Sufi: जाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट
जाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

तुम्ही जाहिराती किती बघतात ? रिमोटसारखा नियंत्रक आपल्या हातात असतो. पण तरीही जाहिराती कळत नकळत कानावर डोळ्यांवर पडत असतात. यांचा बोध प्रेक्षकवर्ग काय घेतो? त्या जाहिराती अशा का बनविल्या जातात? त्यातील प्रत्येक घटकामागील उद्देश नेमका काय? आशयाचे प्रयोजन काय? अशा अनेक उपघटकांचा यात समावेश असतो. त्याची तपशीलवार मांडणी...

पूर्वीची माध्यमांची भूमिका   
                     
काही वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. टीव्हीवर 'त्या' जाहिराती लागल्या की घरातल्या वडीलधारी मंडळी एखाद्या कंडोम्सची जाहिरात आल्यासारखे चॅनेल बदलायचे,  आई वैतागायची आणि आमच्यासारख्या किशोरवयीन मुलांना नेमका प्रश्न पडायचा - पांढऱ्या पट्टीवर निळं पाणी ओतलं की नक्की काय होतं? आणि  जाहिरातीतल्या मुली एवढ्या लाजून का वागतात किंवा मग 'त्या दिवसांत' फक्त पांढरे कपडेच का घालतात, हे समजायचे नाही. हे कदाचित जाहिरातींच्या अपुऱ्या संदेशवाहनामुळे किंवा काही बाबी हेतुपुरक झाकून ठेवल्यामुळे याबाबत प्रसार होणे तर दूरच पण उघडेपणाने बोलल्यास गुन्हा वाटायचा.
याउलट आताची परिस्थिती मोठया प्रमाणात बदलली आहे. मासिक पाळीसंदर्भात जाहीर चर्चा होत आहे. महिलांच्या आरोग्याच्या मुद्दयांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. गोरगरीब स्त्रियांना मोफत सॅनिटरी पॅड देण्याची मागणी होत आहे.
पूर्वी जाहिराती मुद्द्यावर बोट ठेऊन बोलत नव्हत्या. जाहिरातींच्या दृकश्राव्याचे स्वरूप हे 'उन दिनों' का मामला! म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात असे आणि दुकानात गेलं की दुकानदार त्याच्याकडे असेल तो सॅनिटरी पॅडसचा पुडा घाईघाईनं काळया पिशवीत कोंबून देत असे.
१९९० मध्ये सॅनिटरी पॅड्सच्या जाहिरातींना बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सॅनिटरी पॅड्सच्या जाहिरातींचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. परंतु तरीही सॅनिटरी पॅड्स हे चैनीचे उत्पादन असल्यासारखे त्याचे चित्रीकरण असते, ते जागरूकतेची दृष्टिकोनातून व्हायला हवे.

४.२ प्रेक्षकांसाठी जाहिराती
·         जाहिराती प्रेक्षकांच्या माहितीचा स्रोत ठरत आहे.


 मासिक पाळीवरील जाहिराती जरी लैंगिक, विचित्र आणि चुकीच्या वाटत असतील तरीही बर्याच लोकांसाठी मासिक पाळीच्या जाहिराती या मासिक पाळीबाबत ज्ञान मिळण्यासाठी माहितीचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत ठरला आहे. या जाहिराती मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचतात. त्यामुळे  या जाहिरातींत मासिक पाळीचा कलंक आणि लज्जा पसरविण्याची क्षमताहि आहे किंवा दर्शकांना सूचित आणि सशक्त करण्यात त्या सक्षम ठरतात. सन 1920 च्या सुमारास सॅनिटरीविषयक ऍप्रॉन आणि बेल्ट्सचा वापर केलेली पहिली छापील जाहिरात आली. त्या जाहिरातीत तारतम्य बाळगून सोयीस्कर आणि "स्त्रीची आतील समस्या" याचे निराकरण करण्याचे वचन दिले गेले आणि त्यानंतर अनेक जाहिरातींची सुरुवात झाली. ती आजही चालू आहे.

जाहिरातींचे चित्रीकरण

·        चित्रित केल्या जाणाऱ्या जाहिराती या अचूक असतात का ?
सॅनिटरी नॅपकिन्सवरील अपवित्रतेचा टॅबू सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिरातींमधून दर्शविला जातो, ज्यात मासिक पाळीबद्दल ते बोलतात. भारतातील सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती, 'पसंती' आणि 'स्वातंत्र्य' सारख्या शब्दांचा वापर करून नारे देतात. परंतु यासारख्या नाऱ्यांतून नकळत त्या जाहिराती महिलांच्या शरीरावर स्तरित नियंत्रण ठेवणारी कथा बळकट करत असतात. कारण या ब्रॅंड्सची नावेच मासिक पाळी या टॅबूला टॅबू बनवतात. उदाहरणार्थ; विस्पर म्हणजे कुजबुजणे किंवा स्टे फ्री म्हणजे मुक्त राहा.  स्वच्छता, कम्फर्ट आणि आरोग्य या नावे सॅनिटरी नॅपकिन्स खपवली जातात. परंतु आजही ती एक 'गरज' म्हणून विकली जात नाहीत.

दूरचित्रवाणीवरील चित्रित केल्या जाणाऱ्या जाहिराती या अचूक असतात का ?
भारतीय दूरचित्रवाणीवरील जाहिरातींमध्ये मासिक पाळीची उत्पादने कोणत्या पद्धतीने दर्शवितात त्यावर अवलंबून असते कि समाज त्याला कशाप्रकारे समजून घेतो. काहीवेळेला या जाहिराती अप्रत्यक्षपणे केवळ मासिक पाळीच्या अंधश्रद्धांना चित्रीकरणातून अयोग्य आणि निषिद्ध असल्याचे दर्शवितातच त्याचबरोबर त्या  आणखी प्रमाणित करतात.
उत्पादने विक्री व्हावी, या एकमात्र उद्देशाने जाहिराती तयार केल्या जातात. त्यामुळे उत्पादकांनी जरी मासिक पाळी या विषयाबाबत समाजात नकारात्मक सांस्कृतिक दृष्टीकोन प्रकट केला तरी उत्पादकांना त्याचा काहीच फरक पडत नाही,  आणि परिणामी, स्त्रियांच्या शरीराला जोडलेली कलंक बळकट होत जातात. जोपर्यंत उत्पादनाची विक्री होत आहे तोपर्यंत ते सर्व चांगले आहे.
या अभ्यासाचा उद्देश हाच कि, भारतीय जाहिरातींमध्ये मासिक पाळी कशी दर्शविली जाते आणि या जाहिरातींमध्ये वापरल्या जाणार्या आवर्ती प्रतिमा आणि भाषेचा अंतर्निहित अर्थ कसा असतो, याचे विश्लेषण करणे.
स्टेफ्री या ब्रॅण्डची 2008 ची जाहिरात 'किसी भी रूप के साथ समझौता नहीं' या टॅगलाइनचा वापर करून ती बनवली गेली. ज्यात सादरीकरण करणारी मुख्य भूमिकेत असलेली स्त्री असा संदेश देते कि, तिला आता जी वाटेल ती भूमिका मग ती शिक्षिका असो किंवा मुलगी ती त्या भूमिका निभावू शकेल. पाळीच्या दिवसांतही तिला तिच्या निवडीबरोबर तडजोड करावी लागणार नाही आणि हे सगळे शक्य आहे स्टेफ्री, अल्ट्रा थिन, सुरक्षित, कोरड्या सॅनिटरी पॅडमुळे.



अप्रत्यक्षपणे जाहिरात असे दर्शवत आहे कि, एखादी स्त्री तिच्या खर्या ओळखीशी कशा प्रकारे तडजोड करत आहे किंवा तिच्या पाळीच्या काळात असताना तिचा आत्मविश्वास कसा कमकुवत असतो. किंवा मग मासिक पाळी हा एखाद्या प्रकारचा रोग असल्याचे दर्शवितात.



२०१३च्या विस्परच्या एका जाहिरातीमध्ये पांढर्या रंगाचा वापर दिसून येतो. जाहिरातीतल्या मुख्य भूमिकेतील महिलेच्या कपड्यांपासून बेडच्या चादरीपर्यंत सर्व काही पांढरे आहे. अगदी भिंती आणि पडदे पांढरे आहेत! ग्राहकाला त्वरित स्पष्टपणे हे दिसून येत नाही कि येथे पांढरा हा एक महत्त्वाचा घटक आहे, जो नियमित आनंदी दिवसांमधील - आणि 'त्या दिवसांमधील' स्पष्ट फरक दर्शवितो.
जाहिराती उपभोक्त्यांना असे सांगण्याचा प्रयत्न करते कि, 'अरे, आपण पांढरे काहीही वापरू शकतो किंवा त्यावर बसू शकतो, केवळ या पॅड्सचा वापर करा आणि विश्रांती घ्या जेणेकरून आपण कधीही दागले जाणार नाही.'

बदलेले स्वरूप

काही जाहिराती अशापद्धतीने दाखविल्या जात असल्या तरीही काही युट्युब लघुपट असे आहेत ज्यात महिलांच्या आरोग्याची संकल्पना पवित्र आणि आहे तशी मांडली आहे.
मे २०१८, व्हिस्परची जाहिरात, ज्यात एका १४-१५ वर्षाच्या मुलीला पहिल्यांदाच पाळी येते. त्यावेळी तिची आई आणि आजी या दोघींच्या मानसिकतेतील फरक विनोदी पद्धतीने दर्शविला आहे. जिथे आई म्हणते, 'इशा डान्स कॉम्पिटिशन में नहीं नाचेगी, उसके वो दिन चालू हैं' तेव्हा आजी म्हणते, 'वो दिन वो दिन क्या होता हैं? असे पिरियड्स आई हैं'. या लघुपटातील संवाद हे विनोदी असले तरी समाजातील आतापर्यंत चालत आलेल्या जुन्या अंधश्रद्धांचे आणि प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेचे ते दर्शन आहे.
दुसरी जाहिरात म्हणजे टी फाऊंडेशनने तयार केलेला डोनेट अ पॅड हा लघुपट, मे २०१७. ज्यात एका खेड्यात एक मुलगी आणि वडील असे दोघेच राहत असतात. या जाहिरातीत पाळी येत असलेल्या मुलीची पांढरी चादर सलग दुसऱ्या दिवशीही रक्ताने माखते. त्यामुळे सलग दोन दिवस तिची शाळेला सुट्टी पडते. हे सगळं होतं ती जुना कपडा वापरत असल्यामुळे. या जाहिरातीतून दर्शकांना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे कि,  ग्रामीण भागात आजही जुना कापड वापरला जातो. त्यामुळे कोणकोणत्या समस्या उद्भवतात. परंतु शेवटच्या दृश्यात तिचे वडीलच तिला हे पॅड कसे देतात, याचे योग्य चित्रीकरण करण्यात आले आहे.

सॅनिटरी पॅड्सच्या दूरचित्रवाणीवरील जाहिरातींचे प्रमाण-
जाहिरातींच्या जगात 'रेट बार' नावाची पद्धती असते.  'रेटबार'नुसार जाहिराती लावल्या जातात... ज्या जाहिराती जास्त नफा मिळवून देणाऱ्या असतात त्यांना जास्त जागा/ कालावधी दिला जातो.
या जाहिराती १००-२०० रुपये नुसार किंमत असते. गणिती भाषेत, समजा जाहिरात दिग्दर्शकाकडे १०० सेकंदाची जागा असेल आणि २०० सेकंदाची ग्राहकाकड्न मागणी आली तर ज्याचा दर/ किंमत जास्त त्या जाहिरातीला प्राधान्य दिले जाते. आणि त्यानुसार २०० मधील १०० सेकंद जाहिरात आणि उर्वरित शंभर सेकंद दुसऱ्या जाहिरातीला प्राधान्य दिले जाते.
जाहिरातींचे प्रमाण हे तारखेनुसार आणि वेळेनुसार न लावता ते कंपनीबरोबर झालेल्या व्यवहारानुसार ठरलेल्या कालावधीनुसार एकूण जाहिराती लावतात.
म्हणजेच,
x  दिवस =   दिवसाला रिकाम्या वेळेत जाहिराती लावणे
           ______________________________
            जाहिरातींचे बजेट 
"दर आणि बाजारात उत्पादनाची गरज" या दोन महत्त्वाच्या गोष्टींना धरून जाहिरात कंपन्या जाहिराती स्वीकारतात. मासिक पाळीत वापरले जाणारे पर्याय हे लक्झरी उत्पादन नाहीत, त्यामुळे ते टाळता येत नाहीत. ते मूलभूत गरजांमध्ये मोडतात. 
त्यामुळे संपूर्णपणे दुर्लक्ष न करता मूलभूत पातळीवर म्हणजे काही सेकंदाचा स्लॉट देऊन या जाहिराती दाखवल्या जातात. कोटेक्स स्टे फ्री व्हीस्पर् या जाहिरातींचे भारतात प्रमाण अधिक असते.
उत्पादनातील स्पर्धेमुळे जाहिराती खूप झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचायचे असल्यास आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग सातत्याने चालू ठेवणे हा एकमेव पर्याय असतो. त्यामुळे जो उत्पादक जास्त दराने जाहिरातींचे स्लॉट विकत घेईल त्यांना प्राधान्य दिले जाते.
व्यवसायिक जाहिरातींचे प्रमाण हे सरकारी जाहिरातींपेक्षा जास्त असतात... शासकीय जाहिराती या अर्थसंकल्प असेल किंवा निवडणुका असतील तेव्हा अधिक दाखवल्या जातात.

४.६ निळ्या रक्ताची मानसिकता
प्रत्येक महिलेसाठी मासिक पाळीचे अनुभव वेगवेगळे आहेत, परंतु प्रत्येक महिलेसाठी एक गोष्ट सर्वसामान्य आहे कि, मासिक पाळीत कुणालाच निळा रक्तप्रवाह होत नाही. ब्लू जेल म्हणून मासिक पाळीचे चुकीचे वर्णन प्रत्येक पातळ्यांवर समस्याप्रधान आहे. मासिक पाळी येणाऱ्या स्त्रियांची यामुळे हि धारणा झाली आहे कि, पाळीतील लाल रक्ताने माखलेले खराब आणि अपवित्र पॅड लोकांना दाखवले तर लोकही अस्वस्थ होतील, किंबहुना तसे समजूनच जाहिराती बनविणारे त्या पद्धतीने ब्लू जेलचा वापर करून ती अस्वस्थता समाजात कायम ठेवतात.

जाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट

80च्या आसपास, महिलांच्या आरोग्याबाबतच्या उत्पादनांची जाहिरात मग त्यात सॅनिटरी नॅपकिन्ससारख्या उत्पादनांची जाहिरात हि रात्री ९ वाजेच्या आधी भारतीय टेलिव्हिजनवर दाखवण्याची परवानगी नव्हती. त्यावेळी, निळ्या रंगाच्या ऐवजी लाल शाईचा वापर केला जात असे. तेव्हा स्त्रियांना त्यांच्या कुटुंबांसह या जाहिराती पाहण्यास अधिक त्रास होत असे. त्यावेळी तसे काही खास चॅनेल नव्हते आणि त्यामुळे मासिक पाळीबाबत संभाषण करणे खरोखर अवघड होते. गोष्टी हळूहळू बदलू लागल्या, हळूहळू सॅटेलाईट चॅनेल्स आले, काही विशिष्ट चॅनल्स बनले, टीएएमने (टीएएम, टोटल अड्रेसेबल मार्केट) प्रवेश केला, लाल रंगावर बंदी घातली आणि नंतर मोहिमांमध्ये मासिक पाळीबद्दल बोलणे अधिक सोपे झाले. जाहिरात मोहीमांशिवाय, आज बरेच ब्रॅण्ड या विषयाबाबत जागरूकता आणि शिक्षण देण्यासाठी सक्रिय होऊन काम करत आहे.

पुरुषांचा सहभाग:
सॅनिटरी नैपकिनच्या जाहिराती 'कमजोरी' हा फरक मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.  या फरकाच्या निर्मूलनाद्वारे स्त्री सक्षमीकरणाकडे लक्ष दिले जात आहे. या सततच्या प्रयत्नामुळे लिंगभेद हा फरक दूर केला जात आहे. मासिक पाळी हे स्त्री शरीराचे एक आवश्यक कार्य आहे.  जे ते निरोगी असल्याचे दर्शवते.
गंध: स्त्रियांना सुंदर, सुगंधित आणि शुद्ध घटक जास्त आकर्षित करतात. त्यामुळे आधुनिक जाहिरातीत हा घटक प्रकर्षाने दाखविला जात आहे.

जाहिरातीत पहिल्यांदाच रक्ताचा रंग


आत्ताच्या परिस्थितीत हे स्वरूप बदलताना दिसत आहे. मानवी रक्ताचा रंग कसा असतो? लाल! हे उत्तर तर सर्वांनाच माहीत आहे. मग सॅनिटरी पॅडच्या जाहिरातींमध्ये रक्ताचा लाल रंग न दाखवता निळ्या रंगाचा डाग का दाखवतात?
समाजात मासिक पाळीबद्दल खुलेपणा आणि सहजता नसल्यानं असं होत असेल. पण बॉडीफॉर्म या ब्रिटनमधल्या ब्रँडनं जाहिरातींमध्ये सॅनिटरी पॅडवर निळ्या रंगाच्या जागी लाल रंगाचे डाग दाखवले आहेत.
बॉडीफॉर्मची मूळ कंपनी असलेल्या 'एसीटी'ने म्हटलं आहे की "मासिक पाळी हा विषय चारचौघांत न बोलण्याचा विषय समजला जातो. आम्हाला या समजुतींना आव्हान द्यायचं आहे."
या जाहिरातीत सुरुवातीलाच एका पुरुषाला सॅनिटरी पॅड खरेदी करताना दाखवण्यात आले आहे. तसेच सॅनिटरी पॅड्स हे पुरुषांना भेटले तर पुरुष कसे प्रतिसाद देतील हे दर्शविले आहे. त्याचबरोबर महत्वाचा भाग म्हणजे एक अंघोळ करणाऱ्या महिलेला अचानक  जेव्हा पाळी येते तेव्हा ज्या रक्ताचा रक्तस्त्राव होतो तो आहे त्या रंगाचा दाखविण्यात आला आहे. 
आणि शेवटी एक ओळ टाकली, मासिक पाळी हि नैसर्गिक आहे, तर त्याबद्दल दाखवणे हेही नैसर्गिकच हवे ! 

माध्यमांच्या चुका:  
वृत्तपत्रात मासिक पाळीबाबत खूप कमी प्रमाणात लिहिले जाते. हे लिखाण केवळ महिला दिन, मासिक पाळी दिवस, शबरीमाला मंदिर घटना अशा विषयांना धरून लिहिले जाते. हे लिखाण सर्वांगीण होत नाही असे मत स्त्री तज्ज्ञांपासून सामान्य लोकांचे आहे. सर्वसामान्यांचे म्हणणे आहे, (४.७.१) त्यांना या विषायाला समजून घ्यायचे असते परंतु वृत्तपत्रातील लिखाण हे बातमी स्वरूपात असते, ते लेखाच्या किंवा सदराच्या स्वरूपात नसते.
मासिक पाळी हा विषय एकदा समजावून समजेल असा नाही, त्यामुळे याबाबत सतत बोलले जाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तज्ज्ञ मंडळींना अशा उपक्रमात संधी देऊन त्यांच्याकडून स्तंभलेखांचा सदर लिहिला जावा, ज्यात सर्वसामान्यांच्या चुका विनोदी आणि आकर्षक पद्धतीने समजावून सांगून काय टाळले जावे हे सांगण्याचा प्रयत्न असावा. माध्यमे नफा-तोट्याच्या दृष्टिकोनातून याचा प्रसार करतात. माध्यमांतील जनजागृतीचा आशय उदा. जाहिराती आणि चर्चा यांचा आशय हा व्यावसायिकदृष्ट्या तयार केलेला असतो. तो आशय बौद्धिक आणि प्रगत  असावा. वृत्तपत्रांकडे वाचकाला विचार करायला भाग पडण्याची क्षमता आहे, त्याचा वापर अशा 'टॅबू'धारक विषयांसाठी करावा.

सोशल मीडिया जनजागृतीचे व्यासपीठ
समाज माध्यमांतून 'मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड्स' हे विषय ट्रेंड म्हणून जगभर पसरत आहे.
फेसबुक-ट्विटर-इंस्टाग्राम-  ट्विटर हे असे माध्यम आहे जिथे हॅशटॅग भाषेतून २८० शब्दमर्यादेतून आपला आशय अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहेच आणि त्यामुळे स्पर्धेच्या युगात ज्यांना वेळ कमी असतो त्यांच्यास्तही ट्विटर माध्यम फायदेशीर ठरत आहे.
सॅनिटरी पॅड्सच्या संदर्भात ट्विटरची छाननी केली असता काही हॅशटॅग्स समोर आले. त्याचबरोबर हेच हॅशटॅग्स पुढे प्रचलित होऊन इंस्टाग्राम फेसबुकसारखा नामांकित समाज माध्यमांवर ट्रेंड झाले. त्यामुळे समाज माध्यमांच्या माध्यमातून हि जनजागृती नवीन विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे सहज सोपे झाले आहे.
मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेले हॅशटॅग्ज
#pms, #menstruation, #period, #periods, #women, #womenshealth, #menstruationmatters,#menstrualcycle,#periodproblems, #health, #menstrualcup, #zerowaste, #cramps, #womenempowerment, #ecofriendly, #periodpositive, #tampons, #feminism, #wellness,#selfcare, #taxfreesanitary, #padman, #happytobleed


ई-कॉमर्स साईट्सचे प्रयत्न

सॅनिटरी पॅडची ऑनलाईन विक्री हा व्यवसाय तितकासा फायदेशीर नाही. याचे कारण - उत्पादने कमी किमतीची आहेत आणि त्याचा आवाका मोठ्या प्रमाणात आहे. खरेतर या श्रेणीमध्ये येणारी उत्पादने हि किरकोळ विक्रेत्यांसाठी योग्य नसतात. कारण कुरिअर खर्च जास्त असतो आणि पाठविलेल्या प्रत्येक ऑर्डरवर तोटा होऊ शकतो. तथापि, ब्रँड मालक म्हणून एखादी कंपनी ऑनलाईन विक्रीचे नियोजन करत असल्यास ते फायद्याचे ठरेल कारण उत्पादन बनवण्याच्या प्रक्रियेपासून ते पोहोचविण्याचा खर्च याचा एकत्रित खर्च हा नफा मिळवून देणारा ठरतो.
तरीही शासकीय योजनांतर्गत कमी किमतीत सॅनिटरी पॅड्सची विक्री असो ती अशा साइट्सच्या माध्यमातून केली जाते. काही साईट्स उदा. कार्मेसी ४.१ हि साईट नैसर्गिक सामग्रीपासून बनविलेले पॅड्सची विक्री करते. या साईट्सने समोर आणलेले हे पॅड्स पर्यावरणाला घातक नसलेले, नैसर्गिक सामग्रीचा समावेश असलेले आणि पॅड्सच्या खोक्यात वापरलेले पॅड टाकण्यासाठी पिशवी पुरविणारे आहे. त्यामुळे हा प्रकल्प सामाजिक, पर्यावरणीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर आहे. परंतु ई- कॉमर्स साईट्सवर सुद्धा सॅनिटरी पॅड्स मिळतात, हेच ८०% लोकांना माहिती नाही. त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात प्रसार करणे आवश्यक आहे. तसेच या साईट्सवर दिलेली माहिती हि केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे, त्या ठिकाणी स्थानिक भाषेचा पर्याय उपलब्ध असणे आवश्यक आहे. कारण अनेक ई-कॉमर्स साईट्स या लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळे बंद पडतात. त्यामुळे या साईट्सने पब्लिसिटी, प्रोमोशन हे विविध उपक्रमांतून लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

alibaba.com
nuawoman.com
https://mycarmesi.com/
https://www.indiamart.com/

संदर्भ 
जाहिरात तज्ञ् (योगेश पवळे,  ग्रुप हेड- महाराष्ट्रझी मीडिया  कॉर्पोरेशन लिमिटेड)  मार्गदर्शनातून सदर आकडेवारी आणि गणिती संकल्पना मांडल्या. 


जाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट!

by on मे ३१, २०१९
तुम्ही जाहिराती किती बघतात ? रिमोटसारखा नियंत्रक आपल्या हातात असतो. पण तरीही जाहिराती कळत नकळत कानावर डोळ्यांवर पडत असतात. यांचा बोध प...