2017 - Sufi
तो असा समोर बसलाय .. काय बघतोय देव जाणे ! पण मगाचपासून बिंदास्त निरीक्षण करतोय. अशी ताणताण उठेल नि त्याला विचारेल, की 'काय बघत आहात काही प्रॉब्लेम आहे का ?'
पण नाही.... कोणाला बघायला जाताना अस नाही ना बोलत ... ?
काही माणसं न सांगता बघतात. त्यांना बोलता येतं. पण लग्नासाठी सांगून बघतात, त्यांना नाही नं बोलता येत ?
तो अकरावा मुलगा होता, बघण्यासाठी आलेला. त्यामुळे घरचे आधीच खूप त्रस्त होते.
'आता मिळेल तसा मुलगा स्वीकारायचा,तू नाही बोलायचच नाही. त्याच्या होकाराची फक्त वाट पाहायची. ' हा सूर एव्हाना माझ्या अंगवळणी लागला होता. त्यामुळे दोन मिनटांपूर्वी 'तो असं का बघतोय' म्हणून पडलेलं सुतक वॉशरूमला जाऊन आल्यावर संपलं ..
पण पुन्हा तेच ....
केस मोकळे सोडले की तो बघतोय. मग मी हळूच लाजून, हाताने पुढे आलेली ती कुरुळी बट मागे घेते. हे थोड्यावेळासाठी तर मलाही रोमॅंटिक वाटत होतं. पण त्याची नजर माझ्या नाजूकश्या वाफेसारख्या तरळणार्या केसाच्या बटेकडे होती ? तो 'दुसरीकडेच' बघत होता. अर्थात त्याच्या अशा बघण्याने माझ्यावर होणार्‍या परिणामांच त्याला सुतक नव्हतं,तो आकंठ बुडालेला होता बघण्यात ........
मग मी हळूच लाजण्याचा बहाणा करून वॉशरूमला गेले, स्वतःला हे विचारण्यासाठी की तो खरेच योग्य आहे माझ्यासाठी ?
.
आमच्या मागे वाजणारी धून बंद झाली, त्याने समोरुन प्रश्न केला.
'चहा की कॉफी?'
विचारांच्या ओघात कॉफी मागवायची असून मी चहा मागवला...
त्या रेस्टोरेंटच्या बाहेर बिलकुल शुकशुकाट होता. सगळीकडे दमट आणि अंधुकसं वातावरण होत. मावळतीला पिवळसा रंग पसरलेला होता. थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी चहा-कॉफी प्यायला येणारे आणि ऑफीसची घोड-दौड करून आलेले असे मोजकेच लोक होते ..
नखांची नेलपेंट काढण्यात मी मग्न होते.
'तू एरवीसुद्धा शांतच असते का?' त्याने प्रश्न केला.
यावर मी त्याला विचारू का, तुम्ही एरवीसुद्धा असेच रोखून बघता का ...?
पण त्यानीच विषय बदलला ...
बघ.....मी आधीच सगळ सांगून टाकतो,'माझी एक गर्लफ्रेन्ड आहे . आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. लग्नानंतरही हे असच असेल.'
माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलत नाहीत. तो स्वतःतच गुंतुन सगळं एकसकट सांगत असतो ...
'आम्ही लग्नही करणार होतो, पण यू नो ना, जुन्या काळातले लोक. त्यांना एक सभ्य महाराष्ट्रीयन मुलगी लागते आणि त्यात तुझ्या वडलांचे आणि पपांचे खास संबंध. मग ठरलं हे सगळं. पण यात माझी चुक नाही, त्यांच्या आग्रहाखातर मी हे लग्न करणार आहे, त्यापेक्षा एक कर ना तूच नकार कळव...'
.
'आपल्याला निघायला हवं ....' मी म्हटलं.
'चल मी तुला सोडतो ...' त्याने उगाचच म्हणायचे म्हणून म्हटल.
नाही ,नको... मी जाईन.
बाय.. सी..यु सून.
.
बाय :)
.
इतका वेळ आवंढा गिळून बसलेली मी चालायला लागले. खूप रडणार होते मी. पण मला खरेच रडू येईना.
'मी रडावं का ?' किंवा 'का मी रडावं ? आणि तेही अशा व्यक्तीसाठी? ' या प्रश्नांची उत्तरं मी शोधत होते.....
मी मूर्ख होते का ? एवढ होऊनसुद्दा होकाराची अपेक्षा करत होते.
दोन दिवसांनी त्याच्याबाजुने होकार मिळाला .
लग्न ठरलं. सगळे खुश होते. घरातल्यांच्या डोक्यावरच ओझं हलकं झालं म्हणून मीही खुश होते.
'खुश होते मी ?'
.......
हो :)

घुटन...:|

by on डिसेंबर १९, २०१७
तो असा समोर बसलाय .. काय बघतोय देव जाणे ! पण मगाचपासून बिंदास्त निरीक्षण करतोय. अशी ताणताण उठेल नि त्याला विचारेल, की 'काय बघत आहात काह...
हृदयाच्या रंगमंचावर छेडलेला तो प्रयोग ... 
स्पंदनं मनात....शब्द ओठांवर... आणि प्रत्यक्षात ?


आज अचानक नाटकाला जाण्याचा योग आला ... मुळात मला व्यावसायिक अनुभवी व्यक्तिंपेक्षा स्ट्रगलर मुलांचे प्रयोग एकांकिका पहायला खरी मजा येते. कारण त्यांनी जीव ओतलेला असतो त्यांच्या त्या स्वप्नामध्ये आणि खुप अलगद सांभाळतात त्या प्रयोगातील प्रत्येक  हावभावाला, लहेजाला, लकबीला...
या एक्साइटमेन्टमध्ये सगळं शेड्युल आदल्या दिवशीच ठरलं होतं...
आज काम करत असताना सकाळी एका गृपशी नजरानजर झाली. स्वतःच्याच गप्पांमध्ये रंगत मी दुर्लक्ष केलं. दिवस नेहमीसारखाच गेला. नाश्ता जेवण करून मी आणि मित्र आम्ही दोघे एकांकिकेच्या ठिकाणी पोहोचलो. सगळा माहोल अप्रतिम होता. सगळ्यांची घाईगर्दी चालू होती. वेगवेगळ्या भावनांचे ते चेहरे जणू एक प्रयोग सादर करत होते असं सहज भासत होतं.
थंडीचे दिवस असल्यामुळे मला वॉशरुमला जायचं होतं, तेच शोधत गेले. तिथे एक मुलगी आधीपासूनच बाथरुम शोधत होती. ती अर्धवट मराठी-इंग्लिश देहबोलीची होती... हे वर्णन यासाठी की ती गेल्या ५ मिनिटापासून बाथरुमच्या समोरून येरझरा घालत होती. शेवटी तिने मला विचारलं, 'Do you know where is the washroom?'
मी म्हटले 'तुझ्यासमोरच आहे.' ती म्हणे यावर प्रसाधनगृह महिलांकरिता असं लिहिलंय. मग तिला सांगितले, बाथरुमलाच मराठीत प्रसाधनगृह म्हणतात. त्यावर मी खदखदा न हसता आम्ही दोघीनी मुकहस्याने पुढची जर्नी केली. हे आवर्जून लिहावंस वाटलं, कारण पहायला आलेल्या मराठी एकांकिकेत ती मला स्टेजवर काम करताना दिसली, आणि तेव्हा मात्र हसू आवरेचना...पण एकांकिकेत फार शुद्ध मराठी बोलली ती, त्यामुळे  हा प्रसंग विसरायला झालं.
हा प्रसंग विसरल्यानंतर तर खरी मज्जा आली.
तो सकाळी दुर्लक्ष केलेला मुळात दुर्लक्ष केलं असं भासवलं होतं, तो गृपही आला ना या एकांकिकेला ...
अहाहा! काय सुरेख सादरीकरण होतं ते. त्याच्या संहितेपासून पात्रांपर्यंत सगळंच परफेक्ट होतं ... खरंतर त्या नाटकाच्या मध्यातच या एकांकिकेवर रिव्युव्ह लिहिण्याच्या मूडमध्ये मी होते. पण ना एक 'पात्राने' त्या स्टेजवरच्या लाईटीच्या प्रकाशात माझ्या काळजात घर केलं. मग अख्खा रिव्युव्ह त्या एका पात्रावरच लिहायचं ठरलं...
तर झालं अस, ब्रेकमध्ये मित्र आणि मी जेवायला गेलो. श्या! जेवणाला काहीच चव नव्हती. उष्ट नको रहायला म्हणून मित्राला ताटातलं थोडं शेअर करायला लावलं... जेवण स्वादिष्ट नव्हतं हे खरं पण नंतरच्या किस्स्याने त्याला शंभरच्या पटीत खमंग केलं.. आमचं जेवण होत होतच आलं... आणि मागून ९-१० जणांचा गृप आला. मी आपलं जेवतच होते... आपल्याला काय फरक पडतो कोणी येवो न येवो...पुढच्या एकांकिकेतला एक शब्दही मिस नको व्हायला, म्हणून माझं भरभर खाणं चाललं होतं त्यामुळे बाकी सगळं गौण होतं.
ए पण.... पाहते तर काय? हा तोच.....
हा तोच, जो मी रंगमंचावर एका भरभक्कम 'भूमिकेत' पाहिला होता. तो प्रत्येकीसारखाच होता पण त्याच्या त्या भूमिकेने मला गराडा घातला ... रंगमंचावर सगळ्यांच्या गर्दीत असुनही तो एकटाच मला प्रकाशात दिसत होता...
त्याचा तो गोरा गोंडस गरगरित मुखडा, त्यात प्रयोगासाठी गालावर लावलेला ब्लश टिळा आणि ते डोळे... ते डोळे, त्यातले भाव इतके स्वच्छ ...
तो समोरच्या टेबलावर येउन बसला... माझ्या हातातला चमचा तोंडातच राहिला आणि 'युवर नाटक वॉज👌 ' मी लिटरली असं पडझडित बोलून मोकळी झाले...
त्याने त्याच राजबिंड्या दिमाखात 'थॅंक्यू सो मच' म्हटलं...
हाय ! ते थॅंक्यू....
ते थॅंक्यू या सगळ्या दिवसातला माझा आवडता शब्द ठरला. थोड्यावेळाने मला ऐकू आलं मित्र बॅकग्राऊंडला म्हणतोय, 'ए भूक्कड, तुला जात नाहीये बळजबरीने कशाला खातेयस? कितीही पाहिलस तरी तो काय डोळ्यात नाही बसणारे ..'
आह! आइ रिअली विश, डोळ्यात भरून घेता आलं असतं त्याच्या त्या बोलक्या डोळ्यांना.
खरं सांगू तर मला अजून भुक लागायला लागली असं वाटत होतं, तो असाच समोर बसावा. मी त्याला बघत बघत  खातच रहाव ... पण नाही ...
माझ्यातली मी जागी होउन मी तडक निघाले...
'मी तिथून निघाले तर होते, पण तो माझ्यातून बाहेर पडत नव्हता ..'
ती हुरहूर होती, ती त्याच्या आकर्षणाने इतकी तीव्र झाली होती. असं वाटत होतं की सगळं जग स्तब्द व्हावं आणि १० मिनिटांसाठी मी त्याला भेटून यावं, छान मैत्री व्हावी आणि फक्त आणि फक्त त्याच्या प्रत्येक नाटकानंतर त्याने माझ्या कॉंप्लिमेंटची वाट पहावी. बस्स एवढं सरळं साजेसं आणि गोंडस असावं सगळं त्याच्यासारखंच....
श्या ! ही मोहमाया माणसाला वेडं करून टाकते. हे सगळ झालं म्हणून मला चहा पण बरा लागेना...
मित्राला म्हटलं 'चहात गुलकंद टाकलंय वाटतं... '
'आहे त्या गुलकंदातून बाहेर ये. सगळं छान लागेल ... ' हे खडूस उत्तर त्याने दिलं. त्यामुळे मी थोड सावरायचा प्रयत्न केला खरा! पण तो व्यर्थच ठरला म्हणायचं.
शेवटी खूप विचार केला आणि त्याचं नाव शोधायचंच ठरलं. सगळे सीन चित्रपटाच्या कथेसारखे पुढे सरकत होते. जिथे सगळा  खेळ माझ्या हातात होता . योगायोगाने सकाळी माझ्या कामाच्यावेळी हातात आलेल्या पॅंपलेटमध्ये त्यांच्या नाटकाचे नाव दिसले ... एकांकिकेचे दिग्दर्शक, सन्हितालेखक सगळं पाहिल्यानंतर अंदाज लावून,  त्यातलं त्याला साजेसं असं नाव निवडलं आणि फेसबुकला सर्च केलं...... आणि
हो ....
हो...
हो... मला त्याचं प्रोफाइल मिळालं.. पुन्हा तोच चेहरा... हायें मैं मर जावा ... केवढा गोंडस आहे तो ...
त्याला मेसेज करावा, सगळं सांगावं, छान कौतुक करावं, त्याआधी फ्रेंडरिक्वेस्ट पाठवावी यातलं मी काहीच केलं नाही, कारण माणूस जवळ आला की माणसावरून काम कसं हे ठरवलं जातं. त्या कलेची ती शुद्ध पोचपावती प्रांजळपणे दिली जात नाही. मला त्याची ती कलाकृती आणि त्यातला  कलाकार अमर ठेवायचा होता आयुष्यात...
आणि आमच्या त्या दोन सेकंदांच्या, दोन शब्दांच्या अदलाबदलीवरुन प्रेमात नाही रे पडता येतं...स्टेजवर त्या लाइटच्या धुरात तो कितीही सुरेख दिसत असला तरी, माझ्या आयुष्याच्या धुरात सूट नाही होणार तो .... कारण मला माहितीये प्रेम आणि आकर्षण. आणि मला हेही माहितीये, 'एक क्षण भाळण्याचा, बाकी सगळे सांभाळण्याचे.'
पण मला या सगळ्याचा बिलकुल पश्चाताप नव्हता. कारण दिग्दर्शक, संहितालेखक,सेटअप मॅनेजर, प्रोड्युसर, आणि हिरोईनही होते मी माझ्या कल्पनेची.
माझ्या मनातला हा प्रयोग उत्तम रंगला होता.
त्याला शोधणं, त्याचं एकाच दिवसात सकाळी सायंकाळी भेटणं. नजरानजरेतून एकमेकांचे ॲटीट्यूड शेअर करणं आणि शेवटी वेगवेगळ्या टेबलवर समोरासमोर बसून दिवस एका रोमॅन्टिक प्रियकरप्रेयसीसारखा घालवतोय हे डोळ्यांनीच पोहोचवणं.
उलट मी खुश होते. कारण माझ्या आयुष्यातलं हे नाटक मी हवं तेव्हा जगण्यासाठी माझ्या आठवणीच्या शिदोरीत भरून घेतलं होतं.
आणि त्यामुळेच आयुष्यात एखादं पात्र असंच होऊन जावं, जे कलाकृतीपेक्षा कलाकार वर्णायला भाग पाडेल.. माझ्या आयुष्यातलं हेच ते पात्र.
प्रेमात सगळ्यांच्याच पडते मी.... पण प्रत्येक माणूस आयुष्यात आयुष्यभर राहतो असं नाही आणि तो ठेवूही नाही. काही व्यक्ती खास आठवणीतच असाव्यात....  

हृदयाच्या रंगमंचावरचा तो प्रयोग ...

by on डिसेंबर १७, २०१७
हृदयाच्या रंगमंचावर छेडलेला तो प्रयोग ...  स्पंदनं मनात....शब्द ओठांवर... आणि प्रत्यक्षात ? आज अचानक नाटकाला जाण्याचा योग आला ... मुळात म...
टेबलावर कसलाच केओस नव्हता. फक्त एक पेन, डायरी आणि काॅफी....
शेवटची ओळ टाइप करुन फिनिशिंग लाईनलाच होते, तितक्यात काॅफीच्या बुडबुड्यांनी मला खुणावल्यासारखं वाटलं... आपलं मन प्रत्येक गोष्टीत नवखं शोधत असलं की, हे भास खरे वाटतात. मलाही मॅजिकसारखं खरं वाटलं. त्यानंतर खरी मजा आली.
वि हॅड डेट. आम्ही डेटवर गेलो..
ऑफकोर्स आय & कॉफी...
इट वॉज इन्नोवेटिव्ह ... येस .. ट्रस्ट मी इट वॉज इन्नोवेटिव्ह .. ! त्या बुडबुड्यांतील कॉफीच्या धुराळ्यातून वाट काढत काढत मी इतकी दूर गेले की त्यातून मागे येणं कठीण होऊन बसलं.
काॅफीने अचानक प्रश्न केला.
"तुझ्यासाठी कॉफी काय आहे? लोकांसाठी दोन चमचे साखर, दूध, कॉफीसॅशे मग त्यात गोडव्यासाठी रोमॅंटिक तो आणि ती. हे मिश्रण म्हणजे काॅफी? यापलिकडे जावून मी वेगळी कोणीच नाही का ..? तुला काय वाटतं..?"
"..उम्म्मम ....कॉफी...कॉफी... कॉफी... अगदी खरं सांगू ? याआधी नाही केला गं मी पण हा विचार म्हणजे बघ हां सहज लिहायचं झालं तुझ्यावर, तर काॅफी एक असं वर्तुळ आहे जिला कुठल्याही सीमा नाहीत,परिघ नाही आणि कोणत्याही अर्धवट त्रिज्येचा आधार नाही. एका शब्दात सांगू तर स्वतःच्या सौंदर्याने नटलेली ती एक इंन्स्पिरेशनल स्त्री आहे ... ते पूर्ण वर्तुळ तुझं तु एकटीने व्यापलंय. होय! स्वातंत्र्याचं आणि पॅशनचं फक्कड काॅंबिनेशन म्हणजे तु आहेस .."
"वाॅव .... जस्ट वाॅव... याहून खास मी असूच शकत नाही. किती सुंदर बनवलंय तु मला ....पण माझ्या व्याख्येने तु कधी इंन्स्पायर झालीयेस का गं?"
त्यावर आइ वाॅज लाइक "व्हाॅट.?" माझ्या चेहऱ्यावर स्थिर भाव दिसल्यावर तीनेच कन्टिन्यू केलं...
"म्हणजे जसं मी म्हणजे स्वातंत्र्याचं आणि पॅशनचं फक्कड काॅंबिनेशन...तसं तु कोण आहेस ...?. तुझं स्वातंत्र्य, तुझं पॅशन काय आहे...?"
तिच्या त्या प्रश्नावर माझं अनुत्तरित राहणं सहाजिक आणि तिला अपेक्षित असावं....
"वेल ग्रांन्ट मी टू टेक युवर लिव." ती घाईत होती किंवा कदाचित तिला जे सांगायचं होतं ते सांगून झाले होते त्यामुळे ती निघाली आणि त्यामुळेच मीही थांबवलं नाही तिला..
जाता जाता ती म्हणाली,
"एक लक्षात ठेव तुझ्या आजूबाजुलाच तु स्वत: सापडशील. माझी व्याख्या बनताना बघायचंय मला तुला. शोध "..एवढं बोलून ती लुप्त झाली....
पण तिच्या त्या एका प्रश्नाने वादळ केलं... आयुष्यात योग्य मार्गदर्शक हवा असतो, तो मला योग्य वेळी मिळाला...खूप विचार नाही करावा लागला मला, कारण खर्रच माझी व्याख्या माझ्या भोवतालीच होती....
मला माझी कॉफी सापडली "माझं लिखाण."
खरं सांगायचं तर, मच्युर्डपणाच्या व्याख्येत मी कुठेच बसत नाही. नात्यांबद्दलचा चाललेला बाजार मला जमत नाही. दुनियेची पारख, माणसं ओळखता येणं यापैकी मला काहीच जमत नाही म्हणजे मला माणसांमध्ये राजकारण करता येत नाही त्यामुळे असे बक्कळ भरमसाठ अनुभव नाहीत. ही गर्वाने मिरवण्याची गोष्ट नाही, याला आताच्या भाषेत हुशार लोक बावळटही म्हणतील.
पण हरकत नाही जसं त्यांच्यासाठी मी बावळट, तसं माझ्यासाठी ते ...? छानच.
असो.. !
पण आतापर्यंत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आणि आवडत आली ती म्हणजे,
'जो मजा स्ट्रगल में है ना बॉस, वो दुनिया के किसी कोने में नहीं ...'
सुरुवातीला मोठ्या प्रमाणात नवी होती मी लिखाणाच्याबाबतीत, तशी आजही आहे. पण आता लोकांना माझं लिखाण किमान कळेल इथवर तरी पोहोचले आहे.
काल एकाने सुचवलं,
"कर ना यार सुरुवात बाद का बाद में देखेंगे. सूरू कर ब्लॅाग. जस्ट थिंक ही एकमेव गोष्ट अशी असेल ज्याच्या पायापासून घडणीपर्यंत सगळं तु केलेल असेल. काय माहीत काहीतरी अचंबा घडेल यातूनच. लिह तू बिंदास, कोणी नाही वाचलं तरी मी वाचेल आणि समजा मीही नाही वाचलं तर तु स्वतः आहेच कि. तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान मी नाही अनुभवणार तर अजून कोण ?" माझे डोळे आणि माझ्या लेखणीतलं हे टची संभाषण होतं. मी शांतपणे ते ऐकत होते कारण मला त्यांच ते मेहनत घेणं मनापासून आवडत होत. यशस्वी होण्यात मजा आहेच, शंकाच नाही, परंतु यशस्वी झाल्यानंतर एकवार मागे डुंकून बघितलं कि वाटतं, यार ते स्ट्रगलींगचे दिवस यापेक्षा मुरलेले नि छान होते.
ए पण वरवर छान दिसतं एखाद पान बघायला पण ब्लॅीग बनवणं हे काय सोप्प काम नसत हां...जोशाजोशात सुरुवात तर केली मी. ते तर असं झालं, स्वत:च घर तर घेतलयं पण आता सगळ्या वस्तु योग्य ठिकाणी बसवणं सुरुवातीला एक्साइटींग होतं पण नंतर प्रोब्लेम्स येऊ लागले....ए पण घर सजत गेलं ना, तस तस आनंदाची कळी खुलत खुलत सगळं प्रभुल्लित करुन गेली हे मात्र खरं ....
या डोळे आणि लेखणीच्या संभाषणात मला माझी कॉफ़ी सापडली. जिथे स्वतःच्या अस्तित्वाचा गंध दरवळतो, कुणाच्या नसण्याने तिथे फरक पडत नाही, कुणाच्या फुटकळ आधाराची गरज लागत नाही आणि महत्वाचं म्हणजे आनंद होतो स्वतःचे विचार एका स्वच्छ नितळ कागदावर शब्द म्हणून बुडवताना. लेखणी कशी वळते माहीत नाही परंतु पहिला नंबर आल्यानंतर जो आनंद नाही व्हायचा तो आनंद एक छोटी पण 'माझी कल्पना' कागदावर रंगवताना होतो. मग त्या प्रवाहाला दिशा नसते. काहीही आठवतं नि बेभान वादळासारखं मी लिहीत सुटते. कधी कधी या गडबडीत शब्दांचे प्रवाह हातातून निसटतात खरे! पण मला आनंद वेगळाच असतो, कारण मला शब्दांचं जाळ हवंय. पण भावना आणि शब्द यात मला निवड करायला लागली तर भावना पहिल्या पायरीवर ठेवते. आणि जिथे भावना अगणित आहेत, तिथे कधी कधी शब्द नसले तरी हरकत नसते, परंतु समोरच्यापर्यंत मी आणि माझी भावना तितक्या आग्रहाने पोहोचायला हवी, हेही महत्वाचं.
हे सगळं मनाला पटलं. माझी कळी खुलली,कुणासाठी नाही पण स्वतःसाठी लिहिल ठरलं... म्हणून हा प्रयत्न कम प्रयोग......
चियर्स फाॅर दॅट इंन्स्पिरेशनल स्ट्रगलींग काॅफी.....|


ऑन अ डेट विथ काॅफी.....

by on नोव्हेंबर ०४, २०१७
टेबलावर कसलाच केओस नव्हता. फक्त एक पेन, डायरी आणि काॅफी.... शेवटची ओळ टाइप करुन फिनिशिंग लाईनलाच होते, तितक्यात काॅफीच्या बुडबुड्यांनी मल...
आज तब्बल २ वर्षांनी, रात्री २ वाजता अचानक त्याचा फॉरवर्ड मेसेज आला.
२ वर्षांनीसुद्धा लोक मेसेज पाठवतात, हे मला फार जास्त काल्पनिक वाटायचं. पण त्याचा मेसेज आल्यावर माझाही विश्वास बसलाय.
मग काय..? मध्यंतरीच्या काळात घडलेल्या वाटचालीबद्दलचा उगाचचा औपचारिकपणा झाल्यानंतर आम्ही आमच्या मूळ स्वभावावर आलो.
मी: मला तो मुलगा आवडतो. त्याच्या प्रपोजलचा मी स्वीकार करणार आहे. तुही एखाद्या मुलीवर खरं प्रेम कर रे आता !'
तो : ए मला तूच हव. दुसरी कुणी नको.
मी: बघ मला मुलगा आवडलाय. मी त्याला हो म्हणणार आहे. पुन्हा म्हणायचं नाही तुला प्रियकर आहे वगैरे.
तो: बघ मी नेहमीच तुझ्या भावनांचा आदर करतो, यावेळीही करेल. मला तुझा निर्णय मान्य असेल.
मी: खरंतर तुम्ही दोघे 'मिळून' माझ्यासाठी परफेक्ट आहात. त्यामुळे मला दोघे चालतील. काय करू ?
तो: (चिडलेल्या स्वरात) 'नाही.... तुला एकालाच कुणालातरी निवडावं लागेल.
मी: अहाहा असं का... ? तूच तर म्हणालास, माझा निर्णय तुला मान्य असेल... मग आता ? माझ्या भावनांचा आदर करणार नाही तू ?
तो: अगं पण अस नसतं ना... दोन होड्यांमध्ये बसून नदी पार नाही करता येत.
मी: पण मला समुद्र बघायचा आहे. तोही एका बाजूला तु एका बाजूला तो असा. तर ?
दोन मिनीटांच्या भयाण शांतते नंतर न राहवून मीच मेसेज केला.
मी: 'ए खरं सांगू ... आजही तु पजेसिव असुरक्षित झाला कि भलताच क्युट दिसतोस यार...'
तो: 'ए खरं सांगू ... मला अजूनही तु तितकीच आवडतेस. समुद्र आपण दोघेच बघू ना..'
ह्याह्याह्या...

प्रेमावर लोक खूप खुप काही लिहतात, बोलतात. मलाही प्रेम म्हणजे 'तुमचं आमचं सेम' चा प्रकार वाटायचा. पण आज कळलं प्रेमातली निरागसता, प्रेमाचं सौंदर्य आणि स्वच्छपणा कायम राहिला कि मग ते प्रेम कितीहि वर्षांनी माघारी येऊ दे, ते तितकंच पजेसिव्ह, ताजं, आणि महत्वाचं म्हणजे 'प्रेम' असतं.

बरसोंबाद भी वो प्यार...

by on ऑक्टोबर ३१, २०१७
आज तब्बल २ वर्षांनी, रात्री २ वाजता अचानक त्याचा फॉरवर्ड मेसेज आला. २ वर्षांनीसुद्धा लोक मेसेज पाठवतात, हे मला फार जास्त काल्पनिक वाटायचं....


"बोलक्या तुझ्या ओठांतून माझा क्षण मी चोरून घेते,
बोल घरी सांगु का कालचा गुलाब तू दिला होतास ?"


काही न बोलून काही होणारे का.? काहीतरी तर बोल.
काल पाऊस पडला त्यामुळे आपोआपच घरच्यांना सगळं कळलं. त्यात तू तो गुलाब वहीत घालून दिलास.
बाबांनी तपासली कि वही...
मला म्हणे 'फुलवाले पण गुलाब द्यायला लागले वाटतं ?'
मग काय..? बोलावं लागलं खोटं.
"बाबा... फुलवालेच तर गुलाब विकतात."
मग त्यावर पुन्ह: प्रश्न, "विकतात ..? हा गुलाब फुलवाल्याकडून विकत घेतलेला नाही दिसते."
"काय बाबा तुम्ही पण ... तुमच्या मुलीला काही आवडलं तर ती ते विकत घेऊही नाही शकत का ?" मी अतिशहाणपनात म्हटलं.
"म्हातार्याला तरुणपणाचं खोटं विकणं पाप आहे मुली.' बाबा मस्करीत म्हटले. तिथेच तु जिंकलास. बाबा खूप इमोशनल होतात रे.....

म्हणे,"सांग तुझ्या त्या काट्याला... खर्या गुलाबाला नीट जप म्हणावं.
आणि ए माझ्या गुलाबा ...पुढच्यावेळी फुलवाल्यालाही घेऊन ये सोबत.... बघु तर दे माझं चोरलेलं गुलाब कसं जपणारे ते ..."
त्यामुळे पुढच्यावेळी तु घरी ये बिंदास्त ... आणि हो सोबत गुलाबाचं उत्तर घेऊन ये. बाबा खूप हळवा आहे , कठोर होईल त्या क्षणी. बाकी गुलाब का फूल उनके लिये भी लाना जरुर,क्या पता तुम्हें पसंद कर ले |

वहीतला गुलाब...

by on ऑक्टोबर ३०, २०१७
"बोलक्या तुझ्या ओठांतून माझा क्षण मी चोरून घेते, बोल घरी सांगु का कालचा गुलाब तू दिला होतास ?" काही न बोलून काही होणारे क...

स्पर्श वेगळा, प्रेम वेगळं .
ती रात्रही वेगळीच होती.
त्याने केलेला स्पर्श अंगाला झाला मनाला नाही.
तो स्पर्श माझ्या संवेदनेला कुरवाळणारा नसून त्याची गरज भागवणारा होता....
आणि शहारा येण्याऐवजी घीण आली मला ...
मी जोरात किंचाळले,"दुर हो माझ्यापासून....
आज तुझे हात घाणेरडे आहेत, कारण आज तुझं मन नाही तुझं शरीर मला स्पर्श करतंय.
इंटिमसी नाही, आज ओढाताण आहे तुझ्या श्वासांत.
मला दुर लोट आताच्या आता नाहीतर तुझ्या श्वासांत मी गुदमरून जाईल....."
"अग्ग .. आत्ताच तु म्हणालीस ना, मला सुरक्षित वाटतंय तुझ्याबरोबर, मग ?
"सुरक्षित वाटतं म्हणजे लगेच तु तुझ्यातल्या वासनेला जागं करायचं नि माझ्या परवानगीविना जवळ खेचायचं मला ?"
तुझ्यासोबत सुरक्षित वाटतं म्हटलं खरं .... पण तो क्षण तु जपावा म्हणून.... कदाचित तु त्याचा फायदा घेतोयस (?)"
क्षणभर माझाच माझ्यावर विश्वास बसेना....ज्याच्यावर निरागस प्रेम केलं तोच .........?
पेटलेल्या या वणव्यानंतर त्याला बाहेर काढून मी घट्ट दार लावून घेतलं......
अपेक्षप्रमाणे दरवाजात रडत बसण्यापेक्षा चुकीच्या व्यक्तीसाठी घरंगळलेले अश्रू 'पुसून' टाकले. सुस्कारा सोडला नि स्वतःच्यादोन्ही हाताने स्वतःला कुशीत घेतलं, कुरवाळलं त्याच्याविना...... ❤️




तुला स्पर्श कळायला हवा...

by on ऑक्टोबर ३०, २०१७
स्पर्श वेगळा, प्रेम वेगळं . ती रात्रही वेगळीच होती. त्याने केलेला स्पर्श अंगाला झाला मनाला नाही. तो स्पर्श माझ्या संवेदनेला कुरवाळ...

सांडल्या पूजेच्या ताटाला अपशकुनी मानणार्‍याणा काय सांगू ,.......
नितळ पाण्यात कुंकु पडलं तरी तिचं मुख, केसावरची ओली लट नि सडपातळ देह अक्षरशः तरतरीत बोलकी फ्रेम दिसावी इतकी ती बेदाग होती.
अशा सौंदर्याच्या कैदेतून स्वतःला सावरत तिचा मऊ हात हातात घेत त्यानं अलगद विचारलं ....
"फिरसे शादी करोगी मुझसे?"
उधळल्या त्या अपशकुनी कुंकवात,
ती अशी काय लाजरीबुजरी झाली कि, त्याची पापणी तिच्या नेत्रांच्या दवात तशीच गुंफून राहिली.
तिचं लाजणं इतकं काही सांगून गेलं कि, त्याला पुन्हा काही विचारावसही वाटेना. तो मनमुराद त्याच्या 'स्वर्गात' गढून गेला.
त्या विखुरल्या कुंकवाच्या नि तांदळाच्या दाण्यात ती दोेघे मनसोक्त पहुडले...
अपशकुनाचा साधा लवलेशही नव्हता ... ❤

अपशकुन...?

by on ऑक्टोबर ३०, २०१७
सांडल्या पूजेच्या ताटाला अपशकुनी मानणार्‍याणा काय सांगू ,....... नितळ पाण्यात कुंकु पडलं तरी तिचं मुख, केसावरची ओली लट नि सडपातळ देह...

अशाच एका संध्याकाळी वैतागून गच्चीवर जावं. मावळत्या सूर्याकडे बघून साऱ्या आयुष्याचा हिशोब मांडावा. 
घोंगावणाऱ्या माशीला दूर सारावं , एकवार पुन्हा त्या आग शांत झालेल्या सूर्याकडे पाहावं नि आयुष्याची भग्न चौकट द्यावी त्याच्या नावे करून.
एक सुस्कारा टाकावा, इतक्या दिवस नश्वर वाटणाऱ्या वार्याला कवेत घ्यावं,स्पर्श करावा, आकाशाकडे पाहावं नि पुन्हा एकदा सज्ज व्हावं रिकाम्या झालेल्या पटावर फासा टाकण्यासाठी.
या मावळत्या वीराकडे बघून एक मात्र शिकले,
जिंदगी इतनी भी खुदगर्ज नहीं जितना हम समझतें है। 
कभी कभी चलने के चक्कर में हम रुकना भूल जाते है , बिलकुल वैसेही जैसे खुशियां बटोर देते है ख़ुशी पाने के लिए ॥

आयुष्याचा हिशोब...

by on ऑक्टोबर ३०, २०१७
अशाच एका संध्याकाळी वैतागून गच्चीवर जावं. मावळत्या सूर्याकडे बघून साऱ्या आयुष्याचा हिशोब मांडावा.  घोंगावणाऱ्या माशीला दूर सारावं ,...