Sufi: world menstrual hygiene day
world menstrual hygiene day लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
world menstrual hygiene day लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
 भाग- १ 
"या दिवसात बाहेर नको पडू... तुला आलीये...? मग आता पाण्यात कशी येणार...?, मंदिरापर्यंत सोबत ये, पण आत येऊ नको बरे...? हो, गोमूत्र शिंपडून घे. तू लोणच्याला हात कसा लावला...? तुला तुझी तारीख लक्षात राहत नाही का...?, आता स्वयंपाक घरात येऊ नको बरं...! आणि ए, काकांसमोर कशाला सांगतेस, ती काय मोठ्याने सांगायची गोष्ट आहे का...?"

एव्हाना या “त्या” दिवसांची गुपितं स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांना मनोमनी तोंडपाठ झाली. तरीही विकासाच्या वाटेवरील या एकविसाव्या शतकात आजही त्याला 'टॅबू' नावाच्या पाश्चात्य बंधनात अडकवून भारतात यावर बोलण्यास अप्रत्यक्ष बंदी आहे. 
लहानपणापासून आपल्या निरीक्षणास येते कि, कायदेशीर नियम कुणी इतक्या काटेकोरपणे पाळणार नाही, पण मासिक पाळीच्या चार दिवसात आपल्या कुटुंबातील स्त्रिया मात्र पूर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरांचे पालन इतक्या काटेकोरपणे करून स्वतःला एक 'आदर्श व्यवस्था' म्हणून सिद्ध करण्यात कसलीच कसर ठेवणार नाही.

त्यातही ‘ग्रामीण, शहरी, आदिवासी आणि दिव्यांगातील स्त्री’ हि तिच्या तिच्या चौकटीत कशी वेगवेगळ्या नियमांना आणि त्यातील पुरुषसत्ताक रूढींना अधिक बळकट करून बाईपण सांभाळतात, हे वाखाणण्याजोगे आहे. कारण ‘बाईचं बाईपण बाळगण्याचा बाईलाच अभिमान नाही, तर इतर लोकही तिला कमीच हिनवणार’ हे विधान लहानपणीपासूनच्या या निरीक्षणातून मासिक पाळीला वर्णण्यास चपखल बसते.

परंतु अलीकडच्या काळात आधुनिक मानसिकतेमुळे या विषयातील बंधने आणि मासिक पाळीवरील गुप्ततेचे मळभ दूर करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.

अनेक दशकापासून आपण बघत आलो मासिक पाळी आली म्हणजे ‘कावळा शिवला म्हणून तू दूर राहा’ या अशा गैरसमजुतीच्या वेढ्यात अडकली आहे. परंतु शास्त्रीय दृष्टीकोनातून, मासिक पाळी हि प्रत्येक स्त्रीच्या शरीरातील जैविक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे, असे असूनही सगळीकडेच या विषयाबाबत बोलताना हळूच बोलले जात होते.

या विषयाकडे माध्यमांचा सकारात्मकरित्या कल वाढला आहे त्यामुळे नवनवीन माध्यमे नवनवीन आणि आकर्षक आशय निर्माण करीत आहे. त्यावर प्रतिसाद देता येणे शक्य झाल्यामुळे लोक हळूहळू का होईना मनातील कुजबुजलेला आवाज समाज माध्यमांवर मुक्तपणे बाहेर काढत आहे.

कधी कधी वाटते, मी नव्या तंत्रज्ञानाच्या आणि सामाजिक माध्यमांच्या संपर्कात आल्यामुळे मला मासिक पाळी या विषयातील हा बदल जाणवत असेल. त्यामुळे याचा सखोल अभ्यास मूलभूत घटकापासून सुरु केला. 

तेव्हा एक सर्वमान्य प्रश्न पडला कि, जर मासिक पाळी हि नैसर्गिक आणि शारीरिक प्रक्रिया आहे, तर त्यात समाजाच्या दृष्टिकोनाला इतके महत्व का दिले जाते? आणि हा सामाजिक दृष्टिकोन तोपर्यंत नियंत्रणात असतो, जोपर्यंत तो कोणाला हानी पोहोचवत नाही. परंतु निरीक्षणातून लक्षात येते कि, समाजातील या विषयाला निषिद्ध मानण्यामुळे स्त्रियांवर मानसिकरीत्या परिणाम होतोच पण समाजातील या सवयींमुळे स्त्रियांच्या स्वच्छतेच्या सवयींवरदेखील परिणाम होत आहे.
टॅबू

टॅबू म्हणजे निषिद्ध!

स्त्रियांच्या आरोग्याची गोष्ट जेव्हा येते तेव्हा त्यातील अनेक समस्या या अव्यक्त राहिल्यामुळे होतात. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळीतील टॅबू!

शारीरिक निर्बंध तर आहेतच पण त्याचबरोबर, त्यांच्या शास्त्रीय प्रक्रियेबद्दल बोलणेही टाळले जाते. पण शास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर, मासिक पाळीचे चक्र हे निरोगी शरीराचे आणि प्रजननक्षम स्त्रीचे प्रतिनिधीत्व करते. तरीही सामान्यतः हा विषय गुपचूप आणि पुरुष सदस्यासमोर कधीच बोलला जात नाही.

पाउलो फ्रीरने जगभरातील गरीब देशांच्या आणि त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात 'द पेडॅगोगी ऑफ द ओप्रेस्ड' (2005) या पुस्तकात 'शांततेमागील संस्कृती' या संकल्पनेचा उपयोग केला. फ्रीरने असे म्हटले की, ‘शांततेमागील संस्कृती हि इतरांना त्यांच्या सत्तेत ठेवण्यासाठी अस्तित्वात आली.’

या सिद्धांतानुसार, प्रत्येक मुलीसाठी मासिक पाळी जवळ आली कि, तिला शांत राहण्यास शिकवले जाते आणि या घटनेबद्दल गुप्तपणे बोलावे असे सांगितले जाते.

प्रत्येक किशोरवयीन मुलीसमोर मासिक पाळी कशी हाताळावी, ही जोखीम असते. बर्याच निषिद्ध, सामाजिक आणि सांस्कृतिक निर्बंधामुळे किशोरवयापासून मासिक पाळी हि मनात भीती निर्माण करणारी ठरते. म्हणूनच, किशोरवयीन मुली मासिक पाळी स्वीकारण्यास लाजतात आणि गुप्तता कायम ठेवतात.

ज्याप्रमाणे वधू पक्षाकडून अप्रत्यक्ष हुंडा घ्यावा तसे आपण सगळेच घरात आधुनिकतेच्या नावाखाली अप्रत्यक्षरीत्या छुप्या पद्धतीने अनेक अंधश्रद्धा घरातल्या घरात पाळतो.. ज्यामुळे येणाऱ्या पिढीवर तसेच किशोरवयीन मुलींवर विशेषतः त्यांच्या मासिक पाळीच्या विश्वासावर आणि शास्त्रीय दृष्टिकोनावर पूर्वापार चालत आलेला नकारात्मकतेचा पडदा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.


थोडक्यात,
मानवाची निर्मिती करणारी हि ‘मासिक पाळी’ आजही लपवली जाते. पण ज्याप्रमाणे जगाचा पोशिंदा करणाऱ्या शेतकऱ्यावर बोलले जाते त्याप्रमाणे समस्त माणूस जातीची निर्मिती करणारी हि ‘स्त्री’ वर्गातील ‘मासिक पाळी’ मुक्तपणाने बोलली जाऊन साजरी करावी, असे वाटते.


(या विषयाचा अभ्यास करून त्यावरून आलेले निष्कर्ष नोंदविण्याचा हा प्रयत्न...
क्रमश: )