छपराखालचा पाऊस !!!
लहान होते मी, तेव्हा माझ्यासारखाच छपरावरचा पाऊस पत्र्याच्या त्या छतावर ताडताड उड्या मारायचा ... खेळायला, बागडायला, दंगा करायला त्याला ही पत्र्याच्या छपराचीच खोली बरी आवडायची...? प्रश्न नाही पडायचा मला. पण मग कधी इतकं इतकं नाचायचा की छप्पर तुटून त्यातून स्वतःला त्या खोलीत पाडायचा... पाऊस हातावर घ्यायचा हे मोठ्या लोकांचे चोचले !
पावसा, तु पडताना पाहून आत कामात गुंतलेली ती स्त्री घाई करत तुला तिच्या टोपलीत झेलायची. तु पडणार अजून पडणार, बेदम जोरजोरात पडणार. एक दोन करत करत दहा बाय दहाच्या त्या खोलीत २५-३० छिद्र करणार. ती कुठल्याही तक्रारीविना, तीन थेंबाना मिळून एक भांड लावणार, त्या तुझ्या तसुभर पण मौल्यवान थेंबाला झेलायला.तुझं त्या एवढुश्या छपराखाली हे असं रॉयल स्वागत व्हायचं नं मला तीची धावपळ बघवायची नाही. तुला इथेच का पडायचंय म्हणून राग यायचा तुझा. पाऊस सुखावतो, पिक मोठं करतो, शेतीसाठी पाऊस जीव असतो. हे मोठेपण मला कळायचं नाही, मला तो 'माझ्या छपरावरच का पडायचा?' हा प्रश्न 'बदला घ्यावा त्याचा' इतका जवळचा वाटायचा .
त्या खोलीतच मग एखादा चुकून न गळणारा कोपरा शोधून ती माउली मला अभ्यासाला बसवायची . माझे डोळे तिच्या तुझ्यासाठी चाललेल्या धडपडीने गरगर फिरायचे. तिची कळकळ समजायची "अभ्यास कर गं बाई माझी...!" आणि तितक्यात पुढे बघत पुस्तकाच्या त्या पानावर "पावसाच्या सरसर सरी हातावर घेऊ ..." या कवितेच्या ओळी ढोंगी वाटायच्या. ..
आता दिवस बदलले,... पावसावर रोमॅन्टिक कविता कराव्या वाटल्या तरी वास्तवात तो तितकाच हिडीस, निर्दयी वाटतो कधीतरी. त्याचं हे रुप अशा या छपरांखाली भेटतं.
"छप्पर असूनही ओसाड आकाश त्या छपरातून खाली पडलेलं असतं... "
तरीही अशावेळी दूर कुठेतरी हातात कॉफीचा मग, रोजनिशी, पार्करची लेखणी, डोक्यावर सिमेंटचं मजबूत छप्पर, वर अजून मजबूत घरं आणि अशा ठिकाणी खिडकीच्या शेजारी खुर्ची टाकून या पावसाला पाहताना असे दोन चार सुखी शब्द सापडणारा माझ्यासारखा कुणीतरी सहज असतो . कारण त्या चार भिंतीत हा पाऊस त्याच्या डोळ्यांनी पाहता येतो, बाहेर डावा हात काढून, ते थेंब त्या हातावर झेलून उजव्या हाताने त्याला आहे तसं लिहिणं सहज सोप्प असतं कारण तो माझ्याकडे अंगावर येणारा नसतोच. भातलावणी करणारा शेतकरी फोटो काढायला फ्रेमिंग म्हणून छानच वाटतो. पण त्यापलीकडचे कष्ट, त्यामागचं स्ट्रगल खोल असतं, या सुरक्षित चार भिंतीत चार ओळी लिहिण्याइतपत त्याची खोलीही नसते.
कला फक्त निसर्गात आहे... बाकी कलाकार आपल्याला कला येते हे ढोंग उत्तम करतात.
आज सुरक्षित ठिकाणी बसून,
"छपराखाली आसरा शोधणाऱ्यांना थोडं ज्ञान द्यावंस वाटतं,
छपराखालीही हा असा पाऊस पडतो सांगून टाकावंस वाटतं..."
#Unavoiding_reality
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा