Sufi: #Women empowerment
#Women empowerment लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#Women empowerment लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


"तुमच्या अंगातली ती नस काढून टाका बरं, जी तुम्हाला बाई म्हणून काही आव्हान पेलू देत नाही..."
साला हा प्रॉब्लेम तोपर्यंत जाणवत नाही जोपर्यंत एखाद्या रविवार तुम्ही १४ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर क्रिकेटच्या मैदानावर जात नाही ... किंवा मग देवकुंडच्या धबधब्यावर जातात, जिथे तिथला तो धबधबा असा अंगावर येत असतो पण तुमची आणि तुमच्या अंगावर मनाची वाढ फक्त होत असते कारण त्या अंगावर 'भीती' नावाची कातडी जाडसर थरात चिकटलेली असते ... त्यामुळे त्या एवढ्या प्रकर्षाने अंगावर येणाऱ्या पाण्याला तुम्ही विरोध करत दुरूनच मुलं कशी त्या पाण्यात पोहतात, याचा समजूतदार आनंद लुटतात.... 
आणि दुरूनच त्या जाडसर भीतीच्या थराला समाजाने दिलेलं 'नाजूका' नाव तुम्ही जगू लागतात आणि गर्वाने वाढत राहतात नाजूका म्हणूनच!... आणि असं  मिरवण्यातच समाधान मानणाऱ्या अनेक मुलीच मी पाहिल्याय आजही, दुर्दैवाने.!  
ए मुली, 
नाजूक होणं हा तुझ्यातला सुप्त गुण आहे, त्यात नजाकत अदा आहे. पण  तू त्या गुणाला इतकं तुझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवांमध्ये म्हणजे लिटरली हातापासून पायापासून कोपर्‍यापर्यंत, रुजवून भिनवून अंगा खांद्यावर खेळत  ठेवलंय की एक झुरळ दिसलं तरी तू पलंगावरून खाली उड्या मारत राहते, किंचाळते कितीतरी वेळ... मग मला सांग तोच आवाज तू तुझ्या स्वतःच्या हट्टासाठी का बरं नसेल वापरत?
मगग्ग माझा संताप सुरू होतो... मला प्रश्न पडतो याच मूळ नेमकं आहे कुठे? 

'माझ्या भोवतालच्या परिसराने मला मुलगी म्हणून वाढवलं.' या जगातल्या एकमेव कारणामुळे किती गोष्टींना मी मुकले माहिते... ?  
लहानपणी माझं मैदान सुटलं. 
घरच्यांनी हुशारीने माझ्या हातात बॅटऐवजी लाटणं दिलं. आवाज उठवणं मला माहित नव्हतं. अजाणत्या वयात मला जसा आकार दिला मी बनत गेले, घडत गेले. मग आता का निम्म्याहून अधिक पुरुष यावरच अडतात कि बायको मॅच पाहू देत नाही किंवा तिला पाहणं आवडतच नाही.
अरे, जर तुम्ही तिच्या जन्मानंतर धाडकन २५व्या वर्षी मॅच बघायला बसवाल तर तिला घंटा त्यातला फॉर सिक्स सोडून काही कळणारे.? त्यातही ती बसलीच तरी त्या संपूर्ण मॅचमध्ये फोर सिक्स मारले किती जातात कि ती त्याचा आनंद घेऊन तुमच्या सारखं म्हणेल, "अरे यार्र्र्र याने हा बॉल फास्ट टाकण्यापेक्षा स्पिन टाकला असता यार्र्र्र ..... शिट्ट सुटलाssss..." आणि तिथेच ती म्हणते मला क्रिकेट आवडत नाही जसं काहीअंशी पुरुष  म्हणतात आम्हाला टेलिव्हिजनच्या डेली सोप्स, मालिका आवडत नाहीत.  क्रिकेट सर्वमान्य म्हणून त्याचा गर्व, पण याउलट डेली सोप्स ही तिची आवड, ती कितीही टिपिकल असो, तिची आवड असूनही त्यावर जोक्स,  स्टिरिओटिपिकल !
आज मैदानात उतरले मी....
आवड म्हणून सगळा जीव एकवटून किमान 'त्या बॉलरचा बॉल बॅटवरच येईल' हे ध्येय ठेवलं. मग तिथे तर फोरसिक्स बात दूरच होती... मी क्रिकेट खेळतेय, हाच संपूर्ण आनंद माझ्यात होता...
मी सगळीकडे एक नजर टाकली, त्या एवढ्या मोठ्या मैदानात फील होता हा माझ्या खेळण्याचा पण निसर्ग सोडला तर या २१व्या शतकातही 'अरे मुलगी क्रिकेट खेळतेय' म्हणून खिळलेल्या नजरा सुटल्या नव्हत्या.
तितक्यात माझं ध्येय धरून, एक  बॉल बसला ना बॅटवर आणि मी होत्या नव्हत्या ताकदीने फिरवली बॅट आणि अंदाधुंदी माझा फोर गेला, बाबोsssss  माझे मित्र कित्ती खुश झाले माहिते... मी इतक्या इतक्या जोरजोरात ओरडले आमची टीम आनंद सेलिब्रेट करू लागली...
त्यांच्या त्या आनंदात मी माझं लहानपण आता फुलण्याचा आनंद पाहिला, मारलेला तो आनंद त्यांनी त्यांच्या मला चियर करण्यात शोधून दिला, तो आनंद इतका जास्त म्हणजे कसं माहिते का... तुमचं शरीरच नाही तर तुमचं मनही तिथे खेळले असतं... 
नकळत विचार थांबलेले असतात. 
नीट निरीक्षण केलं तर लक्षात येतं, मुलींना वाटून दिलेल्या कामांत उदाहरणार्थ चपात्या करणं असो, कपडे धुणं असो प्रत्येक कामात डोकं मन यांचं युद्ध चालूच असतं...
जेव्हा हे मन, डोकं आणि शरीर एकत्र येऊन खुश होतात तेव्हा खरा आनंद, खरं स्वातंत्र्य असतं. ते माझ्या मते, क्रिकेटमध्ये होतं... आणि मी मनस्वी मुकले या गोष्टीला. माझ्या स्वातंत्र्याला.  
याशिवाय सुटल्या त्या खूप गोष्टी... 
माझा कुणाला विरोध करणं सुटलं. माझं मिरवणुकीत ' गणपती बाप्पाsssss' कुणाच्या आधी म्हणणं सुटलं,  मला निसर्ग एकट्याने अनुभवणं सुटल. माझं रात्रीत एकटं बाहेर फिरणं सुटलं. एखाद्याने 'अरे' केलं तर त्याच्या डोळ्यात डोळे खुपसून तिथेच त्याच्याशी निपटनं सुटलं. गेयरची गाडी हातात घ्यायची नाही , घेतली आणि आक्सिडेंट झाला तर....? बाबोsss , त्या चेहऱ्यावर धपटली तर लग्न कोण करेल तुझ्याशी ? त्यामुळे गपगुमान स्कुटी घ्यायची ते नसेल जमत तर दादा येईल सोडवायला कॉलेजच्या गेटपर्यंत, घ्यायलाही येईल. 
जेणेकरून मुलगी म्हणून तुम्ही दुसऱ्या मुलाकडे डोळे वर करून पाहण्याचे धाडसही करायचे नाही. प्रेम मुलीच्या आयुष्यात नसतं तिने सगळं अरेंज जगावं,  आयुष्यही आणि लग्नही... 
पण हे सुटलं कि सोडवलं... ?
तुम्हाला माहिते जसं एखाद्या व्यक्तीच्या व्यसनाने त्रास होतो, तेव्हा ते सुटलं जात नाही सोडवलं जातं, तेही त्याच्या आप्तस्वकीयांकडून. 
माझं (स्त्रीचं)'लहानपण' ही माझी नशा होती, ती नशा समाजाच्या दृष्टीने, सासरी गेल्यावर माहेरच्या सो कोल्ड 'संस्कारांचा' नाश करणारी होती, त्यामुळे ही नशा आयुष्यात भिनण्याआधी ती सोडणं गरजेचं होतं...   
ही नशा कशी सोडवली माहिते... 
"बाळा, शेवटची चपाती तुला करायला देईल हां ... बघ ही अशी जाळायची नाही गं... कपड्यांना इतकी साबण मी लावते का पुढच्या वेळी हा छोटा कपडा धुवून बघ बर्र्र..." ही अशी गोडीगोडीने समाजवलेली कामं लहानपणीच्या त्या जोशाजोषात मुलीला कुठे माहित असतं कि, आपण आपल्याच हाताने एका बंधिस्त आयुष्याला आवताण देत आहोत. 
काम शिकण्यामध्ये माझा कधीच आक्षेप नाही. पण कामांच्या मागचा उद्देश "लोकाच्या घरी जायचं तुला, तिथले लोक काय म्हणतील हेच शिकवलं का आईने.... ?" यावर आहे. 
हे एक वाक्य सासरकडून ऐकायला मिळू नाही म्हणून मुलीचे पालक स्वतःच्या मुलीच्या आयुष्याला ही पाय आखडून ठेवण्याची तोरणं लावतात, आणि आनंदाने एक आयुष्य सरकवतात मुलगी आहेस तू या नावे...  
त्यावेळी झुरळांना पाहून घाबरणाऱ्या त्या मुलींना बोलावंसं वाटतं,
धडधाकट स्त्रिया तुम्ही,  ह्या अशा बसच्या सीटवर जागा मिळाली नाही किंवा 'नळावरची भांडण' म्हणून प्रसिद्ध होतात, भांडतात... जरा हेच भांडण स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, स्वप्नांसाठी करायला शिका ना आतातरी. 
"शिवाजी जन्मावा तो शेजारी तसं, रणरागिणीसारखं आयुष्य जगावं ते शेजारच्या मुलीने, आम्ही बघ्याचं काम करू." असं करणाऱ्या स्त्रियाच आज अधिक वाढत आहेत, हे बदलायला हवं... असं नाही वाटत?
मला आता पडणारे प्रश्न हे आताच्या काळासाठी फेमिनिज्म (नारीवादी) या विषयावर खपणारे असतील, पण ही प्रश्नपत्रिका प्रत्येक मुलीने एकदा स्वतःच्या मनापुढे ठेवावीच, त्याशिवाय हा जन्म एक चालढकल आणि दुसर्याने तुमच्यावर केलेले उपकार असतील. 
तुझा जन्म हा कुणाच्या तरी जन्माच ओझं बनूनच राहील ... 
भांडणारे भांडत राहतात स्त्रीत्व, फेमिनिज्म आणि समलैंगिकत्वासाठी... आणि या भांडणामुळे एखाद्या स्त्रीच्या वाट्याला हा फेमिनिज्म जपणारा नवरा येतोही तेव्हा ही बाई त्यातच धन्यता मानून भावी आयुष्यात तितक्याच मर्यादेत चिवट स्वप्न पाहू लागते... आणि मुख्य म्हणजे ती ही चिवट स्वप्नही कुणाच्या तरी जिवावर पाहते... 
सिम्पथी किंवा दयेच्या कुबड्या घेऊन हे आयुष्य चालवते... तिची सावित्री होत नाही. 
सावित्रीबाईने नवऱ्याकडून मिळालेली शिक्षणाची देण स्वतःपुरतीच ठेवून धन्यता मानली नाही. तिने तिला मिळालेल्या स्वातंत्र्याची उब अशा अनेकींना मिळावी म्हणून धडपडली. 
इथे प्रॉब्लेमच हा आहे, नवरा मनासारखा मिळाला कि काहीअंशी स्त्रिया स्वप्नांनाच पूर्णविराम देतात. 
शेवटचं सांगू, जन्माला घाला ना तो जन्म जो खरंच तुम्हाला जगावासा वाटतोय, त्यासाठी धडपड करा, स्वतःच्या आयुष्याचं देणं पूर्ण होईल. 
दै. प्रभात वृत्तपत्रात छापून आलेला वरील लेख