चित्रपट सुरू होतो, बघते तर काय
"आताची पिढी नाही हो जास्त थिएटर, नाटकाकडे वळत. आमच्या काळात... " असं म्हणत म्हणत निम्म्याहून अख्खं चित्रपटगृह तरुणाईने भरलं होतं. आजचा आणि कालचा बदल अनुभवायला.
" ... आणि काशीनाथ घाणेकर" बघायला.
पिढी घटकानघटका निर्माण होते, बदलते. त्यामुळे बदल ठरलेला. पण म्हणून कला बदलत नाही, नष्ट होत नाही, तिची रूपं बदलतात...
जगतो, वाढतो, धडपडतो, प्रेक्षकांच्या लायक बनतो, माज करतो, वावरतो आणि तो बनतोच तितक्यात त्याचा प्रयोग संपतो, आणि तो होतो काशिनाथ घाणेकर ...
"बालगंधर्व रंगमंदिरात आधी रांगा लाऊन तिकिटे तेही दररोज नाटक आणि लोक गर्दी करायचे. आज ती मजा नाही राहिली.." हा संवाद आणि ही सगळी चित्रफित जेव्हा समोरुन जाते, तेव्हा वाटतं, दाखवावं यांनाही की आजही नामांकित करंडकं पटकाऊन गर्वात कॉलेजभर फिरतात मुलं.
याशिवाय, चित्रपटात दर्शविलेले वाडे, पोशाख, दोन वेण्या, जुने कॅमेरे, तसच संगीत, तेच त्या काळाला साजरं असं एडिटिंग, तोच ठेहराव बघताना शेजारच्या प्रेक्षकाला टाळलं तर तुम्ही रमून जातात.
छान सुरेख आपल्या भारतीय संस्कृतीत साजेसा असा काशिनाथ असतो. श्रीमंत, देखणा, डोळ्यांत घारा रंग, गोरी गरगरीत त्वचा, नाकावर माज, आणि पाठीशी लग्न करायला म्हणून घरच्यांच्या हट्टाची डॉक्टर ही पदवी.
सुरुवातीला एका कटमध्ये समोर घडणारं सगळं प्रत्येक संसारी पुरुषबाईच्या आयुष्यातलं. 'घरोघरी मातीच्या चुली' वाटतं. पण जेव्हा सगळी दुनिया दावणीला टांगून आतला कलाकार घानेकरांणा
डिवचू लागतो, स्वस्थ बसू देत नाही तेव्हा, तो बाहेर इतरांनाही जाणवतो. मिसेस घाणेकरांनाही जाणवू लागतो तो.
कलाकाराच्या संसारी आयुष्यात त्याला समजणारा जोडीदार नाही, मन असावं लागतं. त्या जोडीदाराला रादर मनाला एक कला यायला हवी स्वतंत्र, नाहीतर निदान तो प्रेक्षक असावा, रसिक. तसं नसल्यास त्याची मिसेस घाणेकर होते.
मिसेस घानेकरांचं म्हणणं तसं योग्य होतंच, " दुसऱ्या बाईकडे गेलेला माणूस परत घरी तरी येतो, नाटकात गेलेला माणूस परत येत नाही..." वाक्य नाही, संवाद नाही हे वास्तव होतं. पण कसा येणार तो माणूस आपल्या कलेतून बाहेर.? एकतर तो प्रामाणिक राहू शकतो, नाहीतर समाजातला ढोंगी...
शेवटी बायको सोडून जाते.
मुळात चित्रपटाची मजा तेव्हा येऊ लागते, जेव्हा तुम्ही घाणेकर खऱ्या अर्थाने पचवू लागतात.
मुख्य नायकाच्या भूमिकेतील आणि घाणेकर उर्फ सुबोध भावे. सुरुवातीला वाटतं, 'हा मेंघळट आहे, याला नाय जमायचं. हा आणि घाणेकर?'
असं म्हणतच सुरुवातीला नकारात्मकता स्वीकारत भावे उत्तमरित्या मोठा होत जातो, आणि जसजसं तो मोठा होतो तसतसे तो कलेला, त्याच्या पॅशनला ज्यापद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, ते इतर सुबोध भावेपेक्षा वेगळं ठरतं. तो आवडत जातो हळूहळू.
बायको सोडून जाण्याआधीच कांचन त्याच्या आयुष्यात येते.
कांचन आणि घाणेकरांची कथा पडद्यावर बघणं सुंदर वाटतं.
कांचन ही ती फिलींग आहे जेव्हा आपल्याला माहिती नसतं आपण कुणालातरी आवडतोय...आणि आपण बेफिकीर वावरत असतो. कांचन हे पात्र असतंच आयुष्यात, नाही?
ती कांचन होती.
आणि काशिनाथ होताच तसा प्रेमात पडण्यासारखा.
कलाकार नाही तरी निदान प्रेक्षक होता आलं पाहिजे, प्रेक्षक कांचन होती.
चित्रपटाच्या मध्यावर मला प्रश्न पडतो की, कांचन हवीच का आयुष्यात?... जी सांगेल तुम्हाला की, 'तुम्ही गर्दीत हरवताय...'
कांचन घाणेकरांच्या आयुष्यात आली.
जेव्हा आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीच्या जवळ, खुप जवळ जात असतो. आपलं मन हेलावतं, कसलातरी सुखद विचार करुन हा क्षण लांबवावा असा खेद करत मागे जावं वाटतं का? घाणेकर जातोही, धाडसी वाटायला लागतो घाणेकर तिथे, पण त्याच अगतीकतेने वाऱ्यासारखे माघारी वळून तो तिथेच कवेत घेतो कांचनला.
तिथेच घडतं रंगमंचामागचं ते घाणेकरांचं पहिलं चुंबन... तिथे वापरलेेेला कॅमेरा हा खास आवडला.
त्यानंतर घाणेकरांची बायको निघून जाते, कांचन मिळत नसते.
प्रेम मिळत नसतं तोवर माणूस त्यासाठी जीवही द्यायला तयार असतो. घाणेकर तर नाटक सोडायला तयार होणार होते. कांचन बायको नव्हती तोवर ती प्रेयसी होती, प्रतिक्षेनंतर जेव्हा लग्न होतं तेव्हा तिची गृहिणी झाली. त्यांच्या नात्यात पुढे औपचारिकताच उरते.
मनात चालू राहतं,
जो कलाकार कधीतरी दुसऱ्यावर अवलंबून सुरुवात करतो, तोच हळुहळू घडवतो पुढे कित्येक रोजगार, कित्येक कलाकार, कितीतरी प्रेक्षक पण जेव्हा तो इतरांना घडवायला लागतो, तेव्हा मात्र स्वतःला घडवायचं विसरून जातो...
आतापर्यंत चित्रपटात तसं सगळं गोडीगोडी साजरंसंगीन चालु असतं....
चित्रपटाचं मध्यांतर होतं आणि चित्रपट मनात चालू असतो आणि कल्पना येतेच की आता खरी घाणेकरांची ( किंवा मग कलाकाराची?) वाताहत सुरू होणार. 'नटसम्राट' ची कुठेतरी घाणेकरांबरोबर तुलना सुरू होते.
पण मी तसं करणं टाळते.
दोन वेगळ्या कलाकारांचा धर्म 'नाटक ' असला तरी आयुष्य आणि तेथील त्यांचं जगणं यांची सरमिसळ करणं हा त्यांच्या मेहनतीचा अपमान ठरला असता.
चित्रपट पुढे पुढे सरकत जातो.
तेव्हा गर्विष्ठ घाणेकरांतून बाहेर येत घाणेकरांची
वेगवेगळी रूपे समोर येत जातात. त्याच्या भोवताली असणाऱ्या माणसांचं आयुष्य, त्याच्यामुळे बदललेले ते लोक यांची पात्र नवखणाण्यासारखी ठरतात. पंतांपासून, त्यांच्या सेवकापर्यंत. काहीकाही नाजूक ठिकाणी पंत खूप भावतो मनाला. कलेतल्या 'कलाकाराची' कदर करणारे खूप कमी असतात, पंत त्यातले होते, शेवटपर्यंत राहतात. हे बघण्यासारखं वाटतं.
मध्यांतर होतं,
आणि घाणेकर पर्वाच्या अस्ताकडे चित्रपट जातो,
वाटतं जेव्हा कलाकार आपटतो धाडकन, तेव्हा तो नाटकाची पाटी लिहिणारा माणूसही बेदरकार क्षणभरही विचार न करता त्या नाट्यगृहाबाहेरील फलाकावरचं ते प्रसिद्ध नाव खोडतो, त्याच्या त्या फडक्याने. तो आय ओपनर असतो त्या प्रयोगाच्या यशाचा, अपयशाचा आणि त्या कलाकाराचा.
त्यामुळे लोकप्रियतेची नशा चढावी पण भिनु देऊ नये. नाहीतर स्वतःच स्वतःत बेचिराख होणं मान्य करावं लागतच.
.......
एक खरा कलाकार नेहमी एका खऱ्या ' प्रेक्षकाच्या' शोधात असतो, त्याची वाट तो प्रत्येक प्रयोगाला त्याच आतुरतेने पाहत असतो. त्याच्यासाठीच हा काय तो अट्टाहास असतो त्याचा.
जेव्हा कलाकार नाकारला जातो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने स्वतः कडे बघतो, शोधतो आणि घडतो.
असं झालं नाही तर अपयश त्याला माहित नसतं त्यामुळे तो स्वतःला लोकांसमोर केवळ ' दाखवत '
असतो, शो ऑफ, फक्त बहिरुप्या म्हणून कुणाचातरी!
याशिवाय चित्रपटाचं संगीत:
"दोन वयातील जाई का अशी गंधाळली...." किंवा मग "सभोवती नसे कुणी लाजते मनात मी...." किती सहज, सोप पण खास गायलंय ते. आमचे सर म्हणायचे, सोप्प लिहिणं जास्त अवघड असतं. आणि तितकंच ते गायलाही अवघड पण तितकंच ते चटकन मनाचा ठाव घेणारं वाटलं मला.
कलाकृती घडते तेव्हा;
लेखक लिहितो, शब्द ऐका हां,
"समशेर संभाजीचं शस्त्र नव्हतं स्वभाव होता..."
म्हणजे कित्ती सुंदरपणे नटाला ते समजावून सांगावं, हा संवाद मला खेचून घेतोच. पण 'रायगडाला जाग येते तेव्हा...' हे शीर्षक जेव्हा लेखकाला सापडतं, आनंद तो कुठला हिरा कोळशातून मिळाला यापेक्षा वेगळा नसतो. बास्स एक शब्द आणि आनंद ... केवढी वेगळी संपती आहे ही, आतला आनंद देणारी....सगळा खेळ शब्दाशब्दाने फिरतो इथे. माणसाआधी इथे महत्व येतं, तुम्ही तुमच्या आतील कलेशी किती बांधिलकी ठेवतात याला.
अपयशाच्या वेळी व्यक्ती जेवढे विचार करतो तेवढे तो एका दिवसातही करत नसेल हे घाणेकरांच्या प्रत्येक अपयशावेळी उलगडत जातं.
याच जगातील आणखी एक सत्य म्हणजे
कलाकारासारखा मूडी माणूस जगात कुठेच नाही, कुठ्ठेच नाही...
आणि त्यावर शाप म्हणजे रंगभूमीवर प्रत्येक दिवसाचा ' मॅन आॅफ दि मॅच' बदलणारा. त्यामुळे कलाकाराला रोज नवं काहीतरी द्यावच लागतं. साचलेपण येऊन चालत नाही कला. नाहीतर त्याच्या कलेची डबघाई सुरू होते, मरत जातो तो, भिकार होतो तो याच कौतुकात.
त्यासाठी कलाकाराने जपावं स्वतःला. नाहीतर मध्याननंतर त्यांचा एकतर डॉ. श्रीराम लागू होतो नाहीतर ...आणि घाणेकर. कला म्हटलं की स्पर्धक आले. प्रत्येक कलाकारासाठी त्याचा तो खोचक बिंदू ठरलेला असतो.ज्याचा एक शब्द किंवा एक टिंबही मनाला लागतो. घाणेकरांसाठी ते डॉ. लागू होते. लागूंनी ही कलेची स्पर्धा छान, सुरेख आणि खेळकर ठेवली.
याशिवाय, रंगमंचा'मागे' घडणारं कुठे टिपलं जात नसलं तरी या चित्रपटात मात्र हेच दाखवण्याची धडपड केलेली दिसते.
तसेच लेखक, नटांची भांडणं कायमचीच. प्रयोग कथेमुळे हाऊसफुल झाला की अभिनयामुळे हा लेखक- नटांतला सौदाच जणू!
-----
चित्रपट शेवटावर येतो,
आणि
घाणेकर तिथेच संपतो, जेव्हा ध्वजनिधीसाठी तो खूप जास्त पैसे त्या मुलीच्या हातावर ठेवतो. ती खुश होते. ती म्हणते, एवढे? ... तो ' ठेव ' म्हणतो. तोही खुश होतो. तेव्हा ती आनंदाने सगळ्यांना बोलावते आणि विचारते नाव काय तुमचं? ...
कलाकाराचा माज, साज, आणि आतापर्यंतचं सगळच एका प्रश्नाने संपतं. पैशाने श्रीमंती दाखवता येते, मनाने श्रीमंत होता येत नाही.
आणि म्हणून वाटतं, प्रेक्षकाच्या हाताखालची कठपुतली असतो कलाकार. प्रेक्षक त्याला विकृतपणे जगवू शकतो आणि मारुही शकतो. त्यामुळे कलाकाराने माज करूनच घ्यावा त्याच्या हक्काचा असतो कारण असही कलाकारासाठी एकच अनादिकाळापर्यंत सत्य उरतं, ते म्हणजे,
--------
कलाकाराची माती होते,
शेवटी फक्त कला उरते....
( हा चित्रपट आत्मचरित्रपट असला तरी ' घाणेकर 'मला ठावूक नाहीत म्हणून चित्रपट मला आवडत जातो.)
#बघावाच_असं_काही_नाही_पण_बघावा_असा_आहे
- पूजा Dheringe