Sufi
भाई…. 

नाव आणि लहानपण यामुळे गाजलेला कुणीतरी व्यक्ती पडद्यावर दिसणार म्हणून उत्सुकतेने आणि महत्त्वाचं म्हणजे अपेक्षेने चित्रपट बघायला जावं. पण बदल्यात  ? 
चित्रपट आहे छान. पण हा पूर्वार्ध होता, कदाचित पुढे मांजरेकर पूर्वर्धाचं समीक्षण पाहून उर्वरित पु.ल अजून खोलात जाऊन विनोदी साकारतील… ही अपेक्षा!
मनापासून चित्रपटात काहीतरी कमी जाणवतच राहिली. कारण पुलं देशपांडे यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर मधूनच म्युझिक आणि मोजक्या संवादामुळे पुलं बघायचाच असे ठरले. कारण लहानपणीपासून जसं चार्ली चॅप्लिन तसे महाराष्ट्रात पुलं. असं होतं म्हणून उत्सुकता टोकाची होती. 
मांजरेकर यांनी प्रयत्न हा केला की, जनसमुदायाला खऱ्या अर्थाने पुल कळावे. पण ते कळावे म्हणून तो बायोपिक गांभीर्याने करावा हे बंधन नव्हतं. दुर्दैवाने तसं घडलं.
आपण कोणती जबाबदारी घेतोय, त्याचा पडद्यावर साकारल्यानंतर होणारा परिणाम हे अत्यंत जोखमीचे काम असते. मी मुळीच हे म्हणणार नाही की, दिग्दर्शनास मेहनत घेतली नाही. मांजरेकर हे मुळात चित्रपट क्षेत्रात मुरलेले. त्या व्यक्तीने चित्रपट क्षेत्रात अभिनयापासून, प्रोडक्शन, लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. त्यामुळे त्याच्या कार्यावर आक्षेप किंवा टीका हा मुळात विनोद ठरेल. पण मी केवळ एक प्रेक्षक म्हणून मला पुलं किती भावले आणि का नाही भावला हे सांगण्याचा हा प्रयत्न केला…
मुळात “ज्या माणसाचा यूएसपीच/ वैशिष्ट्यच हशा पिकवणं आहे. त्याच्या चित्रपटाला चित्रपट गृहात सगळे गंभीर. ?   हा भलताच विरोधाभास घडून आला म्हणायचं.” हातावर मोजण्या इतके विनोद सोडले तर उर्वरित चित्रपट मांजरेकर टाईप्स आहे.
तरीही एकंदरीत जुळवाजूळव छान आहे.
चित्रपटाचा प्रवाह हा एक वेगळा प्रयोग वाटला. कारण , ” मृत्यूच्या वेळी आपल्या जवळ किती व्यक्ती असतात त्यावरून त्याची श्रीमंती दिसते. ” आणि सादर चित्रफितीत पुल देशपांडे या अवलियाची श्रीमंती त्या हॉस्पिटलच्या आवारात घोंगावत , फिरत प्रत्येकाच्या मनातले पुल दर्शवताना  दिसते. हा प्रयोग आणि बायोपिक सादर करण्याची पद्धत आवडली. वेगळी वाटली. पण जर चित्रपट हा बायोपिक बनवला, तेव्हाच एक प्रमुख गोष्ट त्यात असायलाच हवी, “ज्या व्यक्तीचा बायोपिक बनतोय ती व्यक्ती” ती व्यक्ती केवळ असून चालत नाही, तीच व्यक्ती ठासून असायला हवी, एवढी ताकद त्या व्यक्तिरेखेत हवीच. आणि व्यक्तिरेखेत असेल तर ती दिग्दर्शनातही उतरायलाच हवी.
संपूर्ण चित्रपट पुलंबरोबर फिरत असला तरी भाई खूप कमी दिसले, किंवा दिसलेही तरी त्यांच्या आजूबाजूचे पात्र जास्त उठून दिसले. सुनीता हे माझं या पूर्वार्धात सगळ्यात आवडत आणि न्याय्य पात्र. भूमिका ज्या भरभक्कम जबाबदारीने इरावती हर्षे ( सुनीता) यांनी साकारली. तेवढी एकमेव भूमिका ही अतीव सुंदर आणि खरी वाटली. मुळात ती भूमिका अभिनय नाही, जवळची वाटला. त्याप्रमाणेच भाई साकारलेला सागर देशमुख हेही भूमिकेस साजेसे होते खरे पण दिग्दर्शन करताना पुलंचा लहेजा आणि दिसणं काठोकाठ जुलवलं असलं तरी त्यांचा विनोदी किंवा कॉमिक टाईमिंग जे म्हणतात, ते जमायला आणि तितकी मजबूत डायलॉग डिलीव्हरी नाही जमली, जाणवलं. ज्या व्यक्तीची दहावीला बटाट्याची चाळ वाचली,  केवळ पुस्तकातून लोकांच्या मनावर राज्य करून त्यांना हसवण्याचं शस्त्र पेलवलं होतं, पोट धरून धरून हसण्याचं द्योतक असलेला हा अवलिया, दहावीला मराठीच्या कुमारभारती मुळे आपलासा झाला होता. ती जादू दहावीला मराठी शिकवणाऱ्या शिक्षकाची होती की पुलंची ? हा प्रश्न चित्रपट पाहिल्यानंतर पडतो. कारण हेच पुलं आज तर दृकश्राव्य माध्यमातून समोर आले. म्हणतात ना छापील पेक्षा दृकश्राव्य ची ताकद जास्त मग तरीही चित्रपटाची ताकद कमजोर का पडली. तरीही जसं म्हणते की कुठलाही चित्रपट काही. ना काही छान देऊन जातो. तसं या  चित्रपटातील घरगुती ड्रामा हा सुंदर वाटतो, थोडा नेहमीचा आहे पण ओरिजनल आहे. तसेच आवडता सिन म्हणजे सुनीता आणि पुलंची भेट… अतिशय आकर्षक आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कोण्या एका सौंदर्यवती स्त्रीला पाहून वाटेल तशा स्वरूपाची ही भेट. तेवढ्या ठिकाणी मात्र किंचितसे पुलं दिसले. वाटतं तो संवाद तर ट्रेलरमध्येही पूर्ण झाला, मग अजून कशाला चित्रपट.? पण आहे, त्याशिवाय ही चित्रपट उरतो. पुलं न संपणार पुस्तक आहे. 
सुनीता म्हणजे पुलंची दुसरी बायको. कट्टर स्त्रीवादी. त्यामुळे कणखर, खमकी आणि स्वतंत्रही. पण लग्न झाल्यानंतर आयुष्याचा भार वाटून घ्यायला लागतेच सोबत्याची साथ. आणि तेव्हा जर पुलंसारखा व्यक्ती असेल, जो लेखक आहे, गाण्यांना देणारा आहे, पेेेटी वादनाची आवड, शिवाय नाटकाचीही आवड, असे लोकं कलेत जास्त रमतात. त्यांना बाहेर वास्तवात घडणारं सगळं केवळ ढोंगीपणा वाटतो.  तेव्हा सहाजिकपणे संसारात दुर्लक्ष होऊन साथ न मिळाल्याने सूनिताने गर्भवती असल्याची बातमी समजताच दुसऱ्या दिवशीच गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. हा संदेश खूप कमी लोकांना पटेल की अशा वेळी पुलं न चिडता आईला म्हणतात, “योग्यच केलं तिने. तू दुखावली असणार पण आजी म्हणून तू बाळाला जपशील, वाढवशील पण त्या बाळाची सुरुवात आणि शेवट हा तिच्याच जवळ होणार आहे. त्यामुळे तेवढं स्वातंत्र्य तर नक्कीच तिला आहे.” हे संवाद लेखन आणि प्रस्तुती मनाला भावली. या आजच्या जगात ती स्वीकारलीच जावी असे वाटत राहते.
याशिवाय चित्रपटातील बाळासाहेब ठाकरे, पंडित भीमसेन जोशी यांचं अस्तित्व सुरेख वर्णिले. परंतु तरीही जी सर यायला हवी ती जमली नाही, वाटलेले की नाही काही तर शेवटी वसंता, पंडित भीमसेन आणि पुलंची मैफिल भाव खाऊन वाह वां मिळवेल परंतु साफ हरले तिथे. पण हो चित्रपटाचं संगीत रुचकर आहे, संपूर्ण चित्रपटाला भक्कम आधार वाटला संगीताचा. 

एका वाक्यात सांगायचे तर, पुलं चित्रपटगृहात बघण्यापेक्षा ट्रेलरमध्ये जास्त उजळून दिसले… प्रसिद्धीमुळे चित्रपट उचलला गेला तरीही काहीतरी अपूर्णत्व जाणवत राहिले.
याव्यतिरिक्त चित्रपटाला स्क्रिनिंग मिळण्यावरून वाद चालू असणारच. पण बघावा चित्रपट, मराठी आहे म्हणून नाही पण महाराष्ट्रातल्या अशा हरहुन्नरी लोकांशी चित्रपटी ओळख तरी असायलाच हवी नं… 

हास्याचे 'पुलं' चित्रपटगृहात कोमेजले !

by on जानेवारी ०५, २०१९
भाई….  नाव आणि लहानपण यामुळे गाजलेला कुणीतरी व्यक्ती पडद्यावर दिसणार म्हणून उत्सुकतेने आणि महत्त्वाचं म्हणजे अपेक्षेने चित्रपट बघायल...


जुनं वर्ष नवं होतंय... 
जून्यात नवं टाकायचंय ...
नव्याला टिकायचयं जुन्याला टिकवायचंय !

दिवस आजचा खास होत होता.. कारण ... ?
कारण नाही, कारणे होती... अनेक अनेक अनेक कारणे... 
त्या प्रत्येकाची कथा होती. एक वेगवेगळी कथा... 
मनुष्याच्या जीवनाची हीच मजा असते... माणूस कितीही बोअरिंग असला तरी त्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोजचं सरप्राइज असतं...
ते सरप्राइज माणसाचा विचार न करता येतं, आणि नवं काहीतरी देऊन जातं... पण त्यालाच आज सरप्राइज करत वर्षाचं जुनंपण आज सेलिब्रेटच करायचं ठरलं.
बात कुछ यू थी... 
त्या एका ठिकाणी जावं, जिथे आवडेल मनाला... 
वर्षाच्या शेवटी जावंच की...
तिथेच एक पेयं यावं... 
ए दारू नसावी ती, पण तरी नशा कुछ झिंग चढेल एवढी ... 
मागे ' तुझसे नाराज़ नहीं जिंदगी ' इंस्ट्रुमेंटल संगीत ... 
ती धून ओळखत ओळखत पार कितीतरी कधीतरी कुठेतरी ऐकलेल्या मनाच्या कॅसेट प्लेअरमधून ते गाणं धडपडून शोधता शोधता हिय्या... हे तर तुझस्से नाराज नहीं... 
आणि या तेवढ्या कष्टातून मुजिक शंपून दुसरं लगेच, ' जिना यहां मरना यहां ' ... मुड ऑफ होता होता राहून हे गाणं गुणगुणत चालू द्यावा विचारांचा प्रतिवाद... 
              
         विचार आपले केवढे मोठे सोबती असतात... कधीतरी आपली साथ सोडतात ते...? किती गैरफायदा घेता ते आपला !
सतत स्वतःला बरंच अटेंशन मिळवून घेत राहतात...
आणि आपण मनुष्यप्राणी असतोच मुळी खूप निःस्वार्थी... किती साथ देतो ना त्यांची...?
मग काय आपण ऐकतो विचारांचं... आणि घडत जातं आयुष्य...
त्यामुळे या वर्षात निर्णय घेणं किती धाडसाचं असतं शिकले... निर्णय घेण्यात सरप्राइजेस असतात ... ज्या क्षणी निर्णय घेऊ, दुसऱ्या सेकंदावर सरप्राइजचा डब्बा पडलेला असतो...
त्यामुळे तो आपलाच डब्बा घेऊन चालावं लागतं, नवा निर्णय आपल्या वाट्याला येईपर्यंत...
ए तुम्हाला जाणवतं कधी? 
काही वेळा ना, नाही बऱ्याचदा आजूबाजूच्या अनोळखी जगात सुद्धा एक गोष्ट ही आपल्याशी निगडित होतच असते... 
तसं नसतं तर या गाण्यांचा माझा काय घरातला संबंध कधीच नव्हता... ना जिथे मी बसले होते ती जागा माझी होती, पण किती जादू होती त्या गाण्यांच्या अस्तित्वात, अनोळखी होऊन मला त्यांचं करण्याची जादू... 
आयुष्यात म्हणे मी निःस्वार्थी जगतो ... 
श्या खोटं असतं सगळं, स्वतःसाठी जे काही चाललेलं असतं एवढच एकमेवाद्वितीय सत्य!
बाकी सगळे स्वतःचे चोचले! 
या वर्षात अनेक पुरवले... 
पण एक गोष्ट आहे, या वर्षात स्वतःवर भरभरून प्रेम करू लागलेय... कारण ...
कारण नाही कारणे आहेत इथेसुध्दा...
पण महत्त्वाचं कारण म्हणजे, माझ्या अवती अशीच लोकं मी निवडले ज्यांच्या आयुष्यात माझ्या अस्तित्वाचा सकारात्मक दरवळ होता...
त्यामुळे या ३६४ दिवसात करीयरच्या वर्तुळात मी आले, मी जगत गेले, वाढत गेले, प्रगल्भ झाले, वृद्धिंगत झाले, आणि स्वतःवर बरेच मोठाले संस्कार केले रे!
हे शक्य नसतं गड्या... 
म्हणजे या वर्षात मला एक कौतुकाची मोठी थाप काय मिळते आणि स्वतःचे मार्ग सुचत जातात...
एक नितळ स्वप्न मला या वर्षात मिळालं की, पहिल्या वर्षापासून म्हणजे जानेवारीपासून लढत राहायचं, लढत राहायचं, शेवटच्या घोटापर्यंत... आणि वर्षाच्या शेवटी जो आजचा दिवस असतो त्या दिवशी ठरवायचं स्वतःशी... भेटायचं स्वतःल ... मनातल्या आपल्या विचारांच्या सोबत्याबरोबर एक ठिकाण निवडायचं आणि छानसा स्वतःच्याच आयुष्यातल्या एका वर्षाचा फ्लॅशबॅक चित्रपट बनवायचा ...  हसत, रडत, हुंदडत, कडकडा राग आणत, खुन्नस आणत, आयेहाये प्रेमात पडत, त्याच्याकडे बघत, त्याच्यात विरघळत जात, कलाकाराने त्याच्या कलेत विरघळत दीर्घ होत जात, लांब उड्डाण घेत मस्त डोळ्यांच्या पडद्यावर बिना तिकीट पाहून घ्यावा हा चित्रपट ! पण तो करायचा पण पैसा वसूल मंगता हां... !वर्षपलभर मेहनत करून स्वतःचा मज्जाक नाही उडवून घ्यायचा हां! 
आणि माझा शो तर पैसा वसूल करण्याच्या नादात बराच पुढे आणला की मी म्हणत घ्यायची स्वतःलाच शाबासकी देत.. 
तेवढ्यात कॉफी आली... 
काय गंमत असते... एक पेयं असतं आणि ताबा करतं ते आपल्या आयुष्यातल्या क्षणावर ... इतकी प्रचंड ताकद ना भो! 
पण हे खरंय, या सगळ्याचं महत्त्वाचं श्रेय मला स्वतः ला जातच पण ते जातं, त्या प्रत्येक क्षणाला... जे मला अशक्य वाटत होते... 

याच ३६४ दिवसांत तीन वर्षापूर्वी आयुष्यात आलेला 'तो' एका दिवसात निघून गेला... 
तो गेला, दुःख केलं, रडले बोंबलले पण थांबले नाही. उलट राग खुन्नस आणि ईगोवर येऊन उठले ... 
कारण एका दिवसात निघून गेला, पुढचे ३६४  दिवस माझे झाले... आयुष्याचा भागीदार गेला... 
और उसके बाद जो हुआ वो 'मंजूर-ए -खुद' हुआ, खुदा नहीं। 
कारण जो त्याचा वेळ होता तो अनेकांना देऊ लागले. आणि जास्त करून तर स्वतःला....
आयला...
'मेरी उमर के नौ जवानो' ... 
मी म्हटलं ना, या विचारांचा सोबती बरोबर हे गाने असतात... धून गात गात म्युझिकचे लिरिकस आठवत, स्वतः शीच गुणगुणत, पुन्हा स्वतःचा चित्रपट सुरू होतो... 
बरं झालं का मी सोडलं त्याला... ? 
कितीही समजावलं तरी प्रेमासारखी हट्टी भावना नसते माणसाच्या आयुष्यात... 
खंत असते एकत्र नसल्याची पण 
प्रेम छान असतं राव, खरंच! म्हणून मग प्रेम सगळीकडे आहे, डोळ्यांना दिसू लागलं... 
बाहेरचे लोक पण काही वाईट नसतात राव... हे त्याला सोडल्यानंतर कळलं. 
याच ३६४ दिवसात माणसं भरमसाठ आली, गेली आणि काही राहिली... 
जी राहिली ती माझी बनली... 
याच ३६४ दिवसात जवानी आली.... जवानी तीच... रिकाम्या रस्त्यावर एकट्याच्या स्वातंत्र्यात फिरणं, मारण्याचा जोश, तिचा किंवा त्याचा हात त्याच एकट्या रात्री हातात घेणं , पहिलं चुंबन , पाहिली मिठी , पाहिलं तडपणं , करीयर निवडण असतं, निर्णय घेणं , पहिला अबोला , पहिलंच शब्द समजुन घेऊन ऐकलेल गाणं असतं... आणि याच जवानीत पुढच्या आयुष्याची किल्ली असते... सुंदर असते जवानी... तिचं मोहरणं जपावं लागतं, उधळून द्यावं असं रूप असतं तिचं पण स्वतःला ओळखून शोधून आणि सापडून घेऊन जगावी ही जवानी... 
याच ३६४ दिवसात, काही तुटलं, फुटलं, निसटलही ... पण जगाच्या आणि जीवनाच्या तत्वज्ञानातून मी 'स्व' ला शोधलं.
प्रत्येक वर्षागणिक एक पान छान घडवायचं स्वतःच्या आयुष्याच, एवढं काबिल बनवायचं स्वतःला... एवढं या वर्षाकडून घेतलं... 
कटिंगमधून निघून स्पेशल करायचं स्वतः ला... !

तेवढीच काय ती ताकद, स्वतःच्या असण्याची!

या वर्षात एक खजिना मिळाला, स्वतःत जे आहे ते सापडलं...

ते शोधलं, ते सापडून अजून दीर्घ होत जाणार हाच नवीन वर्षी संकल्प मनाशी केला... 
त्यामुळे जुनं सोडून नवं घेण्यापेक्षा जुन्यात नव्याची घडण करून त्यातून चमकणं ही ताकद असते, स्वतःची, स्वतःच्या विचारांची.... 
त्यामुळे विचारांच्या  सोबत्याला नीट संस्कार करून घडवा... आयुष्य अपूनकाही हैं| उसे अपुन काही रहना मांगता। इसलिए,
आयुष्य जपा।


एक वर्ष, पैसा वसूल !

by on डिसेंबर ३१, २०१८
जुनं वर्ष नवं होतंय...  जून्यात नवं टाकायचंय ... नव्याला टिकायचयं जुन्याला टिकवायचंय ! दिवस आजचा खास होत होता.. कारण ... ? का...

"यारों दोस्ती बड़ी ही हसीं हैं,
ये न होतो क्या फिर बोलो ये जिंदगी हैं| "

काही क्षण कित्ती कित्ती बक्कळ सुंदर असतात म्हणजे सहज गॅलरीमध्ये जाऊन बसावं...
थंड वाऱ्याचं येणं असावं...
बॅकग्राऊंडला दोस्ताला कट्ट्यावर आणेल असं गाणं लागावं...
हातात मोबाईल असावा...
एखादा मित्र आपल्या टाईपचा असावा...
असतात खरंतर ...
टाईपचे फक्त प्रियकरच नसतात, मित्रही असतात...
माझ्या आयुष्यात तो होता, बिलकुल माझ्या टाईपचा...
त्याच्याबरोबर आयुष्याचा सगळा हरिपाठ, रडगाणं, पारायण शेअर करावं ...त्यानं त्याचं सांगावं ... दोघांनी इक्वल बोर करावं.
त्यात एकाने निगेटिव्ह बोललं की दुसऱ्याने त्याला आपटू न देता उचकवत आव्हान देत पॉजिटिव्ह करत वरती आणावं....
त्यात मग आजचा विषय माझ्या 'ब्रेकअपच्या फिलिंगचा' असावा..
मग त्याने विचारावं, "भेंडी दरवेळी तुला सारखसारखं विचारायचंच का,
काय झालंय .... भडाभडा बोलून मोकळं होत जा .... पुन्हां त्याच्याशी वाजलं ?  "
त्याच्या या वाक्यानंतरचा माझा सन्नाटा त्याने समजून घ्यावा.. 
मी बोलायला जावं, "हो .... आज शेवटचं... " मी ठामपणे म्हणावं.
"ओ मोहतरमा.... हे गेल्या ४-५ महिन्यापासून हाच टेप ऐकतोय ... चल तेरे अंदाज में सुना आखिर ऐसा अलग आज हुआ क्या ?...." त्याने उचकवत पण, माझं ऐकून घेण्याच्या आग्रहात म्हणावं.
आणि मग मी सुरु करावं,
"हो ! तोंडावर पडूनही आज त्याच्या स्पर्शात शेवटचं एकदा जिव्हाळा शोधत होते मी ...
हात धरावा, चंद्र दाखवावा, आकाशातला सुकून दाखवावा ... 'आयुष्यभरासाठी माझी होशील का ?' ही कुठूनतरी पाठ केलेली ओळ चिकटवावी आणि अचानक त्याने एक दिवस सोडून जावं ...?
सोप्प असतं ना हे तुम्हा मुलांना?
हे सोडून जावंच लागतं का ? हा बावळट प्रश्न मला पडावा....
मग नंतर...?
मग नंतर सुरु व्हावा माझा असा 'एकटा' प्रवास ...
संपूर्ण काळोख, निगरगट्ट आठवणी आणि एक कणही 'आम्ही पुन्हा एकत्र न येण्याची उमेद नसलेली' आयुष्याची वाट ..."
मित्राने यावर शांत राहावं... 
विषय सेक्स किंवा रोमांसचा आलाच तर बाहेरचा कितीही जवळचा असेल त्याने शांतच बसावं. कारण त्या पलंगावर नेमकं काय घडलंय हे त्या दोन बावळटांशिवाय कोणालाच कळलेलं नसतं... फार फार तर त्याबद्दल गौसिप करावं पण त्या दोघांच्या संभोगाविषयी तुम्ही आत्मविश्वासाने छाती ठोकू नाही...
ते मित्राला माहित होतं, त्याला आमच्या सेक्स लाईफमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याला फक्त मी महत्वाची होते.
मलाही त्याचं ते  शांत राहणं आवडावं, म्हणून माझे रडगाणं उरकून मी त्या माझ्या टाईपच्या मित्राला शुक्रिया अदा करावा...
त्यावर त्याने खदखदा माझ्यावर हसावं...
आणि यावेळी मी त्याला म्हणावं,"चल मेरेही अंदाज में सुनाती हूं... "
आणि मग मी सुरु व्हावं,
"या ब्रेकअपनंतर मी माझी उठायला जाणार होते...
मेलेला आत्मविश्वास आधाशासारखा शोधत होते आणि बर्रोबर इथे-च थोडं उचकवणारा, थोडा चॅलेंज देणारा, आणि जास्त माझ्या भावनांशी घेणंदेणं नसलेला पण माझा गमावलेला आत्मविश्वास मला परत करणारा कुणीतरी हवा होता आणि इथ्थे मला तू भेटलास... बिलकुल मला हवा तिथे आणि तसा! 
अर्थात मला ब्रेकअप नंतर मी पूर्ण एकटी हवी होती. मला शब्दाश: एकांत हवा होता.... 
पण तू आला आणि वचवच सुरु केली. आयुष्य शांत, ओसाड भकास होण्याऐवजी चॅलेंजिंग वाटायला लागलं. 
स्वतःच स्वतःच्या भावनांना कसं कंट्रोल करून जपायचं, हे आव्हान मी त्या काळात पेललं. मी जिंकले, मी आतून खुश राहू लागले...
आणि त्याच थोडबाहोत क्रेडिट हे या हरामी तुला...." त्याच्याकडे बघून हळूच डोळा मारत मी त्याच्याकडे पाहिलं.  
आज कें दिन मेरेही अंदाज में थॅंक्यू म्हणायचं आहे तुला... 
"कारण ब्रेकअपनंतर माझी ज्योत मी तेवत ठेवायचा अतोनात प्रयत्न करतच होते, तिथे दोन्ही हातांनी ती वात विझू नये म्हणून आधार देणारे हात तुझे होते.
ते हात मला ओरबडणारे नव्हते ... मला जिवंत ठेवणारे होते ..."
म्हणून ही गुलाबी रात्र तेरे नाम ...
मैत्री प्रेमपेक्षा कैक पुढे आहे...............


तू त्याचं जिवंत उदाहरण आहेस!!!" आणि मी बोलायचं थांबले...
"आणि अशाप्रकारे तुमचा निबंध संपला आहे... टाळ्याssss" त्याने एका झटक्यात सगळा शुक्रिया आहे तसा माझ्या तोंडावर मारला आणि मग तो बोलू लागला,
... 
" प्रेम आणि मैत्री याच्या कैक पुढे आहे आपलं नातं म्हणूनच आपल्या नात्याला मर्यादा नाही .. ते कायम रिक्त असत ...म्हणूनच आपल्या नात्याला नाव नाही... 
आणि तू कोण गं शुक्रीया करणारी .. तुला नाही अधिकार तो.. मला नको तुझं शुक्रीया... घाल चुलीत ते शुक्रिया आणि तुझ्या त्या हरामी प्रियकराला.... 
आणि लक्षात ठेव, मी तुला काहीच नाही दिलं, कधीच नाही... ते देऊही नाही शकत.. तुझ्यात आहे ते सगळं.... तुझ्यात जे दिसलं ते फक्त शब्दात दिल मी तुला.... 
लय बेक्कार.. वाईट .. 
इतकं सिरियस कुणी होत का? चल स्माइल दे ती खदाखदा आणि संपव हे ... हि सिरीयस लोक कशी बोलत असतील यार एवढा वेळ... " 
आणि आम्ही दोघे एकमेकांच्या खदखदणाऱ्या हसण्याकडे पाहून विनाकारण हसू लागलो...
असेच काही क्षण खर्रच खूप सुंदर असतात ... उगाच अशा नात्याचा हेवा वाटून जातो ...
स्साला मित्र असतातच खास, हरामी, कमीने, पण सगळ्यात जास्त जीव लावणारे ! 
म्हणून गुणगुणणे माझं सार्थकी लागतं,
मी गर्वाने गुणगुणू लागते, 
"यारों दोस्ती बड़ी ही हसीं हैं,
ये न होतो क्या फिर बोलो ये जिंदगी हैं| "


दोस्ती आझादी हैं |

by on डिसेंबर २८, २०१८
"यारों दोस्ती बड़ी ही हसीं हैं, ये न होतो क्या फिर बोलो ये जिंदगी हैं| " काही क्षण कित्ती कित्ती बक्कळ सुंदर असतात म्हण...

ज जेव्हा 'जावळी' बघायला जाऊयाच.' म्हणत मित्राने आग्रह केला तेव्हा "जावळी म्हणजे नेमकं काय असतं.? हे मला ठाऊक नव्हतं, ना वेळच्या अभावी जाणून घेण्याचं कुतूहल चावळलं."
पण वेगळ्या कार्यक्रमाला जाणार म्हणून मी वेगळ्याच उत्साहात होते.
"साहित्य, कलाक्षेत्रातील कुठलाच कार्यक्रम आपल्याला काहीच देणार नाही, असं होणार नसतं, त्यामुळे अपेक्षेची निराशा इथे होत नसते, यात मला आनंद असतो."
म्हणून 'जावळी'ला जाणं स्वीकारलं आणि त्यानुसार ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. ठराविक वेळ दवडता काही वेळातच समोर स्टेजवर या प्रयोगाचे प्रस्तुतकर्ते समोर येऊन 'जावळी'चा परिचय सांगू लागले.  मुळात त्यांच्या कंपनीने या नवख्या प्रयोगाचे आव्हान स्वीकारले ही कौतुकाची बाब, त्यापलीकडे जाऊन त्यांनी जी 'जावळी'ची ओळख करून दिली, त्यातून 'यशोदा'ला बघण्याचं आणि हे नेमकं आहे तरी काय? हे कुतूहल मनाच्या गडबडीत खूप उफाळून आलं.
जावळीचा थोडक्यात परिचय त्यांनी दिला तो असा;
देवदासी स्त्रियांनी सुरु केलेली हि नृत्यापरंपरा... जावळी...
जावळी म्हणजे केरळ किंबहुना दक्षिण भारतात उगम पावलेल्या शास्त्रीय संगीत आणि नृत्यातील नायक-नायिकांवर आधारित पारंपरिक नृत्यांपैकी एक. तेथील प्रादेशिक भाषेतून त्या काळातील संस्कृती, समाज, प्रेम आणि शृंगार रसाची भावना अर्पण करणारी ही रचना. मुरुगा किंवा कृष्णासारख्या देवतांना आणि कधीकधी संरक्षणासाठीदेखील हे नृत्य समर्पित केले जात असे. देवदासींनी सुरु केलेली हि नृत्यपरंपरा म्हणजे नृत्यांचा पाया होती. परंतु कालांतराने ब्रिटिशांनी  देवदासींना 'वेश्यांचा' दर्जा दिल्यामुळे ही कलाही लोकांनी तुच्छ समजण्यास सुरुवात केली. त्यामुळे 'या अशा नृत्यप्रकाराला मी येणं, का त्याचा आस्वाद घेणं हे मला आता आवडू लागलं.'
आता मनात अनेक प्रश्न उभे राहिले, म्हणजे प्रत्यक्षात जावळी म्हणजे तमाशासारखं काही असणार का? मग हा प्रकार तिथल्या लोकांचा आपल्याला काय उमजणार तो,? मग यात शास्त्रीय नृत्यप्रकाराचा टच असेल का ? असे अनेक प्रश्न समोर आले.
आणि त्यातच समोर 'यशोदा' आली.
स्टेजवरच्या त्या एका लाईटीच्या प्रकाशात तिचा शृंगार आणि त्यात नटलेली ती सुंदर फ्रेमिंग होती. तिच्या शरीरयष्टीत 'मला इथे बसलेल्या प्रत्येकाला जावळी समजवायची आहे, त्यांच्यापर्यत पोहोचवायची आहे.' हे ठासून दिसत होतं.

जावळी बघताना, या नृत्यप्रकारात एक सामर्थ्य जाणवते कि,  'एक भावना त्या मनाच्या डोहातील प्रत्येक काठाने अनुभवावी आणि ती कशी व्यक्त करावी, ती व्यक्त करण्याची ताकद जावळीत आहे.  त्याचबरोबर, डोळ्यांतील हालचाली, त्यातली चुळबुळ आणि सगळ्याच ठिकाणी प्रियकराला बघण्याची कंठी आलेली आस....' या प्रेमयातना, प्रेमकंठी भावना हे सगळं अगदीच तंतोतंत त्या नजरेच्या बाहुल्यांतून प्रेक्षकांसमोर सादर करून त्यांनाही स्वप्रेमाच्या भावनेत सामावून घेणं हे मुख्य असतं. किती सुंदर संकल्पना आहे कि, माझ्या प्रेमाचा इजहार, माझं प्रेम मी उघडउघडपणे आलेल्या प्रत्येकाला सांगून ते साजरं करू शकते. जावळी ही मुळातच कमी लोकांसाठी सादर केली जात असे. आजही ५०-६० (त्या मानाने बरेच प्रेक्षक) लोकांच्या प्रतिसादात जावळी सादर झाली. त्यामुळे याला 'मेजवानी' असेही संबोधतात. मेजवानी या शब्दाचा उगम हा 'मेजवाण' या शब्दापासून झाला. मेजवान म्हणजे यजमान (किंवा त्या काळातील जमीनदार). या नृत्यप्रकारात जमीनदार घरी जेवणासाठी आलेल्या पाहुण्यांना देवदासी स्त्रियांकडून 'जावळी'ची मेजवानी देत असे.   
हा नृत्याचा प्रकार असला तरी या नृत्यप्रकारातून नृत्यांगना बहुअंशी अभिनयाला जोडली जाते.
यात मुख्यत्वे जावळी, पदम आणि वर्णम असे प्रकार असतात.
हे सगळं वर्णन आणि माहिती केवळ एका कुचिपुडी आणि देवदासी नृत्यांगना 'यशोदा राव ठाकूर' हिला बघून सुचत जाते.
कारण मुळात हा नृत्यप्रकार इतका कमी आणि काळाच्या गतीत दुर्मिळ होत गेल्यामुळे हे नृत्य युट्युबसारख्या ठिकाणी दुर्मिळ एखाददोन चित्रफितींतून रंगवलेलं त्यामुळे 'जावळीसारखे' प्रयोग बघणे डोळ्याला, डोक्याला आणि मनाला एक चवदार खुराक असतो.
सादर नृत्यकलेतील जावळीची थीम प्रामुख्याने 'श्रृंगारावर आणि प्रेमावर' आधारित होती. त्यामुळे माझ्या मनाला अजूनच ताजेतवाने करण्याची क्षमता मला त्यात जाणवत होती.
मला समजलेल्या या नृत्यात यशोदा ठाकोर यांनी प्रेमातील अनेक अवस्थांचे प्रत्येक वेगळ्या लकबीने सादरीकरण केले आहे.
त्यातील स्वीय-  या पहिल्या प्रकारात यशोदा तिच्या हातवारे आणि नजरेतून सांगते कि, एक विवाहित स्त्री आहे, जिच्याकरिता तिचा चंद्रही आणि तिचं आकाशही तिचा पतीच आहे. तिचा स्वर्ग तोच आहे. ती पूर्णपणे त्याला कमिटेड आहे.  - अशी स्त्री जी पतीशिवाय कुणाचाच विचार करत नाही... कारण तिची धारणा आहे कि, "तू एकटा आहेस, जो मला या जगातील सगळं देणारं आहेस..." अशा भावनेने नटलेली आणि त्याची आतुरतेने वाट पाहणारी ती स्त्री आहे.
परकीय या दुसऱ्या प्रकारात ती सांगते, हि स्त्री एक विवाहित स्त्री आहे, परंतु तिचे परपुरुषाबरोबर भावनिक संबंध आहेत. याचे वर्णन हातांच्या मुद्रांनी वर्णाताना ती सांगते कि काल हि स्त्री त्या परपुरुषाला भेटण्यास जात नाही. तेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा परपुरुष तिला विचारतो कि, "काल तू मला भेटली का नाहीस? "
त्यावेळी ती म्हणते, "काल मला माझ्या लग्नाच्या पतीच्या डोळ्यात प्रेम दिसले. मग थांबले"
काहीसा असुरक्षित होत तो विचारतो " मग आज का आलीस?"
ती म्हणते, "आज त्याच मनाने आणि डोळ्यांनी तहानलेपणाने तुला एकदा बघण्याची इच्छा व्यक्त केली. मग आले"

आणि सामान्य या तिसऱ्या प्रकारात यशोदा सांगते, "एक स्त्री आहे. जी विवाहितही नाही आणि तिला प्रियकरहि नाही. ती मादक आहे, तिच्या शरीराकडे पाहून कामुक अवस्था उचंबळून येते. तिला तिच्या शरीर संपत्तीचा आणि शृंगाराचा गर्व आहे आणि त्यामुळे ती त्याच थाटात तिच्या कट्ट्यावर बसलेली असते. तिच्या त्या एका ग्राहकाची वाट पाहत. कारण ती वेश्या असते. तिचा आवडता ग्राहक आलेला नसल्यामुळे तिच्याजवळ आलेल्या दुसऱ्या ग्राहकाशी ती जो संवाद साधते तो मजेशीर आणि 'ग्राहकांतही आवडता ग्राहक असणं' हे नवखेपण देणारा आहे. ती सेक्स वर्कर....तिला तिच्या सौंदर्याचा मोरपिशी अहंकार आहे. ती तिच्या कोठीवर आलेल्या पुरुषाला म्हणते की, "तू स्वतःला माझ्या लायक समजतोस?..." यावर त्यांच्यात वाद होऊन ती त्याला काढून देते आणि तिच्या त्या एका ग्राहकाच्या प्रतीक्षेत तळमळत राहते.

चौथ्या प्रकारात यशोदा समाजवते, एक अविवाहित मुलगी आहे जिला तिच्या प्रियकराने फसवले आहे. आणि त्यामुळे ती मुलगी तिच्या प्रियकराला या नृत्यातून प्रश्न करते की,  'का?'
केवळ 'का?' या प्रश्नाचे स्वरूप ती या नृत्याचा आधार घेऊन व्यक्त करते.
तोयाचक्षी म्हणजेच पाचव्या प्रकारात ती सांगते कि, १६ वर्षाची मुलगी प्रेमात पडते. तिला प्रेम या भावनेची ओळख नसते. ती तिचं प्रेम उघडेपणाने व्यक्त करते आणि या न कळत्या वयात ती तिच्या मैत्रिणीला तिच्या प्रियकराला बोलावून आणायला सांगते.
ती म्हणते, " माझी नजर शांत होणार नाही तो समोर आल्याशिवाय... त्यामुळे तू जा आणि त्याला घेऊनच ये!"
( नृत्यांगना यशोदा ४६ वर्षाच्या आणि त्यांनी साकारलेली मुलगी हि १६ वर्षाची. त्या मुलीच्या भावना, तिचं प्रेम आणि तिचा भोळेपणा हे त्यांनी डोळ्यांनी आणि पायांतील त्या झपझप पडणाऱ्या हालचालींनी आणि पैंजनाने व्यक्त करताना समजते,
"कलेला वय कळत नसतं, तिच्यासाठी समर्पण महत्वाचं.! "

सहाव्या प्रकारात म्हणजेच जावळीच्या शेवटी गप्तुवर्स येते... यात नृत्याची रचना म्हणजेच कोरियोग्राफी ठरवलेली नसते. मनात चाललेला कल्लोळ प्रेक्षकांसमोर नृत्यकलेतून मुक्तपणे सादर करणे हा त्यातला शेवटचा प्रकार. यात लाऊड संगीत असते. ज्यात तळमळ असते. अति दुःख असते, अति प्रेम असतं,  किंवा अति हुरहुरही असते. हा प्रकार प्रामुख्याने भावना अनावर झाल्यावर त्या व्यक्त करण्यासाठी केला जातो. या प्रकारात यशोदाने तरुणवयीन मुलीची भूमिका साकारून नृत्य केले आहे, ती यातून सांगते कि, त्या रात्री त्या मुलीत आणि तिच्या प्रियकरात प्रणयक्रीडेचे काही क्षण रंगले होते. त्यात त्याने तिचे चुंबन घेऊन तिला स्पर्श केला आहे आणि तो निघून जो निघून गेला आहे तो परतलाच नाही पुन्हा... त्याची वाट बघत ती बेचैन आणि रुखरुखीत झाल्यामुळे ती पुन्हा तिच्या सखीला घडलेला प्रकार सांगते आणि त्याला बोलवायला पाठवते आहे.
असे हे जावळीचे अनेक प्रकार सादर करताना यशोदा ठाकोर कमालीच्या भिन्न व्यक्ती भासत होत्या. कारण प्रत्येक अवस्थेतील परिस्थिती हि वेगळी असल्यामुळे ते सादर करणे तेवढेच जिकिरीचे कार्य होते. परंतु त्यांचे स्वतःच्या आवडीसाठी आणि कलेसाठी असलेले समर्पण हि एवढीच गोष्ट त्यांना कळली होती. आणि ती अंगातील प्रत्येक नसेल भिनवून त्यांनी हे सादरीकरण केले होते आणि सभागृहातील प्रत्येकाला स्वतःकडे खेचून घेऊन थांबण्यास भाग पडले होते.

या सादरीकरणावरून जाणवते कि, जावळी गातांना संगीतकार लयीचे आणि वळणाचे स्वातंत्र्य अंगीकारून हि रचना करतात आणि नृत्यांगना या गीतातील शब्दांना अंतर्मनात घेऊन त्यांच्याशी आपापल्या भावनेशी एकरूप होऊन खेळतात.
यातील संगीत लाऊड म्हणजेच वरच्या पट्टीतील असते, त्यात प्रामुख्याने 'वायोलिन, मृदुंगा आणि नटुवङ्म('टाळ' सारखे एक वाद्य) या वाद्यांचा वापर केला जातो. हे संगीत आकर्षक असते त्यामुळेच यावर सादर होणारी नृत्य हि हलक्या शैलीची म्हणजेच नाजूक हातवार्यांचा वापर करून केली जातात. त्यामध्ये संगीताची भाषा हि स्थानिक लोकांची बोलीभाषा आणि वर्णन कामुक रचनेने केले जाते.

जावळीची खासियत ही असते कि, त्यात असंख्य मुद्रा असतात. पण या कलेचे वेगळेपण असे कि यातील अनेक मुद्रा ह्या नैसर्गिकरित्या त्या नृत्यांगनेच्या अंतर्मनातून येतात. उदाहरणार्थ नर्तिकेला लाजणं किंवा शृंगार करणं हे शिकावं लागत नाही...  
यशोदाने वर्णिलेली, समजवलेली आणि मला वैयक्तिकपणे आवडलेली तिची अदा म्हणजे, " नृत्यातून कामुक किंवा मादकपणा दाखवताना स्त्रियांनी लाऊड होऊन छाती बाहेर काढून त्या पद्धतीचे एक्स्प्रेशन दाखवण्यापेक्षा नजरेतून आणि शरीराच्या चालीतून लयीतून आतल्या आत मुद्रा करून तो मादकपणा दाखवावा. कारण प्रणयक्रीडा हा चारचौघांपेक्षा त्या दोघांतील संवाद आहे त्यामुळे त्याचे सादरीकरण उघड्यावर पण खाजगीत करावं कारण एखाद्या नृत्याचे सादरीकरण करताना कधीच आपण त्याचा एक भाग सादर नसतो, आपण ती परंपरा पुढे नेत असतो... त्यामुळे ती कला जबाबदारीने सादर करणं हि कलाकाराची जबाबदारी असते. " 
             आजच्या जावळीने माझ्या छंदाच्या, ज्ञानाच्या आणि प्रेमाच्या कक्षा अधिक वृंदावल्या. जावळी जितकी आवडली तितकीच समजली आणि आपलीशी वाटली. काय बघावं आणि काय स्वीकारावं यासाठी सगळंच पाहावं आणि सगळ्याच कलांचा आस्वाद घ्यावा. त्यानंतर आवडीनिवडीचा प्रश्न ठेवावा कारण आपल्या रोजच्या अनुभवण्यावर आपल्या विचारांची श्रीमंती वाढत जाते. त्यामुळे रोज काहीतरी नवं घ्यावं मनाच्या समाधानासाठी, जावळी त्यातलीच!

(जावळीची भाषा, उच्चार आणि अर्थ आणि या प्रकाराची आज समजली ती माहिती सोडून मला अतिरिक्त माहिती नसल्यामुळे या लिखाणात काही अंशी चुका असू शकतात. जाणकारांनी क्षमा करून त्या चुका दुरुस्त कराव्या, हि विनंती.)

एक गोष्ट सांगते,
एक 'ख़ुशी' आणि एक 'खामोश आयुष्य' असतं. एक दिवस या खामोश आयुष्यात ख़ुशी येते.
आयुष्य हैराण होतं. कारण या खामोशीमुळे कधीच त्याच्याजवळ कुणीही आलेलं नसतं, ना येणार असल्याच्या पूर्वखुणा असतात पण, ख़ुशी येते...
प्रचंड ख़ुशी येते. आयुष्य खुश राहायला लागतं. आयुष्याला माहीत असतं, खूप कमी वेळ 'ख़ुशी' माझी आहे, तरीहि आयुष्य खुशीच्या अधीन होत जात. ॲडिक्शन वाढत जातं.... 
ख़ुशी एका मिनीटाला खूपशा आत्म्यांना जिवंत करते ताकद देते, त्यांच्या कित्येक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या ओठांना खरं हसायला शिकवते... 
पण तो क्षण येतोच, ख़ुशीची वेळ संपते... तिला जायचं नसतं , मृत्यूने कवटाळलेलं असतं आणि तिच्या थांबण्यासाठी प्रार्थना करणारे हातही तिला सोडत नसतात.
'काहीतरी जादू होईल' या आशेवर आयुष्य खुशीच्या लंबी उम्रची दुवा मागतो पण आयुष्याने उशीर केलेला असतो, ख़ुशी मरते.
आणि मग मागून आवाज येतो
"बाबूमुशाय ज़िंदगी और मौत उपर वाले के हाथ है ... उसे ना तो आप बदल सकते है ना मैं ... "

अशा धाटणीतला हा 'आनंद' चित्रपट ...

आताच्या माध्यमांतून डायलॉग्जमध्ये सर्रास 'बाबूमोशाय' हे विशेषण वापरलं जातं. पण त्या बेंगॉली शब्दाचा खरा प्रवास आणि ट्रेंड 'आनंद'ने सुरु केला. विविध संस्कृतीचा गोडवा पोहोचवून, एकमेकांच्या संस्कृतीबद्दल आवड निर्माण करण्याची ताकद चित्रपटांमध्ये असते खरी.!
जुने चित्रपट बघताना संयम खूप असावा लागतो कारण त्यांची कथा आताच्या कथानकांसारखी (म्हणजेच आधी घटना, मग फ्लॅशबॅक आणि शेवटी ट्विस्ट) या  तीन टप्प्यात न सांगता, ती तशी हळूहळू उलगडत आणि रंगत जाणारी असते. त्यामुळे त्यासाठी 'दिग्दर्शकाच्या' कामावर विश्वास असणं फार महत्वाचं ठरतं, आपला संयम सत्कारणी लागतो.
'आनंद' हा तसा एका ओळीतील चित्रपट. थोडक्यात, चित्रपटातल्या नायकाला  'आपण मरणार असं कळतं' तेव्हा तो हे गांभीर्याने हाताळणारं आयुष्य कशा प्रकारे जगू लागतो त्याची हि कथा.
अगदी सरळ, साधा आणि अस्खलित खुश चित्रपट. ना कुठला भडक इफेक्ट, ना एक्सटेर्नल व्हीएफएक्सचा अति वापर, नाही कुठल्या पात्रांचा बळजबरीचा अभिनय. चित्रपटाचे संगीत, याबद्दल वेगळे काय सांगू चित्रपट हा १९७०चा तरीही, आजच्या तरुणाईत 'कहीं दूर जब दिन ढल जाए साँझ की दुल्हन बदन चुराए' हे गीत माहिती नसणारे अपवादच. आणि एवढ्यावर हे गाणं थांबत नाही त्याचे अनेकानेक रूपं बनत आधुनिकतेत मॅशअप बनत जातात त्यामुळे त्या गाण्याचे बोल, संगीत आणि ती धून आजही कातरवेळेत आयुष्य सुकर करण्यासाठी गुणगुणणारे असंख्य आहेत. हे त्या चित्रपटाचे यश ! 
आकर्षक गोष्ट म्हणजे अत्यंत साधं चित्रण आणि इफेक्ट्सपेक्षा चित्रपटाच्या कथेवर केलेला फोकस. त्यात पर्वणी म्हणजे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या एकत्र अभिनयाची जुगलबंदी आणि गुलजार यांच्या लेखणीची भर.
खरेतर वेगळी अशी नाही पण, खूप विचारपूर्वक आणि लोकांना सामावून घेईल अशा ठेवणीतली संहिता (स्क्रिप्ट). 'गुलजार' हे अनेकांना त्यांच्या शायरीच्या किस्स्यांकरिता प्रसिद्ध वाटणारे व्यक्तिमत्व आहे, पण या चित्रपटातील त्यांचे लेखन हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक भावनेला न्याय देणारे ठरते.
चित्रपट संहितेत थोडासा बदल आणि वेगळेपण म्हणजे चित्रपटाशी जोडलं जावं म्हणून वापरलेल्या मराठी, बेंगाली आणि हिंदी या भाषेचा टच. आणि हे सगळं लेखन तेव्हा यशस्वी ठरतं जेव्हा चित्रपटासाठी अचूक पात्र पारखली जातात. आणि त्यामुळे चित्रपटातील प्रमुख आकर्षण म्हणजे डायलॉग डिलिव्हरी, ती इतकी सुरेख कि इतके दिवस शुंभ असणारा मनुष्यही शेवटात 'आनंद'च्या मृत्यूवेळी विरघळेल.
आणि हे सगळं निरीक्षण करीत करीत आपण येतो, चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात ... हा टप्पा इतका काळजातला वाटतो कि तो असा समीक्षणातून सांगण्यापेक्षा अनुभवावा इतका जिवंत आहे, इतका वैयक्तिक दुःख हलकं करणारा आहे.
आणि याच शेवटच्या टप्प्यात दिग्दर्शकाची खरी परीक्षा असते, कारण चित्रपटाच्या शेवटात एवढी ताकद आणावी लागते कि, चित्रपटगृहाच्या बाहेर पडल्यावरही तुम्हाला प्रेक्षकांच्या मनात, चर्चेत जिवंत ठेवायचं असतं.  त्यासाठी त्या कथेचा क्रम आणि ठेवण तशी जुळवून आणायला हवी. ते या चित्रपटास काठोकाठ लागू होते.  दिवा लावायला जावा नि लाईट यावी, इतका परफेक्ट टाईमिंग/ इतका तंतोतंत शेवट दिग्दर्शक मुखर्जींनी या चित्रफितीतून गुंफला आहे.
चित्रपट डोळ्यासमोरून असा निघून जाताना दिसतो, फक्त तीन तासांची चित्रफीत असते ती. पण आपल्या आनंदाचा आणि विचारांचा 'किस्सा' बनून जाते आणि पडदा पडायच्या आतच आपण 'आनंद' व्हायला लागतो. आणि आपण स्वतःला जाणीव करून द्यायला लागतो कि, "बाबूमुशाय, ज़िंदगी बड़ी होनी चाहिए ... लंबी नहीं" 

बाकी काही नाही, चित्रपट पाहिल्यावर स्वतःच्या आयुष्याचं डोक्यावर असलेलं ओझं किंचितसं हलकं होऊ लागतं.

#Must_watch
#Best_composition_of_Indian_cinema



बाबूमुशाय...!

by on नोव्हेंबर २८, २०१८
एक गोष्ट सांगते, एक 'ख़ुशी' आणि एक 'खामोश आयुष्य' असतं. एक दिवस या खामोश आयुष्यात ख़ुशी येते. आयुष्य हैराण होतं. कारण य...


सगळा निसर्गाचा प्रचंड पसारा नि त्यात तो एकच कणखर हट्टी दगड नि आजूबाजूला देहाचं मंदिर होईल इतका प्रचंड स्तब्द डोह... 
दूर दूरवर नजर जाता नजर कमी पडेल इतकी स्वतःतच मग्न अशी शांतता...
हळूहळू राज्य तिथे वर चांदण्यांचं येतं.
तीत हरवून जात मी स्वतःचा हात हातात घेते...
शांततेत त्या भोवतालच्या मी स्वतःशी आपसूक बोलू लागते, उगाच एखाद्या विचाराशी चाळा करू लागते.
तेव्हा, अलगद हातात घेतलेला माझा दूसरा हात मला स्पर्श करून म्हणतो , नको, शांत रहा जरावेळ . काहीच गरज नाही विचार आणण्याची. एकदम स्तब्द हो मनाच्या शांततेत, या पाण्यासारखी.
पण,
मन ते असं शांततेत शांत राहणार कसं!
हळूहळू राज्य मनाचं येऊ लागतं.
मी अडखळत स्वतःशी हसत स्वतःबरोबरचा संवाद टाळू लागते.
हळूहळू राज्य पाण्यावर येतं.
ते तिथे बसूनही माझ्यावर मोहिनी घालत शांत करते मज आतून बाहेरून...
त्याची ती मोहिनी लपेटत मी शब्द हे शोधत जाते,  प्रवास हा शब्दातून नवखणण्याचा हा असा घडत जातो...

जल ते वृंदावन मानुनी, ढीम्म होतो तो पाषाण,         
पसरत जाते काळोखाची किमया, 
उजेडास या कवेत घेते।।
.
वाऱ्याचेही रिते शहाणपण, न उरे या काळोखातही,
जादू त्याची तिथेही चाले, घेतो कुशीत वाऱ्यासही।।
.
.
न लवे पापणी माझी, उडे आकाशी माझीच स्वप्ने,
सौम्य रवीही आड जातो,
अंधाराला त्या साम्राज्य सोपवुनी।।
.
.
उरे शेवटी राज्य काळोखी, स्वप्न माझी हि स्तब्द होतात,
त्याच त्या पाषाणावर, मी ठिम्मपणे एक स्वप्न जन्मवते।।
 .
.
गडद होतो काळोखही तो, स्वप्न माझे सुरक्षित होते,
निराधार ते आजपर्यंतचे स्वप्न, ठामपणे खरे होत जाते।।
 ........................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!.......................


#कुठल्याच_शब्दाला_कुठल्याच_शैलीत_न_बांधता_सुचलं तसंच


निसर्गाचा पसारा...

by on नोव्हेंबर २७, २०१८
सगळा निसर्गाचा प्रचंड पसारा नि त्यात तो एकच कणखर हट्टी दगड नि आजूबाजूला देहाचं मंदिर होईल इतका प्रचंड स्तब्द डोह...  दूर दूरवर नजर ज...

मी - काय बोलु? काय बोलु? ............
हाई बोलु? हेलो ? की मग फक्त एक स्माइली टाकु? की मग हाई बोलून स्माइली टाकु?
हाश्ह्ह्ह....... मला काहीच समजत नव्हत. पुरती चलबिचल, धांदल,गडबड,थरथर सगळ एकदाच....
हां.....पाण्याचा घोट घेतला नि ठरवल कि हेल्लोच बोलते...तितक्यात फोन वाजला ... त्याचा फोन होता तो. ओ माय गॉड……. माझा श्वास त्या फोनवरच्या आवाजात थांबला होता.
तो – हेलो
मी - हेलो कोण ?
तो – कशी आहेस.... ?
मी मनातल्या मनात हसून म्हटलं, नशीब त्याने त्या 'कोण'चं उत्तर दिलं नाही.
मी - यावर तर बरं आहे, ठीक आहे, मस्त आहे की मग मजेत ? काय उत्तर देउ? की सरळ सरळ विचारून टाकु , का फोन केला म्हणून ........ नाही, नको ....
तो - ते जाऊदे सगळं. "मला सांग कुठे आहेस आत्ता? ?"
"हेलो?"
मी - हं..... मित्राबरोबर.....
तो - काही प्लान आहे का आजचा?
मी - नाही......
तो - मी येतोय. नेहमीच्या ठिकाणी भेट. नो एक्सक्यूझेस....बाय.
“काय पटापट बोलून गेला हा.. बस्स ? मी गारठली होते, अंगात सनसनीत झणक गेली होती. त्याच्या त्या अनपेक्षित शांत शब्दांनी. जाऊ की नको ? नाहीतर मेसेज टाकते, काम आहे आज नक्कोच भेटायला... पण भेटावसही वाटतय. आज तब्बल ४ महिन्यांनी त्याने फोन केलाय, नक्कीच काहीतरी काम असणार. सोबत नीशाही असेल ? सुंदर दिसते तशी ... दोघे सोबत छान दिसतात, नाही? ओह काम ऑन आयशा , स्टॉप थिंकिंग टू मच…….” मी स्वतःलाच समजावल.

“एनी प्रॉब्लेम?” मित्राने विचारलं.
मी - नो, नॉट ऐट ऑल...
फोन कट झाला होता. काहीच बोलली नव्हते मी, कारण आजचा हा फोन नि त्यानंतर झालेल संभाषण, आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं, की आज त्याला माझी गरज आहे.
आम्ही भेटलो. तो आला. मी पाहिलं.
माहीत नाही का ? पण आज पहिल्यांदा सोबत असलेल्या मित्राला मी 'मीठी मारुन बाय' केल. तो बघतच होता. माझं मन आज चक्क शांत होत, निगरगट्ट गार. जे हृदयाचे ठोके त्याला बघून धडधडायचे ते आज जणू नव्हतेच.
शर्ट तर तोच घातलाय, पहिल्या भेटीचा. पर्फ्युर्मही तोच, स्पाइक्स, स्टॅंड कॉलर, ब्लॅक शर्ट बस्सच... याआधी तर कद्धी असं झालं नाही ..? काही हवंय का याला? ती सोबत नाही दिसतेय ... काही गडबड तर नसेल?
तो हसला. मला खोट हसावं लागलं. चार बाय सहाच्या खोलीत जितकं गुदमरत नाही, तितकी घुसमट त्या एसी गाडीत होत होती. कारण, काहीही झाल तरी 'माझ प्रेम संपलय' हे त्याला दाखवायचं होतं, आणि यावेळी ते गरजेचही होत. अवघड होत? नाही… बिलकुल नाही ... मी असे एक ना असंख्य विचार करत होते.
गाडी सुरू झाली, पण संवाद मात्र नव्हताच. नजरानजरही झाली नाही किंवा मुद्दाम टाळली त्यानेही... २० मिनिटांचा वेळ गेला.
आम्ही दोघेही शांत होतो, इतके शांत की आवाज होता, फक्त एसी नि रेडियोच्या 'आपकी मुलाक़ात'चा.
तो - गाणं बदलू..? नाहीतर तूच लावते का एखादं? असही तुला माझी प्लेलिस्ट आवडत नाही ना ....
मी - हां :) ..... ( पुन्हा एकदा मनाला समजावलं, प्रेम संपल आहे आणि ते पुन्हा होणार नाहीच , बस्स ..यापुढे काहीही विचार करायचाच नाही) या तन्द्रित अजाणतेपणी मी 'ब्रेकअप सॉँग' लावलं.
हश्ह्ह्ह्ह.... दोघांची नजरानजर झाली आणि एकदाची ती शांतता भंग झाली, आता मात्र दोघेही खळखळुन हसलो.
तो -तू केव्हापासून अशी गाणी ऐकायला लागलीस ? ' त्याने सहजच विचारल'
मी - नवाब साब, मोहब्बत क़ी थी इसलिए, मोहब्बत जी रहे थे|
अब दिल टूटा है, तो उसे भी अपने दर्द की खुशी बाटने का मौका दो||
तो - तू बिलकुल नही बदललीस |
“मी आताही शांतच होते. खरं सांगायचं, तर केव्हा एकदा बडबड करते अस झालं होतं. या शांततेची बिलकुल सवय नव्हती, ना मला ना त्याला. माझा तो थंडावा त्याला आतून खात असावा, तो तेवढा ओळखतोच ना मला ?.... नक्कीच आयशा, हा काय प्रश्न झाला?
पण मग “निशा नि माझ्यामध्ये त्याने निशाला निवडल,” माझ्यावर प्रेम होत ना? ..” तो असतानाही मी स्वतःबरोबर बोलणं अधिक पसंत करत होते ......... पण तरीही कदाचित काहीतरी वाटल असावं किंवा नाहीसुद्धा किंवा मग मी बोलावं म्हणून…म्हणूनच त्याने "लग जा गले" लावलं. माझं भयानक आवडतं गाणं.!
आता मात्र माझ्या मनातल्या आठवणी, प्रेम, एकत्र घेतलेला चहा, ज्ञानप्रबोधिनीची एसपीडीपी, डाकेची दाबेली , वडापावचा चटका, डॉमीनोझचा पिझा, ऐन पावसात छत्री नसताना उडालेली धांदल, राग, रुसवा, त्याचं मनवनं ,चीडचीड, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक आल्हाददायी क्षण यांना ओहोटीसारख उधाण आलं होतं. ४ महिन्यात सहन केलेला तो दुरावा, तो एकटेपणा त्या एका गाण्यामुळे मी पुरती विसरून गेले, स्वतःलाच मन म्हणत होतं,
"लग जा गले के फिर ये, हसीं रात हो ना हो|
शायद फिर इस जनम में, मुलाक़ात हो ना हो || " गाण्याचे बोल मला बोलतं करू पाहत होते. ओठांवर शब्द इतके ऊसळुन आले होते की, कोणत्याही क्षणी तोल जाऊन बाहेर पडतील,
पण मग मनाने प्रश्न केला,
"आठवते ती रात्र.? जेव्हा तू सोबत होती. तू अडचणीत होतीस. तो ही सोबत होता. हेच गाणं बाजूला चालू होतं. तो तुझा हात धरून विचारू शकत होता की " पिल्लू काय झालयं? मला सांग बरं..... मी आहे ना सोबत ... ही अशी रुखीरखी परी छान नाही वाटत बघ...." पण तेव्हाही त्याला फोन आला. काळजी घे, म्हणून तो निघून गेला, तो गेलाच.
त्यामुळे आज तू काहीही बोलणार नाहीस हे कन्फर्म. कारण तुझं प्रेम तू मारलं आहेस, तुझ्या भावनांना तू मारलं आहेस नि ते कायमचंच.! आता कोणतीही तडजोड नाही, कारण नातं वाचवण्यासाठी जी तडजोड करत होतीस तू, ते नातंच आता राहील नाही, मग तडजोड ती कशासाठी?”
त्याने माझी तंद्री तोंडात विचारलं,
तो - आज उपवास आहे?
मी - अं...?
तो - नाही, इतकी शांत तू कधी नसतेस ना, म्हणून विचारलं.
मी - हमारे चेहरें पे तो हरदम मुस्कुराहट हुआ करती थी| शायद, हमारा वही अंदाज आपको रास नही आया ||
तो - असं तुटक का गं बोलतेयस ? बोल ना काहीतरी एकदम धाडधाड फाडफाड आधीसारखं.... तुझी ही शांतता पोखरतेय मला.
"एकदा माफ कर ना!"
मी - माफी ? कशासाठी?
तो - सगळ्याच गोष्टींसाठी.
मी - कोणत्या गोष्टी ? मला काहीच कळत नाहीए...
तो - पिल्लू, तुला सगळं कळतय. नको ना अस करुस. मला नाही ना राहता येतंय तुझ्याशिवाय....
मी - मला खरंच नाही रे कळतेय, तू कशाबद्दल माफी मागतोयस ते.
तो - बर मी काय करू म्हणजे तू आधीसारख वागशील ?... सांग ना .........
मी - अरे थांबव..... थांबव..... थांबव.... घर आलं ना माझं. चल बाय, छान वाटलं भेटून ... :)
तो - तू बदललीस.... इतकी की, तू शांत झालीयेस प्रचंड आणि मला त्रास होतोय त्याचा. कान तरसलेत गं तुझ ते "आज जाने की ज़िद ना करो " ऐकायला. आज हवं तितका वेळ थांबेल, तू जा म्हटली तरी नाही जाणार, पण तू बोल गं… मी खूप एकटा पडलोय गं..... काहीतरी तर बोल....प्रेम करतो गं मी तुझ्यावर..........
मी - "बस्सससस्स्स्स्स्स्स हां.......... यापुढे एक शब्दही नकोय मला....... नॉट ए सिंगल वर्ड ... प्रेम ? वाह बॉस.... सवयीला प्रेमाच नाव देऊन मोकळा झालास ?,ज्याला तू प्रेम म्हणतो, ती निव्वळ एक तडजोड आहे , आपल्या या सो कॉल्ड तडजोडीला कंटाळून प्रेम कधीच लुप्त झालय.. हे जे आपण भेटलोय ते काही प्रेम म्हणून नाही , मुळीच नाही. आपण भेटलोय, कारण आपल्याला एकमेकांची सवय झालीय. तुला भीती मला गमवण्याची मुळीच नाहीए, तू घाबरतोय त्यानंतर येणार्या एकटेपणाला नि तुझा तो एकटेपणाच आज माझ्यासमोर माफी मागतोय.... त्यामुळे ना....".
पुढे बोलणारच तितक्यात फोन वाजला......” हे! कैसे हो ? बहोत दिनों बाद ....? ” फोनवर बोलता बोलताच त्याला अलविदा केल नि मी निघाले.
मी शरिराने तर घरी आले होते, पण मनात विचारांनी घरच्या घर बांधली होती, आसवांची अतिवृष्टी होतानाही, का कुणास ठाऊक, पण मनाचा एक कोपरा इतका सुखावला होता की, डोक बंद होतं नि मन तूटल होतं तरीही तो आनंदित होता ...पण का ?.... .........
आता सगळच संपल होतं... हो ना?. सगळंच....
मग का ? रात्री रेडियोवर लागलेल्या ''आज जाने की ज़िद न करो '' ऐकताना मी रडले? का पुन्हा 'त्याच्या नसण्याच्या'नुसत्या कल्पनेने कोलमडले आणि याहीवेळी नेहमीसारखंच माझ्या अश्रुंचा समुद्र बघण्यासाठी ती रात्र नि तिचा काळोख होता….. तो नाहीच….!



प्रेम? सवय? तो ?

by on नोव्हेंबर २३, २०१८
मी - काय बोलु? काय बोलु? ............ हाई बोलु? हेलो ? की मग फक्त एक स्माइली टाकु? की मग हाई बोलून स्माइली टाकु? हाश्ह्ह्ह....... मला...







जुन्या पेटीत 'ती' चिठ्ठी सापडली.
आज घराची सफाई करताना
सापडलेला तो कागद एक 'भूतकाळ' होता.
यांना जाऊन आज जवळजवळ ५ वर्षे झाली.
आता तर काळ्या टिकलीचीही सवय झाली होती.
मग या अचानक सापडलेल्या तोफ्याचं प्रयोजन काय होतं ?
ती चिठ्ठी नवी होती की, ?
पण ती चिठ्ठी ....
हो ती यांच्याच अक्षरातली होती.
मला ते गुलदस्त्यातले दिवस आठवले ...
पन्नास वर्षांपूर्वी यांनी मला लिहिलेली ती खमकी 'माझी' चिठ्ठी आठवली ....
त्या चिठ्ठीला 'प्रेमपत्र' म्हणणं मुद्दामच टाळलं. कारण आजही ते आठ्ठवून हसायला येतं कारण ते प्रेमपत्र नाही,
 ती 'किराणामालाची' यादी होती.
संताप माझाही तासभर झालाच होता.
कारण, दुसऱ्यासाठी लिहिलेलं माझं प्रेमपत्र तिसऱ्यालाच गेलं होतं... आणि त्या भल्या माणसाला याचा कणभरही संताप नव्हता??
हो ... माझं प्रेमपत्र यांच्याकडे गेलं आणि यांची किराणामालाची यादी माझ्याकडे आली.... आणि मी लिहिलेल्या प्रेमापत्रातला तिसरा तो बाजूलाच राहिला.
नशीब ! पत्रावर ठळक लिहिलेल्या फोन नंबरमुळे तासाभरात यांचा फोन तरी आला...
त्यांचा आवाज तोच होता, जो माझ्या आयुष्याला हवा होता. ज्यात ताकद होती, आयुष्यभर माझ्यामागे खंबीरपणानं उभं राहण्याची.
ज्याला पत्र लिहिलं तो बाजूला राहिला, पण त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना भेटलो...
आणि भेटलो ते आयुष्यभरासाठी.... 😍😍

"कसं असतं ना... आपली एखादी चूकही आपल्याला आयुष्यभराची आनंदाची शिदोरी देऊन जाते... "  
हे सगळं आज आठवून न राहवून मला त्यांची आठवण अनावर झाली. व्यक्ती असा अर्ध्यात सोडून जाऊ नाही. साथ सोबतीची आहे ती अर्धवट राहायला नको, वाटतं.
 पण आता मात्र पानावलेल्या डोळ्यांतुन अश्रू पडून चिठ्ठीतील अक्षरे पुसण्याआधी मला पुन्हा त्यांच्या अक्षरातले ते शब्द वाचायचे होते.
माझं तरुण्यातलं प्रेम उभारून येऊन, आत्ता ती चिठ्ठी वाचताना सोबतीला त्यांचा हात असावा राहून राहून वाटत होतं...
शेवटी नाईलाजाने मी ती चिठ्ठी भराभरा उघडली....
उत्सुकता शिगेला पोहोचली होती...
काळ्या अक्षरात मजकूर होता,
"मी गेलो तरी लाल टिकली लावत जा सरकार (नानांच्या आवाजात).
आपल्यावर शोभून दिसते ओ...
समाजाची चिंता कशाला करता..?
काळी लावताच ना ? फक्त रंग बदलून लाल लावा ...
देवा शपथ तुमच्या गोर्या मुखड्यावर भारी शोभून दिसते ती ..."

हे सगळं वाचून मात्र खरंच वाटलं, अश्रू पडून चिठ्ठीतली अक्षरे मिटली असती तर फार बरं झालं असतं...
ते सोबत असायलाच हवे ना...
का लालची काळी करावी लागली असती.?
एकदा एकमेकांचे झालो की वेगळे का व्हावं लागतं... ?
तरीही या माणसाच्या आग्रहाखातर मी आरशात जाऊन तो एक यशस्वी प्रयत्न केला....
"खास दिसत होते मी.
मला आवडले मी.
इवलुशी कमी होती, ती त्यांच्या किफायती तारीफदार शब्दांची."
पण मी चिठ्ठी स्वीकारली आणि त्यातील शब्दही ....

#Colourful_Shades
#Change_Is_Beautiful

-सूफी


चित्रपट सुरू होतो, बघते तर काय
"आताची पिढी नाही हो जास्त थिएटर, नाटकाकडे वळत. आमच्या काळात... " असं म्हणत म्हणत निम्म्याहून अख्खं चित्रपटगृह तरुणाईने भरलं होतं. आजचा आणि कालचा बदल अनुभवायला.
" ... आणि काशीनाथ घाणेकर" बघायला.
पिढी घटकानघटका निर्माण होते, बदलते. त्यामुळे बदल ठरलेला. पण म्हणून कला बदलत नाही, नष्ट होत नाही, तिची रूपं बदलतात...

जगतो, वाढतो, धडपडतो, प्रेक्षकांच्या लायक बनतो, माज करतो, वावरतो आणि तो बनतोच तितक्यात त्याचा प्रयोग संपतो, आणि तो होतो काशिनाथ घाणेकर ...

"बालगंधर्व रंगमंदिरात आधी रांगा लाऊन तिकिटे तेही दररोज नाटक आणि लोक गर्दी करायचे. आज ती मजा नाही राहिली.." हा संवाद आणि ही सगळी चित्रफित जेव्हा समोरुन जाते, तेव्हा वाटतं, दाखवावं यांनाही की आजही नामांकित करंडकं पटकाऊन गर्वात कॉलेजभर फिरतात मुलं.
याशिवाय, चित्रपटात दर्शविलेले वाडे, पोशाख, दोन वेण्या, जुने कॅमेरे, तसच संगीत, तेच त्या काळाला साजरं असं एडिटिंग,  तोच ठेहराव बघताना शेजारच्या प्रेक्षकाला टाळलं तर तुम्ही रमून जातात.
छान सुरेख आपल्या भारतीय संस्कृतीत साजेसा असा काशिनाथ असतो. श्रीमंत, देखणा, डोळ्यांत घारा रंग, गोरी गरगरीत त्वचा, नाकावर माज, आणि पाठीशी लग्न करायला म्हणून घरच्यांच्या हट्टाची डॉक्टर ही पदवी.
सुरुवातीला एका कटमध्ये समोर घडणारं सगळं प्रत्येक संसारी पुरुषबाईच्या आयुष्यातलं. 'घरोघरी मातीच्या चुली' वाटतं. पण जेव्हा सगळी दुनिया दावणीला टांगून आतला कलाकार घानेकरांणा
डिवचू लागतो, स्वस्थ बसू देत नाही तेव्हा, तो बाहेर इतरांनाही जाणवतो. मिसेस घाणेकरांनाही जाणवू लागतो तो.
कलाकाराच्या संसारी आयुष्यात त्याला समजणारा जोडीदार नाही, मन असावं लागतं. त्या जोडीदाराला रादर मनाला एक कला यायला हवी स्वतंत्र, नाहीतर निदान तो प्रेक्षक असावा, रसिक. तसं नसल्यास त्याची मिसेस घाणेकर होते.
मिसेस घानेकरांचं म्हणणं तसं योग्य होतंच, " दुसऱ्या बाईकडे गेलेला माणूस परत घरी तरी येतो, नाटकात गेलेला माणूस परत येत नाही..." वाक्य नाही, संवाद नाही हे वास्तव होतं. पण कसा येणार तो माणूस आपल्या कलेतून बाहेर.? एकतर तो प्रामाणिक राहू शकतो, नाहीतर समाजातला ढोंगी...
शेवटी बायको सोडून जाते.
मुळात चित्रपटाची मजा तेव्हा येऊ लागते, जेव्हा तुम्ही घाणेकर खऱ्या अर्थाने पचवू लागतात.
मुख्य नायकाच्या भूमिकेतील आणि घाणेकर उर्फ सुबोध भावे.  सुरुवातीला वाटतं, 'हा मेंघळट आहे, याला नाय जमायचं. हा आणि घाणेकर?'
असं म्हणतच सुरुवातीला नकारात्मकता स्वीकारत भावे उत्तमरित्या मोठा होत जातो, आणि जसजसं तो मोठा होतो तसतसे तो कलेला, त्याच्या पॅशनला ज्यापद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, ते इतर सुबोध भावेपेक्षा वेगळं ठरतं. तो आवडत जातो हळूहळू.
बायको सोडून जाण्याआधीच कांचन त्याच्या आयुष्यात येते.
कांचन आणि घाणेकरांची कथा पडद्यावर बघणं सुंदर वाटतं.
कांचन ही ती फिलींग आहे जेव्हा आपल्याला माहिती नसतं आपण कुणालातरी आवडतोय...आणि आपण बेफिकीर वावरत असतो. कांचन हे पात्र असतंच आयुष्यात, नाही?
ती कांचन होती.
आणि काशिनाथ होताच तसा प्रेमात पडण्यासारखा.
कलाकार नाही तरी निदान प्रेक्षक होता आलं पाहिजे, प्रेक्षक कांचन होती.
चित्रपटाच्या मध्यावर मला प्रश्न पडतो की, कांचन हवीच का आयुष्यात?... जी सांगेल तुम्हाला की, 'तुम्ही गर्दीत हरवताय...'
कांचन घाणेकरांच्या आयुष्यात आली.
जेव्हा आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीच्या जवळ, खुप जवळ जात असतो. आपलं मन हेलावतं, कसलातरी सुखद विचार करुन हा क्षण लांबवावा असा खेद करत मागे जावं वाटतं का? घाणेकर जातोही, धाडसी वाटायला लागतो घाणेकर तिथे, पण त्याच अगतीकतेने वाऱ्यासारखे माघारी वळून तो तिथेच कवेत घेतो कांचनला.
तिथेच घडतं रंगमंचामागचं ते घाणेकरांचं पहिलं चुंबन... तिथे वापरलेेेला कॅमेरा हा खास आवडला.
त्यानंतर घाणेकरांची बायको निघून जाते, कांचन मिळत नसते.
प्रेम मिळत नसतं तोवर माणूस त्यासाठी जीवही द्यायला तयार असतो. घाणेकर तर नाटक सोडायला तयार होणार होते. कांचन बायको नव्हती तोवर ती प्रेयसी होती, प्रतिक्षेनंतर जेव्हा लग्न होतं तेव्हा तिची गृहिणी झाली. त्यांच्या नात्यात पुढे औपचारिकताच उरते.
मनात चालू राहतं,
जो कलाकार  कधीतरी दुसऱ्यावर अवलंबून सुरुवात करतो, तोच हळुहळू घडवतो पुढे कित्येक रोजगार, कित्येक कलाकार, कितीतरी प्रेक्षक पण जेव्हा तो इतरांना घडवायला लागतो, तेव्हा मात्र स्वतःला घडवायचं विसरून जातो...
आतापर्यंत चित्रपटात तसं सगळं गोडीगोडी साजरंसंगीन चालु असतं....
चित्रपटाचं मध्यांतर होतं आणि चित्रपट मनात चालू असतो आणि  कल्पना येतेच की आता खरी घाणेकरांची ( किंवा मग कलाकाराची?) वाताहत सुरू होणार.  'नटसम्राट' ची कुठेतरी घाणेकरांबरोबर तुलना सुरू होते.
पण मी तसं करणं टाळते.
दोन वेगळ्या कलाकारांचा धर्म 'नाटक ' असला तरी आयुष्य आणि तेथील त्यांचं जगणं यांची सरमिसळ करणं हा त्यांच्या मेहनतीचा अपमान ठरला असता. 
चित्रपट पुढे पुढे सरकत जातो.
तेव्हा गर्विष्ठ घाणेकरांतून बाहेर येत घाणेकरांची
वेगवेगळी रूपे समोर येत जातात. त्याच्या भोवताली असणाऱ्या माणसांचं आयुष्य, त्याच्यामुळे बदललेले ते लोक यांची पात्र नवखणाण्यासारखी ठरतात. पंतांपासून, त्यांच्या सेवकापर्यंत. काहीकाही नाजूक ठिकाणी पंत खूप भावतो मनाला. कलेतल्या 'कलाकाराची' कदर करणारे खूप कमी असतात, पंत त्यातले होते, शेवटपर्यंत राहतात. हे बघण्यासारखं वाटतं.
मध्यांतर होतं,
आणि घाणेकर पर्वाच्या अस्ताकडे चित्रपट जातो,
वाटतं जेव्हा कलाकार आपटतो धाडकन, तेव्हा तो नाटकाची पाटी लिहिणारा माणूसही बेदरकार क्षणभरही विचार न करता त्या नाट्यगृहाबाहेरील फलाकावरचं ते प्रसिद्ध नाव खोडतो, त्याच्या त्या फडक्याने. तो आय ओपनर असतो त्या प्रयोगाच्या यशाचा, अपयशाचा आणि त्या कलाकाराचा.
त्यामुळे लोकप्रियतेची नशा चढावी पण भिनु देऊ नये. नाहीतर स्वतःच स्वतःत बेचिराख होणं मान्य करावं लागतच.
.......
एक खरा कलाकार नेहमी एका खऱ्या ' प्रेक्षकाच्या' शोधात असतो, त्याची वाट तो प्रत्येक प्रयोगाला त्याच आतुरतेने पाहत असतो. त्याच्यासाठीच हा काय तो अट्टाहास असतो त्याचा.
जेव्हा कलाकार नाकारला जातो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने स्वतः कडे बघतो, शोधतो आणि घडतो.
असं झालं नाही तर अपयश त्याला माहित नसतं त्यामुळे तो स्वतःला लोकांसमोर केवळ ' दाखवत '
असतो, शो ऑफ, फक्त बहिरुप्या म्हणून कुणाचातरी!
याशिवाय चित्रपटाचं संगीत:
"दोन वयातील जाई का अशी गंधाळली...." किंवा मग "सभोवती नसे कुणी लाजते मनात मी...." किती सहज, सोप पण खास गायलंय ते. आमचे सर म्हणायचे, सोप्प लिहिणं जास्त अवघड असतं. आणि तितकंच ते गायलाही अवघड पण तितकंच ते चटकन मनाचा ठाव घेणारं वाटलं मला.
कलाकृती घडते तेव्हा;
लेखक लिहितो, शब्द ऐका हां,
"समशेर संभाजीचं शस्त्र नव्हतं स्वभाव होता..."
म्हणजे कित्ती सुंदरपणे नटाला ते समजावून सांगावं, हा संवाद मला खेचून घेतोच. पण 'रायगडाला जाग येते तेव्हा...' हे शीर्षक जेव्हा लेखकाला सापडतं, आनंद तो कुठला हिरा कोळशातून मिळाला यापेक्षा वेगळा नसतो. बास्स एक शब्द आणि आनंद ... केवढी वेगळी संपती आहे ही, आतला आनंद देणारी....सगळा खेळ शब्दाशब्दाने फिरतो इथे. माणसाआधी इथे महत्व येतं, तुम्ही तुमच्या आतील कलेशी किती बांधिलकी ठेवतात याला.
अपयशाच्या वेळी व्यक्ती जेवढे विचार करतो तेवढे तो एका दिवसातही करत नसेल हे घाणेकरांच्या प्रत्येक अपयशावेळी उलगडत जातं.
याच जगातील आणखी एक सत्य म्हणजे
कलाकारासारखा मूडी माणूस जगात कुठेच नाही, कुठ्ठेच नाही...
आणि त्यावर शाप म्हणजे रंगभूमीवर प्रत्येक दिवसाचा ' मॅन आॅफ दि मॅच' बदलणारा. त्यामुळे कलाकाराला रोज नवं काहीतरी द्यावच लागतं. साचलेपण येऊन चालत नाही कला. नाहीतर त्याच्या कलेची डबघाई सुरू होते, मरत जातो तो, भिकार होतो तो याच कौतुकात.
त्यासाठी कलाकाराने जपावं स्वतःला. नाहीतर मध्याननंतर त्यांचा एकतर डॉ. श्रीराम लागू होतो नाहीतर ...आणि घाणेकर. कला म्हटलं की स्पर्धक आले. प्रत्येक कलाकारासाठी त्याचा तो खोचक बिंदू ठरलेला असतो.ज्याचा एक शब्द किंवा एक टिंबही मनाला लागतो. घाणेकरांसाठी ते डॉ. लागू होते. लागूंनी ही कलेची स्पर्धा छान, सुरेख आणि खेळकर ठेवली.
याशिवाय, रंगमंचा'मागे' घडणारं कुठे टिपलं जात नसलं तरी या चित्रपटात मात्र हेच दाखवण्याची धडपड केलेली दिसते.
तसेच लेखक, नटांची भांडणं कायमचीच. प्रयोग कथेमुळे हाऊसफुल झाला की अभिनयामुळे हा लेखक- नटांतला सौदाच जणू!
-----
चित्रपट शेवटावर येतो,
आणि
घाणेकर तिथेच संपतो, जेव्हा ध्वजनिधीसाठी तो खूप जास्त पैसे त्या मुलीच्या हातावर ठेवतो. ती  खुश होते. ती म्हणते, एवढे? ... तो ' ठेव ' म्हणतो. तोही खुश होतो. तेव्हा ती आनंदाने सगळ्यांना बोलावते आणि विचारते नाव काय तुमचं? ...
कलाकाराचा माज, साज, आणि आतापर्यंतचं सगळच एका प्रश्नाने संपतं. पैशाने श्रीमंती दाखवता येते, मनाने श्रीमंत होता येत नाही.
आणि म्हणून वाटतं, प्रेक्षकाच्या हाताखालची कठपुतली असतो कलाकार. प्रेक्षक त्याला विकृतपणे जगवू शकतो आणि मारुही शकतो. त्यामुळे कलाकाराने माज करूनच घ्यावा त्याच्या हक्काचा असतो कारण असही कलाकारासाठी एकच अनादिकाळापर्यंत सत्य उरतं, ते म्हणजे,
--------
कलाकाराची माती होते,
शेवटी फक्त कला उरते.... 

( हा चित्रपट आत्मचरित्रपट असला तरी ' घाणेकर 'मला ठावूक नाहीत म्हणून चित्रपट मला आवडत जातो.)

#बघावाच_असं_काही_नाही_पण_बघावा_असा_आहे

- पूजा Dheringe

...आणि काशीनाथ घाणेकर

by on नोव्हेंबर १७, २०१८
चित्रपट सुरू होतो, बघते तर काय "आताची पिढी नाही हो जास्त थिएटर, नाटकाकडे वळत. आमच्या काळात... " असं म्हणत म्हणत निम्म्याहून...


"तुमच्या अंगातली ती नस काढून टाका बरं, जी तुम्हाला बाई म्हणून काही आव्हान पेलू देत नाही..."
साला हा प्रॉब्लेम तोपर्यंत जाणवत नाही जोपर्यंत एखाद्या रविवार तुम्ही १४ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर क्रिकेटच्या मैदानावर जात नाही ... किंवा मग देवकुंडच्या धबधब्यावर जातात, जिथे तिथला तो धबधबा असा अंगावर येत असतो पण तुमची आणि तुमच्या अंगावर मनाची वाढ फक्त होत असते कारण त्या अंगावर 'भीती' नावाची कातडी जाडसर थरात चिकटलेली असते ... त्यामुळे त्या एवढ्या प्रकर्षाने अंगावर येणाऱ्या पाण्याला तुम्ही विरोध करत दुरूनच मुलं कशी त्या पाण्यात पोहतात, याचा समजूतदार आनंद लुटतात.... 
आणि दुरूनच त्या जाडसर भीतीच्या थराला समाजाने दिलेलं 'नाजूका' नाव तुम्ही जगू लागतात आणि गर्वाने वाढत राहतात नाजूका म्हणूनच!... आणि असं  मिरवण्यातच समाधान मानणाऱ्या अनेक मुलीच मी पाहिल्याय आजही, दुर्दैवाने.!  
ए मुली, 
नाजूक होणं हा तुझ्यातला सुप्त गुण आहे, त्यात नजाकत अदा आहे. पण  तू त्या गुणाला इतकं तुझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवांमध्ये म्हणजे लिटरली हातापासून पायापासून कोपर्‍यापर्यंत, रुजवून भिनवून अंगा खांद्यावर खेळत  ठेवलंय की एक झुरळ दिसलं तरी तू पलंगावरून खाली उड्या मारत राहते, किंचाळते कितीतरी वेळ... मग मला सांग तोच आवाज तू तुझ्या स्वतःच्या हट्टासाठी का बरं नसेल वापरत?
मगग्ग माझा संताप सुरू होतो... मला प्रश्न पडतो याच मूळ नेमकं आहे कुठे? 

'माझ्या भोवतालच्या परिसराने मला मुलगी म्हणून वाढवलं.' या जगातल्या एकमेव कारणामुळे किती गोष्टींना मी मुकले माहिते... ?  
लहानपणी माझं मैदान सुटलं. 
घरच्यांनी हुशारीने माझ्या हातात बॅटऐवजी लाटणं दिलं. आवाज उठवणं मला माहित नव्हतं. अजाणत्या वयात मला जसा आकार दिला मी बनत गेले, घडत गेले. मग आता का निम्म्याहून अधिक पुरुष यावरच अडतात कि बायको मॅच पाहू देत नाही किंवा तिला पाहणं आवडतच नाही.
अरे, जर तुम्ही तिच्या जन्मानंतर धाडकन २५व्या वर्षी मॅच बघायला बसवाल तर तिला घंटा त्यातला फॉर सिक्स सोडून काही कळणारे.? त्यातही ती बसलीच तरी त्या संपूर्ण मॅचमध्ये फोर सिक्स मारले किती जातात कि ती त्याचा आनंद घेऊन तुमच्या सारखं म्हणेल, "अरे यार्र्र्र याने हा बॉल फास्ट टाकण्यापेक्षा स्पिन टाकला असता यार्र्र्र ..... शिट्ट सुटलाssss..." आणि तिथेच ती म्हणते मला क्रिकेट आवडत नाही जसं काहीअंशी पुरुष  म्हणतात आम्हाला टेलिव्हिजनच्या डेली सोप्स, मालिका आवडत नाहीत.  क्रिकेट सर्वमान्य म्हणून त्याचा गर्व, पण याउलट डेली सोप्स ही तिची आवड, ती कितीही टिपिकल असो, तिची आवड असूनही त्यावर जोक्स,  स्टिरिओटिपिकल !
आज मैदानात उतरले मी....
आवड म्हणून सगळा जीव एकवटून किमान 'त्या बॉलरचा बॉल बॅटवरच येईल' हे ध्येय ठेवलं. मग तिथे तर फोरसिक्स बात दूरच होती... मी क्रिकेट खेळतेय, हाच संपूर्ण आनंद माझ्यात होता...
मी सगळीकडे एक नजर टाकली, त्या एवढ्या मोठ्या मैदानात फील होता हा माझ्या खेळण्याचा पण निसर्ग सोडला तर या २१व्या शतकातही 'अरे मुलगी क्रिकेट खेळतेय' म्हणून खिळलेल्या नजरा सुटल्या नव्हत्या.
तितक्यात माझं ध्येय धरून, एक  बॉल बसला ना बॅटवर आणि मी होत्या नव्हत्या ताकदीने फिरवली बॅट आणि अंदाधुंदी माझा फोर गेला, बाबोsssss  माझे मित्र कित्ती खुश झाले माहिते... मी इतक्या इतक्या जोरजोरात ओरडले आमची टीम आनंद सेलिब्रेट करू लागली...
त्यांच्या त्या आनंदात मी माझं लहानपण आता फुलण्याचा आनंद पाहिला, मारलेला तो आनंद त्यांनी त्यांच्या मला चियर करण्यात शोधून दिला, तो आनंद इतका जास्त म्हणजे कसं माहिते का... तुमचं शरीरच नाही तर तुमचं मनही तिथे खेळले असतं... 
नकळत विचार थांबलेले असतात. 
नीट निरीक्षण केलं तर लक्षात येतं, मुलींना वाटून दिलेल्या कामांत उदाहरणार्थ चपात्या करणं असो, कपडे धुणं असो प्रत्येक कामात डोकं मन यांचं युद्ध चालूच असतं...
जेव्हा हे मन, डोकं आणि शरीर एकत्र येऊन खुश होतात तेव्हा खरा आनंद, खरं स्वातंत्र्य असतं. ते माझ्या मते, क्रिकेटमध्ये होतं... आणि मी मनस्वी मुकले या गोष्टीला. माझ्या स्वातंत्र्याला.  
याशिवाय सुटल्या त्या खूप गोष्टी... 
माझा कुणाला विरोध करणं सुटलं. माझं मिरवणुकीत ' गणपती बाप्पाsssss' कुणाच्या आधी म्हणणं सुटलं,  मला निसर्ग एकट्याने अनुभवणं सुटल. माझं रात्रीत एकटं बाहेर फिरणं सुटलं. एखाद्याने 'अरे' केलं तर त्याच्या डोळ्यात डोळे खुपसून तिथेच त्याच्याशी निपटनं सुटलं. गेयरची गाडी हातात घ्यायची नाही , घेतली आणि आक्सिडेंट झाला तर....? बाबोsss , त्या चेहऱ्यावर धपटली तर लग्न कोण करेल तुझ्याशी ? त्यामुळे गपगुमान स्कुटी घ्यायची ते नसेल जमत तर दादा येईल सोडवायला कॉलेजच्या गेटपर्यंत, घ्यायलाही येईल. 
जेणेकरून मुलगी म्हणून तुम्ही दुसऱ्या मुलाकडे डोळे वर करून पाहण्याचे धाडसही करायचे नाही. प्रेम मुलीच्या आयुष्यात नसतं तिने सगळं अरेंज जगावं,  आयुष्यही आणि लग्नही... 
पण हे सुटलं कि सोडवलं... ?
तुम्हाला माहिते जसं एखाद्या व्यक्तीच्या व्यसनाने त्रास होतो, तेव्हा ते सुटलं जात नाही सोडवलं जातं, तेही त्याच्या आप्तस्वकीयांकडून. 
माझं (स्त्रीचं)'लहानपण' ही माझी नशा होती, ती नशा समाजाच्या दृष्टीने, सासरी गेल्यावर माहेरच्या सो कोल्ड 'संस्कारांचा' नाश करणारी होती, त्यामुळे ही नशा आयुष्यात भिनण्याआधी ती सोडणं गरजेचं होतं...   
ही नशा कशी सोडवली माहिते... 
"बाळा, शेवटची चपाती तुला करायला देईल हां ... बघ ही अशी जाळायची नाही गं... कपड्यांना इतकी साबण मी लावते का पुढच्या वेळी हा छोटा कपडा धुवून बघ बर्र्र..." ही अशी गोडीगोडीने समाजवलेली कामं लहानपणीच्या त्या जोशाजोषात मुलीला कुठे माहित असतं कि, आपण आपल्याच हाताने एका बंधिस्त आयुष्याला आवताण देत आहोत. 
काम शिकण्यामध्ये माझा कधीच आक्षेप नाही. पण कामांच्या मागचा उद्देश "लोकाच्या घरी जायचं तुला, तिथले लोक काय म्हणतील हेच शिकवलं का आईने.... ?" यावर आहे. 
हे एक वाक्य सासरकडून ऐकायला मिळू नाही म्हणून मुलीचे पालक स्वतःच्या मुलीच्या आयुष्याला ही पाय आखडून ठेवण्याची तोरणं लावतात, आणि आनंदाने एक आयुष्य सरकवतात मुलगी आहेस तू या नावे...  
त्यावेळी झुरळांना पाहून घाबरणाऱ्या त्या मुलींना बोलावंसं वाटतं,
धडधाकट स्त्रिया तुम्ही,  ह्या अशा बसच्या सीटवर जागा मिळाली नाही किंवा 'नळावरची भांडण' म्हणून प्रसिद्ध होतात, भांडतात... जरा हेच भांडण स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, स्वप्नांसाठी करायला शिका ना आतातरी. 
"शिवाजी जन्मावा तो शेजारी तसं, रणरागिणीसारखं आयुष्य जगावं ते शेजारच्या मुलीने, आम्ही बघ्याचं काम करू." असं करणाऱ्या स्त्रियाच आज अधिक वाढत आहेत, हे बदलायला हवं... असं नाही वाटत?
मला आता पडणारे प्रश्न हे आताच्या काळासाठी फेमिनिज्म (नारीवादी) या विषयावर खपणारे असतील, पण ही प्रश्नपत्रिका प्रत्येक मुलीने एकदा स्वतःच्या मनापुढे ठेवावीच, त्याशिवाय हा जन्म एक चालढकल आणि दुसर्याने तुमच्यावर केलेले उपकार असतील. 
तुझा जन्म हा कुणाच्या तरी जन्माच ओझं बनूनच राहील ... 
भांडणारे भांडत राहतात स्त्रीत्व, फेमिनिज्म आणि समलैंगिकत्वासाठी... आणि या भांडणामुळे एखाद्या स्त्रीच्या वाट्याला हा फेमिनिज्म जपणारा नवरा येतोही तेव्हा ही बाई त्यातच धन्यता मानून भावी आयुष्यात तितक्याच मर्यादेत चिवट स्वप्न पाहू लागते... आणि मुख्य म्हणजे ती ही चिवट स्वप्नही कुणाच्या तरी जिवावर पाहते... 
सिम्पथी किंवा दयेच्या कुबड्या घेऊन हे आयुष्य चालवते... तिची सावित्री होत नाही. 
सावित्रीबाईने नवऱ्याकडून मिळालेली शिक्षणाची देण स्वतःपुरतीच ठेवून धन्यता मानली नाही. तिने तिला मिळालेल्या स्वातंत्र्याची उब अशा अनेकींना मिळावी म्हणून धडपडली. 
इथे प्रॉब्लेमच हा आहे, नवरा मनासारखा मिळाला कि काहीअंशी स्त्रिया स्वप्नांनाच पूर्णविराम देतात. 
शेवटचं सांगू, जन्माला घाला ना तो जन्म जो खरंच तुम्हाला जगावासा वाटतोय, त्यासाठी धडपड करा, स्वतःच्या आयुष्याचं देणं पूर्ण होईल. 
दै. प्रभात वृत्तपत्रात छापून आलेला वरील लेख