Sufi: मासिक पाळी
मासिक पाळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मासिक पाळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

भाग - ३ 

तुम्हाला माहिती आहे का, पहिले सॅनिटरी पॅड हे पूरूषांसाठी बनवले गेले. ?

तर अभ्यासावरून हे दिसून आले कि पहिले डिस्पोजेबल सेनेटरी पॅड फ्रान्समध्ये युद्धात नर्सने विकसित केले होते. ते युद्धक्षेत्रात जखमी सैनिकांमधील अति रक्तस्त्राव नियंत्रित करण्याचा पर्याय म्हणून निर्माण केले गेले. ते शोषक आणि स्वस्त आणि वापरल्यानंतर फेकून देण्यास सोयीस्कर होते. बेन फ्रँकलिनच्या आविष्कारामुळे सैनिकांना जबरदस्त जखमांपासून बचावले, या डिस्पोजेबल नॅपकिन्स वायूच्या वेळेस सहज उपलब्ध होते अशा सामग्रीमधून बनविल्या गेले. ते अत्यंत सोयीस्कर आणि वापरल्यानंतर फेकून देण्यासाठी स्वस्त होते.

व्यावसायिक उत्पादकांनी ही कल्पना उधार घेऊन प्रथम डिस्पोजेबल पॅड १८८८च्या सुमारास - साउथबॉल पॅड या नावाने निर्माण केले. अमेरिकेत, जॉनसन आणि जॉन्सन यांनी १८९६ मध्ये 'लिस्टर्ज टॉवेल: सेनेटरी टॉवल्स फॉर लेडीज' या नावाने त्यांची स्वतःची आवृत्ती विकसित केली.

आताची परिस्थिती

जेव्हा स्त्रिया म्हणतात कि, एकविसाव्या शतकातही पुरुष मासिक पाळीचा टॅबू कायम ठेवण्यास कारणीभूत आहे. त्यावेळी याचा प्रत्यक्षात अभ्यास केल्यावर लक्षात येते कि, मासिक पाळीबाबत खेड्या - पाड्यातील, वाड्या - वस्तीवरील महिलांमध्ये जागृती करणे आवश्यक असून, शिक्षणात लैंगिक शिक्षणात मासिक पाळीबाबत स्वतंत्र विषय असावा व अगदी पाचवीपासूनच मुलीमुलांना मासिक पाळीबाबत जागृत करणे आवश्यक आहे.. खरतर आधी शेतात काम करावं लागायचं, नदीतून पाणी आणायचं, कपडे नदीवर धुवायला न्यावे लागायचे, दळण जात्यावर दळाल जायचं, हि सर्व कष्टाची कामे होती, त्यावेळी मासिक पाळी आली असता हि कामे करणे खूप कठीण असायची, शिवाय अशक्तपणा असायचा, त्यावर उपाय म्हणून घरचे लोक त्यांना आराम मिळावा म्हणून एकजागी बसायला लावायचे, आणि असे नियम लावलेत कि त्यांना कुणातच न मिसळून काम करावे लागू नये, हे तेव्हाच्या काळात योग्य होते, कालांतराने याची अंधश्रद्धा होत गेली, आणि आता सर्व कामे सोपी झाली आहे, पॅड्स, टॅम्पॉनस, मासिक कप्स वापरून सहजपणे केली जाऊ शकतात, त्यामुळे कुठलेच नियम, अंधश्रद्धा आता पाळण्याची गरज नाही. तसेच शबरीमाला मंदिरात सर्व स्त्रियांना जाण्याची अनुमती द्यायला हवी.

तसेच, मासिक पाळी आणि त्या दरम्यान होणारे सॅनिटरी नॅपकिन्स या विषयाबद्दल बोलल्याशिवाय अडचणी कळणार नाहीत. त्यामुळे बोलणे गरजेचे आहे. आजकाल इंटरनेट, सोशल मीडिया अशा माध्यमातून या विषयावर मोकळेपणाने चर्चा होत आहेत. शाळा आणि कॉलेज जिथे खुले वातावरण असते तिथे मित्र मैत्रिणींसोबत या विषयांवर बोलायला कोणताही संकोच होत नसल्याने याबद्दल जाणीवनिर्मिती होत आहे.... हा बदल सकारात्मक आहे.

काही पुरुष म्हटले कि, आता मूलभूत गरजा केवळ तीनपुरत्या मर्यादित राहिल्या नसून त्या सकारात्मक पद्धतीने विस्तरायला हव्या. समाजाने जल, जंगल, जीवन आणि जिज्ञासा याबाबत शिकायला हवे. आणि आपल्या समाजाने अशा टॅबूबद्दल बोलायला हवे, त्याला स्वीकारायला हवे. त्यात स्वच्छता महत्त्वाची. सोशल मिडीया, चित्रपट, डॉक्युमेंट्री ही माध्यम नक्कीच समाजसुधारणेला वाव देणारी आहेत. पण, आजही खेड्यापाड्यातील सुशिक्षित लोक आणि स्त्रिया मासिक पाळीला वाईट समजतात किंवा देवाशी जोडतात. चित्रपट किंवा सोशल मिडीया अशा माध्यमातून ही कीड सहज निघणारी नाही. त्यासाठी मुली आणि महिला स्पष्ट बोलतील तेव्हाच ही कीड नाहीशी होईल. आमच्या गावातल्या एकानेही पॅडमॅन थिएटरमध्ये जाऊन पाहिला नसणार आणि जेव्हा टिव्हीवर रिलीज झाला तेव्हाही गावातल्या एकाही कुटुंबाने तो सोबत पाहिला नसणार याची मी पुण्यात बसून खात्री देतो. प्रत्येक मुलगी स्पष्ट आणि बेधडक बोलेल तेव्हा हा विषय सहजसोपा होऊन जाईल.

काही स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी त्यांच्या गरिबीमुळे वृत्तपत्रे , चिखल, आणि राखेचा ही वापर करतात. यामुळे मात्र संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी भारतात आरोग्याच्या दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने विकसित व्हायला हवे. जागरुकता ग्रामीण भागात होणे अत्यंत गरजेचे आहे.ती काही घाणेरडी गोष्ट नाहीये म्हणून लपवून ठेवावी.याबाबत जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे. जागृती झाल्यामुळे माझ्या आया बहिणी यांच्या वरील होणारे दुष्परिणाम त्यांच्यावरील होणारे अंधश्रद्धाचे सावट दूर होतील.शो ऑफ किंवा मार्केटिंग कंपनी पेक्षा जास्त फोकस हा स्त्री शरीर व मानसिक स्वास्थ्य हे विषय हवेत. हा विषय एवढा नॉर्मल होयला हवा की त्याचे फारसे वावगे ही कोणाला वाटू नये एवढा साधा. जसे की पाणी पिणे, जेवण करणे, झोपणे इत्यादी.

या अभ्यासावरून हे लक्षात आले कि, स्त्रीयांपेक्षाही पुरुष जास्त व्यक्त होत आहे. जेव्हा आदिवासी भागात स्वयंसेवी संस्था मासिक पाळी जनजागृतीसाठी जातात तेव्हा त्यात ८०% पुरुषांचा सहभाग असतो. परंतु २०% महिलांनाच बोलावे लागते कारण आदिवासी स्त्रिया या पुरुषांसमोर मोकळेपणाने बोलत नाहीत, त्यामुळे संस्थेच्या इतर कामात पुरुष सहकार्य ठेवतात.

( क्रमश: )
 भाग- १ 
"या दिवसात बाहेर नको पडू... तुला आलीये...? मग आता पाण्यात कशी येणार...?, मंदिरापर्यंत सोबत ये, पण आत येऊ नको बरे...? हो, गोमूत्र शिंपडून घे. तू लोणच्याला हात कसा लावला...? तुला तुझी तारीख लक्षात राहत नाही का...?, आता स्वयंपाक घरात येऊ नको बरं...! आणि ए, काकांसमोर कशाला सांगतेस, ती काय मोठ्याने सांगायची गोष्ट आहे का...?"

एव्हाना या “त्या” दिवसांची गुपितं स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांना मनोमनी तोंडपाठ झाली. तरीही विकासाच्या वाटेवरील या एकविसाव्या शतकात आजही त्याला 'टॅबू' नावाच्या पाश्चात्य बंधनात अडकवून भारतात यावर बोलण्यास अप्रत्यक्ष बंदी आहे. 
लहानपणापासून आपल्या निरीक्षणास येते कि, कायदेशीर नियम कुणी इतक्या काटेकोरपणे पाळणार नाही, पण मासिक पाळीच्या चार दिवसात आपल्या कुटुंबातील स्त्रिया मात्र पूर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरांचे पालन इतक्या काटेकोरपणे करून स्वतःला एक 'आदर्श व्यवस्था' म्हणून सिद्ध करण्यात कसलीच कसर ठेवणार नाही.

त्यातही ‘ग्रामीण, शहरी, आदिवासी आणि दिव्यांगातील स्त्री’ हि तिच्या तिच्या चौकटीत कशी वेगवेगळ्या नियमांना आणि त्यातील पुरुषसत्ताक रूढींना अधिक बळकट करून बाईपण सांभाळतात, हे वाखाणण्याजोगे आहे. कारण ‘बाईचं बाईपण बाळगण्याचा बाईलाच अभिमान नाही, तर इतर लोकही तिला कमीच हिनवणार’ हे विधान लहानपणीपासूनच्या या निरीक्षणातून मासिक पाळीला वर्णण्यास चपखल बसते.

परंतु अलीकडच्या काळात आधुनिक मानसिकतेमुळे या विषयातील बंधने आणि मासिक पाळीवरील गुप्ततेचे मळभ दूर करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.

अनेक दशकापासून आपण बघत आलो मासिक पाळी आली म्हणजे ‘कावळा शिवला म्हणून तू दूर राहा’ या अशा गैरसमजुतीच्या वेढ्यात अडकली आहे. परंतु शास्त्रीय दृष्टीकोनातून, मासिक पाळी हि प्रत्येक स्त्रीच्या शरीरातील जैविक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे, असे असूनही सगळीकडेच या विषयाबाबत बोलताना हळूच बोलले जात होते.

या विषयाकडे माध्यमांचा सकारात्मकरित्या कल वाढला आहे त्यामुळे नवनवीन माध्यमे नवनवीन आणि आकर्षक आशय निर्माण करीत आहे. त्यावर प्रतिसाद देता येणे शक्य झाल्यामुळे लोक हळूहळू का होईना मनातील कुजबुजलेला आवाज समाज माध्यमांवर मुक्तपणे बाहेर काढत आहे.

कधी कधी वाटते, मी नव्या तंत्रज्ञानाच्या आणि सामाजिक माध्यमांच्या संपर्कात आल्यामुळे मला मासिक पाळी या विषयातील हा बदल जाणवत असेल. त्यामुळे याचा सखोल अभ्यास मूलभूत घटकापासून सुरु केला. 

तेव्हा एक सर्वमान्य प्रश्न पडला कि, जर मासिक पाळी हि नैसर्गिक आणि शारीरिक प्रक्रिया आहे, तर त्यात समाजाच्या दृष्टिकोनाला इतके महत्व का दिले जाते? आणि हा सामाजिक दृष्टिकोन तोपर्यंत नियंत्रणात असतो, जोपर्यंत तो कोणाला हानी पोहोचवत नाही. परंतु निरीक्षणातून लक्षात येते कि, समाजातील या विषयाला निषिद्ध मानण्यामुळे स्त्रियांवर मानसिकरीत्या परिणाम होतोच पण समाजातील या सवयींमुळे स्त्रियांच्या स्वच्छतेच्या सवयींवरदेखील परिणाम होत आहे.
टॅबू

टॅबू म्हणजे निषिद्ध!

स्त्रियांच्या आरोग्याची गोष्ट जेव्हा येते तेव्हा त्यातील अनेक समस्या या अव्यक्त राहिल्यामुळे होतात. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळीतील टॅबू!

शारीरिक निर्बंध तर आहेतच पण त्याचबरोबर, त्यांच्या शास्त्रीय प्रक्रियेबद्दल बोलणेही टाळले जाते. पण शास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर, मासिक पाळीचे चक्र हे निरोगी शरीराचे आणि प्रजननक्षम स्त्रीचे प्रतिनिधीत्व करते. तरीही सामान्यतः हा विषय गुपचूप आणि पुरुष सदस्यासमोर कधीच बोलला जात नाही.

पाउलो फ्रीरने जगभरातील गरीब देशांच्या आणि त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात 'द पेडॅगोगी ऑफ द ओप्रेस्ड' (2005) या पुस्तकात 'शांततेमागील संस्कृती' या संकल्पनेचा उपयोग केला. फ्रीरने असे म्हटले की, ‘शांततेमागील संस्कृती हि इतरांना त्यांच्या सत्तेत ठेवण्यासाठी अस्तित्वात आली.’

या सिद्धांतानुसार, प्रत्येक मुलीसाठी मासिक पाळी जवळ आली कि, तिला शांत राहण्यास शिकवले जाते आणि या घटनेबद्दल गुप्तपणे बोलावे असे सांगितले जाते.

प्रत्येक किशोरवयीन मुलीसमोर मासिक पाळी कशी हाताळावी, ही जोखीम असते. बर्याच निषिद्ध, सामाजिक आणि सांस्कृतिक निर्बंधामुळे किशोरवयापासून मासिक पाळी हि मनात भीती निर्माण करणारी ठरते. म्हणूनच, किशोरवयीन मुली मासिक पाळी स्वीकारण्यास लाजतात आणि गुप्तता कायम ठेवतात.

ज्याप्रमाणे वधू पक्षाकडून अप्रत्यक्ष हुंडा घ्यावा तसे आपण सगळेच घरात आधुनिकतेच्या नावाखाली अप्रत्यक्षरीत्या छुप्या पद्धतीने अनेक अंधश्रद्धा घरातल्या घरात पाळतो.. ज्यामुळे येणाऱ्या पिढीवर तसेच किशोरवयीन मुलींवर विशेषतः त्यांच्या मासिक पाळीच्या विश्वासावर आणि शास्त्रीय दृष्टिकोनावर पूर्वापार चालत आलेला नकारात्मकतेचा पडदा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.


थोडक्यात,
मानवाची निर्मिती करणारी हि ‘मासिक पाळी’ आजही लपवली जाते. पण ज्याप्रमाणे जगाचा पोशिंदा करणाऱ्या शेतकऱ्यावर बोलले जाते त्याप्रमाणे समस्त माणूस जातीची निर्मिती करणारी हि ‘स्त्री’ वर्गातील ‘मासिक पाळी’ मुक्तपणाने बोलली जाऊन साजरी करावी, असे वाटते.


(या विषयाचा अभ्यास करून त्यावरून आलेले निष्कर्ष नोंदविण्याचा हा प्रयत्न...
क्रमश: )