आपण. हे घाणेरडं व्यसन आहे. कारण जेव्हा मनाला संवाद करायचा असतो तेव्हा जीवंत माणसेच लागतात समोर. पण सोशल मीडियावर होणारा संवाद हा डोक्याने केला जातो. कारण चॅटिंग करताना, पोस्ट करताना, कमेंट करताना आपण नेहमीच प्रत्येक शब्दाचा विचार करतो. डोक्याला विचार करण्यासाठी वेळ देतो. पण तसं प्रत्यक्षात माणूस समोर असेल अशावेळी बोलताना आपले हावभाव, आपले मन जो स्वभाव असेल तसं व्यक्त होत जातो. 
सतत डोक्याने होणारा मशिनसारखा संवाद तुमच्या मनाच्या उत्साहाला, ऊर्जेला अधिक निकामी करत आहे.
"दिवसातून किमान ५ लोकांबरोबर बोला, यामुळे तुम्ही विचार न करता मनापासून बोलाल" आणि जेव्हा कमी विचार असतील तेव्हा कामही अधिक होईल आणि हळूहळू स्वतःचं अस्तित्व तयार होईल. जेव्हा मन सुदृढ असेल तेव्हा आयुष्य सुंदर वाटेल.
डीप्रेशनचा प्रवास सुरू होतो. हे तडकाफडकी नसतं. कारण डिप्रेशन हा डोक्याने घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे अशा आत्महत्येच्या वाटेवर जाणाऱ्या तरुणाईने लोकांशी बोलावं. कोणीही अनोळखी असो बोलायचं. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या आयुष्याचा विचार करायचा. रस्त्यावर जाणाऱ्या किती लोकांच्या चेहऱ्यावर आज हसू आहे हे बघायचं. जगात एवढी लोकसंख्या आहे त्यात स्वतःला कशात तरी सतत गुंतवून ठेवायचं. त्याशिवाय हे एकटेपण दूर होणार नाही.
एकटेपणाचा मोह असतो, ते व्यसन करू नका...
नाहीतर स्वतःच स्वतःचा इतका तिरस्कार करू लागाल की स्वतःचाच जीव घ्याल !
त्यामुळे समाज कितीही खराब, सडक्या मनोवृत्तीचा म्हणत असलो आपण तरी त्यातले आपले आवडते लोकं निवडायचे आणि त्यांच्याशी मूर्त स्वरूपात तोंडाने बोलायचं. व्यक्त व्हायचं. ही खरी  प्रक्रिया सुरू करायची...
एवढाच एक उत्तम उपाय डिप्रेशन विरोधात लढण्यासाठी मला वाटतो. कारण हे तंत्रज्ञानाच्या युगात कंप्युटरच्या निर्जीव दगडासमोर बसणे, सोशल मीडियावर पोस्ट करणं, त्यावरच जगणं, खुश होणं, हे मशिनच्या प्रजातीचे लक्षण.
मशीन होणं माणसाला जमणार नाही, त्यामुळेच तो डिप्रेशनमध्ये जातो. त्यावर लोकांचा लोकांबरोबर असलेला मुक्त संवाद वाढायला हवा, एवढेच कळकळीने वाटते.



आधुनिक पिढीच्या या कुलनेस ट्रेंडचा फायदा बर्याचदा सामाजिक उपक्रमांत होतो. याचीच अनेक उदाहरणे आणि तरुण पिढी या निषिद्ध विषयाला कसे हाताळते याची माहिती...


मासिक पाळीचे इमोजी 
सोशल मीडियावर पहिल्यांदाच दाखल झालेल्या मासिक पाळीबद्दलच्या इमोजीला स्त्रियांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ४७% स्त्रिया असे म्हणत आहेत की, या इमोजीमुळे त्यांना मासिक पाळीबद्दल अधिक उघडपणे बोलता येईल. स्त्रियांच्या मनातल्या गुजगोष्टींना, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षांना संवादाचे खुले आकाश मिळावे यासाठीच्या उपक्रमांमध्ये या इमोजीला गणले जात आहे.
मासिक पाळी किंवा पिरियड इमोजी हे त्याविषयीच्या संवादाचे प्रतीक आहे. जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येचे प्रत्यक्ष जीवनानुभव या इमोजीमधून व्यक्त होतील. स्त्रियांच्या शारीरिक, आरोग्यविषयक समस्यांवर अधिक गंभीरपणे चर्चा होईल. खरेतर ही इमोजी सोशल मीडियावर यायला बराच उशीर झाला आहे.

भारतीय निर्माती गुनीत मोंगा यांच्या पिरियड: एन्ड ऑफ सेन्टेन्स' या लघुपटाने जिंकला ऑस्कर! 

भारतात मासिक पाळीच्या मान्यतांवर आधारित लघुपट पिरियड: एन्ड ऑफ सेन्टेन्स'ने  ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट श्रेणीत या लघुपटाने पुरस्कार पटकावला. चित्रपटात प्रामुख्याने भारतातील महिलांची मासिक पाळी आणि या काळात त्यांना येणा-या अडचणी यावर भाष्य केले आहे. २५ मिनिटांच्या या लघुपटात दिल्लीनजिकच्या हापुड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सत्य घटना सांगितली आहे, ज्यात सॅनिटरी नॅपकीन बनवणा-या काही महिलांची कथा रेखाटण्यात आली आहे.

मासिक पाळीसाठी सुट्टी 

महिलांच्या मासिक पाळीविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यात मासिक पाळीचे दिवस महिलांसाठी अतिशय वेदनादायी असतात. याची दखल घेत कल्चर मशीन या डिजिटल मिडीया कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर करण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे.

28 मे रोजी 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस' सुरु करण्यात आला.
    
मासिक पाळी स्वच्छता दिवस (एमएचएम) हा मासिक पाळीत स्वच्छता कशी पाळावी याचे महत्त्व दर्शविण्यासाठी २८ मे हा वार्षिक जागरूकता दिवस म्हणून घोषित केला गेला आहे. २०१४ मध्ये जर्मन-आधारित एनजीओ डब्ल्यूएएसएच(वॉश) युनायटेड यांनी ही सुरुवात केली. जगभरातील महिला आणि मुलींना याचा फायदा व्हावा हा त्याचा उद्देश होता.

पॅडकेअरहे सयंत्र 

इन्फोसिसमध्ये कार्यरत असणाऱ्या पुण्याच्या अजिंक्य धारिया या मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या तरूणाने मासिक पाळीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडची संपूर्ण विल्हेवाट लावण्यासाठी पॅडकेअरहे सयंत्र विकसित केले आहे. रासायनिक आणि यांत्रिक प्रक्रियेचा वापर करून यात पॅडची विल्हेवाट लावली जाते, त्यानंतर शिल्लक राहणारा कचरा प्रक्रिया करून पुन्हा वापरणे शक्य असल्याने त्या कचऱ्याला मोल मिळणे शक्य आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये हे सयंत्र बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असून महिलांची वसतिगृहे, कॉर्पोरेट कार्यालये, विद्यापीठे आणि रूग्णालये येथे त्याचा योग्य वापर शक्य आहे. त्याचा आकार आटोपशीर असल्याने एका स्वच्छतागृहातही ते बसवणे शक्य आहे. विजेवर चालणारे हे उपकरण कितीही वेळा वापरणे शक्य आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या तशा प्रकारच्या यंत्रांच्या तुलनेत हे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे.

मासिक पाळीतील दुखण्यावर औषध
मासिक पाळीतील दुखण्यावर आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी  सांफे रोल ऑनहे वेदनाशामक औषध विकसित केले आहे.  वैद्यकीयदृष्टय़ा गुणकारक असलेल्या तेलांचा वापर करून हे औषध बनवण्यात आले आहे. मासिक पाळीच्या काळात ओटीपोट, पाठ आणि पायांमध्ये होणाऱ्या असह्य़ वेदनांवर या औषधाचा वापर केला असता वेदना कमी होणे शक्य असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. दहा मिलीच्या दहा रुपये किमतीच्या पॅकिंगमध्ये हे औषध उपलब्ध होणार आहे.पाळीच्या त्रासामुळे कुठलेही महत्वाचे काम सुटू नये म्हणून या समस्येवर औषध तयार करण्याची गरज प्रकर्षांने जाणवली. सात महिन्यांहून अधिक काळ यावर संशोधन केले. हे औषध संपूर्ण नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या औषधाच्या वापरातून कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने देखील यावर शिक्कामोर्तब केले आहे.

युट्युबवरील नवनवे प्रयोग
जिथे एका बाजूला पॅड्सच्या जाहिराती पाहून पालक लाजिरवाणे हावभाव देतात, तर दुसरीकडे याचा विरोधाभास दिसून येतो.
कारण सॅनिटरी पॅड्सचा किंवा कुठल्याही नैसर्गिक प्रक्रियेचा प्रसार हा केवळ पारंपरिक माध्यमातून व्हावा असे नाही. हेच सिद्ध कारण्यासाठी आताच्या घडीला युट्युबवर जेव्हा सॅनिटरी पॅड्स हे नाव टाकलं जात. तेव्हा अनेक उत्तम जाहिराती असलेला संच समोर येतो किंवा सॅनिटरी पॅड्सचा प्रसार करणारा उत्तम आशय असलेला लघुपट पहिल्याच क्रमांकाला असतो.
त्यातील उत्तम चॅनेल्समध्ये खालील नावांचा समावेश होत आहे;
१.      बीइंग इंडियन
२.      व्हिटॅमिन स्त्री
३.      गर्लियाप्पा


आधुनिक काळातील मासिक पाळी!

by on जून ०३, २०१९
आधुनिक पिढीच्या या कुलनेस ट्रेंडचा फायदा बर्याचदा सामाजिक उपक्रमांत होतो. याचीच अनेक उदाहरणे आणि तरुण पिढी या निषिद्ध विषयाला कसे हात...