Sufi

तुम्ही जाहिराती किती बघतात ? रिमोटसारखा नियंत्रक आपल्या हातात असतो. पण तरीही जाहिराती कळत नकळत कानावर डोळ्यांवर पडत असतात. यांचा बोध प्रेक्षकवर्ग काय घेतो? त्या जाहिराती अशा का बनविल्या जातात? त्यातील प्रत्येक घटकामागील उद्देश नेमका काय? आशयाचे प्रयोजन काय? अशा अनेक उपघटकांचा यात समावेश असतो. त्याची तपशीलवार मांडणी...

पूर्वीची माध्यमांची भूमिका   
                     
काही वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. टीव्हीवर 'त्या' जाहिराती लागल्या की घरातल्या वडीलधारी मंडळी एखाद्या कंडोम्सची जाहिरात आल्यासारखे चॅनेल बदलायचे,  आई वैतागायची आणि आमच्यासारख्या किशोरवयीन मुलांना नेमका प्रश्न पडायचा - पांढऱ्या पट्टीवर निळं पाणी ओतलं की नक्की काय होतं? आणि  जाहिरातीतल्या मुली एवढ्या लाजून का वागतात किंवा मग 'त्या दिवसांत' फक्त पांढरे कपडेच का घालतात, हे समजायचे नाही. हे कदाचित जाहिरातींच्या अपुऱ्या संदेशवाहनामुळे किंवा काही बाबी हेतुपुरक झाकून ठेवल्यामुळे याबाबत प्रसार होणे तर दूरच पण उघडेपणाने बोलल्यास गुन्हा वाटायचा.
याउलट आताची परिस्थिती मोठया प्रमाणात बदलली आहे. मासिक पाळीसंदर्भात जाहीर चर्चा होत आहे. महिलांच्या आरोग्याच्या मुद्दयांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. गोरगरीब स्त्रियांना मोफत सॅनिटरी पॅड देण्याची मागणी होत आहे.
पूर्वी जाहिराती मुद्द्यावर बोट ठेऊन बोलत नव्हत्या. जाहिरातींच्या दृकश्राव्याचे स्वरूप हे 'उन दिनों' का मामला! म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात असे आणि दुकानात गेलं की दुकानदार त्याच्याकडे असेल तो सॅनिटरी पॅडसचा पुडा घाईघाईनं काळया पिशवीत कोंबून देत असे.
१९९० मध्ये सॅनिटरी पॅड्सच्या जाहिरातींना बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सॅनिटरी पॅड्सच्या जाहिरातींचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. परंतु तरीही सॅनिटरी पॅड्स हे चैनीचे उत्पादन असल्यासारखे त्याचे चित्रीकरण असते, ते जागरूकतेची दृष्टिकोनातून व्हायला हवे.

४.२ प्रेक्षकांसाठी जाहिराती
·         जाहिराती प्रेक्षकांच्या माहितीचा स्रोत ठरत आहे.


 मासिक पाळीवरील जाहिराती जरी लैंगिक, विचित्र आणि चुकीच्या वाटत असतील तरीही बर्याच लोकांसाठी मासिक पाळीच्या जाहिराती या मासिक पाळीबाबत ज्ञान मिळण्यासाठी माहितीचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत ठरला आहे. या जाहिराती मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचतात. त्यामुळे  या जाहिरातींत मासिक पाळीचा कलंक आणि लज्जा पसरविण्याची क्षमताहि आहे किंवा दर्शकांना सूचित आणि सशक्त करण्यात त्या सक्षम ठरतात. सन 1920 च्या सुमारास सॅनिटरीविषयक ऍप्रॉन आणि बेल्ट्सचा वापर केलेली पहिली छापील जाहिरात आली. त्या जाहिरातीत तारतम्य बाळगून सोयीस्कर आणि "स्त्रीची आतील समस्या" याचे निराकरण करण्याचे वचन दिले गेले आणि त्यानंतर अनेक जाहिरातींची सुरुवात झाली. ती आजही चालू आहे.

जाहिरातींचे चित्रीकरण

·        चित्रित केल्या जाणाऱ्या जाहिराती या अचूक असतात का ?
सॅनिटरी नॅपकिन्सवरील अपवित्रतेचा टॅबू सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिरातींमधून दर्शविला जातो, ज्यात मासिक पाळीबद्दल ते बोलतात. भारतातील सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती, 'पसंती' आणि 'स्वातंत्र्य' सारख्या शब्दांचा वापर करून नारे देतात. परंतु यासारख्या नाऱ्यांतून नकळत त्या जाहिराती महिलांच्या शरीरावर स्तरित नियंत्रण ठेवणारी कथा बळकट करत असतात. कारण या ब्रॅंड्सची नावेच मासिक पाळी या टॅबूला टॅबू बनवतात. उदाहरणार्थ; विस्पर म्हणजे कुजबुजणे किंवा स्टे फ्री म्हणजे मुक्त राहा.  स्वच्छता, कम्फर्ट आणि आरोग्य या नावे सॅनिटरी नॅपकिन्स खपवली जातात. परंतु आजही ती एक 'गरज' म्हणून विकली जात नाहीत.

दूरचित्रवाणीवरील चित्रित केल्या जाणाऱ्या जाहिराती या अचूक असतात का ?
भारतीय दूरचित्रवाणीवरील जाहिरातींमध्ये मासिक पाळीची उत्पादने कोणत्या पद्धतीने दर्शवितात त्यावर अवलंबून असते कि समाज त्याला कशाप्रकारे समजून घेतो. काहीवेळेला या जाहिराती अप्रत्यक्षपणे केवळ मासिक पाळीच्या अंधश्रद्धांना चित्रीकरणातून अयोग्य आणि निषिद्ध असल्याचे दर्शवितातच त्याचबरोबर त्या  आणखी प्रमाणित करतात.
उत्पादने विक्री व्हावी, या एकमात्र उद्देशाने जाहिराती तयार केल्या जातात. त्यामुळे उत्पादकांनी जरी मासिक पाळी या विषयाबाबत समाजात नकारात्मक सांस्कृतिक दृष्टीकोन प्रकट केला तरी उत्पादकांना त्याचा काहीच फरक पडत नाही,  आणि परिणामी, स्त्रियांच्या शरीराला जोडलेली कलंक बळकट होत जातात. जोपर्यंत उत्पादनाची विक्री होत आहे तोपर्यंत ते सर्व चांगले आहे.
या अभ्यासाचा उद्देश हाच कि, भारतीय जाहिरातींमध्ये मासिक पाळी कशी दर्शविली जाते आणि या जाहिरातींमध्ये वापरल्या जाणार्या आवर्ती प्रतिमा आणि भाषेचा अंतर्निहित अर्थ कसा असतो, याचे विश्लेषण करणे.
स्टेफ्री या ब्रॅण्डची 2008 ची जाहिरात 'किसी भी रूप के साथ समझौता नहीं' या टॅगलाइनचा वापर करून ती बनवली गेली. ज्यात सादरीकरण करणारी मुख्य भूमिकेत असलेली स्त्री असा संदेश देते कि, तिला आता जी वाटेल ती भूमिका मग ती शिक्षिका असो किंवा मुलगी ती त्या भूमिका निभावू शकेल. पाळीच्या दिवसांतही तिला तिच्या निवडीबरोबर तडजोड करावी लागणार नाही आणि हे सगळे शक्य आहे स्टेफ्री, अल्ट्रा थिन, सुरक्षित, कोरड्या सॅनिटरी पॅडमुळे.



अप्रत्यक्षपणे जाहिरात असे दर्शवत आहे कि, एखादी स्त्री तिच्या खर्या ओळखीशी कशा प्रकारे तडजोड करत आहे किंवा तिच्या पाळीच्या काळात असताना तिचा आत्मविश्वास कसा कमकुवत असतो. किंवा मग मासिक पाळी हा एखाद्या प्रकारचा रोग असल्याचे दर्शवितात.



२०१३च्या विस्परच्या एका जाहिरातीमध्ये पांढर्या रंगाचा वापर दिसून येतो. जाहिरातीतल्या मुख्य भूमिकेतील महिलेच्या कपड्यांपासून बेडच्या चादरीपर्यंत सर्व काही पांढरे आहे. अगदी भिंती आणि पडदे पांढरे आहेत! ग्राहकाला त्वरित स्पष्टपणे हे दिसून येत नाही कि येथे पांढरा हा एक महत्त्वाचा घटक आहे, जो नियमित आनंदी दिवसांमधील - आणि 'त्या दिवसांमधील' स्पष्ट फरक दर्शवितो.
जाहिराती उपभोक्त्यांना असे सांगण्याचा प्रयत्न करते कि, 'अरे, आपण पांढरे काहीही वापरू शकतो किंवा त्यावर बसू शकतो, केवळ या पॅड्सचा वापर करा आणि विश्रांती घ्या जेणेकरून आपण कधीही दागले जाणार नाही.'

बदलेले स्वरूप

काही जाहिराती अशापद्धतीने दाखविल्या जात असल्या तरीही काही युट्युब लघुपट असे आहेत ज्यात महिलांच्या आरोग्याची संकल्पना पवित्र आणि आहे तशी मांडली आहे.
मे २०१८, व्हिस्परची जाहिरात, ज्यात एका १४-१५ वर्षाच्या मुलीला पहिल्यांदाच पाळी येते. त्यावेळी तिची आई आणि आजी या दोघींच्या मानसिकतेतील फरक विनोदी पद्धतीने दर्शविला आहे. जिथे आई म्हणते, 'इशा डान्स कॉम्पिटिशन में नहीं नाचेगी, उसके वो दिन चालू हैं' तेव्हा आजी म्हणते, 'वो दिन वो दिन क्या होता हैं? असे पिरियड्स आई हैं'. या लघुपटातील संवाद हे विनोदी असले तरी समाजातील आतापर्यंत चालत आलेल्या जुन्या अंधश्रद्धांचे आणि प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेचे ते दर्शन आहे.
दुसरी जाहिरात म्हणजे टी फाऊंडेशनने तयार केलेला डोनेट अ पॅड हा लघुपट, मे २०१७. ज्यात एका खेड्यात एक मुलगी आणि वडील असे दोघेच राहत असतात. या जाहिरातीत पाळी येत असलेल्या मुलीची पांढरी चादर सलग दुसऱ्या दिवशीही रक्ताने माखते. त्यामुळे सलग दोन दिवस तिची शाळेला सुट्टी पडते. हे सगळं होतं ती जुना कपडा वापरत असल्यामुळे. या जाहिरातीतून दर्शकांना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे कि,  ग्रामीण भागात आजही जुना कापड वापरला जातो. त्यामुळे कोणकोणत्या समस्या उद्भवतात. परंतु शेवटच्या दृश्यात तिचे वडीलच तिला हे पॅड कसे देतात, याचे योग्य चित्रीकरण करण्यात आले आहे.

सॅनिटरी पॅड्सच्या दूरचित्रवाणीवरील जाहिरातींचे प्रमाण-
जाहिरातींच्या जगात 'रेट बार' नावाची पद्धती असते.  'रेटबार'नुसार जाहिराती लावल्या जातात... ज्या जाहिराती जास्त नफा मिळवून देणाऱ्या असतात त्यांना जास्त जागा/ कालावधी दिला जातो.
या जाहिराती १००-२०० रुपये नुसार किंमत असते. गणिती भाषेत, समजा जाहिरात दिग्दर्शकाकडे १०० सेकंदाची जागा असेल आणि २०० सेकंदाची ग्राहकाकड्न मागणी आली तर ज्याचा दर/ किंमत जास्त त्या जाहिरातीला प्राधान्य दिले जाते. आणि त्यानुसार २०० मधील १०० सेकंद जाहिरात आणि उर्वरित शंभर सेकंद दुसऱ्या जाहिरातीला प्राधान्य दिले जाते.
जाहिरातींचे प्रमाण हे तारखेनुसार आणि वेळेनुसार न लावता ते कंपनीबरोबर झालेल्या व्यवहारानुसार ठरलेल्या कालावधीनुसार एकूण जाहिराती लावतात.
म्हणजेच,
x  दिवस =   दिवसाला रिकाम्या वेळेत जाहिराती लावणे
           ______________________________
            जाहिरातींचे बजेट 
"दर आणि बाजारात उत्पादनाची गरज" या दोन महत्त्वाच्या गोष्टींना धरून जाहिरात कंपन्या जाहिराती स्वीकारतात. मासिक पाळीत वापरले जाणारे पर्याय हे लक्झरी उत्पादन नाहीत, त्यामुळे ते टाळता येत नाहीत. ते मूलभूत गरजांमध्ये मोडतात. 
त्यामुळे संपूर्णपणे दुर्लक्ष न करता मूलभूत पातळीवर म्हणजे काही सेकंदाचा स्लॉट देऊन या जाहिराती दाखवल्या जातात. कोटेक्स स्टे फ्री व्हीस्पर् या जाहिरातींचे भारतात प्रमाण अधिक असते.
उत्पादनातील स्पर्धेमुळे जाहिराती खूप झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचायचे असल्यास आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग सातत्याने चालू ठेवणे हा एकमेव पर्याय असतो. त्यामुळे जो उत्पादक जास्त दराने जाहिरातींचे स्लॉट विकत घेईल त्यांना प्राधान्य दिले जाते.
व्यवसायिक जाहिरातींचे प्रमाण हे सरकारी जाहिरातींपेक्षा जास्त असतात... शासकीय जाहिराती या अर्थसंकल्प असेल किंवा निवडणुका असतील तेव्हा अधिक दाखवल्या जातात.

४.६ निळ्या रक्ताची मानसिकता
प्रत्येक महिलेसाठी मासिक पाळीचे अनुभव वेगवेगळे आहेत, परंतु प्रत्येक महिलेसाठी एक गोष्ट सर्वसामान्य आहे कि, मासिक पाळीत कुणालाच निळा रक्तप्रवाह होत नाही. ब्लू जेल म्हणून मासिक पाळीचे चुकीचे वर्णन प्रत्येक पातळ्यांवर समस्याप्रधान आहे. मासिक पाळी येणाऱ्या स्त्रियांची यामुळे हि धारणा झाली आहे कि, पाळीतील लाल रक्ताने माखलेले खराब आणि अपवित्र पॅड लोकांना दाखवले तर लोकही अस्वस्थ होतील, किंबहुना तसे समजूनच जाहिराती बनविणारे त्या पद्धतीने ब्लू जेलचा वापर करून ती अस्वस्थता समाजात कायम ठेवतात.

जाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट

80च्या आसपास, महिलांच्या आरोग्याबाबतच्या उत्पादनांची जाहिरात मग त्यात सॅनिटरी नॅपकिन्ससारख्या उत्पादनांची जाहिरात हि रात्री ९ वाजेच्या आधी भारतीय टेलिव्हिजनवर दाखवण्याची परवानगी नव्हती. त्यावेळी, निळ्या रंगाच्या ऐवजी लाल शाईचा वापर केला जात असे. तेव्हा स्त्रियांना त्यांच्या कुटुंबांसह या जाहिराती पाहण्यास अधिक त्रास होत असे. त्यावेळी तसे काही खास चॅनेल नव्हते आणि त्यामुळे मासिक पाळीबाबत संभाषण करणे खरोखर अवघड होते. गोष्टी हळूहळू बदलू लागल्या, हळूहळू सॅटेलाईट चॅनेल्स आले, काही विशिष्ट चॅनल्स बनले, टीएएमने (टीएएम, टोटल अड्रेसेबल मार्केट) प्रवेश केला, लाल रंगावर बंदी घातली आणि नंतर मोहिमांमध्ये मासिक पाळीबद्दल बोलणे अधिक सोपे झाले. जाहिरात मोहीमांशिवाय, आज बरेच ब्रॅण्ड या विषयाबाबत जागरूकता आणि शिक्षण देण्यासाठी सक्रिय होऊन काम करत आहे.

पुरुषांचा सहभाग:
सॅनिटरी नैपकिनच्या जाहिराती 'कमजोरी' हा फरक मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.  या फरकाच्या निर्मूलनाद्वारे स्त्री सक्षमीकरणाकडे लक्ष दिले जात आहे. या सततच्या प्रयत्नामुळे लिंगभेद हा फरक दूर केला जात आहे. मासिक पाळी हे स्त्री शरीराचे एक आवश्यक कार्य आहे.  जे ते निरोगी असल्याचे दर्शवते.
गंध: स्त्रियांना सुंदर, सुगंधित आणि शुद्ध घटक जास्त आकर्षित करतात. त्यामुळे आधुनिक जाहिरातीत हा घटक प्रकर्षाने दाखविला जात आहे.

जाहिरातीत पहिल्यांदाच रक्ताचा रंग


आत्ताच्या परिस्थितीत हे स्वरूप बदलताना दिसत आहे. मानवी रक्ताचा रंग कसा असतो? लाल! हे उत्तर तर सर्वांनाच माहीत आहे. मग सॅनिटरी पॅडच्या जाहिरातींमध्ये रक्ताचा लाल रंग न दाखवता निळ्या रंगाचा डाग का दाखवतात?
समाजात मासिक पाळीबद्दल खुलेपणा आणि सहजता नसल्यानं असं होत असेल. पण बॉडीफॉर्म या ब्रिटनमधल्या ब्रँडनं जाहिरातींमध्ये सॅनिटरी पॅडवर निळ्या रंगाच्या जागी लाल रंगाचे डाग दाखवले आहेत.
बॉडीफॉर्मची मूळ कंपनी असलेल्या 'एसीटी'ने म्हटलं आहे की "मासिक पाळी हा विषय चारचौघांत न बोलण्याचा विषय समजला जातो. आम्हाला या समजुतींना आव्हान द्यायचं आहे."
या जाहिरातीत सुरुवातीलाच एका पुरुषाला सॅनिटरी पॅड खरेदी करताना दाखवण्यात आले आहे. तसेच सॅनिटरी पॅड्स हे पुरुषांना भेटले तर पुरुष कसे प्रतिसाद देतील हे दर्शविले आहे. त्याचबरोबर महत्वाचा भाग म्हणजे एक अंघोळ करणाऱ्या महिलेला अचानक  जेव्हा पाळी येते तेव्हा ज्या रक्ताचा रक्तस्त्राव होतो तो आहे त्या रंगाचा दाखविण्यात आला आहे. 
आणि शेवटी एक ओळ टाकली, मासिक पाळी हि नैसर्गिक आहे, तर त्याबद्दल दाखवणे हेही नैसर्गिकच हवे ! 

माध्यमांच्या चुका:  
वृत्तपत्रात मासिक पाळीबाबत खूप कमी प्रमाणात लिहिले जाते. हे लिखाण केवळ महिला दिन, मासिक पाळी दिवस, शबरीमाला मंदिर घटना अशा विषयांना धरून लिहिले जाते. हे लिखाण सर्वांगीण होत नाही असे मत स्त्री तज्ज्ञांपासून सामान्य लोकांचे आहे. सर्वसामान्यांचे म्हणणे आहे, (४.७.१) त्यांना या विषायाला समजून घ्यायचे असते परंतु वृत्तपत्रातील लिखाण हे बातमी स्वरूपात असते, ते लेखाच्या किंवा सदराच्या स्वरूपात नसते.
मासिक पाळी हा विषय एकदा समजावून समजेल असा नाही, त्यामुळे याबाबत सतत बोलले जाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तज्ज्ञ मंडळींना अशा उपक्रमात संधी देऊन त्यांच्याकडून स्तंभलेखांचा सदर लिहिला जावा, ज्यात सर्वसामान्यांच्या चुका विनोदी आणि आकर्षक पद्धतीने समजावून सांगून काय टाळले जावे हे सांगण्याचा प्रयत्न असावा. माध्यमे नफा-तोट्याच्या दृष्टिकोनातून याचा प्रसार करतात. माध्यमांतील जनजागृतीचा आशय उदा. जाहिराती आणि चर्चा यांचा आशय हा व्यावसायिकदृष्ट्या तयार केलेला असतो. तो आशय बौद्धिक आणि प्रगत  असावा. वृत्तपत्रांकडे वाचकाला विचार करायला भाग पडण्याची क्षमता आहे, त्याचा वापर अशा 'टॅबू'धारक विषयांसाठी करावा.

सोशल मीडिया जनजागृतीचे व्यासपीठ
समाज माध्यमांतून 'मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड्स' हे विषय ट्रेंड म्हणून जगभर पसरत आहे.
फेसबुक-ट्विटर-इंस्टाग्राम-  ट्विटर हे असे माध्यम आहे जिथे हॅशटॅग भाषेतून २८० शब्दमर्यादेतून आपला आशय अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहेच आणि त्यामुळे स्पर्धेच्या युगात ज्यांना वेळ कमी असतो त्यांच्यास्तही ट्विटर माध्यम फायदेशीर ठरत आहे.
सॅनिटरी पॅड्सच्या संदर्भात ट्विटरची छाननी केली असता काही हॅशटॅग्स समोर आले. त्याचबरोबर हेच हॅशटॅग्स पुढे प्रचलित होऊन इंस्टाग्राम फेसबुकसारखा नामांकित समाज माध्यमांवर ट्रेंड झाले. त्यामुळे समाज माध्यमांच्या माध्यमातून हि जनजागृती नवीन विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे सहज सोपे झाले आहे.
मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेले हॅशटॅग्ज
#pms, #menstruation, #period, #periods, #women, #womenshealth, #menstruationmatters,#menstrualcycle,#periodproblems, #health, #menstrualcup, #zerowaste, #cramps, #womenempowerment, #ecofriendly, #periodpositive, #tampons, #feminism, #wellness,#selfcare, #taxfreesanitary, #padman, #happytobleed


ई-कॉमर्स साईट्सचे प्रयत्न

सॅनिटरी पॅडची ऑनलाईन विक्री हा व्यवसाय तितकासा फायदेशीर नाही. याचे कारण - उत्पादने कमी किमतीची आहेत आणि त्याचा आवाका मोठ्या प्रमाणात आहे. खरेतर या श्रेणीमध्ये येणारी उत्पादने हि किरकोळ विक्रेत्यांसाठी योग्य नसतात. कारण कुरिअर खर्च जास्त असतो आणि पाठविलेल्या प्रत्येक ऑर्डरवर तोटा होऊ शकतो. तथापि, ब्रँड मालक म्हणून एखादी कंपनी ऑनलाईन विक्रीचे नियोजन करत असल्यास ते फायद्याचे ठरेल कारण उत्पादन बनवण्याच्या प्रक्रियेपासून ते पोहोचविण्याचा खर्च याचा एकत्रित खर्च हा नफा मिळवून देणारा ठरतो.
तरीही शासकीय योजनांतर्गत कमी किमतीत सॅनिटरी पॅड्सची विक्री असो ती अशा साइट्सच्या माध्यमातून केली जाते. काही साईट्स उदा. कार्मेसी ४.१ हि साईट नैसर्गिक सामग्रीपासून बनविलेले पॅड्सची विक्री करते. या साईट्सने समोर आणलेले हे पॅड्स पर्यावरणाला घातक नसलेले, नैसर्गिक सामग्रीचा समावेश असलेले आणि पॅड्सच्या खोक्यात वापरलेले पॅड टाकण्यासाठी पिशवी पुरविणारे आहे. त्यामुळे हा प्रकल्प सामाजिक, पर्यावरणीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर आहे. परंतु ई- कॉमर्स साईट्सवर सुद्धा सॅनिटरी पॅड्स मिळतात, हेच ८०% लोकांना माहिती नाही. त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात प्रसार करणे आवश्यक आहे. तसेच या साईट्सवर दिलेली माहिती हि केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे, त्या ठिकाणी स्थानिक भाषेचा पर्याय उपलब्ध असणे आवश्यक आहे. कारण अनेक ई-कॉमर्स साईट्स या लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळे बंद पडतात. त्यामुळे या साईट्सने पब्लिसिटी, प्रोमोशन हे विविध उपक्रमांतून लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

alibaba.com
nuawoman.com
https://mycarmesi.com/
https://www.indiamart.com/

संदर्भ 
जाहिरात तज्ञ् (योगेश पवळे,  ग्रुप हेड- महाराष्ट्रझी मीडिया  कॉर्पोरेशन लिमिटेड)  मार्गदर्शनातून सदर आकडेवारी आणि गणिती संकल्पना मांडल्या. 


जाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट!

by on मे ३१, २०१९
तुम्ही जाहिराती किती बघतात ? रिमोटसारखा नियंत्रक आपल्या हातात असतो. पण तरीही जाहिराती कळत नकळत कानावर डोळ्यांवर पडत असतात. यांचा बोध प...

ते काय आहे ना? किराणा मालाच्या दुकानात किराणा घेताना सामान्य माणूस गरजेची वस्तू म्हणून सहज पैसे पुढे करतो. पण भारतीय मानसिकता जेव्हा मेडिकल स्टोअर्स मध्ये जाऊन सॅनिटरी नॅपकिन्स घेताना हातातून पैसा सुटत नाही. त्यामुळे याचं मूळ नेमकं आहे कुठे? याचा आर्थिक व्यवहाराशी असलेला संबंध समजून घेणे गरजेचे होते. कारण 'न परवडणाऱ्या वर्गात ' अडकलेला हा विषय असतो. तो नेहमीच चर्चेत असतो. 
सॅनिटरी नॅपकीन वापराला १८८० नंतर सुरुवात झाल्याचा उल्लेख आढळतो. हे नॅपकिन्स अस्तित्वात येऊन सुमारे सव्वाशे वर्षे झाली असली तरी अजूनही भारतात ते सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.
शक्य तिथे, शक्य त्या पद्धतीने सॅनिटरी नॅपकिन्स, सॅनिटरी वेअर, मासिक पाळी या विषयांसदर्भातील टॅबू दूर करण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे. सामाजिक माध्यमांमधूनही खुलेपणाने मासिक पाळीबद्दल चर्चा होत आहे. हा विषय काळ्या प्लास्टिकच्या पिशवीतील सॅनिटरी नॅपकिनच्या पाकिटाप्रमाणेच लपवला गेला आहे.
परिणामी,
मासिक पाळीत वापरली जाणारी उत्पादने अजूनही मोठा नफा कमवून विकले जात आहे आणि त्यावरील करांमुळे ते अनेकांच्या आवाक्याबाहेर जात होते. एकीकडे जिमनॅस्टिक्स, स्वीमिंग याचा सराव मासिक पाळीच्या दिवसांमध्येही इतर दिवसांप्रमाणेच करा, असा संदेश दिला जात असताना दुसरीकडे या नॅपकिन्सच्या दराचे आणि कराचे ओझे लादून हा आनंद बाजूला ठेवण्याचेच सूचित केले जात होते. कापड त्वचेसाठी चांगले असले तरी नोकरी करणाऱ्यांसाठी किंवा शाळा-कॉलेजच्या निमित्ताने दिवसभर बाहेर राहणाऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकीन, टॅम्पोन्स, कप्स या गोष्टी सोयीस्कर ठरतात. रॅशेस, जंतूसंसर्ग या गोष्टी टाळण्यासाठी दिवसभरातून चार ते पाच वेळा सॅनिटरी नॅपकिन बदलावेत. मात्र पहिले दोन किंवा तीन दिवस वगळल्यास एवढ्या वेळा नॅपकिन बदलले जात नाहीत. याचे एक महत्त्वाचे कारण या नॅपकिन्सची किंमत.
अजूनही या किमतीमुळे महिला सॅनिटरी नॅपकिनकडे वळत नाहीत. ही किंमत कमी झाली असती तर उर्वरित महिलांनी लगेच सॅनिटरी नॅपकीन वापरायला सुरुवात केली नसती, मात्र याची संख्या मात्र वाढली असती.
एका सॅनिटरी पॅडचा खर्च
एका नॅपकिनची किंमत ७ ते ८ रुपयांपर्यंत आहे. दिवसभरात तीन ते चार नॅपकिन्स असा विचार केला तर एका दिवसात २८ ते ३० रुपयाचे नॅपकिन. असे चार ते पाच दिवस. म्हणजे मासिक पाळीत नॅपकिनसाठी १०० रुपयांहून अधिक खर्च होतो. 
एखाद्या घरात दोन किंवा तीन महिला असल्या की हा खर्च त्या पटीत वाढत जातो. मासिक पाळीवर एवढा खर्च... हे समीकरण दिवसाला शंभर रुपयेसुद्धा कमावू न शकणाऱ्यांकडून नाकारले जाणे स्वाभाविकच आहे. नवऱ्याच्या पगारात भागवायचे तर सॅनिटरी नॅपकिनची चैन कशी करता येईल...? असे मत जेव्हा महिला व्यक्त करतात तेव्हा सॅनिटरी नॅपकिन ही गरज नाही तर चैन आहे हे चित्र अजूनही महिलांच्या आरोग्याला दुय्यम लेखण्याची मानसिकता अधोरेखित करते.
देशातील ८८% भारतीय आदिवासी स्त्रिया घरगुती पर्याय म्हणून जुने कापड, रग, वाळू, राख, लाकूड शेव्हिंग, वृत्तपत्र, वाळलेली पाने, मक्याच्या कणसाचे आवरण, गवत आणि प्लास्टिक याचा वापर करतात. दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्या महिलाही सर्वसाधारणपणे कापडच वापरतात. पाळीच्या दोन-तीन दिवसांमध्ये या महिला घरीच राहतात. नॅपकिन विकत घेणे त्यांना परवडत नाही. काम करताना कापड बदलणे शक्य होत नाही. कापड बदलले तरी आधी वापरलेले कापड ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. कापडाचा वापर झाल्यास केवळ कपड्यांवर डाग पडण्याची भीती, अधिक रक्तस्राव या बाबींमुळे घरी थांबण्याची वेळ येते. त्यामुळे त्यांची रोजंदारीही बुडते. मासिक पाळी ही दैनंदिन आयुष्याचा भाग होण्यासाठी मदत न झाल्याने मुली शाळा सोडून घरी बसतात.

सॅनिटरी नॅपकिन्स अस्तित्वात येऊन सुमारे सव्वाशे वर्षे झाली असली तरी अजूनही भारतात ते सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. एकीकडे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री उभी आहे वगैरे बोलले जात असताना दुसरीकडे दर महिन्याला तीन ते चार दिवसाचे आयुष्य केवळ सोयींच्या अभावामुळे अंधाऱ्या खोलीमध्ये, घरातच काढावे लागते हे कोणत्या समानतेचे चिन्ह आहे हा प्रश्न निर्माण होतो. तसेच मुलींच्या सोयीसाठी शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनची सोय करून देण्यात आली आहे. शाळांमध्ये ही सोय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. मात्र महाविद्यालयांमध्ये गेल्यावर काय, हा प्रश्न उरतो. महाविद्यालयांमध्ये गेल्यावर पुन्हा ते आर्थिक अडचणीमुळे कापडाकडे वळतात.

उत्पादकांची धोरणे आणि बाजारपेठ
सॅनिटरी नॅपकिन हे एक पातळ पॅड असते ते अशा पदार्थांपासून तयार होते जे मासिक पाळीच्या दरम्यान रक्तप्रवाहाला शोषून घेण्यास मदत करते. महिलांची स्वच्छता आणि आरोग्य यासाठी हे नॅपकीन महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. सॅनिटरी पॅड सध्या विविध प्रकारच्या शोषक पातळी आणि आकारांसह उपलब्ध आहेत.
काही लोकप्रिय पॅड म्हणजे नियमित (रेग्युलर), पातळ (थिन) आणि अति-पातळ (अल्ट्रा थिन) पॅड समाविष्ट आहेत. "इंडियन सेनेटरी नेपकिन मार्केट: इंडस्ट्री ट्रेंडस्, शेअर, साइज, ग्रोथ, ऑपॉर्च्युनिटी अँड फॉरकास्ट २०१८-२०२३"  या नवीनतम अहवालाच्या मते, भारतीय सॅनिटरी नॅपकिनने मार्केट २०१८ मध्ये जवळजवळ ४४१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके मूल्य गाठले.
बर्याच वर्षांपासून, सरकारी आणि एनजीओ संस्था वैयक्तिक स्वच्छतेच्या महत्त्वविषयी महिलांना शिक्षित करण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यशाळा घेत आहेत. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सने भारतात महत्त्व प्राप्त केले आहे.
अशा प्रकारे, भारतीय महिलांमधील वैयक्तिक स्वच्छता याबाबत जागरूकता वाढवणारे सॅनिटरी नॅपकिन हे मार्केटच्या वाढीस मदत करणारा एक प्रमुख घटक ठरत आहे. 
याच्या व्यतिरिक्त, उत्पन्न वाढविणे आणि स्वस्त किंमतीत सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता ही बाजारपेठ वाढवण्यासाठी आणखी एक घटक आहे. याशिवाय, 'इंडियन सेनेटरी नेपकिन मार्केट: इंडस्ट्री ट्रेंडस्, शेअर, साइज, ग्रोथ, ऑपॉर्च्युनिटी अँड फॉरकास्ट २०१८-२०२३" या अहवालानुसार २०१८-२०२३ दरम्यान, सीएजीआरमध्ये (सीएजिआर, कंपाउंड अनुअल ग्रोथ रेट) २०२३ पर्यंत हि सॅनिटरी पॅड्सच्या विक्री-खरेदीची बाजारपेठ सुमारे ६३१ दशलक्ष अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
महिलांच्या आरोग्याचा विचार करून उत्पादनातील नवीन प्रयोग हे मार्केटच्या वाढीसाठी फायद्याचे ठरत आहे.
सध्या, बाजारात गुंतवणूक करणार्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, स्त्रियांच्या स्वच्छतेच्या उत्पादनांमध्ये विविध प्रकारच्या नवकल्पना येत आहेत. पाळीतील रक्तप्रवाहाच्या दरम्यान महिलांना अधिक सांत्वन (कम्फर्ट) प्रदान करण्यासाठी अनेक नवीन उत्पादनांचे प्रयोग होत आहे. उदाहरणार्थ, २०१८ मध्ये, कॅलली (स्त्रियांच्या उत्पादनाची कंपनी) ने नवीन डिझाइनमध्ये लीक-फ्री टॅम्पॉन सादर केले, जे योनीच्या काठांना अडकतात ते टॅम्पॉन्स सॉफ्ट-लाइनरला संलग्न केले जातात, जे सॅनिटरी पॅडशिवायही अतिरिक्त सुरक्षिततेचा स्तर आणि भावना देतो.
उत्पादक हे वयोमर्यादेवर लक्ष केंद्रित करीत आहे. उदाहरणार्थ, २०१८ मध्ये, बी + ईटी (एक सेनेटरी नैपकिन उत्पादन ब्रँड) ने किशोर व त्यांच्या वाढत्या शरीरास अनुकूल असलेल्या मुलींसाठी सॅनिटरी पॅडची निर्मिती केली. ते पॅड किशोरवयीन मुलींच्या (मुख्यतः ८-१६) वयोगटातील मुलींकरिता कॅम्फोर्ट देत असे.
महिला आरोग्य उत्पादनाच्या मार्केटमध्ये सॅनिटरी पॅड्सची लोकप्रियता
सॅनिटरी नॅपकिन हे सर्वात लोकप्रिय उत्पादन आहे. पूर्वीच्या काळात जुना कापड वापरल्यामुळे होणाऱ्या संसर्ग आणि आजारांना आणि अस्वच्छतेला लक्षात घेत हळूहळू सरकार आणि एनजीओच्या हातभारामुळे सॅनिटरी नॅपकिनबाबत महिलांना स्वतःच्या आरोग्याबाबत शिक्षित करण्याच्या उद्देशातून या उत्पादनाच्या विक्रीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. तथापि, या सकारात्मक बदलामुळे, शिक्षित महिला या सॅनिटरी नॅपकिन्स वापरल्यामुळे स्वच्छताविषयक आव्हानांचा सामना करीत आहेत. याचे कारण असे की, नियमित सॅनिटरी पॅडमध्ये कृत्रिम तसेच कर्करोगाला आमंत्रण देईल अशी सामग्री आहे आणि विविध अभ्यासातून असे सूचित होते की, कृत्रिम घटकांचा समावेश असलेले पॅड्स वापरल्यामुळे योनि भागातील किंवा त्याच्या जवळील भागांत याचा वापर वाढल्याने संसर्ग, जळजळ, अस्वस्थता वगैरे आजार होऊ शकतात.

मार्केटमधील प्रमुख विकास
२०१८ - २०१८ मध्ये अशी नोंद केली गेली की, भारतातील सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) हा ग्राहकांना अधिक परवडण्याकरिता काढण्यात आला. त्याच वर्षी, भारत सरकारने गरजू आणि गरीब स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या परवडणारे बायोडिग्रेडेबल पॅड बनविले (ते प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी योजना (पीएमबीजेपी) योजनेअंतर्गत विकले जाऊ लागले)
२०१७ - बॉडीफॉर्म (एसिटी ब्रँड) ने #bloodnormal या मोहिमेचा एक भाग म्हणून आपल्या जाहिरातींपैकी एका जाहिरातीमध्ये पारंपारिक निळ्याऐवजी लाल रक्ताने माखलेल्या नैसर्गिक नॅपकिन्सची जाहिरात केली. जाहिरातीतून लाल रक्त दर्शविणारा तो प्रथम ब्रँड म्हणून जागतिक स्तरावर लक्ष केंद्रित केले.

संदर्भ -
(द एक्सप्रेस वायर, 'इंडियन सॅनिटरी नॅपकिन मार्केट www.marketwatch.com, २०१९)


पाळी येण्याचे दिवस जवळ येऊ लागले की मुली आधी त्यांच्या पर्यायी तत्सम गोष्टींची सोय करू लागतात. पुन्हा ऐनवेळी कधीही आली तर धांदल उडू नये म्हणून.
परंतु हे पर्याय कोणकोणते असतात? त्याचे स्वरूप, फायदे, तोटे याबाबत आपण जागरूक आहोत का?
आरोग्य हा विषय आला कि समोर येतो तो 'स्वच्छता' हा घटक. त्यामुळे आज बाजारात तंत्रज्ञानाच्या आणि आधुनिकीकरणाच्या गतीने मासिक पाळीत वापरले जाणारे अनेक पर्याय समोर येत असले तरी त्याचे सखोल विश्लेषण गरजेचे आहे. जागतिकीकरणामुळे आपण विदेशातील पर्यायही भारतात आणले असले तरी हे पर्याय वापरताना अनेक समस्या उद्भवतात, त्यासाठी सद्यस्थितीला नेमके काय करणे आवश्यक आहे, कोणत्या चुका नोकरीवर जाणाऱ्या आणि आधुनिक विचारसरणी स्वीकारणाऱ्या महिला करतात आणि या पर्यायी उत्पादनांचे एकूणच फायदे तोटे आणि स्त्री तज्ज्ञांचे यावरील मत समजून घेण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न.

 मासिक पाळीत वापरले जाणारे पर्याय

जेव्हा एखादी महिला तिच्या 'त्या महिन्याच्या वेळेची' आठवण करून देतात तेव्हा त्यामागे अनेक गोष्टी येतात.
पाळी ही एक मासिक प्रक्रिया आहे आणि जसं जसा काळ जात आहे, तसं तसे महिलांनी हि मासिक पाळी हि सुरक्षित, सुलभ, स्वच्छ आणि अस्वच्छ असायला हवी त्याप्रमाणे त्या उत्पादने शोधत आहेत.
याउलट, वादविवाद स्पर्धाना चांगला विषय मिळू लागला आहे, त्यात मासिक पाळीत कोणते उत्पादन चांगले आहे हा प्रमुख विषय आहे.
सॅनिटरी पॅड, टॅम्पन्स आणि मासिक पाळीतील कप संबंधित बाजारपेठेतील विविध पर्याय, आवडी, निवडी सुरु आहेत. काही स्त्रियांना टँम्पन्ससह शारीरिक स्वातंत्र्य पाहिजे तर काहीजण त्या पॅडमुळे होणाऱ्या रक्ताचे स्त्राव विखुरतात त्यापासून मुक्ती हवी आहे. म्हणूनच, प्रत्येक स्त्रीला स्वच्छ आणि मुक्त पाळी हवी आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित, पाळीतील विविध उत्पादनांची माहिती घेऊन त्यांचे फायदे समजून घ्यावे.

सॅनिटरी नॅपकिन्स

सॅनिटरी नॅपकिन्स हे स्त्रियांच्या शरीरावरील द्रवपदार्थ शोषून घेण्यास आणि टिकवून ठेवण्यासाठी तयार केले जाते. वापरकर्त्यास नेहमी कोरडे आणि आरामदायक वाटावे हा याचा मूळ उद्देश असतो.
नॅपकिनचे तीन प्रमुख प्रकारचे उत्पादन आहेत, उदा. (अ) जाड सॅनिटरी नॅपकिन्स. (ब) अल्ट्रा पातळ सॅनिटरी नॅपकिन्स. (क) पॅन्टी लाइनर. सॅनिटरी नॅपकिन्स मोठे पॅड असतात जे तंतूच्या धाग्यांनी जेल शोषून घेतात , नॅपकिन्स शरीरातील रक्तस्त्राव जेलमध्ये रूपांतरित करतो. आजकाल पॅड हे मोठ्या पंखांसारखे येते, जेणेंकरून पॅन्टवर स्त्राव पसरत नाही.
आकार आणि रचना-
पॅड्स हे अंडरवियरला चिकटवले जातात. 3 ते 4 तासांनंतर ते रक्तरस्त्रावानंतर काढावे लागतात. ते रक्तस्त्राव शोषून घेते आणि ओल्या रक्तस्रावाचे जेलमध्ये रूपांतर करते.
उपयोग -
सॅनिटरी नॅपकिन्स ही रक्तसंक्रमण नियंत्रित करण्यासाठी सर्वात सामान्य उत्पादन आहे. सर्व वयोगटातील महिलांमध्ये हे उत्पादन लोकप्रिय आहे. पॅड वापरण्यास सोपे आणि विनात्रासदायक आणि विनावेदनादायक आहेत. हा पर्याय सुटसुटीत आहे. हे उत्पादन पाळीचा अनुभव सुलभ आणि आरामदायक करते. तथापि, टॅम्पॉनस आणि मासिक कप्सच्या तुलनेत पॅड्स कमीत कमी हालचालीत मुक्तपणे दैनंदिन कार्य करण्यास सुलभ असतात. परंतु, सॅनिटरी नॅपकिन्सचे शेकडो वर्षे विघटन होत नाही, कारण त्यातील जोखीम देणारा विषारी वायू पर्यावरणास घातक ठरतो.
फायदे-
पॅड्स हे आतील कपड्याला चिकटले जाते त्यामुळे, ते दिवसभर ठेवणे सोपे.
सुटसुटीत वापर आणि फायदे.
पाळीच्या दिवसात रात्रभर चांगली निवड
तोटे-
पर्यावरणास घातक
योनी संसर्गाच्या रोगांचा धोका
सॅनिटरी पॅड्समधील प्लास्टिक योनीला घासून रॅशेस
वेळेत सॅनिटरी पॅड्स बदलले नाही तर गर्भाशयाला धोका
उत्पादन पद्धत-
नॅपकिनचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे शोषक पॅड. शोषक पॅड हे प्लास्टिक मिसळलेल्या लाकडाच्या लगद्यापासून बनविलेले असते. शोषक पॅड प्रथम लाकडाचा लगदा आणि व्हॅक्यूम वापरून आवश्यक आकार आणि रचनेनुसार तयार केले गेले. व्हॅक्युमच्या साहाय्याने वजन स्वयंचलितपणे नियंत्रित करून आणि दाबून ते आवश्यक जाडीएवढे तयार केले जात असे. पॅड तयार करण्यापूर्वी द्रव शोषून घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी लगदा सुपर शोषक पॉलिमर्स (एसएएपी) मध्ये मिसळला जात असे.
सुपर शोषक पॉलिमर मूळतः ऍक्रेलिक आधारित पॉलिमर आहे, जे द्रव शोषून घेण्याआधी जेल तयार करते. यामुळे ते 30 पट वजन पाण्यात तग धरून ठेवू शकते. हे शोषक पॅड तंतूच्या धाग्यांपासून बनवलेल्या प्रवेशयोग्य सपाट कापडाशी संलग्न केले जाते. मग ते प्लास्टिक आरक्षित तळाशी जोडले जाते. गळती टाळण्यासाठी पॅडचे तीन स्तर एकमेकांना चिकटून बंधिस्त केले जातात. काही स्त्रियांच्या मागणीवरून, पॅड्स बनवण्यासाठी चिकट टेप, सिलिंग इत्यादी सामग्री वापरणे आवश्यक असते. वेगवेगळ्या नॅपकिन्स बनवण्यासाठी वेगवेगळी सामग्री वापरली जाते.

कापडी नॅपकिन्स

सॅनिटरी पॅड्समध्ये प्लास्टिकचा वापर अधिक असतो. त्यामुळे शरीर आणि पर्यावरणास धोका असतो.  त्यामुळे, कापडी पॅड हि जुन्या वापराची नवी संकल्पना सोयीस्कर, परवडणारी, घरगुती आहे. अनेक स्वयंसेवी संस्था अशा पॅडचा प्रचार करीत आहे. कारण प्लास्टिक निर्मित सॅनिटरी पॅड्स हे ग्रामीण, गरजू, गरीब लोकांना न परवडणारे आणि टॅबू वाटतात. त्यामुळे ते पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे कापडी पॅड हा पर्याय त्यांच्या आवाक्यात येतो.
रचना:
कापडाचे सॅनिटरी नॅपकिन हे शिवलेले असतात, त्याला टच बटन म्हणजेच आतील पँटीला घट्ट धरून ठेवेल असे बटन असते. ते दैनंदिन आणि वापरायलाही सोपे वाटते.
फायदे:
कापडी पॅडचा वापर वाढला पाहिजे, कारण ते धुवून पुन्हा वापरता येतात.
बटन असल्यामुळे नोकरी करणाऱ्या, खेळाडू आणि कामात असणाऱ्या स्त्रियांसाठी हे हालचालीत सुद्धा सोयीस्कर असते.
खर्च कमी
शोषण क्षमता हि आपोआप कळते त्यामुळे ते बदलले जाते.
तोटे:
ओलेपणाची भावना.
रक्तस्त्राव शोषून घेईल याची खात्री नाही.
कापड सतत धुतल्यामुळे त्या कापडात सूक्ष्म कोळी तयार होतात, जे योनीच्या आत गेले तर गर्भाशयास धोका निर्माण होऊ शकतो.

टॅम्पून्स
पाश्चात्य देशांमध्ये प्रचलित असलेला हा प्रकार भारतात फारसा वारपला जात नाही. सॅनिटरी नॅपकिन्ससारखाच काहीसा हा प्रकार. पण पॅडस योनीच्या बाहेर राहून पाळीचा रक्तस्राव शोषतात तर टॅम्पॉन योनीच्या आत घालावे लागतात. हे बोटांच्या आकाराचे असते, जे स्त्रीच्या योनीच्या आत जाऊन रक्त शोषून घेते.

आकार आणि रचना-
टॅम्पॉन हे आकाराने लहान असते आणि मासिक पाळी दरम्यान सर्व रक्त गोठून घेते. त्या योनि भिंतींवर अतिरिक्त स्नेहकपणा देखील शोषते, ज्यामुळे स्त्रीला योनीच्या ठिकाणी कोरडे आणि सामान्य वाटते.
उपयोग-
ज्या मुलींची जीवनशैली हि सक्रिय आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय फायदेशीर ठरते. कारण टॅम्पॉनस त्यांना त्यांच्या पिरियड्सबद्दल पूर्णपणे विसरायला लावतात. टॅम्पॉनस योनिजवळ आणि खालच्या भागात आर्द्रता शोषून, बॅक्टेरियाच्या संसर्गास दूर ठेवतात आणि 'तिथे काहीच नाही' याची भावना देतात. हे आपल्याला इतर मासिक उपायांपेक्षा तुलनेने स्वच्छ ठेवते आणि मासिक पाळीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यात मदत करते.  निःसंशयपणे, टँम्पन्स वापरल्याने खेळाडू मुलींना पोहणे, उड्या मारणे इत्यादीसारखे शारीरिक स्वातंत्र्य मिळते. परंतु याचा सर्वात मोठा दोष म्हणजे टॅम्पॉनसमुळे ट्रॉमा शॉक सिंड्रोम (टीएसएस) नावाचा रोग होतो. ते नैसर्गिक गुळगुळीतपणा शोषून घेते. ते शोषून घेत असले तरीही त्याच्या वापरामुळे लघवीतून पसरलेल्या संसर्गाचा धोका आणि विषारी केमिकल्सचा धोका असतो.
फायदे :
७-८ तास शोषण क्षमता. शोषणक्षमता सर्वाधिक असते.
आकारात लहान- सुलभतेने कुठेही हालचाली करणे.
बाहेर रक्त नाही. ओलेपणाची भावना राहत नाही.
पॅडप्रमाणे दुर्गंधी येत नाही.
फिल्डवर काम करणाऱ्या महिला, खेळाडू यांच्यासाठी हे सोईस्कर ठरतात
कोणतीही लाजेची भावना नाही- लहान आकाराचे असल्यामुळे दैनंदिन कामे करणे सोपे असते.
चांगला कॅम्फोर्ट
तोटे:
विशेषतः नवख्यांसाठी हे सुरुवातीला वापराने, योग्य ठिकाणी त्याचा सुरुवातीचा भाग टाकणे कठिण आहे.
लघवी करताना अडचणीचे वाटते. कारण मोठ्या आकाराचे टॅम्पॉनस हे योनीच्या विरुद्ध दिशेने ढकलावे लागतात आणि त्यामुळे प्रवाहास अडथळा निर्माण होतो.
टॅम्पॉनमधील सामग्रीत शोषणासाठी ब्लीच वापरतात, जे शरीराला हानिकारक असते.
वेळेत काढले नाही किंवा ते काढण्यास विसरलो तर कदाचित अडकून राहण्याची शक्यता असते.
रात्री टॅम्पॉनस घालून झोपणे घातक असते.

पिरीयड पॅंटी
अमेरिकेतल्या काही कंपन्यांनी अशा पँटी बाजारात आणल्या आहेत, त्यांची शोषक्षमता टॅम्पॉन एवढीच, किंबहुना जास्त आहे असा त्यांचा दावा आहे. पाळी दरम्यान फक्त ही पँटी घालायची आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज पडणार नाही या कंपन्यांचं म्हणणं आहे.
भारतात या पँटी ऑनलाईन उपलब्ध आहेत. काही भारतीय कंपन्यांनीही अशा प्रकारच्या अंडरवेअरचं उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. सिरोना इंडिया, फ्लिपकार्ट, अमॅझॉनवर या पॅंटी उपलब्ध आहे.

रचना
पॅँटीच्या आत पाळीचा रक्तस्राव शोषण्यासाठी पॅड, टॅम्पून किंवा कप वापरण्यापेक्षा पॅन्टीच रक्तस्राव शोषणारी आहे.
त्या पॅन्टीत शोषण क्षमता असणारे कापड समाविष्ट असते.
फायदे:
दैनंदिन दिनक्रमासारखाच पाळीचा दिवस वाटतो.
कम्फर्ट नेहमीसारखा
तोटे:
ओलेपणा जाणवतो.
नीट धुतले न गेल्यास जंतू संसर्ग
नीट वाळले नाही तर रक्तस्त्रावातून निर्माण होणारे जंतू त्या भागात राहतात.

मासिक कप

हा कप सिलिकॉन किंवा लेटेक्स रबरापासून बनवलेला असतो. ते उलट्या ग्लासच्या आकाराचे असतात. सॅनिटरी नॅपकिन पाळीतला रक्तप्रवाह शोषून घेतात, पण हा कप मात्र पाळीचा रक्तप्रवाह जमा करतो.

वापर:
पाळीच्या वेळी हा कप अशाप्रकारे योनीमध्ये बसवावा लागतो की त्यात पाळीचा रक्तप्रवाह जमा होईल.
आकार आणि संरचना:
कप्स हे भिजत नाही. ते बाहेर पडलेले रक्त गोळा करते. एका कपमध्ये सुमारे 30-40 मिली रक्त गोळा करण्याची क्षमता असते.
फायदे:
मासिक कप्स हे तुलनात्मकदृष्ट्या पर्यावरण आणि वापरकर्ता यांच्यासाठी अनुकूल असतात.
कप धुवून त्याचा पुनर्वापर सहज शक्य असतो.
कप्स हे टॅम्पॉनस आणि पॅडमुळे होणाऱ्या संक्रमण आणि रोगांपासून वाचवते.
संसर्ग होण्याचा धोका कमी आहे.
कपच्या रचनेमध्ये रसायने, ब्लीच आणि फायबरचा समावेश नसतो.
हे कप वापरायला अगदी सोपे आहेत आणि अनेक वर्षं वापरता येतात.
पॅड वापरल्यामुळे येणारे रॅश, डाग लागण्याची भीती,  कप्स वापरल्यामुळे यातलं काहीहि होत नाही.
जितक्या महिलांनी मेन्स्ट्रुअल कप वापरले आहेत, बहुतेक जणींना ते अतिशय सोईस्कर वाटतात.
तोटे:
पहिल्यांदा योनीत घालण्यास भीती असते.
कशा पद्धतीने वापरावे, याचे ज्ञान नसल्यामुळे योनीच्या आत जाऊन योनीस घासण्याची शक्यता.
नीट धुतले नाही किंवा अँटीसेप्टिकचा वापर झाला नाही तर संसर्ग होण्याची शक्यता असते.

आरोग्याबद्दल स्त्री तज्ज्ञ म्हणतात…

एमसीजीएम कलिना म्युनिसिपल मुंबई येथील स्त्री तज्ज्ञ सुमेध मोरे यांचे मत असे कि, स्त्रिया आमच्याकडे अनियमित मासिक पाळी, अधिक रक्तस्त्राव, पांढरा डिस्चार्ज, जळजळ, पाळीच्या काळात दुखणे या समस्या घेऊन येतात. परंतु त्या यावर मोकळेपणाने आजही बोलत नाहीत. शिवाय सोबत आलेली व्यक्ती ही पुरुष असेल तर सगळे प्रश्न डॉक्टरांना विचारावे लागतात. स्त्रियांची सर्वसाधारणपणे काय चूक होते यावर ते म्हणाले कि, स्त्रिया सुरुवातीच्या काळात त्यांच्या समस्या लपवून ठेवतात. खूप त्रास होत असेल तेव्हाच त्या डॉक्टरांना दाखवतात.
                  सॅनिटरी पॅड्सबद्दल स्त्रियांना माहिती असते, विशेषतः मुंबईतील स्त्रियांना. पण ते खरेदी करून वापरावे एवढेच ज्ञान त्यांना असते. शास्त्रीय ज्ञान शून्य असल्यामुळे आजही मासिक पाळीचा टॅबू कायम आहे. 
पूर्वीच्या स्त्रियांचे राहणीमान आणि आधुनिक राहणीमान यात बदल हा वाटतो कि आताच्या स्त्रिया या आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करीत नाही. माध्यमांचा या विषयातील सहभागाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, वृत्तपत्रांमधून मासिक पाळीबाबत चर्चा होते, पण ती सर्वांगीण आणि वाचकांसाठी पुरेशी वाटत नाही. त्याचबरोबर टॅम्पॉनस किंवा कप्स यांसारखे नवीनतम पर्यायी सोयी बाजारात उपलब्ध झाल्या आहे परंतु त्याचा वापर प्रत्येक व्यक्तीच्या त्या उत्पादनाबद्दल असलेल्या ज्ञानावर अवलंबून आहे. जर त्या उत्पादनाबद्दल पुरेशी माहिती असेल तरच हे पर्याय स्वीकारावे.  हा विषय केवळ सोशल प्लॅटफॉर्मवर कुजबुजण्यापेक्षा तो शहरी स्तरापासून ग्रामीण तळागाळापर्यंत बोलला जावा आणि सरकारने कमी पैशांत उत्तम दर्जाचे पॅड्स गरजू लोकांना उपलब्ध करून द्यावे, यामुळे मूलभूत समस्यांना आळा बसेल. स्त्रियांना जर हा विश्वास दिला कि, त्यांच्यासाठी सॅनिटरी पॅड्सशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही तेव्हा त्या ते उत्पादन सहजतेने स्वीकारतील.
याउलट, नाशिकच्या बिर्ला हॉस्पिटलमधील स्त्रीतज्ज्ञ श्वेता पानसरे यांनी सांगितले कि, स्त्री डॉक्टर असल्यामुळे स्त्रिया मोकळेपणाने त्यांच्या समस्या मांडतात. जर स्त्री रुग्णाच्या सोबत शिक्षित पुरुष आला असेल तर तो तिच्या समस्येबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ आता दिलेली औषधे हि कुठला बाह्य परिणाम करणार नाही ना ? पण जर अशिक्षित पुरुष असेल तर तो काहीच न बोलता बसून राहतो. मासिक पाळीत स्त्रियांकडून होणाऱ्या चुकांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, स्त्रिया सामान्यपणे त्यांचे नॅपकिन्स वेळेवर बदलत नाही, ज्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असते.
          सॅनिटरी पॅड्सची जनजागृती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना ते कसे वापरले जावे हे सांगणे गरजेचे आहे. 
त्याचबरोबर व्यावसायिक जाहिराती या सॅनिटरी पॅड्सबद्दल अचूक आशय पोहोचवत नाही. या आशयात सुधारणा व्हावी, जेणेकरून लोक ते मनोरंजन समजून पाहण्यापेक्षा गरज म्हणून बघतील. सॅनिटरी पॅड्सबद्दल स्त्रियांना माहिती असली तरीही आजही त्या ते वापरण्यास घाबरतात. पूर्वीच्या स्त्रिया पाळीच्या दिवसांतही खूप कामे करायच्या. तसे करणे चुकीचे आहे कारण पाळीच्या दिवसांत स्त्रीचे शरीर ८०मिली रक्त बाहेर पडते. त्यामुळे या दिवसांत विश्रांती गरजेची असते. आधुनिक स्त्रिया या खूप जास्त आराम करतात, पूर्ण विश्रांती घेणेही चुकीचे असते, काही प्रमाणात शरीराची हालचाल आवश्यक असते. टॅम्पॉनस किंवा कप्स यांसारखे नवीनतम पर्यायी सोयी बाजारात उपलब्ध आहे परंतु त्या वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जर हे दोन्ही पर्याय योनीच्या आत जातात, जर ते व्यवस्थित बसले नाही तर ते पुन्हा बाहेर येऊन मूत्रमार्गास हानी पोहोचवू शकतात.
भारतीय समाजातील मासिक पाळीशी निगडित अंधश्रद्धाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, जर स्त्री हि तिच्या रक्तामुळे अपवित्र मानली जात असेल तर तिच्य रक्तातून निर्माण झालेलं हे संपूर्ण जगच अपवित्र आहे, असे मानायला कमीपणा वाटायला नको.

संदर्भ:
२.२.१, २.३.१ कलिना हेल्थपोस्ट मुंबई, डॉ. सुमेध मोरे, स्त्री तज्ज्ञ, बिरला हॉस्पिटल नाशिक, स्त्री तज्ज्ञ डॉ. श्वेता पानसरे,


मासिक पाळीत 'हे' ही वापरता येऊ शकते?

by on मे २९, २०१९
पाळी येण्याचे दिवस जवळ येऊ लागले की मुली आधी त्यांच्या पर्यायी तत्सम गोष्टींची सोय करू लागतात. पुन्हा ऐनवेळी कधीही आली तर धांदल उडू नये ...

भाग - ३ 

तुम्हाला माहिती आहे का, पहिले सॅनिटरी पॅड हे पूरूषांसाठी बनवले गेले. ?

तर अभ्यासावरून हे दिसून आले कि पहिले डिस्पोजेबल सेनेटरी पॅड फ्रान्समध्ये युद्धात नर्सने विकसित केले होते. ते युद्धक्षेत्रात जखमी सैनिकांमधील अति रक्तस्त्राव नियंत्रित करण्याचा पर्याय म्हणून निर्माण केले गेले. ते शोषक आणि स्वस्त आणि वापरल्यानंतर फेकून देण्यास सोयीस्कर होते. बेन फ्रँकलिनच्या आविष्कारामुळे सैनिकांना जबरदस्त जखमांपासून बचावले, या डिस्पोजेबल नॅपकिन्स वायूच्या वेळेस सहज उपलब्ध होते अशा सामग्रीमधून बनविल्या गेले. ते अत्यंत सोयीस्कर आणि वापरल्यानंतर फेकून देण्यासाठी स्वस्त होते.

व्यावसायिक उत्पादकांनी ही कल्पना उधार घेऊन प्रथम डिस्पोजेबल पॅड १८८८च्या सुमारास - साउथबॉल पॅड या नावाने निर्माण केले. अमेरिकेत, जॉनसन आणि जॉन्सन यांनी १८९६ मध्ये 'लिस्टर्ज टॉवेल: सेनेटरी टॉवल्स फॉर लेडीज' या नावाने त्यांची स्वतःची आवृत्ती विकसित केली.

आताची परिस्थिती

जेव्हा स्त्रिया म्हणतात कि, एकविसाव्या शतकातही पुरुष मासिक पाळीचा टॅबू कायम ठेवण्यास कारणीभूत आहे. त्यावेळी याचा प्रत्यक्षात अभ्यास केल्यावर लक्षात येते कि, मासिक पाळीबाबत खेड्या - पाड्यातील, वाड्या - वस्तीवरील महिलांमध्ये जागृती करणे आवश्यक असून, शिक्षणात लैंगिक शिक्षणात मासिक पाळीबाबत स्वतंत्र विषय असावा व अगदी पाचवीपासूनच मुलीमुलांना मासिक पाळीबाबत जागृत करणे आवश्यक आहे.. खरतर आधी शेतात काम करावं लागायचं, नदीतून पाणी आणायचं, कपडे नदीवर धुवायला न्यावे लागायचे, दळण जात्यावर दळाल जायचं, हि सर्व कष्टाची कामे होती, त्यावेळी मासिक पाळी आली असता हि कामे करणे खूप कठीण असायची, शिवाय अशक्तपणा असायचा, त्यावर उपाय म्हणून घरचे लोक त्यांना आराम मिळावा म्हणून एकजागी बसायला लावायचे, आणि असे नियम लावलेत कि त्यांना कुणातच न मिसळून काम करावे लागू नये, हे तेव्हाच्या काळात योग्य होते, कालांतराने याची अंधश्रद्धा होत गेली, आणि आता सर्व कामे सोपी झाली आहे, पॅड्स, टॅम्पॉनस, मासिक कप्स वापरून सहजपणे केली जाऊ शकतात, त्यामुळे कुठलेच नियम, अंधश्रद्धा आता पाळण्याची गरज नाही. तसेच शबरीमाला मंदिरात सर्व स्त्रियांना जाण्याची अनुमती द्यायला हवी.

तसेच, मासिक पाळी आणि त्या दरम्यान होणारे सॅनिटरी नॅपकिन्स या विषयाबद्दल बोलल्याशिवाय अडचणी कळणार नाहीत. त्यामुळे बोलणे गरजेचे आहे. आजकाल इंटरनेट, सोशल मीडिया अशा माध्यमातून या विषयावर मोकळेपणाने चर्चा होत आहेत. शाळा आणि कॉलेज जिथे खुले वातावरण असते तिथे मित्र मैत्रिणींसोबत या विषयांवर बोलायला कोणताही संकोच होत नसल्याने याबद्दल जाणीवनिर्मिती होत आहे.... हा बदल सकारात्मक आहे.

काही पुरुष म्हटले कि, आता मूलभूत गरजा केवळ तीनपुरत्या मर्यादित राहिल्या नसून त्या सकारात्मक पद्धतीने विस्तरायला हव्या. समाजाने जल, जंगल, जीवन आणि जिज्ञासा याबाबत शिकायला हवे. आणि आपल्या समाजाने अशा टॅबूबद्दल बोलायला हवे, त्याला स्वीकारायला हवे. त्यात स्वच्छता महत्त्वाची. सोशल मिडीया, चित्रपट, डॉक्युमेंट्री ही माध्यम नक्कीच समाजसुधारणेला वाव देणारी आहेत. पण, आजही खेड्यापाड्यातील सुशिक्षित लोक आणि स्त्रिया मासिक पाळीला वाईट समजतात किंवा देवाशी जोडतात. चित्रपट किंवा सोशल मिडीया अशा माध्यमातून ही कीड सहज निघणारी नाही. त्यासाठी मुली आणि महिला स्पष्ट बोलतील तेव्हाच ही कीड नाहीशी होईल. आमच्या गावातल्या एकानेही पॅडमॅन थिएटरमध्ये जाऊन पाहिला नसणार आणि जेव्हा टिव्हीवर रिलीज झाला तेव्हाही गावातल्या एकाही कुटुंबाने तो सोबत पाहिला नसणार याची मी पुण्यात बसून खात्री देतो. प्रत्येक मुलगी स्पष्ट आणि बेधडक बोलेल तेव्हा हा विषय सहजसोपा होऊन जाईल.

काही स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी त्यांच्या गरिबीमुळे वृत्तपत्रे , चिखल, आणि राखेचा ही वापर करतात. यामुळे मात्र संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी भारतात आरोग्याच्या दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने विकसित व्हायला हवे. जागरुकता ग्रामीण भागात होणे अत्यंत गरजेचे आहे.ती काही घाणेरडी गोष्ट नाहीये म्हणून लपवून ठेवावी.याबाबत जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे. जागृती झाल्यामुळे माझ्या आया बहिणी यांच्या वरील होणारे दुष्परिणाम त्यांच्यावरील होणारे अंधश्रद्धाचे सावट दूर होतील.शो ऑफ किंवा मार्केटिंग कंपनी पेक्षा जास्त फोकस हा स्त्री शरीर व मानसिक स्वास्थ्य हे विषय हवेत. हा विषय एवढा नॉर्मल होयला हवा की त्याचे फारसे वावगे ही कोणाला वाटू नये एवढा साधा. जसे की पाणी पिणे, जेवण करणे, झोपणे इत्यादी.

या अभ्यासावरून हे लक्षात आले कि, स्त्रीयांपेक्षाही पुरुष जास्त व्यक्त होत आहे. जेव्हा आदिवासी भागात स्वयंसेवी संस्था मासिक पाळी जनजागृतीसाठी जातात तेव्हा त्यात ८०% पुरुषांचा सहभाग असतो. परंतु २०% महिलांनाच बोलावे लागते कारण आदिवासी स्त्रिया या पुरुषांसमोर मोकळेपणाने बोलत नाहीत, त्यामुळे संस्थेच्या इतर कामात पुरुष सहकार्य ठेवतात.

( क्रमश: )