हाई बोलु? हेलो ? की मग फक्त एक स्माइली टाकु? की मग हाई बोलून स्माइली टाकु?
हाश्ह्ह्ह....... मला काहीच समजत नव्हत. पुरती चलबिचल, धांदल,गडबड,थरथर सगळ एकदाच....
हां.....पाण्याचा घोट घेतला नि ठरवल कि हेल्लोच बोलते...तितक्यात फोन वाजला ... त्याचा फोन होता तो. ओ माय गॉड……. माझा श्वास त्या फोनवरच्या आवाजात थांबला होता.
तो – हेलो
मी - हेलो कोण ?
तो – कशी आहेस.... ?
मी मनातल्या मनात हसून म्हटलं, नशीब त्याने त्या 'कोण'चं उत्तर दिलं नाही.
मी - यावर तर बरं आहे, ठीक आहे, मस्त आहे की मग मजेत ? काय उत्तर देउ? की सरळ सरळ विचारून टाकु , का फोन केला म्हणून ........ नाही, नको ....
तो - ते जाऊदे सगळं. "मला सांग कुठे आहेस आत्ता? ?"
"हेलो?"
मी - हं..... मित्राबरोबर.....
तो - काही प्लान आहे का आजचा?
मी - नाही......
तो - मी येतोय. नेहमीच्या ठिकाणी भेट. नो एक्सक्यूझेस....बाय.
“काय पटापट बोलून गेला हा.. बस्स ? मी गारठली होते, अंगात सनसनीत झणक गेली होती. त्याच्या त्या अनपेक्षित शांत शब्दांनी. जाऊ की नको ? नाहीतर मेसेज टाकते, काम आहे आज नक्कोच भेटायला... पण भेटावसही वाटतय. आज तब्बल ४ महिन्यांनी त्याने फोन केलाय, नक्कीच काहीतरी काम असणार. सोबत नीशाही असेल ? सुंदर दिसते तशी ... दोघे सोबत छान दिसतात, नाही? ओह काम ऑन आयशा , स्टॉप थिंकिंग टू मच…….” मी स्वतःलाच समजावल.
“एनी प्रॉब्लेम?” मित्राने विचारलं.
मी - नो, नॉट ऐट ऑल...
फोन कट झाला होता. काहीच बोलली नव्हते मी, कारण आजचा हा फोन नि त्यानंतर झालेल संभाषण, आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं, की आज त्याला माझी गरज आहे.
आम्ही भेटलो. तो आला. मी पाहिलं.
माहीत नाही का ? पण आज पहिल्यांदा सोबत असलेल्या मित्राला मी 'मीठी मारुन बाय' केल. तो बघतच होता. माझं मन आज चक्क शांत होत, निगरगट्ट गार. जे हृदयाचे ठोके त्याला बघून धडधडायचे ते आज जणू नव्हतेच.
शर्ट तर तोच घातलाय, पहिल्या भेटीचा. पर्फ्युर्मही तोच, स्पाइक्स, स्टॅंड कॉलर, ब्लॅक शर्ट बस्सच... याआधी तर कद्धी असं झालं नाही ..? काही हवंय का याला? ती सोबत नाही दिसतेय ... काही गडबड तर नसेल?
तो हसला. मला खोट हसावं लागलं. चार बाय सहाच्या खोलीत जितकं गुदमरत नाही, तितकी घुसमट त्या एसी गाडीत होत होती. कारण, काहीही झाल तरी 'माझ प्रेम संपलय' हे त्याला दाखवायचं होतं, आणि यावेळी ते गरजेचही होत. अवघड होत? नाही… बिलकुल नाही ... मी असे एक ना असंख्य विचार करत होते.
गाडी सुरू झाली, पण संवाद मात्र नव्हताच. नजरानजरही झाली नाही किंवा मुद्दाम टाळली त्यानेही... २० मिनिटांचा वेळ गेला.
आम्ही दोघेही शांत होतो, इतके शांत की आवाज होता, फक्त एसी नि रेडियोच्या 'आपकी मुलाक़ात'चा.
तो - गाणं बदलू..? नाहीतर तूच लावते का एखादं? असही तुला माझी प्लेलिस्ट आवडत नाही ना ....
मी - हां
:) ..... ( पुन्हा एकदा मनाला समजावलं, प्रेम संपल आहे आणि ते पुन्हा होणार नाहीच , बस्स ..यापुढे काहीही विचार करायचाच नाही) या तन्द्रित अजाणतेपणी मी 'ब्रेकअप सॉँग' लावलं.
हश्ह्ह्ह्ह.... दोघांची नजरानजर झाली आणि एकदाची ती शांतता भंग झाली, आता मात्र दोघेही खळखळुन हसलो.
तो -तू केव्हापासून अशी गाणी ऐकायला लागलीस ? ' त्याने सहजच विचारल'
मी - नवाब साब, मोहब्बत क़ी थी इसलिए, मोहब्बत जी रहे थे|
अब दिल टूटा है, तो उसे भी अपने दर्द की खुशी बाटने का मौका दो||
तो - तू बिलकुल नही बदललीस |
“मी आताही शांतच होते. खरं सांगायचं, तर केव्हा एकदा बडबड करते अस झालं होतं. या शांततेची बिलकुल सवय नव्हती, ना मला ना त्याला. माझा तो थंडावा त्याला आतून खात असावा, तो तेवढा ओळखतोच ना मला ?.... नक्कीच आयशा, हा काय प्रश्न झाला?
पण मग “निशा नि माझ्यामध्ये त्याने निशाला निवडल,” माझ्यावर प्रेम होत ना? ..” तो असतानाही मी स्वतःबरोबर बोलणं अधिक पसंत करत होते ......... पण तरीही कदाचित काहीतरी वाटल असावं किंवा नाहीसुद्धा किंवा मग मी बोलावं म्हणून…म्हणूनच त्याने "लग जा गले" लावलं. माझं भयानक आवडतं गाणं.!
आता मात्र माझ्या मनातल्या आठवणी, प्रेम, एकत्र घेतलेला चहा, ज्ञानप्रबोधिनीची एसपीडीपी, डाकेची दाबेली , वडापावचा चटका, डॉमीनोझचा पिझा, ऐन पावसात छत्री नसताना उडालेली धांदल, राग, रुसवा, त्याचं मनवनं ,चीडचीड, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक आल्हाददायी क्षण यांना ओहोटीसारख उधाण आलं होतं. ४ महिन्यात सहन केलेला तो दुरावा, तो एकटेपणा त्या एका गाण्यामुळे मी पुरती विसरून गेले, स्वतःलाच मन म्हणत होतं,
"लग जा गले के फिर ये, हसीं रात हो ना हो|
शायद फिर इस जनम में, मुलाक़ात हो ना हो || " गाण्याचे बोल मला बोलतं करू पाहत होते. ओठांवर शब्द इतके ऊसळुन आले होते की, कोणत्याही क्षणी तोल जाऊन बाहेर पडतील, पण मग मनाने प्रश्न केला,
"आठवते ती रात्र.? जेव्हा तू सोबत होती. तू अडचणीत होतीस. तो ही सोबत होता. हेच गाणं बाजूला चालू होतं. तो तुझा हात धरून विचारू शकत होता की " पिल्लू काय झालयं? मला सांग बरं..... मी आहे ना सोबत ... ही अशी रुखीरखी परी छान नाही वाटत बघ...." पण तेव्हाही त्याला फोन आला. काळजी घे, म्हणून तो निघून गेला, तो गेलाच.
त्यामुळे आज तू काहीही बोलणार नाहीस हे कन्फर्म. कारण तुझं प्रेम तू मारलं आहेस, तुझ्या भावनांना तू मारलं आहेस नि ते कायमचंच.! आता कोणतीही तडजोड नाही, कारण नातं वाचवण्यासाठी जी तडजोड करत होतीस तू, ते नातंच आता राहील नाही, मग तडजोड ती कशासाठी?”
त्याने माझी तंद्री तोंडात विचारलं,
तो - आज उपवास आहे?
मी - अं...?
तो - नाही, इतकी शांत तू कधी नसतेस ना, म्हणून विचारलं.
मी - हमारे चेहरें पे तो हरदम मुस्कुराहट हुआ करती थी| शायद, हमारा वही अंदाज आपको रास नही आया ||
तो - असं तुटक का गं बोलतेयस ? बोल ना काहीतरी एकदम धाडधाड फाडफाड आधीसारखं.... तुझी ही शांतता पोखरतेय मला.
"एकदा माफ कर ना!"
मी - माफी ? कशासाठी?
तो - सगळ्याच गोष्टींसाठी.
मी - कोणत्या गोष्टी ? मला काहीच कळत नाहीए...
तो - पिल्लू, तुला सगळं कळतय. नको ना अस करुस. मला नाही ना राहता येतंय तुझ्याशिवाय....
मी - मला खरंच नाही रे कळतेय, तू कशाबद्दल माफी मागतोयस ते.
तो - बर मी काय करू म्हणजे तू आधीसारख वागशील ?... सांग ना .........
मी - अरे थांबव..... थांबव..... थांबव.... घर आलं ना माझं. चल बाय, छान वाटलं भेटून ...
:)
तो - तू बदललीस.... इतकी की, तू शांत झालीयेस प्रचंड आणि मला त्रास होतोय त्याचा. कान तरसलेत गं तुझ ते "आज जाने की ज़िद ना करो " ऐकायला. आज हवं तितका वेळ थांबेल, तू जा म्हटली तरी नाही जाणार, पण तू बोल गं… मी खूप एकटा पडलोय गं..... काहीतरी तर बोल....प्रेम करतो गं मी तुझ्यावर..........
मी - "बस्सससस्स्स्स्स्स्स हां.......... यापुढे एक शब्दही नकोय मला....... नॉट ए सिंगल वर्ड ... प्रेम ? वाह बॉस.... सवयीला प्रेमाच नाव देऊन मोकळा झालास ?,ज्याला तू प्रेम म्हणतो, ती निव्वळ एक तडजोड आहे , आपल्या या सो कॉल्ड तडजोडीला कंटाळून प्रेम कधीच लुप्त झालय.. हे जे आपण भेटलोय ते काही प्रेम म्हणून नाही , मुळीच नाही. आपण भेटलोय, कारण आपल्याला एकमेकांची सवय झालीय. तुला भीती मला गमवण्याची मुळीच नाहीए, तू घाबरतोय त्यानंतर येणार्या एकटेपणाला नि तुझा तो एकटेपणाच आज माझ्यासमोर माफी मागतोय.... त्यामुळे ना....".
पुढे बोलणारच तितक्यात फोन वाजला......” हे! कैसे हो ? बहोत दिनों बाद ....? ” फोनवर बोलता बोलताच त्याला अलविदा केल नि मी निघाले.
मी शरिराने तर घरी आले होते, पण मनात विचारांनी घरच्या घर बांधली होती, आसवांची अतिवृष्टी होतानाही, का कुणास ठाऊक, पण मनाचा एक कोपरा इतका सुखावला होता की, डोक बंद होतं नि मन तूटल होतं तरीही तो आनंदित होता ...पण का ?.... .........
आता सगळच संपल होतं... हो ना?. सगळंच....
मग का ? रात्री रेडियोवर लागलेल्या ''आज जाने की ज़िद न करो '' ऐकताना मी रडले? का पुन्हा 'त्याच्या नसण्याच्या'नुसत्या कल्पनेने कोलमडले आणि याहीवेळी नेहमीसारखंच माझ्या अश्रुंचा समुद्र बघण्यासाठी ती रात्र नि तिचा काळोख होता….. तो नाहीच….!