Sufi: डॉ. आंबेडकर
डॉ. आंबेडकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डॉ. आंबेडकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

उशीर झाला थोडासा, पण आज एैतवारी काहीतरी पहावं म्हणून लॅपटॉपवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिका लावली.
मध्यंतरी भ्रमंतीच्या वेळी एका हॉटेलात ही मालिका मोठ्या रसिकतेने चालू होती. मालिकेत चालू असलेले शाळेतील एक दृश्य पाहून मन थबकल होतं. शिवाय, आंबेडकर हे आजवर दलितांचे, संविधानाचे आणि अस्पृश्यांचे... इथवर माझी नि त्यांची समाजाने करून दिलेली ओळख होती.
त्या पलीकडे ना ते माझ्या वाट्याला आले ना मी त्यांच्या वाट्याला गेलेले. पण आज वाटलं ते यामुळे की पत्रकारिता शिकताना बऱ्याचदा शाहू, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. त्यांच्या मूकनायक, बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचा नमुना पाहिल्यानंतर मनाची उत्सुकता जाणून घेण्याच्या शिगेला पोहोचलेली.
त्या माणसाने जे केलं होतं, ते आजही कुणी करायला धजावत नाही... कारण ज्याप्रमाणे त्या माणसाला त्याच्या लहानपणी या जाती व्यवस्थेचा शिकार व्हावं लागलं तसं आता होता येत नाही. आताची परिस्थिती ही काही बरी नाही. पण वेगळी आहे.
मनात हे थोडेफार विचार चालूच होते. तेव्हा आईने विचारलं, "काय लावतेस?"
तिला सांगितलं, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर..."
परंपरागत चालत आलेल्या विचार साच्याने तिनेही तितकीशी स्वीकारार्हता दाखवली नाही. पण तरीही मी माझा निर्णय अढळ ठेवला.
सुरुवात केली... मालिकेत पुल देशपांडे यांच्या चित्रपटात भूमिका साकारलेला सागर देशपांडे दिसला. आई म्हणाली, हा तर देशपांडे चित्रपटातला दिसतोय.
तेव्हाच मलाही क्लिक झालं. मग मालिका सुरू झाली, सुरुवात ही आंबेडकरांच्या विचारांनी, संविधानाने आणि नंतर हळूहळू शाहू महाराजांच्या भेटीने होते.
शाहू महाराजांच्या भेटीतून उलगडत जातात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे जीवन पैलू.
"सैन्य भरतीत अस्पृश्याना बंदी" हा नवा निर्णय जेव्हा जाहीर केला जातो तेव्हाच जन्म होतो भीमरावचा... नि सुरुवात करतानाच आंबेडकर म्हणतात, माझा जन्मच 'अन्यायाच्या' दिवशी झाला. तेव्हा या अन्यायासाठी जन्मणार वादळ कसं असतं, याची प्रचिती येण्यासाठी खऱ्याखुऱ्या वादळाची चाहूल प्रसूतीच्या दृष्यातून साकारली जाते.
तेव्हा सुरू होतो, लहानग्या भीमाचा प्रवास. त्यात येणारी वादळे, नि वादळांपेक्षाही आपल्या सारख्याच देहाच्या माणसांकडून मिळणारी वागणूक आणि त्या वागणुकीतून लहानग्या जीवाला पडणारे असंख्य बोचक प्रश्न.
"महार म्हणजे काय रे आनंदा? किंवा बाट म्हणजे काय? मग उच्च जाती म्हणजे कोण आणि आपल्या अंगाला घाण लागलेली असते का?" या प्रश्नांचा संच इतका बलाढ्य आहे की एखाद्या व्यक्तीचं आयुष्य टोकाला नेऊ शकतं. ही वागणूक आपल्याला दिली तर? एवढा कचरत विचार माझ्या मनात आला नि माझा प्रवास मी आंबेडकर म्हणून सुरू केला. त्या मालिकेतला आंबेडकर केवळ बघण्यापुरता म्हणून तरी जगून पाहू अशी धारणा मनी केली आणि बघू लागले.
कारण जेव्हा दुःख आपलं होतं तेव्हा सगळचं योग्य वाटतं. तेव्हा खरा चटका कळू लागतो, चटक्याचा त्रास होऊ लागतो.
हा चटका लागतो, जेव्हा आर्मीतील रिटायर्ड शिक्षक म्हणजे वडील रामजी जात समजू नाही म्हणून त्यांचं सकपाळ आडनाव बदलून गावाच्या नावावरून ' अंबवडेकर' आडनाव लावतात... या अंबवडेकरने दिवस सरू लागतात, पण आता भीमाला शाळेत टाकण्याचा दिवसही समोर येतो. वडील भीमा आणि आनंदाला शाळेत नेतात. शाळेतील मास्तर गुरुजी म्हणजे आंबेडकर गुरुजी यांच्याकडे ते प्रवेशाची चौकशी करतात. नाव - आडनाव सांगेपर्यंत गुरुजी नेहमीसारख्याच मूडमध्ये असतात. पण जेव्हा शालेय पटावर 'जात' टाकणं अनिवार्य असतं, तेव्हा मात्र रामजी ' महार ' म्हणतो. तोच गुरुजी म्हणतात "ठीके ठीके, उद्यापासून त्यांच्या सोबत बसणं द्या आणि शाळेत पाठवा.!"
भिमजी आणि आनंदपासून मुले आजूबाजूला पळतात, दूर बसू लागतात, स्वतःच्या डब्ब्यातला खाऊ देत नाही, खेळायला घेत नाही, कचरा टाकतात, तू शिवला तर तीनदा अंघोळ करावी लागेल म्हणून मनावर जातीचा पगडा घट्ट करू लागतात... असं पोळणारं वास्तव, त्या वास्तवाचे निखारे इतके का कठोर की खरा जाळ इतका पोळत नसेल... अन् इथून सुरू होतो प्रवास भिमारावाचा!
या ऐतवारी लावलेल्या या मालिकेने जास्त काही नाही, मनोरंजनाच्या या प्रयत्नांमुळे किमान घरातली माय हे पाहू लागली, तिला गोडी लागली. तिला त्या लहानग्या भिमात नि त्याला सोसाव्या लागणाऱ्या वेदनेत तिचं मुल दिसलं, तिला त्या समाजातील लोकांच्या वागणुकीची कणव आली, तिला राग आला, द्वेष आला, माणूस म्हणून तिने मला मोठं केल्याचा अभिमान हळूहळू बळावत चालला. तिने तिच्या मुलींच्या विचारांचा मजला आंबेडकर विचारांचा केल्याचा तिला अभिमान वाटला. जोपर्यंत प्रत्येक समजातल वास्तव समोर येत नाही, नि त्यातली अढी सुटत नाही, तोवर हा समाज एकमेकांपासून जातींच्या किडीने किडत जाणार. त्याला एकत्र करायचं असेल तर प्रत्येक धर्माला मनापासून स्वीकारणं जमायला हवे, आणि या बदलाची सुरुवात ' स्व_पासून करायला हवी. जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या जातीला बनुनही पाहता येतं तेव्हा आपल्याला माणूस होता येतं. कारण प्रत्येक धर्माचा संघर्ष वेगळा निर्माण झालाय, त्या समाजातला माणूस एकसंध सांधायचा असेल तर त्यासाठी हे छोटे छोटे बदल स्वीकारायला हवे.
हे बदल इतके स्वीकारायला हवे की एकेक जात मुळासकट नष्ट होऊन लाल रक्तसारखा समाज उरायला हवा, आडनाव नाही, ना त्याला चिकटून येणारी जात. जे उरावं ते निखळ नि माणूस म्हणून एकमेकांना प्रेरित करणार असावं!
कारण खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे!