घुटन...:| - Sufi

घुटन...:|

तो असा समोर बसलाय .. काय बघतोय देव जाणे ! पण मगाचपासून बिंदास्त निरीक्षण करतोय. अशी ताणताण उठेल नि त्याला विचारेल, की 'काय बघत आहात काही प्रॉब्लेम आहे का ?'
पण नाही.... कोणाला बघायला जाताना अस नाही ना बोलत ... ?
काही माणसं न सांगता बघतात. त्यांना बोलता येतं. पण लग्नासाठी सांगून बघतात, त्यांना नाही नं बोलता येत ?
तो अकरावा मुलगा होता, बघण्यासाठी आलेला. त्यामुळे घरचे आधीच खूप त्रस्त होते.
'आता मिळेल तसा मुलगा स्वीकारायचा,तू नाही बोलायचच नाही. त्याच्या होकाराची फक्त वाट पाहायची. ' हा सूर एव्हाना माझ्या अंगवळणी लागला होता. त्यामुळे दोन मिनटांपूर्वी 'तो असं का बघतोय' म्हणून पडलेलं सुतक वॉशरूमला जाऊन आल्यावर संपलं ..
पण पुन्हा तेच ....
केस मोकळे सोडले की तो बघतोय. मग मी हळूच लाजून, हाताने पुढे आलेली ती कुरुळी बट मागे घेते. हे थोड्यावेळासाठी तर मलाही रोमॅंटिक वाटत होतं. पण त्याची नजर माझ्या नाजूकश्या वाफेसारख्या तरळणार्या केसाच्या बटेकडे होती ? तो 'दुसरीकडेच' बघत होता. अर्थात त्याच्या अशा बघण्याने माझ्यावर होणार्‍या परिणामांच त्याला सुतक नव्हतं,तो आकंठ बुडालेला होता बघण्यात ........
मग मी हळूच लाजण्याचा बहाणा करून वॉशरूमला गेले, स्वतःला हे विचारण्यासाठी की तो खरेच योग्य आहे माझ्यासाठी ?
.
आमच्या मागे वाजणारी धून बंद झाली, त्याने समोरुन प्रश्न केला.
'चहा की कॉफी?'
विचारांच्या ओघात कॉफी मागवायची असून मी चहा मागवला...
त्या रेस्टोरेंटच्या बाहेर बिलकुल शुकशुकाट होता. सगळीकडे दमट आणि अंधुकसं वातावरण होत. मावळतीला पिवळसा रंग पसरलेला होता. थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी चहा-कॉफी प्यायला येणारे आणि ऑफीसची घोड-दौड करून आलेले असे मोजकेच लोक होते ..
नखांची नेलपेंट काढण्यात मी मग्न होते.
'तू एरवीसुद्धा शांतच असते का?' त्याने प्रश्न केला.
यावर मी त्याला विचारू का, तुम्ही एरवीसुद्धा असेच रोखून बघता का ...?
पण त्यानीच विषय बदलला ...
बघ.....मी आधीच सगळ सांगून टाकतो,'माझी एक गर्लफ्रेन्ड आहे . आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. लग्नानंतरही हे असच असेल.'
माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलत नाहीत. तो स्वतःतच गुंतुन सगळं एकसकट सांगत असतो ...
'आम्ही लग्नही करणार होतो, पण यू नो ना, जुन्या काळातले लोक. त्यांना एक सभ्य महाराष्ट्रीयन मुलगी लागते आणि त्यात तुझ्या वडलांचे आणि पपांचे खास संबंध. मग ठरलं हे सगळं. पण यात माझी चुक नाही, त्यांच्या आग्रहाखातर मी हे लग्न करणार आहे, त्यापेक्षा एक कर ना तूच नकार कळव...'
.
'आपल्याला निघायला हवं ....' मी म्हटलं.
'चल मी तुला सोडतो ...' त्याने उगाचच म्हणायचे म्हणून म्हटल.
नाही ,नको... मी जाईन.
बाय.. सी..यु सून.
.
बाय :)
.
इतका वेळ आवंढा गिळून बसलेली मी चालायला लागले. खूप रडणार होते मी. पण मला खरेच रडू येईना.
'मी रडावं का ?' किंवा 'का मी रडावं ? आणि तेही अशा व्यक्तीसाठी? ' या प्रश्नांची उत्तरं मी शोधत होते.....
मी मूर्ख होते का ? एवढ होऊनसुद्दा होकाराची अपेक्षा करत होते.
दोन दिवसांनी त्याच्याबाजुने होकार मिळाला .
लग्न ठरलं. सगळे खुश होते. घरातल्यांच्या डोक्यावरच ओझं हलकं झालं म्हणून मीही खुश होते.
'खुश होते मी ?'
.......
हो :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा